अशी आहे ग्रहस्थिती
राहू -हर्षल मेषेत, मंगळ (वक्री) वृषभेत, केतू – तुळेत, रवि-बुध -शुक्र वृश्चिकेत, शनि -प्लूटो मकरेत, नेपच्युन कुंभेत, गुरु मीन राशीत. दिनविशेष – २३ नोव्हेंबर रोजी दर्श अमावस्या, मार्गशीष मासारंभ.
मेष – येत्या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी तुमची धावपळ वाढणार आहे. आपल्या सहकार्यांचे काम अंगावर पडू शकते. त्यामुळे चिडचिड होईल. मनाची अस्थिरता वाढू शकते. कामाला विलंब झाला म्हणून नकारात्मक प्रतिक्रिया देणे टाळा. त्यामधून नवीन वाद निर्माण होऊ शकतो. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. त्याकडे दुर्लक्ष करू नका. मार्गी शनि भ्रमणामुळे व्यवसायात कामाची गती मंदावलेली दिसेल. पण काही प्रमाणात सकारात्मक बदल झालेले दिसतील. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मार्गी गुरुचे स्वराशीतील भ्रमण त्यामुळे अध्यात्म, ध्यानधारणा, चिंतन यामध्ये वेळ देताल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. चमचमीत पदार्थ खाण्याचे टाळा. व्यवसायात नवीन संधी येतील, भविष्यात त्यामधून चांगला फायदा मिळू शकतो.
वृषभ – कुठे प्रेम प्रकरण सुरु असेल तर थोडे सावध राहा. शुक्राचे सप्तमातील भ्रमण त्यासोबत रवि-बुध, मंगळ -शुक्र परिवर्तन योग. संगीत, गायन क्षेत्रात काम करणार्या मंडळींना अच्छे दिन अनुभवायला मिळतील. लक्षात राहणार्या रोमांचकारी घटनांचा अनुभव येईल. नवीन ओळखी होतील, त्यामधून कामाच्या संधी उपलब्ध होतील. २० आणि २१ नोव्हेंबर रोजी होणार गुरुचंद्र दृष्टियोग यामुळे अनपेक्षित लाभ मिळू शकतो. शनि महाराजांचे मार्गी भ्रमण हे लाभदायक राहाणार आहे. दाम्पत्य जीवनात गोडवा राहणार आहे. समाजसेवक म्हणून काम करणार्या मंडळींच्यासाठी पत प्रतिष्ठा वाढवणारा काळ रहाणार आहे. येणारा काळ हा तुम्हाला आनंददायी जाणार आहे.
मिथुन – नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षित घटना घडू शकतात. बुधाचे वृश्चिकेतील षष्ठातील भ्रमण, रवि-शुक्राबरोबर युती योग. अनपेक्षितपणे लाभ मिळेल, त्यामुळे आनंदी राहताल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ राहणार आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, ते महागात पडू शकते. काही जणांना जुने आजार त्रासदायक ठरू शकतात. नवे घर घेण्याचा विचार करत असताल तर त्यासाठी येणारा काळ उत्तम राहणार आहे. आर्थिक बाजू चांगली राहणार आहे. नोकरीच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागेल. संततीच्यासाठी उत्तम काळ राहणार आहे. शिक्षण-नोकरीच्या बाबत सकारात्मक काळ अनुभवायला मिळेल.
कर्क – लक्षात राहणार्या घटना घडतील. लाभदायक काळ राहणार आहे. रवि-बुध-शुक्राचे मंगळाबरोबरचे दृष्टियोग. त्यामुळे तुमचा खिसा भरलेला राहू शकतो. शेअर बाजार, सट्टा, कमिशन यामधून चांगला फायदा होऊ शकतो. सुखस्थानात आणि दशमभावात असणार्या राहू-केतूमुळे थोडासा अनुत्साह निर्माण होऊ शकतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करा आणि कामाला लागा. संततीसाठी उत्तम काळ राहणार आहे. संगीत, कला या क्षेत्रात काम करणार्या मंडळींना चांगले अनुभव येतील. आपल्या आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मनोरंजनासाठी पैसे खर्च कराल.
सिंह – तुम्हाला नवीन कामाच्या संधी चालून येणार आहेत. अनपेक्षितपणे मान सन्मान मिळू शकतो. अंगात जोश संचारेल. पोलीस, लष्कर या ठिकाणी काम करणार्या मंडळींच्यासाठी येणारा आठवडा जबरदस्त राहणार आहे. काही दिवसांपासून सुरु असणार्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल. सरकार दरबारी अडकलेली कामे मार्गी लागतील. सरकारी अधिकारी वर्गासाठी चांगला काळ राहणार आहे. संततीकडे लक्ष द्या. महिलांना एखादे जुने दुखणे त्रासदायक ठरू शकते. नोकरीच्या ठिकाणी बदली होण्याचे योग आहेत. बढती मिळू शकते. जमीन जुमल्याची कामे मार्गी लागू शकतात. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल, पण देवाचे नाव घ्या आणि शांत राहा.
कन्या – तुमच्या कार्यकर्तृत्वाच्या दृष्टीने अनुकूल काळ रहाणार आहे. सहकारी-मित्र यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल. शिक्षक, प्राध्यापक यांच्यासाठी चांगला काळ रहाणार आहे. जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील, त्यामुळे आनंददायी वातावरण राहील. आगामी काळात आपल्या व्यवसायाचा आवाका वाढणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात नव्या संधी मिळू शकतात. उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील. प्रवासाचे योग जुळून येतील. परदेशात राहात असणार्या बहीण भावाकडून चांगली मदत मिळेल.
तूळ – आपल्या बुद्धीच्या जोरावर गोड बोलून आपले कार्य मार्गी लावाल. धनस्थानात बुध-शुक्र-रवि युती योग त्यामुळे वारसाहक्क माध्यमातून फायदा होईल. कायदे पंडित मंडळींना चांगले यश मिळेल. व्यवसायात चांगली वृद्धी सुरु राहील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. सुखस्थानात मार्गी झालेल्या शनीमुळे आपली अडकलेली कामे मार्गी लागतील. पत्नीकडून चांगले लाभ मिळतील. वडिलांनी केलेल्या गुंतवणुकीतून चांगले आर्थिक लाभ मिळतील. कर्ज प्रकरण मार्गी लागेल. एखादे जुने येणे वसूल होईल.
वृश्चिक – मंगळाचे सप्तम भावातून होणारे वक्री भ्रमण त्यामुळे पती-पत्नीच्या बाबत क्लेशदायक घटना घडू शकतात. तिखट बोलणे टाळा. कोणताही निर्णय घेताना तो विचार करूनच घ्या. व्यवहारात सावध भूमिका घ्या. पंचमात असणारा स्वराशीतला गुरु विवाहाबाबत सकारात्मक रिझल्ट देताना दिसेल. खेळाडूंची चांगली कमाई होईल. २० आणि २१ तारखा लाभदायक ठरणार आहेत. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यावर यश मिळवाल. अचानकपणे कोणत्या तरी व्यवहारातून चांगला मार्ग मिळेल, भविष्यात त्यामधून चांगली कमाई होईल. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करू नका, ते महागात पडू शकते.
धनु – व्यवसायात चांगली वाढ होऊ शकते. मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी चालून येतील. नोकरीच्या ठिकाणी बदली होऊ शकते. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीच्या ठिकाणी योग्य निर्णय घेण्याचा काळ रहाणार आहे. २० आणि २१ तारखेला होणार गुरुचंद्र दृष्टीयोग तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. विमा व्यवसाय, शेती उद्योग, केमिकल व्यवसाय असणार्या मंडळींसाठी उत्तम काळ रहाणार आहे. शत्रूंपासून सावध राहा. कलाकार मंडळींसाठी आगामी काळ चांगला रहाणार आहे.
मकर – आपल्या मागे लागलेली शुक्लकाष्ठ हळूहळू निघून जातील. शुक्राचे लाभातील भ्रमण सोबत रवि-बुध त्यामुळे अनपेक्षित लाभ पदरात पडतील. आपल्यामध्ये असणार्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. गायन, अभिनय, क्रीडा यामध्ये असणार्या मंडळींना चांगले यश मिळालेले दिसेल. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. येत्या आठवड्यात देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणे होईल. परदेशातील व्यक्तीबरोबर कामासाठी चर्चा होतील, त्यामधून भविष्यात चांगला फायदा होईल.
कुंभ – ग्रहस्थिती सुधारत चालली आहे, त्यामुळे आगामी काळात चांगले अनुभव तुम्हाला येतील. व्यवसायात वृद्धी झालेली दिसेल. नव्या संधी चालून येतील. अडचणींवर सहजपणे मात कराल. नोकरीच्या ठिकाणी बदलीचे योग आहेत. मोठे अधिकार मिळू शकतात. सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्याकडून प्रभाव पडणारे काम होईल. जमिनीचे व्यवहार पार पडतील. शिक्षक, पत्रकार, संपादक यांच्यासाठी चांगला काळ रहाणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढू शकते. मौज मजेवर पैसे खर्च कराल.
मीन – येत्या २४ नोव्हेंबर रोजी मार्गी होत असणार्या गुरूमुळे आगामी काळात शुभ फळे मिळतील. अडकून राहिलेली कामे मार्गी लागतील. शुभकार्ये पार पाडण्यासाठी आगामी काळ उत्तम राहणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी लाभदायक काळ राहणार आहे. काही मंडळींना नोकरीच्या निमित्ताने परदेशात जावे लागू शकते. २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान गुरु- रवि-चंद्र-शुक्र-बुध नवपंचम योग हा आकस्मिक शुभ घटनांचा रहाणार आहे. काही मंडळींना भाजणे, कापणे अशा त्रासाचा सामना करावा लागू शकतो.