कोणतंही पूर्वनियोजन नसताना प्रबोधनकार सातार्याहून पुण्यात धडकले. पुण्यातल्या ब्राह्मणी कारस्थानी टोळक्यांसाठी तो मोठा धक्का होता. कारण त्याच काळात पुण्यात ब्राह्मणेतर चळवळ जोरात होती. त्यामुळे ठाकरे आणि पुण्यात? अब्रह्मण्यम्! अशी त्यांची प्रतिक्रिया स्वाभाविकच होती.
– – –
प्रबोधनकारांनी `प्रबोधनाची जीवनक्रान्ति’ या अग्रलेखात सातार्यात काय घडलं ते वाचकांना सांगितलं. त्यामुळे त्यांना उत्तेजन आणि आशीर्वाद देणारी शेकडो पत्रं आली, असा उल्लेख ४ जुलै १९२४च्या प्रबोधन अंकात आहे. अनेक पत्रलेखकांनी सूचना केली की आता पुण्यात आल्याने प्रबोधनने पाक्षिकाचं साप्ताहिक बनावं. आज ना उद्या प्रबोधनकारांसारख्या प्रामाणिक आणि स्वाभिमानी संपादकाचं भांडवलशाही धनजीशेठ कूपर यांच्याशी फाटणारच होतं, अशी भावना या पत्रांमधून व्यक्त झाली होती.
त्याचंच प्रतिबिंब इस्लामपूरच्या `भारतमाता’ या नियतकालिकाच्या शाबास प्रबोधनकार! या संपादकीय स्फुटात दिसतं. तेही या अंकात प्रसिद्ध केलेलं आहे. प्रबोधन सातार्यात आलं तेव्हाच या नियतकालिकाने इशारा दिला होता की द्वेष आणि स्वार्थाने बरबटलेल्या ठिकाणी प्रबोधनकारांसारख्या सद्गृहस्थाने येऊ नये. तो इशारा खरा ठरल्यामुळे ते लिहितात, प्रबोधनाचा व्यावहारिक शुद्ध उद्देश अशुद्ध होऊ लागताच श्री. ठाकर्यांनी आपल्या ब्रीदास अनुसरून आपल्या बुद्धिमत्तेस व निस्पृहतेस भांडवलवाल्याची न बटीक बनविता पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी धडाडीने प्रयाण केले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
प्रबोधनकारांना खरं तर कधीच पुण्यात राहण्यासाठी यायचं नव्हतं. सातार्यातलं बिर्हाड अचानक हलवावं लागलं आणि बापूसाहेब चित्रेंनी पुण्यात जुना छापखाना उपलब्ध करून दिला, म्हणून ते पुण्यात आले. शनिमाहात्म्य या पुस्तकात प्रबोधनकार लिहितात, मर्हाठी इतिहासाच्या अध्ययनामुळे मूळपासूनच मला पुण्याचे काहीच आकर्षण नव्हते व सध्याही नाही. पुण्यात राहण्याची पाळी कधी काळी मजवर येईल, अशी मला स्वप्नातही कल्पना नव्हती. याच्या थोडं आधी ते लिहितात, स्वर्गवासी मर्हाठी इतिहासाचार्य राजवाडे पुण्याविषयी `पुणे हा एक मोठा शेतखाना आहे असे उद्गार काढीत असत. हा सिद्धांत त्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या ठरविला, का आरोग्यशास्त्रदृष्ट्या काढला, हे समजणे कठीण आहे. तथापि त्यात पुष्कळच तथ्य आहे, यात संशय नाही. मी राजवाड्यांइतका पुढे न जाता, इतकेच स्वानुभवपूर्वक म्हणू शकेन की पुणे हा एक शनिखाना आहे.’
शेतखाना हा शब्द आता प्रचलित नसल्यामुळे आपल्याला कळणार नाही. पण शेतखाना म्हणजे संडास किंवा शौचालय. सनातन्यांचे शिरोमणी असणार्या इतिहासाचार्य राजवाडेंचाच दाखला देत प्रबोधनकारांनी एका वाक्यात त्या काळच्या पुण्याचं बेमालूम वर्णन केलंय. प्रबोधनकारांच्या `शनिमाहात्म्य’ या पुस्तकात तात्याजी महिपती यांनी लिहिलेल्या शनिमाहात्म्य या ओवीबद्ध पोथीमध्ये आलेल्या राजा विक्रमाची कहाणीचं त्यांच्या स्वत:च्या जीवनात आलेल्या उतारचढावांशी कसं साधर्म्य आहे, याचं वर्णन आहे. त्यात शेवटी त्यांनी ज्योतिष भविष्यापेक्षा प्रयत्नांवर भर देण्याचं शिकवणही दिली आहे. ही कहाणी सांगताना त्यांनी त्या काळातल्या पुण्याचं वर्णन शेतखान्याच्या धर्तीवर शनिखाना असं केलं आहे. पुण्याची नजर जेथे जेथे गेली तेथे तेथे साडेसातीचा ज्वालामुखी फुटून सत्यानाशाचा कहरच गुदरला, असा मागील आणि चालू इतिहासाचा पुरावा आहे, असं त्यांनी लिहिलं आहे.
ग्रहांमध्ये जसा शनी तसं महाराष्ट्रात पुणे आणि पुण्यातले ब्राह्मण शनीचा अवतार असं त्यांनी लिहून ठेवलंय. त्यासंदर्भात ते लिहितात, ‘इतर ठिकाणचे ब्राम्हणब्रुव लोक तात्याजी महिपतीच्या व्याख्येप्रमाणे जरी गुरुग्रहाच्या गुणधर्माचे असले, तसे या शनिखान्यातला एकजात ब्राम्हण हमखास शनीचा अवतार असतो… विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, पुण्याच्या पेठांच्या नावांत सगळ्या वारांची नावे आहेत. पण त्यात ब्राम्हणी गुणधर्माच्या गुरुवार पेठेचा अज्जीबात लोप झालेला आहे. पुण्यांत सगळे वार आहेत, गंज आहेत, भवानी आहे, वेताळही आहे, पण गुरू मात्र कोठेच नाही. सगळे महत्व शनीला!’ अशा या शनिखान्यात प्रबोधनसारखं बहुजनवादी वर्तमानपत्र आल्यामुळे ब्राह्मणी कारस्थान्यांना धक्का बसला. हे प्रबोधनकारांच्या शब्दांत असं, `तीन वर्षांच्या नियमित आणि सडेतोड कामगिरीने आधीच प्रबोधन पाक्षिक म्हणजे पुण्याच्या शनिदेवांच्या डोळ्यात वडसाप्रमाणे सलत होते. त्यात आता खास प्रबोधन छापखान्याचीच छावणी शनिखान्याच्या अड्ड्यात आल्यावर त्यांच्या पोटात शनिगोळा का उठू नये?
मुळात एका ब्राह्मणानेच प्रबोधनला छापखाना दिल्यामुळे पुण्यातल्या कारस्थानी टोळक्याचा तीळपापड झाला होता. त्यात बापूसाहेब चित्रे आणि प्रबोधनकारांचे मित्र प्रो. समर्थ यांनी प्रबोधनकारांना राहण्यासाठी सदाशिव पेठेत जागा बघितली. प्रबोधनकारांचे बालमित्र नातू यांच्या घरात प्रबोधनकारांना भाड्याने जागा मिळाली. त्यामुळे त्यांनी सातार्याहून मुंबईला न जाता थेट पुण्यात संसार मांडला. या सगळ्यामुळे ब्राह्मणी टोळक्यांची अस्वस्थता प्रबोधनकारांनी आत्मचरित्रात सांगितली आहे, ब्राह्मणेतर चळवळीतला एक नाठाळ लेखक आणि वक्ता ठाकरे पुण्यासारख्या ब्राह्मणनगरात येऊन प्रकाशनाचे ठाण मांडतो म्हणजे काय? सारा चळवळ्या ब्राह्मणवर्ग माझ्या हालचालींवर काकदृष्टी ठेवून बसला.
ब्राह्मणी छावणीने लक्ष ठेवणं स्वाभाविकच होतं. कारण तेव्हा पुण्यात ब्राह्मणेतरी चळवळ जोमात काम करत होती. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या तरुणांनी काही वर्षं टिळकवादी म्हणवणार्या जातीय कार्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांची नव्याने आक्रमक मांडणी केली होती. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने श्रीपतराव शिंदे यांचा साप्ताहिक विजयी मराठा नित्यनेमाने प्रसिद्ध होत होता. त्यात प्रबोधनकार पुण्यात आल्याने या चळवळीला उठाव मिळणं स्वाभाविकच होतं. जेधे, जवळकर यांच्या बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी पांडुरंगराव राजभोज आणि विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांचे बंडखोर चिरंजीव श्रीधरपंत टिळक हे रोज प्रबोधनकारांच्या भेटीला येऊ लागले. त्यामुळे प्रबोधनकार ब्राह्मणी मंडळींच्या डोळ्यात सलू लागले. ते लिहितात, दूरवर असलेले पाप आता थेट घराच्या माजघरातच आल्यामुळे येनकेनप्रकारेण पुण्यातून माझी उचलबांगडी करण्याच्या खटपटीला चळवळ्या ब्राह्मणवर्ग लागला.
सगळ्यात आधी त्यांनी घरमालक नातू यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. शेजार्यांना चिथावून नातू यांना त्रास दिला. प्रबोधनकारांना नोटीस देण्यासाठी मागे लागले. पण ते प्रबोधनकारांचेच बालमित्र! ते या सगळ्याला पुरून उरले. आता या ब्राह्मणी मंडळींनी सगळं लक्ष छापखाना मालकावर केंद्रित केली. पुण्यात येताच प्रबोधनकारांना कळलं की या छापखाना मालकाने बापूसाहेबांना फसवलं आहे. जप्तीत निघालेला छापखाना बापूसाहेबांना विकला आहे. आपण फसल्याचं लक्षात येताच बापूसाहेब हातपाय गाळून बसले. पण प्रबोधन चालवायचा होता. प्रबोधनकारांना हताश होऊन चालणार नव्हते. त्यांनी पुण्यात येऊन दोन अंक काढलेही. पण छापखाना आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे डबघाईला गेला होता.
कॉम्रेड निंबकरांचं ‘स्वदेशी’ नावाचं साप्ताहिक छापखान्यात छापलं जायचं. जुन्या मालकाने लावलेल्या सवयीनुसार तो उधारीत चालू होता. जुनी बाकीही मिळत नव्हती. त्यामुळे रोख पैसे मिळाल्याशिवाय छपाई करणार नाही, असा आक्षेप प्रबोधनकारांनी घेतला. प्रबोधनकारांना बरीच वर्षं छपाईचा व्यवसाय नीट माहीत होता. त्यांनी ‘स्वदेशी’ची छपाई बंदच केली. त्यामुळे जुन्या मालकाची जुनी उधारी बंद झाली. तो छापखान्यातल्या कामाची वसुली बाहेरच्या बाहेर परस्पर करत असे. तीदेखील प्रबोधनकारांनी थांबवली. त्यामुळे जुना छापखाना मालक अस्वस्थ झाला होता. ती संधी बघून कारस्थानी ब्राह्मणी टोळकी रोज त्याला चिथावण्यासाठी गोळा होऊ लागली. वाटल्यास एखाद्या अस्पृश्याला छापखाना चालवायला दे, पण ठाकर्याच्या हातातून काढून घे, असा ठेका सुरू केला. पण त्याच्या हातात काहीच नव्हतं. प्रबोधनकारांनी मालकाचा हक्क नाकारणं पुरेसं होतं. कारण कागदपत्रं काहीच झाली नव्हती. आणि मालकावर सावकारांच्या जप्तीच्या नोटिसा होत्या.
प्रबोधनकारांसमोर अडचण फक्त एकच होती, ती म्हणजे छापखाना मोरोबादादाच्या वाड्यात म्हणजे अगदी ब्राह्मणी वर्चस्वाच्या परिसरात होता. एक दिवस छापखान्याचा मालक १५-२०जणांना घेऊन प्रबोधनकारांच्या घरी आला. कशाला आलात, हे विचारल्यावरही तो शांतच होता. मग एकेकाला कंठ फुटू लागला. छापखाना मालकाची उपासमार सुरू आहे. त्याला दर महिन्याला ३०० रुपये तरी द्यावेत, अशी मागणी झाली. पण प्रबोधनकारांनी स्पष्टपणे हे शक्य नसल्याचं बजावलं. सहा महिने काहीच द्यायचं नाही आणि त्याबदल्यात जप्तीच्या संकटातून सोडवायचं, असं ठरल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. तरीही या टोळधाडीने जवळपास तासभर प्रबोधनकार आणि बापूसाहेबांचं डोकं खाल्लं.
या सगळ्या शनिदेवांचं प्रबोधनकारांनी शनिमाहात्म्यात अफलातून वर्णन केलं आहे. ते असं, नाना प्रकारचे नाटकी मुखवटे घालून पुणेरी शनिदेवांच्या टोळ्याच्या टोळ्या मला उलटसुलट उपदेशाने मदत करण्यासाठी माझ्या बिर्हाडी घिरट्या घालू लागल्या. गायतोंड्याच्या डिक्रेटलेल्या सावकारांनीही हाच क्रम पत्करला. प्रतिवादीचे गुप्त कारस्थान सावरण्यासाठी नकली वादाचे वकीलपत्र घेऊन खटले झुंडविणारे कित्येक झुंझार कोंबडे विश्रामबागेच्या उकीरड्यावर आरवू लागले. ज्यांचा माझा जन्मात कधी संबंध आला नाही व ज्यांची काळी गोरी तोंडे मी एकदाही पाहिली नाहीत, अशा निवडक इरसाल शनींची एक दिवस तर माझ्या बिर्हाडी मोठी शनि कॉन्फरन्सच भरली. त्यात श्रीमंत पदवी धारण करणार्या वेड्यापासून तो हॉटेलात खरकट्या कपबशा विसळून पोट भरणार्या महात्म्यापर्यंत सर्व दर्जाच्या वेदोनारायण शनींचा भरणा होता. त्या
कॉन्फरन्सने मला पुणेरी भटांच्या शनिमाहात्म्याचा जो अथांग थांग लागला, त्याची किंमत दहा टाटांच्या ऐश्वर्यालाही देता देववणार नाही. पुण्यात उलटसुलट कायदेबाजीच्या भानगडी कोण कोण कसकसे चालवितात, ह्याचा मला पुरा छडा लागला.’
प्रबोधनकारांनी या शनींच्या साडेसाडेतीला त्या संध्याकाळी वाटेला लावलं तरी त्यांचा प्रकोप त्याच रात्री होणार होता, याची कल्पना त्यांना नव्हती. प्रबोधनसमोर महासंकट उभं राहणार होतं.