पूर्वीपासून माझ्या घरी रोज येणारा माझा मानलेला परममित्र पोक्या अलिकडे अधूनमधून येतो. प्रेमात पडल्यापासून आणि लग्न ठरल्यापासून त्याच्यात झालेला हा बदल पाहून मला आता खरोखरच भीती वाटायला लागली आहे. माझ्या धंद्यातल्या भागीदाराला मला मुकायला तर लागणार नाही ना, अशी शंकासुद्धा कधी कधी मनात येते.
परवाच घरी येऊन गेला, पण तेव्हासुद्धा त्याचं माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष नव्हतं. स्वत:च्या विचारातच असल्यासारखा होता. मधूनच हसत काय होता, लाजत काय होता, हातवारे काय करत होता. मी त्याला खूष करण्यासाठी भारतातील अनेक राजकीय नेत्यांच्या प्रेमप्रकरणांची माहिती सांगत होतो. तर तो मला विदेशी राजकीय नेत्यांच्या गाजलेल्या प्रेमप्रकरणांची आणि लफड्यांची माहिती सांगू लागला. मध्येच त्याने गाणे गायला सुरुवात केली- ‘प्यार किया तो डरना क्या, प्यार किया कोई चोरी नही की, छुप छुप के आहे भरना क्याऽऽऽ’ बहुतेक तो स्वत:ला सलीम आणि पाकळीला अनारकली समजत असावा. प्रेमात अडथळे आले की अशी अवस्था होते, हे मला त्याचा अनुभव नसला तरी माहीत आहे. पण याचा रस्ता तर साफसुथरा होता. काडीचाही अडथळा या दोघांच्या प्रेमात आणि लग्नात येणार नाही, याची सर्व जबाबदारी माझी आहे, हे मी त्याला समजावून सांगितलं.
म्हटलं, तुमची प्रेमपत्रांची ऐतिहासिक मालिका चालू आहे ना? की तुझ्याकडील प्रेमाच्या खजिन्याचा शब्दरांजण रिकामी आणि निकामी झालाय, ते मला सांग. म्हणजे मी तुला गाजलेल्या प्रेमपत्रांची आणि शेरोशायरीची आणखी पुस्तकं पुरवतो. मग दे तुझ्या बुद्धीला चालना आणि घाल छान छान प्रेमपत्रांचा रतीब. एकदा आखाड्यात उतरल्यावर कुस्ती सोडून पळायचं नसतं. परवाचा `चॉकलेट डे’ आणि `व्हॅलेंटाईन डे’ पाकळीबरोबर साजरा केलास की नाही? नसशील केला तर अजून कर. `देशी-विदेशी चॉकलेटसचा स्टॉक मी पाठवतो तुम्हा दोघांसाठी. मग बसा एखाद्या बागेत किंवा चौपाटीवर हवेबरोबर चॉकलेट खात आणि प्रेमिकांचा तर लग्नाआधी प्रत्येक दिवस `व्हॅलेन्टाइन डे’च असतो आणि लग्नानंतर प्रेमाची भरती ओसरली की अनेकांचा `क्वारंटाइन डे’ असतो. ती वेळ तुझ्यावर येऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण तू विचारात वेळ वाया घालवू नकोस. मला तुझ्या एका शेजार्याकडून कळलंय की तू घरात फक्त झोपा काढत असतोस.
मी एवढं बोलल्यावर पोक्या उसळला आणि म्हणाला, हे बघ टोक्या मी पलंगावर झोपलेला दिसलो तरी माझं चिंतन सुरू असतं. अधून मधून आम्ही गप्पाही मारतो. त्यात फक्त प्रेमाचा आणि लग्नाचाच विषय नसतो तर बायडनपासून ट्रम्पपर्यंत आणि मोदींपासून आपल्या तिरकीट भूमैय्यापर्यंत अनेक विषयांपर्यंत आम्ही बोलतो. पुण्यात त्याने स्वत:च स्वत:ला पाडून घेतलं आणि शिवसैनिकांनी आपल्याला तुडवलं अशी प्रतिक्रिया देऊन हाताच्या कोपराला मार लागल्याचं सांगत हाताला प्लॅस्टिकचं बँडेज बांधून प्रेस कॉन्फरन्स घेतली. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. तो आपला मित्र असला तरी त्याच्या खोटारडेपणाला सीमा नाही. आपण ईडीच्या धाडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांच्याशी मैत्री केली. त्याशिवाय आपली पूर्वीची दादागिरी, टर्रेबाजी आणि आपलं महान समाज कार्य त्याला ठाऊक असल्यामुळे तो आपल्याला टरकून असतो. आता तर त्याचा तोलच सुटलाय. काय वाटेल ते बरळत असतो. धमक्या काय देतो, नकला काय करतो. सारंच विचित्र. हे असंच वाढत चाललं तर एक मानसिक रूग्ण म्हणून त्याच्यावर उपचार करावे लागतील.
अलिकडेच पाकळी घरी आली असता तिच्याशी बोलता बोलता विषय निघाला आणि समाजात मानसिक रूग्ण वाढत चालल्याची बातमी त्याचवेळी आल्यामुळे आपण अशा रुग्णांसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल बांधूया असं तिनं सुचवलं. कारण तिने मेडिकलला असताना मानसोपचार तज्ज्ञाची डिग्री मिळवली होती. पण पुरेशा पैशाअभावी तिला दवाखानाही उघडता आला नाही. तिची इच्छा आणि नवं सामाजिक कार्य म्हणून आपण दोघांनी सुसज्ज मेंटल हॉस्पिटल बांधूया आणि त्याचं उद्घाटनच तिरकिट भूमय्या आणि इंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करूया. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि त्यांच्यावर मोफत उपचारही करूया. त्यांना आपली ही आयडिया नक्कीच आवडेल. आणखी एका गोर्या पेशंटलाही बोलावू. मला वाटतं हातून सत्ता गेली की राजकीय नेते वेडेपिसे कसे होतात हे तर आपण पाहतच आहोत. वाईट वाटतं त्याचं. जेव्हा फुललेली, बहरलेली पालवी फुलांसह उन्हाने करपते तेव्हा त्या फांदीची काय अवस्था होत असेल! तसाच या सत्ताभ्रष्टांचा जळफळाट चालला आहे. त्याला उपाय नाही. त्यामुळेच आरोप-प्रत्यारोपांचा हा गदारोळ उडाला आहे. त्याकडे फारसं लक्ष देऊ नये असं मला वाटतं. तीन पक्षांची सत्ता तर पाच वर्षं राहणारच आहे. काही दिवसांनी जड पारडे पाहून उलटी भरती सुरू होईल. मग बसा नवीन फेकाफेकीला काय विषय मिळतात ते पुढच्या निवडणुकीसाठी.
बँक खात्यात १५ लाखाऐवजी मला वाटतं आता २५ लाख टाकण्याचं आश्वासन देतील. ती आश्वासनं ऐकूनच कंटाळा आला. आपण आपलं आणि पाकळीचं मनोरुग्णालयाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या कामाला लागूया. तोपर्यंत ही मंडळी ठार वेडी झालेली असतील. आमच्या लग्नाच्या विषयामुळे एका नव्या विषयाला चालना मिळाली ही काय कमी झालं? शेवटी चांगल्यातून चांगलंच निघतं. येतो आता.
पोक्या चांगली आयडिया देऊन गेला. आता उद्या आपल्याला वेड लागलं तरी काळजी नको!