अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू वृश्चिकेत, शुक्र-मंगळ धनूमध्ये, बुध-शनी-प्लूटो मकरेत, रवी-गुरू-नेपच्युन कुंभेत, चंद्र कन्येत- सप्ताहाच्या मध्यास तूळ आणि वृश्चिकेमध्ये.
दिनविशेष – २० फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थी, २५ फेब्रुवारी रोजी रामनवमी, २६ फेब्रुवारी रोजी विजयास्मार्त एकादशी…
मेष – ठप्प झालेली कामे आता मार्गी लागणार आहेत. राश्यांतर झालेल्या रवी-बुध यांच्यामुळे व्यावसायिक मंडळींना चांगले लाभ मिळतील. व्यवसाय वाढीस लागेल. अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढेल. घरात, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदार्या खांद्यावर येतील. त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना नव्या योजना तयार कराव्या लागतील, त्यात ते सफल होतील. दाम्पत्यजीवनात आनंदी आणि उत्साही वातावरण राहणार आहे. कौटुंबिक सहलीचे नियोजन होईल. परदेश दौर्याचे योग जुळून येतील. विवाहइच्छुकांसाठी उत्तम काळ रहाणार आहे.
वृषभ – कुंभेचा रवी त्यासोबत असणारा गुरू यांच्यामुळे नवीन वास्तूचे लाभ होणार आहेत. काही मंडळींना कौटुंबिक वडिलोपार्जित मालमत्तेच्या माध्यमातून चांगले लाभ होतील. शनी भाग्यात असल्यामुळे वकिलांना महत्वाच्या निकालांमध्ये यश मिळेल. व्यसनापासून दोन हात लांबच राहा. अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. चैन-मौजमजा करण्यासाठी पैसे खर्चू नका. सिनेमा-नाटक क्षेत्रातील मंडळींना आठवडा चांगला जाणार आहे.
मिथुन – येत्या आठवड्यात तुमचा सर्वाधिक वेळ धार्मिक कार्यक्रमांत जाईल. कुंभेत राश्यांतर करून आलेला रवी, त्यासोबत गुरू यामुळे हा योग जुळून आला आहे. घरात एखादे पारायण कराल. सामाजिक कामामुळे मानसन्मानाचे योग जुळून येतील. सन्मानपत्र मिळेल. व्यवसायात घवघवीत यश मिळेल. मंदिराच्या कार्यासाठी सढळ हाताने मदत कराल. परदेशात नोकरी, व्यवसायासाठीच्या प्रयत्नांत यश मिळेल. संततीसौख्य लाभेल. मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.
कर्क – कभी खुशी कभी गम याचा अनुभव या आठवड्यात येईल. कोणतेही काम सहजासहजी पूर्ण होणार नाही, त्यामुळे चिडचिड होईल. सकारात्मकतेचा प्रभाव दिसणार नसला तरी काही चांगल्या घटनांचे संकेत मिळतील. पेराल तसे उगवेल असा अनुभव या आठवड्यात येईल. अष्टमेश शनी सप्तमात, षष्ठात शुक्र-मंगळ युती त्यामुळे आपला वीक पॉईंट ओळखून काम करा. व्यभिचारी लोकांपासून सांभाळा. वैवाहिक जीवनात अडचणी उद्भवतील.
सिंह – रवीचे सप्तमातील भ्रमण, रवी-गुरू शुभयोगात त्यामुळे उत्तम योग जमून येत असल्याने या आठवड्यात मनासारखी कामे होतील. कार्यक्षेत्रात मानसन्मानचे प्रसंग येतील. सरकारी सेवकांना पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. साहित्यिक, प्राध्यापकांसाठी उत्तम काळ आहे. महिलावर्गाला आरोग्याच्या तक्रारीचा सामना करावा लागू शकतो. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पचनक्रिया बिघडण्याचे संकेत आहेत.
कन्या – काही दिवसांपासून नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी चांगले लाभ होत आहेत. भविष्यात मोठा फायदा मिळवण्यासाठी काही नियोजन केले तर ते यशस्वी होईल. वरिष्ठांच्या कृपेमुळे काही सकारात्मक बदल घडतील. काही मंडळींना मामाकडून चांगला फायदा मिळण्याचा योग आहे. शनी-बुध पंचमात, सुखस्थानात शुक्र आणि मंगळ यामुळे हाव आणि दुष्कर्म टाळा. स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्याचा गळा कापण्याच्या फंदात पडू नका, अविश्वासास पात्र ठराल.
तूळ – पंचमस्थानात रवी-गुरू, पराक्रमात लग्नेश शुक्र-मंगळ त्यामुळे कला-क्रीडा यांच्या माध्यमातून चांगले लाभ होतील. कलाकारांसाठी लाभदायक आठवडा आहे. धार्मिक क्षेत्रात-आध्यात्ममार्गात असणार्या मंडळींना परमार्थाची संधी चालून येईल. योगकारक शनी चतुर्थात, बुधासोबत पितृकृपेच्या आशीर्वादाने कामे पार पडतील. घरामध्ये धार्मिक कामे पूर्ण होतील. नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने लांबचे प्रवास होतील. भावंडांचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक – काही संस्मरणीय घटनांचा अनुभव येईल. प्रसिद्धीचा अनुभव मिळेल. स्थावर मालमत्तेच्या माध्यमातून चांगला लाभ संभवतो. शेती व्यवसाय करणार्या मंडळींना हा आठवडा चांगला जाईल. स्वतंत्र व्यवसाय करणार्यांसाठी उत्तम काळ राहणार आहे. दळणवळण, प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात असणार्या मंडळींसाठीही चांगला काळ आहे. आर्थिक आवक चांगली राहिल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. लेखन, प्रकाशनाच्या माध्यमातून काहींना लाभ होतील. प्रवासाचे नियोजन नीट करा, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल.
धनु – नशिबाला भाग्याची साथ मिळून अडकलेली कामे चुटकीसरशी पूर्ण झाली, असे चमत्कार या आठवड्यात अनुभवयास येतील. कामाच्या निमित्ताने प्रवास होतील. समाजोपयोगी कामाची मुहूर्तमेढ रोवाल, नव्या कामाची दमदार सुरुवात होईल. आर्थिक आवक चांगली राहील, तरी पैसे खर्च करताना विचार करा. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कामाला चांगली गती मिळेल आणि त्यासाठी आवश्यक परवाने मिळण्याची वाट सुकर होईल.
मकर – साडेसातीचा काळ सुरू आहे. शनिला बुधाची जोड, धनस्थानात राश्यांतर करून गेलेला रवी, सोबत गुरू यांच्यामुळे आतापर्यंत डोक्यावर असणारा ताण काही प्रमाणात कमी झालेला असेल. व्यवसायासाठी नवीन कल्पना सुचतील. त्या पूर्ण करण्यासाठी खिशातून काही पैसे खर्च करावे लागतील. कुटुंबासाठी पैसे खर्च होतील. सहलीचे नियोजन कराल. शेअर, सट्टाबाजारामधून झटपट पैसे मिळवण्याचे धाडस करू नका, नुकसान करून घ्याल. पैसे खर्चताना खबरदारी बाळगा.
कुंभ – सुखस्थानात राहू, दशमात केतू, राशिस्वामी शनी व्ययस्थानात, त्यामुळे पाठीमागे लागलेली शुक्लकाष्ठं कमी होण्याची चिन्हे नाहीत. जपून पावले टाका. निर्णयक्षमता कमजोर होईल. लग्नात गुरू-रवी युती असल्यामुळे न डगमगता धडाडीचे निर्णय घ्यावे लागतील. त्यातून काही प्रमाणात आर्थिक आवक राहील. शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास घडतील. उंची वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च होतील. विवाहेच्छुकांना चट मंगनी पट ब्याह याचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही.
मीन – गुरूसोबत रवीची साथ मिळणार असल्यामुळे उत्तम संधी मिळेल. घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घ्या. या ना त्या कारणामुळे काही मंडळींची पगारवाढ लांबणीवर पडेल. नोकरीच्या निमित्ताने परप्रांतात जावे लागेल. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना चांगले आर्थिक लाभ मिळतील. कोणतेही काम करताना फाजील आत्मविश्वास टाळा. वित्तीय क्षेत्रातील मंडळींना परदेशात काम करण्याची संधी चालून येईल.