नुकत्याच पार पडलेल्या गोपाळकाल्याच्या निमित्ताने मी लाही आणि लाही पीठ या पदार्थांकडे जरा नीट बघितलं. मला जाणवले की इन्स्टंट तरी पौष्टिक आणि स्वस्त अशा खाद्यपदार्थांच्या अनेक व्हरायटीज यापासून करता येतात. परदेशी कॉर्नफ्लेक्स हिट झाले. पण हे देशी सिरीयल मात्र मार्केटिंगच्या अभावामुळे दुर्लक्षित राहिले.
ज्वारी, राजगिरा आणि साळीच्या लाह्या आणि या सर्वांचे लाही पीठ हे फार पौष्टिक आणि पचायला हलके व स्वस्त पदार्थ आहेत. साळीच्या लाह्या थंडावा देणार्या आणि आजारपणात किंवा नंतर शरीराला रिकव्हरीत ताकद देणार्या आहेत.
ज्वारीचं महत्व आजकाल डायबेटिसचं प्रमाण वाढल्यापासून अधिक वाढलंय. ज्वारीचे सगळेच गुण ज्वारी लाह्यांत आणि लाहीपीठात असतात. लाही पीठ चावायला दातही लागत नाहीत त्यामुळे गुपुगुपु खाताही येतं. लाह्या भाजून ठेवल्या तर टिकतातही. साळीच्या लाह्या नुसत्या किंवा तुपावर भाजून जिरेपूड मीठ घालून मस्त लागतात.
ज्वारीच्या लाह्यांचं पीठ नुसतं दुधात कालवून, साखर/ गूळ घालून सोबत सुके मेवे/ फळं असा ब्रेकफास्ट मस्त होतो. गोड नको असल्यास ताकात हे लाही पीठ आणि मीठ घालून वरून जिरं, हिरवी मिरची, हिंग फोडणी घालून मस्त चविष्ट पदार्थ होतो. हा सकाळी किंवा संध्याकाळी मधल्या वेळंचं खाणं म्हणून छान पदार्थ आहे.
अर्धा मोठा बाऊल लाह्यांचे पीठ घेतले असेल तर निदान त्यात तीन ते चार वाट्या ताक आरामात जिरतं, त्यामुळे प्रिâजमध्ये भरपूर गोड ताक असेल तरच हे करायला घ्यावं. फोडणीच्या ज्वारी लाह्या चिवड्याची जागा नाही घेऊ शकत; पण त्याही मस्त लागतात.
गोपाळकाला
पद्धत १
साहित्य :
साळीच्या लाह्या- एक वाटी, ज्वारीच्या लाह्या- एक वाटी, भिजवलेले जाड पोहे- अर्धी वाटी, भिजवलेली हरभरा डाळ- एक मूठ, भिजवलेले शेंगदाणे- एक मूठ, हिरव्या मिरच्या- दोन, वाटलेले आले- एक चमचा, केळे- अर्धे, छोटा पेरू- एक (फोडी करून), लिंबू व आंब्याचे लोणचे- प्रत्येकी एक चमचा, साखर- एक चमचा, दही- दोन चमचे, दूध- पाव कप.
कृती :
– सर्वप्रथम साळीच्या आणि ज्वारीच्या लाह्या पाण्यात घाला.
– पाण्यातील या लाह्या हाताने नीट दाबून पाणी काढून घ्या.
– त्यानंतर दही आणि दूध वगळता वरील इतर सर्व साहित्य एका भांड्यात घ्या.
– हे सर्व साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्या.
– हे मिश्रण कोरडे वाटत असल्यास त्यात आवडीनुसार दही किंवा दूध घालून घ्या.
– साधारणपणे भेळ असते, तेवढा हा काला ओलसर करावा.
– आवडत असल्यास यामध्ये डाळिंबाचे दाणेही घालता येतील.
पद्धत २
साहित्य :
दही- १ कप
पोहे- १ कप
लाह्या- एक मूठभर
ओले खोबरे, खवलेले- २ टेबलस्पून
काकडी, चिरून- १ कप
डाळिंब दाणे- पाव कप
हिरव्या मिरच्या, चिरून किंवा ठेचून- १ टेबलस्पून
आले, किसून- अर्धा चमचा
शेंगदाणे, भाजून सोललेले- पाव कप
तळलेली चणा डाळ किंवा पंढरपूरी डाळं – पाव कप
मीठ- चवीनुसार
साखर- १ टीस्पून
कोथिंबीर, बारीक चिरून- पाव कप
साजूक तूप- १ टीस्पून
जिरे- १ टीस्पून
कृती :
पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवा.
दह्यात साखर आणि थोडेसे मीठ घालून ढवळा.
एका मोठ्या वाडग्यात दही, पोहे आणि लाह्या एकत्र करा. ५ मिनिटे भिजू द्या.
तेवढ्या वेळात कढल्यात/ फोडणीपात्रात तूप गरम करून त्यात जिरे, हिरव्या मिरच्या घाला आणि जरासं परता.
ही फोडणी पोहे-दही मिश्रणावर ओता आणि चांगले मिक्स करा.
खोबरे, काकडी, डाळिंबाचे दाणे, आले, शेंगदाणे, मसाला चणा डाळ, कोथिंबीर आणि थोडे मीठ घाला. व्यवथित मिक्स करा.
लाह्यांच्या पिठाचे लाडू
तीन वाट्या लाह्यांचे पीठ व एक वाटी पंढरपुरी डाळ्याचे (फुटाण्याची डाळ) पीठ, कढईत तुपावर थोडे परतून घ्या, त्यात पिठीसाखर, वेलची पूड, हवे असल्यास ड्रायफ्रूटचे काप, खोबर्याचा कीस घालून खूप मळून घेणे व लाडू वळावेत.
लाह्याचे थालीपीठ
साहित्य : दोन वाट्या ज्वारी लाह्या, एक वाटी राजगिरा लाह्या, एक चमचा तिखट, अर्धा चमचा ओवा, एक कांदा, अर्धी वाटी आंबट ताक, मीठ, कोथिंबीर, तेल, दोन चमचे ज्वारी पीठ, एक चमचा कणीक, एक चमचा हरभरा डाळीचे पीठ.
कृती : सर्व लाह्या मिक्सरमधून फिरवून पीठ करावे किंवा तयार लाही पीठ घ्यावे. कांदा बारीक चिरावा. परातीत कांदा, लाह्यांची पिठे, कणीक, ज्वारी पीठ, हरभरा डाळीचे पीठ, तिखट, मीठ, ओवा, कोथिंबीर, हळद, ताक घालून भिजवावे. लागल्यास पाणी वापरावे. तव्यावर एक चमचा तेल घालून थालीपीठ लावावे. दोन्ही बाजू खमंग भाजाव्यात.
लाह्यामुळे थालीपीठ खुसखुशीत होते. साजूक तूप, चटणी, लोणच्याबरोबर द्यावे. पचायला हलके असले तरी पोटभर होते.
लाही पिठाचं उप्पीट : गुपुगुपु उपमा
ज्वारीच्या लाही पिठाचा उपमा
साहित्य : ज्वारी लाही पीठ चार पाच वाट्या, १ कांदा, फोडणीचे साहित्य, ताक.
कृती : थोड्या तेलाची मोठ्या कढईत फोडणी करून घ्यावी. कांदा परतून घ्यावा. आता त्यात दोन चमचे तिखट, मीठ, चिमूटभर साखर घालून परतावे.
लाही पीठ घालावे. ताक/ पाणी शिंपडून परतावे. परतत थोडे मऊ झाले की अजून थोडेसे ताक/ पाणी शिंपडून एक वाफ काढायची.
गुपुगुपु उपमा तयार.
– जुई कुलकर्णी
(लेखिकेला पारंपरिक अन्नपदार्थांविषयी उत्सुकता आहे आणि पाककलेत रुची आहे.)