इतिहासाचार्य राजवाडेंनी एका दीर्घ लेखात चांद्रसेनीय कायस्थ समाजाची बदनामी केली. त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले. त्यामुळे प्रबोधनकार भडकून उठले. त्यांनी त्याच्या उत्तरादाखल पुस्तकच लिहिलं. तो त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
– – –
`मी चांगला वक्ता आहे. खंबीर लेखक आहे. समाजातला अन्याय मी उघड्या डोळ्यांनी पहात आहे. बहुजन समाजाच्या बाजूने लिहिणारा बोलणारा खमक्या वक्ता लेखक कोणीही नाही. मी स्वस्थ का बसावे? याच सुमाराला जातिवर्चस्वाच्या दंभाने तर्र झालेल्या काही विद्वान ब्राह्मणश्रेष्ठींनी पांढरपेशा ब्राह्मणेतर जमातींना आणि काही ब्राह्मण जातींनाही क्षुद्रत्वाच्या किंबहुना शूद्रत्वाच्या खायीत ढकलून त्यांना हिंदू समाजात बदनाम करण्याचा विद्वत्ताप्रचुर चंग बांधला. म्हणजे खेड्यापाड्यांतल्या बहुजन समाजाच्या चुरडणी भरडणीच्या जोडीने शहरांत वावरणार्या पांढरपेशा जमातींना सामाजिक हीनत्वाने लेखण्याच्या चिथावणीचा उद्योग चालू झाला.`
`प्रतिकाराचा माझा निर्धार` या नावाने प्रबोधनकारांच्या आत्मचरित्रात येणारा हा आठ दहा ओळींचा उतारा त्यांच्या जीवनगाथेत फारच महत्त्वाचा ठरतो. या उतार्याच्या आधीचं त्यांनी सांगितलेलं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य यात मोठा फरक पडलेला दिसतो. इथेच त्यांच्या जीवनकथेला निर्णायक वळण लागलं. ब्राह्मण समाजामधल्या जातीय अहंकाराने माजलेल्या लोकांनी सामाजिक इतिहास लिहिण्याच्या निमित्ताने ब्राह्मणेतर समाजांची बदनामी करायला सुरुवात केली होती. प्रबोधनकार सांगतात तसं काही ब्राह्मणांच्या पोटजातींचीही बदनामी केली जात होती. कारण हे काम प्रामुख्याने चित्पावन म्हणजेच कोकणस्थ या ब्राह्मणांच्या पोटजातीतलेच विद्वान करत होते. एकीकडे खेड्यांमधल्या बहुजन समाजाला त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन फसवलं जात होतं. दुसरीकडे शहरांमधल्या ब्राह्मणेतरांना हीन ठरवून त्यांचा स्वाभिमानावर हल्ला केला जात होता. हा अन्याय प्रबोधनकार बघत होतेच. प्रबोधनकारांनी त्याचा प्रतिकार करायचा ठरवलं. त्यासाठी त्यांचा मार्ग भाषणं आणि लेखनातून जागृती करण्याचा होता. ते म्हणतात तसा त्यांना बहुजन समाजाची बाजू मांडणारा खंबीर वक्ता आणि लेखक दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी ते काम करायचं ठरवलं. खरं तर लहानपणापासून हालअपेष्टा सोसून त्यांनी नुकतंच सुखी आयुष्य जगायला सुरुवात केली होती. दादरला बिर्हाड केलं होतं. सरकारी नोकरी होती. संसार बहरत होता. लेखन, वक्तृत्व आणि सामाजिक काम यामुळे प्रतिष्ठा मिळाली होती. `वक्तृत्वशास्त्र` या पुस्तकाने तर लोकप्रियताही मिळवून दिली होती. मित्रांचा गोतावळा जमा झाला होता. वाचन आणि संगीत या आवडत्या छंदांसाठी वेळ देता येत होता.
असं सुखासमाधानाचं आयुष्य सुरू असताना थोडाबहुत निषेध नोंदवून इतरांसारखा त्याचाही आनंद मिळवणं प्रबोधनकारांना शक्य होतं. पण त्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला होता. सर्व प्रस्थापितांच्या विरोधात ते उभे राहिले. त्यांच्या मर्मावरच घाव घालण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे प्रबोधनकारांना स्वतःचं सर्वस्व पणाला लावावं लागणार होतं. तसं त्यांनी लावलंही. त्यासाठी कारण ठरलं ते राजवाडे प्रकरण. ते समजून घेण्यासाठी आधी हे राजवाडे कोण होते, ते समजून घ्यावच लागतं. विश्वकोशाच्या त्यांच्याविषयी असलेल्या नोंदीतलं पहिलं वाक्य त्यांचा आवाका स्पष्ट करतं, `राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ : (१२ जुलै १८६४ – ३१ डिसेंबर १९२६). मराठीतून इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यासंगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान. इतिहास संशोधक म्हणून विशेषेकरून ते मान्यता पावले. `फक्त महाराष्ट्रातच नाही, तर भारतभर फिरून इतिहासाचार्य राजवाडेंनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं गोळा केली. त्याचे तब्बल बावीस खंड `मराठ्यांच्या इतिहासाची साधने` या शीर्षकाचे प्रसिद्ध केले. त्याला सविस्तर प्रस्तावना लिहिल्या. राधामाधवविलासचंपू, महिकावतीची बखर, ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण, व्युत्पत्तिकोश अशा पुस्तकांनी महाराष्ट्राचा इतिहासविषयक दृष्टिकोन घडवला आणि बिघडवलाही.
मराठ्यांच्या साम्राज्यनिर्मितीमागे रामदास स्वामींच्या महाराष्ट्र धर्माची प्रेरणा होती. पेशव्यांना हिंदूपदपातशाही स्थापन करायची होती, अशी मांडणी त्यांनी केली. मराठी भाषा ही संस्कृतोद्भव असल्याचा दावा त्यांनी केला. त्याच्या आधारे त्यांनी गावांच्या, माणसांच्या नावांची तोडमोड करत नवी गृहितकं मांडली. यातून महाराष्ट्राच्या इतिहासाची ब्राह्मणी वर्चस्वाच्या दृष्टिकोनातून मांडणी करण्याचा पायंडा पडला. विकिपीडियावरच्या त्यांच्या परिचयात असलेलं हे वाक्य त्यांच्या दोषावर नेमकं बोट ठेवतं, `राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने आणि अशा आक्रमकपणाने मांडत की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.` त्यांच्या मांडणीचं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, त्र्यं. शं. शेजवलकर यांच्यापासून सदानंद मोरे यांच्यापर्यंतच्या अभ्यासकांनी साधार खंडन केलं. पण त्यांचा त्याग, मराठीविषयीची निष्ठा, व्यासंग, अपार मेहनत यामुळे त्यांच्याविषयी सगळ्यांना आदरच होता. त्यांनी शोधलेली इतिहासाची साधनं आजही इतिहास संशोधकांना आधार मानावीच लागतात.
त्यांच्या या इतिहासाच्या मांडणीवर सर्वात आधी हल्ला केला तो प्रबोधनकारांनीच. पण त्यांनीही राजवाडेंचा सन्मान त्यांनीही केलाय. ते लिहितात, `श्रीयुत राजवाडे हे इतिहास साहित्य संग्राहक म्हणून चांगली प्रख्या पावलेले आहेत. मराठ्यांच्या इतिहासाची साधने शोधून ती संकलित करण्यात राजवाडे यांनी जे परिश्रम केले आणि स्वार्थत्यागाची जी परासीमा गाठली, ती महाराष्ट्रात अक्षरशः अद्वितिय आणि अत्यंत कौतुकास्पद आहे. आम्ही तर असेही म्हणतो की श्री. राजवाड्यांचे खंड जर बाहेर पडले नसते. तर महाराष्ट्रेतिहासाच्या क्षेत्रांत खरोखरच सर्व अंधार पडला असता. राजवाड्यांची ही कामगिरी बहुमोल आहे. इतकेंच नव्हे तर दुसरा राजवाडे प्रसवायला महाराष्ट्राला आणखी एक दोन शतकांचीही तपश्चर्या अपुरी पडेल, असे आमचे प्रांजल मत आहे.`
ते महाराष्ट्राच्या इतिहासलेखनाचं राजवाडे युग होतं. ते सांगत तो इतिहास होता. ते म्हणत ती पूर्व दिशा होती. त्यांच्याविरोधात ब्र काढण्याची हिंमत कुणात नव्हती. त्यांच्या इतिहासकथनाचा प्रभाव महाराष्ट्रावर अजूनही आहे. त्यांच्या मांडणीच्या आधुनिक आवृत्त्या आजही तयार होत आहेत. त्याची कारणं अनेक असली तरी एक महत्त्वाचं कारण हे होतं की राजवाडेंनी इतिहासविषयक संस्थांची उभारणी केली. त्यातली सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजे भारत इतिहास संशोधन मंडळ. ७ जुलै १९१०ला त्याची स्थापना झाली. आजही पुण्याच्या सदाशिवपेठेत ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेत १५ लाखांहून अधिक ऐतिहासिक कागदपत्रं, ३० हजारांहून जास्त हस्तलिखितं, २७ हजारांपेक्षा जास्त नवीजुनी पुस्तकं, ४ हजारांहून जास्त नाणी, एका हजारापेक्षा जास्त चित्रं, अनेक शिल्पं, शिलालेख अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत.
या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या चौथ्या वर्षांच्या अहवालात राजवाडेंचा कायस्थ धर्मदीप या पुस्तकाविषयी २२ पानांचा एक लेख छापून आला. त्याआधी त्यांनी तो मंडळाच्या वार्षिक संमेलानात सादर केला होता. हे `कायस्थ धर्मदीप` नावाच्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाची बदनामी केली होती. या पुस्तकाची पोथी राजवाडेंना सातारा दरबारच्या कागदपत्रांत सापडली होती. ती वाचताच प्रबोधनकारांना कायस्थ विरुद्ध चित्पावन या जुन्या वादातून जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा असल्याचं लक्षात आलं. राजवाडेंनी लेखात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजावर केलेले आरोप असे होते,
१. संभाजीराजांची हत्या आणि तेव्हाचं सत्तांतर कायस्थांमुळेच घडून आली.
२. नारायणराव पेशव्यांच्या खुनात कायस्थांचाच सहभाग होता.
३. दुसर्या बाजीरावाच्या विरुद्ध सातारच्या महाराजांच्या वतीने इंग्रजांशी हातमिळवणी करणारे कायस्थ प्रभूच होते.
४. कायस्थ प्रभूंमुळेच सातार्याच्या गादीचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना पदभ्रष्ट व्हावं लागलं.
प्रबोधनकारांना कायस्थांच्या इतिहासाविषयी अभिमान होता. तो जाणीवपूर्वक काळवंडला जात असेल, तर ते शांत राहणारे नव्हतेच. त्यांनी जोरदार प्रतिवाद करून हे आरोप खोडून काढले. मुळात `कायस्थ धर्मदीप` या पुस्तकात फारसा दम नव्हता. त्यामुळे ते काम सोपं होतं. पण राजवाडेंशी दोन हात करणं फारच कठीण होतं. त्याची सुरवात महाराष्ट्रभराच्या प्रचारदौर्याने झाली. त्याविषयी प्रबोधनकार लिहितात, `भा.इ.सं. मंडळाचे ते वार्षिक अहवाल इतर पुस्तकांप्रमाणे सर्वसामान्य लोकांपर्यंत जात नसत आणि आजही जात नाहीत. पुराव्यासाठी कधी कोणाला लागायचे. हा असला तेजोभंग आणि बदनामी करणारा पुरावा जेव्हाच्या तेव्हा रोखठोक पुराव्यानिशी उलथून पाडला नाही, तर तो भावी पिढ्यांच्या उरावर सारखा नाचता राहणार, या विचाराने मी संतप्त झालो आणि प्रतिष्ठेचे केवढे का मत्त मतगंज असत ना, मी त्यांना यथास्थित लंबा करणार, या निर्धाराने मी महाराष्ट्रभर प्रचाराचा दौरा काढून जातभाईंना जाग आणली.`
हे आरोप वेगवेगळ्या काळातल्या घटनांशी जोडलेले असल्यामुळे खंडनमंडनाच्या निमित्ताने एक वेगळीच गोष्ट घडली. शिवकाळापासून ब्रिटिश काळापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहासच ब्राह्मणेतरांच्या दृष्टीने नोंदवला गेला. ते महत्त्वाचं होतं. ते करण्यासाठी प्रबोधनकारांसारखा खणखणीत लेखणीचा इतिहासकार दुसरा नव्हताच. जणू इतिहासानेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. `कोदण्डाचा टणत्कार अथवा भारत इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी` अशा बंदुकीच्या गोळीसारख्या रूतणार्या नावाचा संशोधनपर ग्रंथ लिहून प्रबोधनकारांनी ही जबाबदारी नीट पार पाडली. त्यातून एक इतिहास घडला. तो प्रबोधनकारांच्या आयुष्यासाठीही टर्निंग पॉइंटच होता.