बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे प्रत्ययकारी व्यंगचित्र आहे ११ मे १९७५ या तारखेचं. संदर्भ आहे तेव्हाच्या पोटनिवडणुकांचा. पण, आज जवळपास ५० वर्षांनंतरही कोणत्याही निवडणुकीत लागू पडेल, इतकं ते जिवंत आहे आणि त्याचवेळी विषण्ण करणारंही आहे. मतदारांची अवस्था पाहा. बेरोजगारी आणि गरिबीचा शाप काही सुटता सुटत नाही. ही सगळी काँग्रेसची काळी करणी असं म्हणत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी देशातल्या दोघांनाच श्रीमंत करण्याचा विडा उचलला आहे. गरीब आणि बेरोजगार त्यांना आठवतात ते मतदानापुरते, त्यांना धर्माच्या नावाने घाबरवून, काँग्रेस अमुक करेल, तमुक करेल, अशी भीती घालून, आपण सोडून सगळे भ्रष्ट असा आव आणून आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी ईडीची छडी उगारून आपल्या बाजूला वळवून घेतलेला देशातला सगळा भ्रष्टाचारी पुढारी वर्ग, मारून मुटकून का होईना, त्यांना साथ देत उभा आहेच. फक्त टंचाई आणि महागाई या मागे उभ्या असलेल्या शेठजींबरोबर अक्कलगहाण मोदीभक्तांचं एक वाढीव व्यक्तिचित्र काढलं असतं बाळासाहेबांनी यात… तेवढाच बदल, बाकी सगळं मागच्या पानावरून पुढे तसंच चालू आहे.