जगभरातील लीग क्रिकेटला वेळीच आळा न घातल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात आहे, असा सावधगिरीचा इशारा ‘एमसीसी’ने दिला आहे. त्यामुळे ‘लीग आटवा, क्रिकेट वाचवा’ हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लीगमुळे गेल्या दोन दशकांत नेमके काय साधले आणि काय अडचणीचे ठरत आहे, या बाबींचा घेतलेला वेध.
– – –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हंगाम आता भरगच्च झाला आहे. यात कुठेही उसंत नाही. याला कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका किंवा तिरंगी-चौरंगी क्रिकेट स्पर्धा नाही, तर देशोदेशी चालू असलेल्या क्रिकेट लीग आहेत. ट्वेन्टी-२०, द हंड्रेड, टेन-१० अशा काही तासांत संपणार्या सामन्यांच्या लीग मोठ्या प्रमाणात बोकाळल्या आहेत. याबाबत मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) चिंता प्रकट केली आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात लीगचे प्रस्थ वाढले आहे. या लीगना वेळीच आळा न घातल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात येणार आहे, असा सावधगिरीचा इशाराच ‘एमसीसी’ने दिला आहे. त्यामुळे ‘लीग आटवा, क्रिकेट वाचवा’ ही मोहीम सुरू होईल का? या लीग क्रिकेटने गेल्या दोन दशकांत नेमके काय साधले? क्रिकेटला त्यांनी विकसित केले की संकटात टाकले? अशा अनेक प्रश्नांवर ऊहापोह करणे अपरिहार्य ठरते.
२००८पासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या गौरवशाली अध्यायाला प्रारंभ झाला. त्याआधी, इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) ही बंडखोर मंडळींची लीग देशात अवतरली होती. पण शक्तिशाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तिच्यावर अनधिकृततेचा शिक्का मारून पुढील काही वर्षांत तिचे अस्तित्वच संपवून टाकले. ‘आयपीएल’मुळे बरीच मोठी अर्थक्रांती झाली. तिची रसाळ गोमटी फळे देशवासीयांनी, तशीच परदेशातील क्रिकेटपटूंनीही अनुभवली. एव्हाना क्रिकेटच्या नकाशावर जगातल्या सर्वात श्रीमंत मंडळाची पाळेमुळे खोलवर रुजल्यामुळे जगभरातील क्रिकेटपटूंना त्याचे मोठे आकर्षण निर्माण झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि अनेक क्रिकेट मंडळांना त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेतील हे विशिष्ट महिने रिक्त ठेवावे लागले. त्यानंतर काही वर्षे सारे सुरळीत सुरू होते.
कोणतेही सूत्र यशस्वी ठरले की त्याचे अनुकरण होतेच. स्वाभाविकपणे बिग बॅश लीग (ऑस्ट्रेलियाची), बांगलादेश प्रीमियर लीग, टी-२० ब्लास्ट, सुपर स्मॅश, पाकिस्तान सुपर लीग, एसए२०, लंका प्रीमियर लीग, नेपाळ टी-२० लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, मेजर लीग क्रिकेट लीग, आदी अनेक लीग जगभरात बोकाळल्या. ट्वेन्टी-२० हे पावणेचार तासांचे मनोरंजन आणखी कमी वेळाचे करता येईल का, या हेतूने द हंड्रेड, टेन-१० लीगपर्यंतही काही पावले उचलली गेली. पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात, तशा लीग झपाट्याने अवतरू लागल्यामुळे गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कॅलेंडर कमालीचे बदलले आहे. ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धांचा कार्यक्रम वगळून लीगचेच प्रस्थ सर्वत्र आहे. लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समतोल साधणे, हे फक्त भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यासारख्या ‘बिग-थ्री’ राष्ट्रांना शक्य झाले. त्यामुळे या त्रिकुटासह काही सधन राष्ट्रांचे क्रिकेट टिकून आहे. त्यांच्या मालिका अविरतपणे होत असतात.
पण अन्य राष्ट्रांची गोची झाली. वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, श्रीलंका यांच्यासारख्या अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे या देशांमधील क्रिकेटपटूंना वैयक्तिक अर्थकारण सुधारण्यासाठी देशोदेशीच्या लीग खेळण्याची उत्तम संधी चालून आली. ती त्यांनी साधली. परंतु त्यांच्या राष्ट्रीय क्रिकेटला अडचणी निर्माण झाल्या. क्रिकेटपटूंच्या अनुपलब्धतेचा मोठा फटका बसू लागल्याने या दारिद्र्यरेषेखालील देशांना आंतरराष्ट्रीय मालिका खेळणेसुद्धा कठीण जाऊ लागले आहे. ‘एमसीसी’ची चिंता नेमकी तीच आहे. कसलेही सोंग आणता येते, पण पैशाचे नाही, हेच खरे. ‘आयसीसी’ला अद्याप उत्पन्नाचे समान वाटप करता आलेले नाही. तिथे हे आर्थिक गणित सोडवून जागतिक अर्थसमानता त्यांना कशी काय आणता येईल?
‘आयपीएल’ किंवा देशोदेशीच्या लीगच्या तोट्यांबाबत गांभीर्याने चर्चा एकीकडे चालू असताना त्यांच्या फायद्यााचे पारडे अधिक जड आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेट लोकप्रिय होण्यात लीग क्रिकेटची भूमिका महत्त्वाची आहे. त्याआधी फक्त देशासाठी खेळणे, एवढेच स्वप्न क्रिकेटपटू बाळगायचे. ते पूर्ण नाही झाले की पुरे क्रिकेट असे म्हणत नोकरी-धंद्याचा मार्ग पत्करायचे. पण लीगमुळे खेळाडूंचे क्षितिज रुंदावले. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला. किंबहुना स्थानिक क्रिकेटपेक्षा मोठ्या प्रमाणात नवी गुणवत्ता या व्यासपीठावर दिसू लागली. नवनव्या प्रयोगांमुळे क्रिकेट विकसित झाले.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये क्लब महत्त्वाचा की राष्ट्रीय संघ ही चर्चा जशी ऐरणीवर असते, तशीच क्रिकेटमध्येही होऊ लागली. अनेक क्रिकेटपटू लीगसाठी फिट आणि हिट असतात, तर मालिकांच्या वेळी दुखापतग्रस्त किंवा कौटुंबिक कारणास्तव अनुपलब्धही असतात, हे आता कुणाच्याही नजरेतून सुटलेले नाही. काही क्रिकेटपटूंनी लीगचे महात्म्य समजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच अलविदा करण्याचे धारिष्ट्य केले. यात ख्रिस गेल, ब्रँडन मॅककलम, एबी डीव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती पत्करली. हाच स्टोक्स २०१९मध्ये इंग्लंडच्या विश्वविजेतेपदाचा शिल्पकार होता. न्यूझीलंडचा जगविख्यात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने कुटुंबाला वेळ देता यावा आणि फ्रँचायझी लीग खेळता याव्यात, म्हणून चक्क आपल्या क्रिकेट मंडळाला करारमुक्त करायला लावले. लीगवर अंकुश राहावा, म्हणून विविध क्रिकेट मंडळांनी आपल्या क्रिकेटपटूंसाठी नियमावली केली आहे. भारतानेही ‘आयपीएल’चे मोठेपण खालसा होऊ नये, म्हणून निवृत्ती पत्करल्याशिवाय कोणत्याही क्रिकेटपटूला परदेशातील लीग खेळता येणार नाही, असा फतवा काढला आहे. त्यामुळे मुनाफ पटेल, युवराज सिंग, प्रवीण तांबे, वीरेंद्र सेहवाग, उन्मुक्त चंद अशा अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा मार्ग पत्करला आहे.
लीग वाढल्या आणि क्रिकेट धोक्यात आले, ही वस्तुस्थिती गंभीर असली, तरी काळानुसार होणारा व्यावसायिक बदल आणि त्यांची आव्हाने यांबाबत ‘आयसीसी’ला विचार करावा लागणार आहे. अन्यथा, मालिका ही फक्त श्रीमंत देशांची चैन उरेल आणि गरीब देशांतील क्रिकेटपटू लीगची गुलामगिरी पत्करतील. लीगमुळे क्रिकेटपटूंचे पोट भरते आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. याच बाबींचा विचार क्रिकेट टिकवण्यासाठी करावा लागणार आहे.
खेळपट्टीवरून खडाजंगी
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा अधिक चर्चेत आली ती खेळपट्टीवरून झालेली खडाजंगी. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आप्रिâका या राष्ट्रांमध्ये वेगवान गोलंदाजांना अनुकूल, तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या आशियाई देशांमध्ये फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या बनवल्या जात आहे. कसोटी सामन्यांचे निकाल नियमानुसार यजमान देशांसाठी अनुकूल ठरत असले तरी त्यावरून खडाष्टक होत असते. अशा अपेक्षित एकतर्फी कसोटी सामन्यांबाबतही नाराजी प्रकट केली जात आहे. पण त्रयस्थ क्युरेटकरून ‘आयसीसी’च्या देखरेखीखालील खेळपट्टीचा पर्याय कुणालाही नको आहे. मग हे सातत्याने घडत राहणार आणि ते स्वीकारावे लागणार आहे. क्रिकेटसाठी प्रतिकुल असलेला हा खेळपट्टीचा नियम तसा अनुकूलतेनेच सर्वांनी स्वीकारला आहे.
मोठा धोका कसोटी क्रिकेटला
फ्रँचायझी लीग आणि कसोटी क्रिकेट यात समतोल हवा, अशी सूचना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरीनुसारच खेळाडूंचे मोठेपण ठरते. सचिनची शंभर शतके, मुरलीधरनचे आठशे बळी सर्वांच्या लक्षात आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टिन लँगरने म्हटले. या दोघांचीही चिंता योग्य आहे. गेल्या काही वर्षांत ट्वेन्टी-२० आणि लीग क्रिकेटमुळे कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटला अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडावे लागत आहे. लीग क्रिकेट वाढत असताना ‘आयसीसी’नेही ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अंतर चार वर्षांवरून दोन वर्षांवर केल्यामुळे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटपुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.