गॅसचा सिलिंडर ज्याच्या पाठीवर आहे, असा आडवा पडलेला, कुचंबलेला सामान्य माणूस पाहिल्यावर या सदराच्या वाचकांना प्रश्न पडेल की बाळासाहेबांच्या कुंचल्याने वर्तमानातले चित्र भूतकाळात कसे रेखाटले… असेही थोर कलावंत, व्यंगचित्रकार हे द्रष्टे असतात, काळाची पावलं ते सर्वांच्या आधी ओळखतात. शिवाय इतिहासाचीही पुनरावृत्ती होत असते. १९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनीच गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्यांचे चिरंजीव राजीव गांधी हे प्रचंड बहुमताने पंतप्रधानपदावर विराजमान झाले. १९८५ साली त्यांच्या सरकारच्या बजेटमध्ये टेलिव्हिजन आणि रेडिओ या मनोरंजन माध्यमांवरची परवाना फी कमी केली गेला, पण, घासलेट, गॅस, पेट्रोल यावर कर वाढले, महागाई वाढली. अर्थात टीव्हीच्या जादूमध्ये अडकलेल्या या व्यंगचित्रातल्या सामान्य माणसाला आपले कंबरडे मोडले आहे, याची जाणीवही नाहीये… मोदींच्या काळात, सुमारे ३८ वर्षांनंतर एकच बदल झालाय… टीव्हीची जागा मोबाइल आणि डेटा यांनी घेतली आहे… लोक इन्स्टा, व्हॉट्सअप, क्लिपा, रील्स, सेल्फी, सिनेमे, गाणी, गेम्स यांच्यात गुंतलेले आहेत… सरकारने कंबरेचे दोन तुकडे केले तरी कुठून कळणार आहे त्यांना?