मी साहेबांना म्हटले होते, ‘एकदा वेळ काढून कुर्ल्याला या.’ त्यांनतर आम्ही बोलावल्यानंतर ते आले, पण वेगळ्या कारणासाठी. कुर्ल्याला ‘ब्राह्मण सेवा संघ’ या संस्थेचा कार्यवाह म्हणून काम करत होतो. त्या संस्थेच्या नव्या व्यायामशाळेचे उद्घाटन करायला आम्ही त्यांना बोलावले. त्यांच्याबरोबर ‘सर’ म्हणजे मनोहर जोशींनाही बोलावले होते. क्रीडांगण होते, जागा होती, पण पैशांअभावी बरीच वर्षे नवीन इमारतीचे काम रखडले होते. जुन्या व्यायामशाळेच्या आम्ही काही विद्यार्थ्यांनी उचल खाल्ली आणि ते काम पूर्ण केले.
व्यासपीठावर एका मोठ्या बारला दोन्ही बाजूंना चाकासारखी दोन-दोन, तीन-तीन मोठी वजने लावली होती. व्यायामशाळेतील विद्यार्थी ‘पॉवर लिफ्टिंग’चे वेगवेगळे प्रकार करून दाखवत होते. बारच्या दोन्ही बाजूंना गरज पडली तर मदत करायला दोन-दोनजण उभे होते. कार्यक्रम संपला. आपली मुले एवढीही वजने उचलायला शिकली तरी कधी? त्यांच्या अंगात एवढी ताकद आली तरी कुठून? असा विचार प्रेक्षक करत असतानाच लंगोट नेसलेली पाच-सहा वर्षांची दोन मुले व्यासपीठावर आली. बारच्या दोन बाजूंना उभी राहिली. बारचे एकेक टोक एकेकाने धरले आणि एवढी मोठी वजने लावलेला बार त्यांनी व्यासपीठावरून उचलून नेला. मोठा हंशा पिकला. त्यात साहेबही सामील झाले. करमणुकीबरोबरच आपली फसवणूकही झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. तो बार बांबूचा आणि मोठमोठी वजने ‘थर्माकोल’ची बनवली होती.
त्यानंतर ‘शरीर सौष्ठव दर्शना’चा कार्यक्रम झाला. ‘प्रभुदेसाई यांच्याकडे भाषासौष्ठव आहे हे माहीत होते, पण शरीरसौष्ठवसुद्धा आहे. ते एक शिवसैनिक आहेत याचा मला अभिमान वाटतो. आपल्या या व्यायामशाळेतून चांगले बिल्डर तयार होवोत अशा मी आपल्या संस्थेला शुभेच्छा देतो,’ असे साहेबांनी सांगितले.
यानंतरची साहेबांची कुर्ल्याला भेट १९७४ साली झाली. आमचा व्यायामशाळेतील आठ-दहाजणांचा एक गट होता. केलेल्या व्यायामाचा कस लागावा म्हणून आम्ही दर वर्षी एका दिवसात साधारण १५-२० मैल पायपीट होईल, अशा एखाद्या गड-किल्ल्यावर जात असू. हल्ली अशी बरीच मंडळे निर्माण झाली आहेत. पण १९६०-७०च्या काळात अशी स्थिती नव्हती. बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर असे काही एकांडे शिलेदार होते. गड-किल्ल्यांची फारशी माहिती उपलब्ध नव्हती. कोणीतरी सांगितलेली, कोणाकडून तरी ऐकलेली माहिती एकत्र करून आम्ही फिरत असू. त्यावेळी पं. महादेवशास्त्री जोशी यांचे ‘महाराष्ट्राची धारातीर्थे : भाग १ व २’ ही पुस्तके आम्हाला मिळाली. त्यांचा आम्हाला फार उपयोग झाला.
आम्ही १९६०-६१ साली सुरुवात केली असेल. त्यावेळी रायगडसुद्धा ओसाड होता. सर्वत्र गवत आणि झुडुपे माजली होती. पालीजवळच्या ‘सुधागडा’वर पायथ्याचे गावकरी आपली जनावरे पावसाळाभर गडावर सोडून देत. मला वाटते त्यावेळी ‘पन्हाळ्या’वर बंगलेवाल्यांची वर्दळ असायची आणि ‘प्रतापगडा’वर अफझल खानाच्या दर्ग्यामुळे काही लोकांचा राबता असायचा. असो.
आम्ही एवढ्या वर्षांत बरेच गडकिल्ले पाहिले होते. २४ ते २८ नोव्हेंबर १९७३ ला ‘पन्हाळा ते विशाळगड – पावनखिंडीमार्गे’ व १२ व १३ ऑक्टोबर १९७४ ला ‘रोहिडा-रायरेश्वर’ असे तीन किल्ले पाहिल्यावर आता आपण ही भटकंती थांबवूया आणि अजूनपर्यंत जे जे आमच्या भटकंतीत सामील झाले होते त्यांचे छोटेसे संमेलन जुन्या आठवणींना उजाळा देऊन साजरे करूया असे आम्ही ठरवले होते. म्हणजे महाराजांनी ‘रायरेश्वरी’ शपथ घेऊन आणि ‘रोहिडा’ जिंकून हिंदवी स्वराज्याची सुरुवात केली होती, तर आम्ही सांगता करत होतो. तेवढ्यात ‘छत्रपती शिवराज्याभिषेक त्रिशत संवत्सरी’चे उत्साही वारे वाहू लागले. ते आमच्याही कानात शिरले आणि आम्हीही आमच्या कार्यक्रमाला मोठे स्वरूप देऊन हा उत्सव साजरा करायचा असे ठरवले.
गड-किल्ल्यांची छायाचित्रे आकाराने मोठी करून घेतली. काही कलाकारांकडून राजांच्या जीवनप्रसंगावरील काही चित्रे काढून घेतली. महाराजांची वंशावळ, त्यांचा जीवनालेख, राज्य विस्ताराचे नकाशे, राजमुद्रा, एका व्यायामशाळेतून ढाली, तलवारी, भाले आणून २९ व ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर १९७४ रोजी वेगवेगळ्या कार्यक्रमांनी ही त्रिशत संवत्सरी आम्ही साजरी केली. (नंतर हे सर्व साहित्य, छायाचित्रे वगैरे, ढाली-तलवारी-भाले सोडून सर्व ‘शीव’च्या डी. एस. हायस्कूलला दिले.) ब्राह्मण सेवा संघ या संस्थेच्या सभागृहात छायाचित्रे व इतर सर्व साहित्य यांचे प्रदर्शन भरवले आणि समोरच असलेल्या त्यांच्या ‘रायरीकर क्रीडांगणा’वर रात्री ९ ते १२ असे कार्यक्रम केले. नाव दिले- ‘आनंदवन भुवन’. त्या निमित्ताने आम्ही एक छोटी पुस्तिका प्रसिद्ध केली. ल. रा. पांगारकर, श्री. कृ. कोल्हटकर, राम गणेश गडकरी व वसंत बापट यांची ‘महाराष्ट्र गीते’ आणि १० गड-किल्ले ‘जंजिरा’ व ‘पावनखिंडी’ची माहिती त्या पुस्तिकेत आहे. रोज सुरुवातीला सर्वांनी ‘बहु असोत सुंदर’ हे महाराष्ट्र गीत म्हणायचे, मग स्थानिक गायकांचे महाराष्ट्र गीत, मग मुख्य कार्यक्रम. शेवटी समर्थांचे ‘शिवरायाचे आठवावे स्वरूप’ हे आवाहन आणि ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपायचा.
कार्यक्रम होता- दि. २९-११-७४ रोजी सु. ग. शेवडे यांचे व्याख्यान. विषय- ‘शिवरायाची राजनीती’. दि. ३०-११-७४ रोजी संगीत दिग्दर्शक स्नेहल भाटवâर यांचे गायन ‘गीत शिवायन’. आणि दि. १-१२-७४ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे व्याख्यान. विषय- ‘माझा महाराष्ट्र’. (कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही ‘शिवसेना भवन निधी’स ५१/- रुपये देणगी दिली होती.)
साहेब आले. त्यांनी छायाचित्रांचे प्रदर्शन पाहायला सुरुवात केली आणि एके ठिकाणी थांबून त्यांनी मला विचारले, ‘प्रभुदेसाई, तुम्ही लेख लिहिला आहे तीच ना ही पावनखिंड?’
त्याचे असे झाले होते की यापूर्वी लिहिल्याप्रमाणे आम्ही आदल्याच दिवशी ‘पन्हाळा, विशाळगड, पावनखिंडी’मार्गे जाऊन आलो होतो. शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने गेलो होतो आणि त्यावेळच्या ‘घोडखिंडी’त पोहोचलो होतो. (बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झाली म्हणून ती ‘पावनखिंड’, नाही तर तिचे पूर्वीचे नाव ‘घोडखिंड’ किंवा बाजूच्याच ‘गजापूर’ गावावरून ओळखली जाणारी ‘गजापूरची खिंड’).
पण खिंड पाहून आमची निराशा झाली. ‘पन्हाळ्या’वरचे गुळवणी यांच्याकडून माहिती घेतली होती. गो. नी. दांडेकरांना पत्र पाठवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे १९६५ला ‘किर्लोस्कर’मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा लेख ‘किर्लोस्कर’ला पत्र पाठवून मिळवला. गजापूरचे सिनकर यांच्याकडून माहिती मिळवून रस्त्यांतील सर्व गावांची नावे जुळतात की नाही हे पाहून आणि शिवाय ‘वाटाड्या’बरोबर घेऊन आम्ही खिंडीत आलो. पण आमची निराशा झाली.
कारण खिंड म्हटल्यावर दोन डोंगरातून पलीकडे जाण्यासाठी वर चढत जाणारी एक अरुंद वाट आपल्या डोळ्यांसमोर येते. पावनखिंडीचे तसेच वर्णन आम्ही वाचले होते. अरुंद वाटेने मसूदचे सैन्य खिंड चढण्याचे प्रयत्न करत होते आणि वर उभे असलेले मावळे मोठमोठे दगड खाली ढकलून त्यांना त्याखाली चिरडत होते. म्हणजे बाजी उंचावर होते आणि मसूद चढावरून, खालून वर येण्याचा प्रयत्न करत होता. प्राकृतिकदृष्ट्या बाजी प्रभूंनी अडवलेली खिंड अशीच हवी. पण आम्ही उभे होतो पंधरावीस फूट खोलीच्या एका विहिरीच्या काठावर! (त्यावेळी मसूद तेथे उभा असणार.) खिंडीत उतरायचे तर झाडांच्या मुळांना धरून खाली उतरावे लागत होते. (जेथे बाजी प्रभूंना उभे राहावे लागेल.) मग मावळे खालून वर मोठमोठे दगड ढकलणार आणि त्याखाली चिरडून मसूदचे सैन्य मरणार असे कसे म्हणता येईल? तळाशी १५-२० माणसे मारतील एवढी जागा आहे. तेथून एक ओहोळ वाहातो तीच ‘कासारी’ नदी. बाजी प्रभूंनी योग्य ठिकाणी खिंड अडवली आणि लढवलीही! कोणत्याही दृष्टीने ही खिंड तीच हे पटेना. तेव्हा आम्ही वाटाड्याला ‘गजापूरच्या खिंडी’कडे न्यायला सांगितले, तेव्हा ‘ही वाट गजापूरच्या खिंडीतून जात नाही’ असे त्याने सांगितले तेव्हा ‘ती खिंड’ ही नव्हे याची आम्हाला खात्री पटली. गजापूरच्या गणपतराव सिनकर यांनी हीच ती खिंड अशी खात्री दिली तरी आम्हाला ते पटले नाही.
माझा लेख ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध होताच पुण्याच्या एका अशाच मंडळाने भ्रमंती करून त्या भागातील अशी ७ ते ८ ठिकाणे शोधून काढली, ज्यांना ‘पावनखिंड’ म्हणता येईल.
आता दोन-चार वर्षांपूर्वी दिवसाउजेडी मोटारीने गेलो तेव्हा आम्ही जी विहिरीसारखी खिंड पाहिली होती, तीच ‘पावनखिंड’ असल्याचा शासकीय फलक तेथे लावलेला होता. अर्थात सरकारने इतिहास अभ्यासकांची, संशोधकांची संमती घेऊनच हे सर्व केले असणार. मी काही अभ्यासक किंवा संशोधक नाही. साहेबांनी मला विचारलेल्या प्रश्नामागे हा सगळा इतिहास होता ज्याची त्यांनी पूर्ण माहिती घेतली होती. ‘माझा महाराष्ट्र’ या जिव्हाळ्याच्या विषयावर साहेब फार समरसून बोलले. ‘खिंडी’बद्दल बोलले. आमचे कौतुक केले.
योगायोग म्हणजे ‘ठाणे’ शहराचे ‘नगराध्यक्षपद’ जिंकून सतीश प्रधान हे थेट सभेतच आले. त्यांचा सत्कार करण्याची संधी आमच्या मंडळाला मिळाली. आमचा हा कार्यक्रम आखणी, आयोजन, नियोजन, शिस्त आणि रंगत या सर्वच दृष्टीने फार सुंदर झाल्याचे प्रेक्षकांनी, रहिवाशांनी सांगितले आणि साहेबांनीही!
आमच्या भटकंतीचे योग्य ते सार्थक झाले, समर्पक सांगता झाली असे आम्हाला वाटले. रात्री आम्ही ‘मावंद’ घातलं. त्यानंतर साहेबांची कुर्ल्याला भेट झाली नाही.