आम्ही ‘संज्या छाया’ नाटकात तुम्ही आणि निर्मिती सावंत यांची जुगलबंदी पाहायला आतूर आहोत. सहकलावंत म्हणून निर्मिती सावंत यांच्याबद्दल तीनच शब्दांत सांगा असं सांगितलं तर ते शब्द कोणते असतील?
– रसिका वेलणकर, अंधेरी
अतिशय उत्तम अभिनेत्री
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला? उत्तम, अतिउत्तम, सर्वोत्कृष्ट, बरा, ठीकठाक की निराशाजनक?
– अनिल बेटावदकर, पुणे
ठीकठाक
‘पुष्पा’ या सिनेमातून गुन्हेगारांचं उदात्तीकरण होतं, त्यामुळे त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी काही मान्यवरांनी केली आहे. सिनेमा हा संस्कारवर्ग असतो का? आपल्याला आवडत नाही, तो सिनेमा न पाहण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. लोक बिघडतील, हे ही मंडळी परस्पर कसं ठरवतात?
– चिन्मय बोरावके, सांगली
तुम्हीच उत्तर दिलंयत… आपण कुठलीही कला कशासाठी पाहतो आणि आपल्यावर संस्कार काय आहेत, यावरही खूप अवलंबून आहे.
ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे?
– जोसेफ फर्नांडिस, उत्तन
ते किती चढली आहे त्यावर अवलंबून आहे.
आयुष्यात सुखी राहण्याचा मूलमंत्र काय आहे?
– गणेश बाजारकर, चुनाभट्टी
कुणाकडून किती अपेक्षा ठेवाव्यात, यावर किती सुख मिळणार हे कळतं.
‘तेरी झलक अशर्फी, श्रीवल्ली, बाते मोदक बर्फी’ हे ‘पुष्पा’ सिनेमातलं गाणं म्हणजे प्रेमकाव्य आहे, फारसी बखरीतलं वाक्य आहे की मिठाईच्या दुकानातला बोर्ड आहे?
– बेंजामिन चौलकर, अलिबाग
नका मनावर घेऊ एवढं.
इतिहासातली एक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी तुम्हाला मिळणार असेल, तर कोणाला निवडाल?
– फातिमा शेख, सातारा
राघोबादादा
व्हॉट्सअॅपवर गुडमॉर्निंग, गुड इव्हनिंगचे मेसेज पाठवणारे, मेसेंजरवर ‘जेवण झालं का’ असं विचारणारे ओळखीचे, अनोळखी लोक तुमच्या मित्रयादीत आहेत का? अशांच्या बाबतीत काय करता?
– नामदेव कांडके, श्रीरामपूर
हो आहेत की… दुर्लक्ष करायचं!
फेसबुकवर एखाद्या विचारधारेच्या विरोधात काही लिहिलं की बरेच लोक तुटून पडतात, भयंकर गलिच्छ भाषेत ट्रोलिंग करतात. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का?
– संपत मोरे, प्रभादेवी
खूपदा
भारतीय लोक लोकशाहीला लायक नाहीत, असं विन्स्टन चर्चिल म्हणाला होता. तुम्ही त्याच्याशी सहमत आहात की असहमत?
– किरण मोने, चेंदणी, ठाणे
कुठेच लोकशाही पूर्णपणे रुजू शकत नाही… कारण भांडवलदार, सरंजामशाही वृत्तीचे लोक ती रुजू देत नाहीत… आपली लोकशाही तरूण आहे… ती प्रौढ व्हायला वेळ जाईल… फक्त ती बालिश होऊ नये एवढीच इच्छा आहे.
राजकारण हा बदमाशांचा अड्डा आहे, असं म्हणून सभ्य माणसं राजकारणापासून दूर राहायला लागली तर देशाचं कसं होईल?
– अमिता येरूणकर, बिरवाडी
आता जे होतंय ते!
‘संज्या छाया’ नाटकात तुम्ही प्रेक्षकांना हसवणार की रडवणार?
– विनोद जोशी, घाटकोपर
दोन्ही उलट सुलट करणार!