१५ वर्षांपूर्वी थंडीच्या मोसमात जगाच्या विविध भागातून येणार्या स्थलांतरित विदेशी पक्ष्यांची संख्या २४ ते ४० हजाराच्या आसपास असायची, आता ते प्रमाण हळूहळू कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. कारण, काही वर्षांपासून ऋतुमानात देखील बदल होत चालला आहे, मॉन्सूनचा कालावधी संपल्यानंतर ऐन थंडीच्या मोसमात मुसळधार पाऊस पडू लागला आहे. दिवसेंदिवस बदलत चाललेल्या परिस्थितीचा परिणाम या पक्ष्यांवर होऊ लागला आहे. काही पक्षी नेहमीच्या वेळेपेक्षा एक महिनाभर उशिराने येऊ लागले आहेत.
—-
रविवारचा दिवस होता… आयटी इंजिनिअर म्हणून काम करणारा विशाल सकाळी चार मित्रांना सोबत घेऊन सायकलिंग करण्यासाठी निघाला होता. एका रस्तावर सर्व मंडळी चहा पिण्यासाठी थांबली होती, त्या पंधरा मिनिटाच्या काळात अनेक विषयांवर चर्चा सुरू होत्या. त्यांच्यासोबत असणार्या मनीषला अचानकपणे पुण्याच्या परिसरात थंडीमध्ये येणार्या विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची आठवण झाली. आपण चाललो आहोत, त्याच रस्त्यावर कुठेतरी तो स्पॉट असेल, म्हणून फोनाफोनी सुरू झाली. सातारा रोडवरील शिरवळजवळचे एक ठिकाण सापडले… झाले, या सर्व मंडळींनी थेट तिकडे मोर्चा वळवला. तिथे पोहोचून सगळ्यांनी बराच वेळ वाट पाहिली… पण, ते सुप्रसिद्ध स्थलांतरित विदेशी पक्षी काही दिसेनात! आपण योग्य ठिकाणी आलो आहोत ना, याची त्यांनी शहानिशा केली. विदेशी पक्षी इथेच येतात ना, याची आजूबाजूला चौकशी केली. पक्षी का दिसत नाहीयेत, म्हणून या मंडळींनी थेट ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांना फोन केला आणि त्यासंदर्भात विचारणा केली, तेव्हा त्यांना हे असं का झालं त्याचा उलगडा झाला…
डॉ. पांडे यांनी या तरुणांना असं काय सांगितलं?
डॉ. पांडे म्हणाले, हल्लीच्या काळात सगळ्या जगभरच ग्लोबल वॉर्मिंगचे संकट गहिरे होत चालले आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांवर परिणाम होतो आहे, त्यांचे अधिवास देखील बदलत चालले आहेत. म्हणूनच विदेशातून येणार्या स्थलांतरित पक्ष्यांचे वेळापत्रकही आता बदलत चालले असून या पक्ष्यांचे इथे येण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. विदेशातून येणारे स्थलांतरित पक्षी पाहण्याच्या ओढीपोटी गेलेली ही मंडळी निराश होऊन घरी परतली…
जगात बदल ही सातत्यपूर्ण अशी एकमेव गोष्ट आहे. पृथ्वीचं हवामानही नैसर्गिकरित्या बदलत आलं आहे. मात्र, आज जे बदल घडत आहेत, ते नैसर्गिक नाहीत. ऋतूमानात होत असणार्या बदलांना आता मानवी चुका कारणीभूत आहेत. त्याचा फार मोठा परिणाम या पक्ष्यांवर होतो आहे. हे असेच सुरू राहिले तर दर वर्षी आपल्याला दिसणारे विदेशी पक्षी भविष्यात नजरेला पडणार नाहीत.
दरवर्षी जपान मलेशिया, म्यानमार, पूर्व युरोप, दुबई अशा अनेक भागामधून विदेशी पक्षी काही दिवसांसाठी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुक्कामाला येत असतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात होणार्या बदलांमुळे हे स्थलांतर गडबडून गेलं आहे. अनेक ठिकाणी बर्फ वितळला आहे. पक्ष्यांना वर्षानुवर्षं ठरावीक चक्राने ऋतूमान अनुभवण्याची सवय होती. तीच विस्कटून गेली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या प्रजननावर झाला आहे. त्यांचं हजारो मैलांचं स्थलांतर विणीच्या हंगामाशी जोडलेलं असतं. ते सगळंच चक्र चमत्कारिक होऊन बसल्याने अनेक पक्षी स्थलांतर करायचेच थांबले आहेत, गोंधळून गेले आहेत, असं डॉ. पांडे सांगतात.
अधिवासबदलाचा गंभीर परिणाम
पूर्वी माळरानाच्या ठिकाणी क्रौंच पक्षी मोठ्या प्रमाणात यायचे. आता माळरानाच्या जागेवर उसाची किंवा अन्य पिकाची शेती केली जाते, त्यामुळे क्रौंच पक्ष्यांना माळरानंच उरलेली नाहीत. माळटिटवी, माळढोक, तणमोर, चंडेल असे माळरानावर दिसणारे अनेक पक्षी आता दिसेनासे होऊ लागले आहेत. आपणच त्यांचा हक्काचा अधिवास हिसकावून घेत, त्यावर पिके घेण्यास सुरुवात केली असल्यामुळे अनेक वर्षांपासून दरवर्षी थंडीच्या मोसमात येणारे हे पक्षी दिसेनासे होऊ लागले आहेत. आपणच त्यांची वाट कायमची बंद केली आहे, असे डॉ. पांडे सांगतात.
जलप्रदूषण आणि कीटकनाशकांचा धोका
पट्टकदंब हंस, तलवार बदक, चक्रवाक असे अनेक स्थलांतरित पक्षी पूर्वी महाराष्ट्रात पाहायला मिळत. आता ते दिसत नाहीत, याला जलप्रदूषणही कारणीभूत आहे. समुद्राच्या पाण्यात त्यामुळे माशांची संख्या कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम स्थलांतरित पक्ष्यांच्या अन्नसाखळीवर झाला आहे. शेतात झटपट पिके येण्यासाठी रसायने आणि कीटक मारण्यासाठी कीटकनाशके फवारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पक्ष्यांना विषबाधा होणे, त्यांची हालचाल मंदावणे, अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी काही ठिकाणी स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत सापडले होते. ते कशामुळे मरण पावले आहेत, याचा शोध घेतला गेला. तेव्हा त्यांच्यात कीटकनाशकांचे अंश सापडले, असे डॉ. पांडे सांगतात.
ही धोक्याची घंटा
१५ वर्षांपूर्वी थंडीच्या मोसमात जगाच्या विविध भागातून येणार्या स्थलांतरित विदेशी पक्ष्यांची संख्या २४ ते ४० हजाराच्या आसपास असायची, आता ते प्रमाण हळूहळू कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. कारण, काही वर्षांपासून ऋतुमानात देखील बदल होत चालला आहे, मॉन्सूनचा कालावधी संपल्यानंतर ऐन थंडीच्या मोसमात मुसळधार पाऊस पडू लागला आहे. दिवसेंदिवस बदलत चाललेल्या परिस्थितीचा परिणाम या पक्ष्यांवर होऊ लागला आहे. काही पक्षी नेहमीच्या वेळेपेक्षा एक महिनाभर उशिराने येऊ लागले आहेत. सैबेरियामधून दरवर्षी इथे येणारा शैलकस्तुर पक्षी गेल्या वर्षी नेहमीच्या वेळेपेक्षा १५ दिवस उशिराने आल्याची नोंद आहे. पक्ष्यांच्या या उशिरा येण्यामुळे त्यांची अन्नसाखळी विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते.
जैवविविधता फक्त ग्रामीण भागात
सध्या प्रत्येक शहरामध्येच मोठ्या प्रमाणात ‘विकास’ सुरू आहे. त्याचा थेट परिणाम तिथल्या पर्यावरणावर झाला आहे. आताच्या घटकेला जैवविविधता कुठे उरली असेल, तर ती ग्रामीण भागामध्येच शिल्लक आहे… ग्रामीण भागाचे जसे शहरीकरण होत जाईल तसतसा या पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास आक्रसत जाईल आणि त्यांचं स्थलांतर थांबेल. यावर काही ‘कुंडीत शेती’तज्ज्ञ विकासवादी म्हणतील की त्याने काय फरक पडतो? नाही आले हे पक्षी तर काय बिघडलं? ज्यांना ते पाहायचे असतील त्यांच्यासाठी पक्षी संग्रहालय किंवा अभयारण्य करावं. हे इतकं सोपं नाही. स्थलांतरित पक्षी हे माणसांसाठी बायोइंडिकेटर (जैविक दर्शक) म्हणून काम करतात. त्यांच्या येण्याजाण्यातून, त्यातल्या बदलांतून आपल्याला आपल्या भूमीतल्या हवामानाबद्दल फार मौलिक निरीक्षणं समजतात. काही पक्षी विशिष्ट हंगामात नैसर्गिक कीटकनाशकांचंही काम करतात. निसर्गाने त्यांच्यासाठी निर्माण केलेले अधिवास आपण जपायला हवेत. माळरानावर होणारे शेतीचे प्रयोग थांबवायला हवेत. औदयोगिक वसाहतींमधून थेट नद्यांमध्ये येणारे प्रदूषित पाणी थांबवायला हवे. डोंगरदर्यांच्या भागात होणार्या जंगलतोड बंद करायला हवी. पक्ष्यांसाठीचे अधिवास ही त्यांची हक्काची जागा आहे, ती त्यांच्यासाठीच ठेवायला हवी, ही लोकभावना व्हायला हवी.
पक्षी पर्यटनाचा पर्याय
प्रत्येक कामात स्वत:चा फायदा पाहणे ही एक मानवी प्रवृत्ती आहे. त्यादृष्टीने विचार केला तरी स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित करणे अंतिमत: आपल्या भल्याचेच आहे. तसे केले तर पक्षी पर्यटनाला चांगली गती मिळू शकते. यासाठी सरकारने पुढे येऊन धोरण आखणे आवश्यक आहे. त्यात स्थानिक जनतेला पक्ष्यांचं महत्त्व समजावून सांगून अशा पर्यटनासाठी त्यांना अनुकूल करून घेणंही अभिप्रेत आहे. अधिवास सुरक्षित झाले की सध्या रोडावलेली या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या आगामी काळात वाढलेली दिसू शकते.