• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भाजप को सन्मती दे भगवान!

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 16, 2022
in देशकाल
0

सत्तांध आणि मदांध भाजप तात्कालिक राजकीय फायद्यासाठी धर्माचे खरे आचरण देखील आज विसरला आहे. ईश्वर अल्ला मिळून या पक्षाला सन्मती द्यायला कमीच पडतील. या पक्षाचा आयटी सेल दररोज लाखो नूपुर शर्मा घडवते आहे. ते थांबणार कधी? अनुयायांना द्वेषाची शिकवण देणे थांबवले आणि सहिष्णू सनातन धर्माचरणाची खरी शिकवण दिली, तरच ते चांगले नागरिक बनतील, हे सगळ्यांना कळते. बलशाली भारत बनवण्याच्या वल्गना करून आठ वर्षांत सर्व आघाड्यांवर हा देश खिळखिळा करून टाकणार्‍या भाजपला ते वळत का नाही, याचा आता आपण विचार केला पाहिजे.
– – –

‘देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा (सम्राट अशोक) सर्व संप्रदायातील संन्यासी व उपासकांचे नानाप्रकारचे दान देऊन व पूजा करून आदर-सत्कार करत असतो. पण सर्व संप्रदायांची तत्वे वृद्धिंगत व्हावीत याचे त्याला जे मोल वाटते तितके मोल त्याला दान अथवा पूजेचे वाटत नाही. संप्रदायांची (धर्मांची) वृद्धी अनेक प्रकारे होते, पण तिच्या मुळाशी वाक्-संयम आहे. माणसाने केवळ स्वतःच्या संप्रदायाचाच आदर व दुसर्‍याच्या संप्रदायाची निष्कारण निंदा करू नये. इतर धर्मांवर केवळ विशेष कारणासाठीच टीका केली पाहिजे, कारण सर्व संप्रदायांचा आदर करणे हे माणसांचे कर्तव्य आहे आणि असे केल्यानेच स्वतःच्या संप्रदायाची उन्नती आणि दुसर्‍या संप्रदायाचे हित होते. याउलट आपल्या संप्रदायाची प्रतिष्ठा वाढेल अशा विचाराने आवेशात येऊन जो फक्त आपल्याच संप्रदायाची प्रशंसा व इतर संप्रदायांची निंदा करतो, तो स्वतःच्याच संप्रदायाची हानी करतो. दुसर्‍याशी मिलाफाने राहणे ही फार चांगली गोष्ट आहे. माणसाने इतर धर्मांची माहिती लक्ष देऊन ऐकावी. कारण देवांचा प्रिय प्रियदर्शी राजा याची इच्छा आहे की सर्वच संप्रदायातील लोकांनी विद्वान व कल्याणकारी कामे करणारे व्हावे…’
(सम्राट अशोकाचे विविध गिरीलेख हे चौदा आदेश म्हणून ओळखले जातात. त्यातील गिरनार येथील हा बारावा गिरीलेख. स्वैर मराठी अनुवाद वासुदेव आपटे यांनी १०० वर्षांपूर्वी केलेला.)
आपल्या सोयीने प्राचीन भारतीय इतिहासाचे (त्यातही इतिहास कमी, पुराणे आणि महाकाव्यांवरच अधिक भर) उठता बसता दाखले देणारे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांनी हा गिरीलेख वाचला पाहिजे, खरेतर प्रत्येकानेच तो वाचायला हवा; पण विशेषकरून प्राइम टाइमला विखारी द्वेषाचा वणवा पेटवणार्‍या झुंजी लढवणार्‍या आजच्या गोदी मिडीयानेदेखील तो वाचावा आणि आवाजाची पट्टी चढवत द्वेषाचे फुत्कार सोडणार्‍या पक्षप्रवक्ता नावाच्या पाळीव भुजंगांनी देखील तो वाचायला हवा.
संघ परिवारातल्या संघटनांना ठरावीक स्वरूपाच्या इतिहासाचा उदोउदो करण्याची सवय आहे. अक्षय कुमारच्या ‘ऐतिहासिक’ सिनेमांइतकाच तो पोशाखी इतिहासही कचकड्याचा आहे. आपल्या इतिहासात सम्राट अशोकाच्या रूपाने नांदून गेलेल्या सुवर्णपर्वाचे त्यांना वावडे आहे. त्याचे स्मरण त्यांना होत नसले तरी आपण केले पाहिजे. कारण, आपल्या आजच्या भारत देशापेक्षाच नव्हे, तर संघपरिवाराच्या संकल्पनेतील तथाकथित ‘अखंड हिंदुस्तान’पेक्षादेखील बरेच मोठे, अतिविशाल राष्ट्र सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली होते. ते त्या काळातील जगातील सर्वात प्रगत व श्रीमंत राष्ट्र होते. त्या काळी चोख राज्यव्यवस्था निर्माण करून सम्राट अशोकाने लोककल्याणाला केंद्रीभूत ठेवून कारभार चालवला, इतकेच नाही तर प्रजेच्या निव्वळ भौतिक गरजा न भागवता प्रजेची आध्यात्मिक उन्नती होऊन प्रजेला मनःशांती कशी मिळेल यासाठी त्यानी धर्माला राजाश्रय देखील दिला. प्रजेची भौतिक उन्नती व्हावी यासाठी प्रयत्न करणारे बरेच सम्राट झाले असतील, पण प्रजेच्या आध्यात्मिक आणि मानसिक उन्नतीचा इतक्या खोलवर विचार करणारा राज्यकर्ता विरळाच.
तीन सिंहांच्या मुद्रा असलेले भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आपल्या भारतवर्षाचा महान सम्राट अशोक यांनी स्थापन केलेल्या सारनाथ येथील अशोकस्तंभावरून घेण्यात आले आहे, हे आपण शाळेतच शिकलो आहोत. हे चिन्ह जवळपास दोन हजार वर्षापूर्वी कोरलेले आहे. इतक्या मोठ्या कालावधीनंतर देखील सम्राट अशोकाचे बोधचिन्ह अथवा भारतीय ध्वजावरील अशोकचक्र काळाच्या कसोटीवर टिकून आहे. कारण आज संविधानानुसार चालणार्‍या या लोककल्याणकारी राष्ट्रनिर्माणाचा भक्कम पाया देवानां प्रिय: प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक याने दोन हजार वर्षापूर्वी घातलेला आहे.
आपले विचार, आदेश व उपदेश सम्राट अशोकाने मोठमोठ्या स्तंभांवर, शिळांवर कोरून ठेवले आणि ते आजवर टिकले आहेत. कोणी ते पाडून तिथे नव्या वास्तू का उभारल्या नाहीत? ते टिकले ते निव्वळ भक्कम दगडावर कोरले म्हणून नव्हे, तर ते आदेश आणि उपदेश हेच या राष्ट्रासाठी सर्वोच्च हिताचे आहे हे शेकडो वेळा परत परत सिद्ध झाले आणि सर्वमान्य झाले.
सम्राट अशोकाने सुरू केलेला एक नियम पाहा. अधिकार्‍यांची दर तीन वर्षांनी बदली केली जावी, असा नियम त्याने केला होता. हितसंबंध प्रस्थापित होऊ नयेत यासाठी आज देखील सरकारी अधिकारी वर्गासाठी हा नियम तंतोतंत पाळला जातो. हे एक उदाहरण सम्राट अशोकाची दूरदृष्टी दाखवायला पुरेसे आहे.
लेखाच्या प्रारंभी उद्घृत केलेल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या गिरीलेखातील एकेक शब्द अशोकाने प्रजेच्या हितार्थ किती पोटतिडकीने लिहिलेला आहे ते पाहून स्तिमित व्हायला होते. त्या सम्राटाचे निर्जीव दगडावरचे कोरलेले शब्द आजदेखील मनाला थेट भिडतात, पण दर महिन्यात तासभर आवाजाची पट्टी वरखाली करत केलेली नटसम्राटांची बातचीत मात्र तद्दन प्रचारकी वाटते. पाणी खोल असले की शांत असते, उथळ असले की खळखळाट असतो, हेच त्याचे कारण.
या मार्गदर्शक गिरीलेखाचे स्मरण करण्याचे ताजे कारण म्हणजे नुकतेच भाजपा प्रवत्तäया नूपुर शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल केलेले अवमानकारक भाष्य. त्यांची पक्षातून (तात्पुरतीच) हकालपट्टीही केली गेली आहे. मुख्यत्वेकरून आखाती देश, अरब राष्ट्रे आणि जगभरातील असंख्य इस्लामी राष्ट्रांतून नूपुर शर्मांच्या टिप्पणीवर तीव्र प्रतिक्रिया आली आणि त्या देशांनी या बाईंवर ताबडतोब व कडक कारवाई व्हावी, यासाठी मागणी करणारा फतवाच काढला. तो एतद्देशीय मुसलमानांवर छप्पन्न इंची डरकाळ्या फोडणार्‍या भाजपाने गुडघ्यावर बसून हातात घेतला आणि डोक्याला लावला. म्हणजेच शर्मा बाईंवर जी कारवाई झाली ती बलाढ्य राष्ट्रे नाराज झाली म्हणून आणि जागतिक दबावापोटी केली गेली आहे. त्यात भाजपला कसलीही उपरती झालेली असण्याची कणभर शक्यता नाही. मुळात नूपुर शर्माला प्रेषितांविषयीचा दिशाभूल करणारा आणि द्वेषाने भरलेला विकृत इतिहास शिकवलाच कोणी? तो कोणी शिकवला असेल, ते उघड आहे. त्या फक्त आणखी एक शिकवण विसरल्या. ज्या गोष्टी पूर्वी खासगीत कुजबुजी करून पसरवल्या जात किंवा आता सोशल मीडियावर बनावट अकाउंट्स आणि बुद्धीगहाण बहुजनांना हाताशी धरून पसरवायच्या असतात त्या शर्मा बाई अनवधानाने उघडपणे बोलून गेल्या. त्यांची चूक एवढीच झाली आहे. संघ आणि भाजपा यांनी प्रज्ञासिंग ठाकूरप्रमाणेच भविष्यात नुपूर शर्मांचेही पुनर्वसन केले, तर फारसे आश्चर्य वाटू नये.
सम्राट अशोकाने जो धर्माबाबत वाक्-संयम सांगितलेला आहे, तो हे बनावट हिंदुत्ववादी आपल्या अनुयायांना सांगत नाहीत, कारण त्यांच्याकडे एकमेव ब्रह्मास्त्र आहे ते खोटारडेपणाचे आणि भडकाऊ भाषेचे. तेच वापरले नाही तर लोकांचा बुद्धिभेद करणार कसा? यांच्यावर सत्ता सोडून घरी बसायची वेळ येईल. ते आता न परवडणारे आहे.
राजकारणात मतभेद पहिल्यापासून होते, असलेच पाहिजेत. पण आपला अंतिम उद्देश जनतेचं कल्याण हेच आहे, हे गृहीत धरून परस्परांच्या विभिन्न विचारांचा, मतभेदांचा आदर केला पाहिजे, हे एक साधे तत्त्व आहे. ते मोदी सत्तेत येण्यासाठी जी पूर्वपीठिका तयार केली, तिथे सर्वात आधी विसरले गेले आहे. जो मोदींचा अडाणी भक्त नाही, तो तो थेट देशाचाच शत्रू आहे, असली बाष्कळ मांडणी (बायनरी) समाजमाध्यमांतून प्रसृत करण्यात आली. काँग्रेस पक्षाने या देशाला जे जे दिले ते मोडून खाणार्‍या आणि मित्रपरिवाराला स्वस्तात विकणार्‍या सटोडियांच्या टोळीने काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचारापलीकडे काहीच होत नव्हते, असल्या कंड्या पिकवल्या आणि कारस्थानाच्या थियर्‍यांवर सदैव विश्वास ठेवणार्‍या भारतीय जनमानसाने त्या स्वीकारल्या. तेव्हापासून एकमेकांच्या विचारसरणीवर अश्लाघ्य टीका आणि एकमेकांच्या नेत्यांची गलिच्छ निंदानालस्ती करत आजचं राजकारण रसातळाला पोहोचले आहे. त्याचीच पुढची पायरी म्हणजे देवी-देवतांचा, पूजनीय व्यक्तींचा टीव्हीवर प्राइमटाइममध्ये अवमान. आपण प्रेषितांच्या चरित्रातील ‘तथ्य’ सांगितले किंवा चिकित्सा केली, असला आव तर भाजपेयींनी मुळातच आणता कामा नये. तो त्यांना अधिकारच नाही, ती त्यांची योग्यता नाही. ज्याला धर्मचिकित्सा करायची असते तो स्वधर्मापासून सुरुवात करतो. आपलं झाकून ठेवून इतरांचं वाकून पाहायला जात नाही. भाजपेयी हेच करतात त्यामुळे ते इतर धर्मांची चिकित्सा करण्यास पात्र नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे विखारी शेरेबाजी ही चिकित्सा होत नाही. हे धार्मिक तरी आहेत का? त्याबद्दल शंकाच आहे. कारण ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या शिवरायांइतका स्वधर्मप्रेमी राजा दुसरा सापडणार नाही इतिहासात. पण त्यांनी मुसलमानी राजवटीशी लढताना त्या धर्माचा द्वेष केलेला नाही. ज्याचं स्वधर्मावर प्रेम असेल, त्याला इतर धर्मीयांची त्यांच्या धर्माबद्दलची आस्थाही समजते आणि तो त्या धर्माचाही आदर करतो. या देशातल्या बहुसंख्य हिंदूंची मनोधारणा हीच आहे.
नूपुर शर्माच्या उद्गारांनी देशाची मान खाली घालायला लावली आहे आणि बळजबरीने मिठ्या मारत फिरलो की आपण विश्वगुरू झालो, या समजुतीलाही चांगलीच चपराक बसली आहे. पण, ते या महान देशासाठी अवमानकारक आणि घातक पायंडा पाडणारे आहे, ही बदनामी मोदींच्या एककल्ली धोरणांनी ओढवलेली आहे, त्याचे काय! नूपुर शर्माच्या आगळिकीमुळे झालेल्या नालस्तीने भडकलेले भाजपेयी इथल्या मुस्लिम समुदायावर त्याचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत. रविवारी दंगा केल्याचा आरोप असलेल्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याचं संपूर्णपणे माणुसकीशून्य आणि बेकायदा कृत्य ही त्याचीच सुरुवात आहे.
या विधानांचा शांततापूर्ण निषेध करणे हा एकच संवैधानिक मार्ग मुस्लिम समुदायाकडे उपलब्ध असताना त्यावरून ऊग्र निदर्शने आणि आंदोलने करणे, डोके कलम करण्याच्या धमक्या देणे, यातून मुस्लिम समुदाय कोणता न्याय मिळवणार आहे? हे बेकायदा तर आहेच पण स्वधर्माचेही संकुचित आकलन असण्याचे लक्षण आहे. आजच्या विज्ञानयुगात कालबाह्य रूढी आणि नियमांची कात टाकत जो धर्म पुढे जाईल तोच टिकेल. माथेफिरू बनून नालस्ती करणे आणि त्या नालस्तीने क्रोधित होऊन माथेफिरू बनणे हे दोन्हीही चूकच आहे. शेवटी संयम आणि सन्मती या मानवी गुणांना पैलू पाडतो तोच खरा धर्म.
सत्तांध आणि मदांध भाजप तात्कालिक राजकीय फायद्यासाठी धर्माचे खरे आचरण देखील आज विसरला आहे. ईश्वर अल्ला मिळून या पक्षाला सन्मती द्यायला कमीच पडतील. या पक्षाचा आयटी सेल दररोज लाखो नूपुर शर्मा घडवते आहे. ते थांबणार कधी? अनुयायांना द्वेषाची शिकवण देणे थांबवले आणि सहिष्णू सनातन धर्माचरणाची खरी शिकवण दिली, तरच ते चांगले नागरिक बनतील आणि सुदृढ व निकोप मनाचे चांगले नागरिक हेच बलशाली भारत घडवू शकतील, हे सगळ्यांना कळते… बलशाली भारत बनवण्याच्या वल्गना करून आठ वर्षांत सर्व आघाड्यांवर हा देश खिळखिळा करून टाकणार्‍या भाजपला ते वळत का नाही, असे सहिष्णू नागरिक का नको आहेत, याचा आता आपण विचार केला पाहिजे.

Previous Post

इतिहासाचार्य आणि टर्निंग पॉइंट

Next Post

खदखद राजापूरच्या तेल प्रकल्पाची

Next Post

खदखद राजापूरच्या तेल प्रकल्पाची

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.