अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली वगैरे अपप्रचार भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने केला होता. शिवसेनेची भारतीय जनता पक्षाबरोबर २५ वर्षांची युती होती. पण, त्याआधी शिवसेनेने मुंबईकरांच्या आणि मराठीजनांच्या हितासाठी काँग्रेसपासून समाजवादी पक्षापर्यंत अनेक पक्षांशी वेळोवेळी युती-आघाडी केलीच होती. खोकेबाज गद्दारांचे ईडी सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक समाजघटकांनी उद्धव यांची पाठराखण केली आहे. अंधेरीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह कम्युनिस्ट पक्षाचाही पाठिंबा मशालीला मिळाला होता. शिवसेनेचा इतिहास माहिती नसलेल्या अलीकडच्या काळातील युवकांना भ्रमित करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीच्या आधीच्या घडामोडी दडपून रेटून खोटे बोलले जाते… उद्या प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील वेबसाइटच्या लोकार्पणाच्या निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकत्र येत आहेत. त्यामुळे आता कोणी पूर्वीची शिवसेना राहिली नाही, वगैरे छाती पिटायला लागलं तर त्यांना ४४ वर्षांपूर्वीचं हे मार्मिकचं मुखपृष्ठ दाखवा. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती याआधीही एकत्र आलेली आहे, यापुढेही एकत्र येत राहील.