या व्यवसायातील रोड सेफ्टी हा विषय चेतनसाठी जास्त कुतूहलाचा होता. देशातील रस्त्यांवर २०२० साली साडेतीन लाख अपघात झाले आणि त्यातील एक लाख तीस हजार लोकांना जीव गमवावा लागला अशी अधिकृत आकडेवारी सांगते. हे जीवघेणे अपघात कमी करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा तसेच रोड मेन्टेनेंसचे काम करणार्या खाजगी कंपन्या नेहमीच प्रयत्न करत असतात. या कामात आपल्याला काय मदत करता येईल याचा विचार चेतनच्या मनात नेहमी घोळत असे.
—-
‘आमच्या खानदानात कुणी धंदा केला नाही पण मी केला! अजिबात भांडवल उपलब्ध नसतानाही केला आणि वाढवला देखील…’ हे शब्द आहेत एका तरूण तडफदार मराठी उद्योजकाचे- चेतन नलावडे याचे, ज्याने भारतातील पहिला ‘रोबोटिक फ्लॅगमॅन’ बनवला आहे. त्याच्या या टेक्नोलॉजीमुळे आज देशभरात राष्ट्रीय महामार्गावर काम करणार्या पन्नासहून अधिक रस्ते कामगारांचे जीव वाचले आहेत.
चेतनचा हा प्रवास गुळगुळीत मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसारखा नक्कीच नव्हता तर तो आजही खाचखळग्यांनी भरलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील एखाद्या रस्त्यासारखा होता. तो यशाच्या एका मोठ्या टप्प्यावर आज पोहोचला आहे. ‘पीएन सेफ्टी’ या चांगली कमाई करणार्या कंपनीचा तो डायरेक्टर आहे. मुलुंड व मस्जिद बंदर येथे ऑफिस आणि धुळे येथे सुरक्षाविषयक साधने बनवणारा कारखाना असा त्याचा आजवरचा व्यवसायविस्तार आहे.
या प्रवासाची सुरुवात झाली नाशिकमध्ये. तिथला जन्म. तिथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर चेतनने बीसीए ही पुणे विद्यापीठाची डिग्री संपादन केली. या अभ्यासक्रमातून त्याचा कॉम्प्युटर अप्लिकेशन्स आणि मार्केटिंग यांचा पाया पक्का झाला. एखाद्या मुलीच्या प्रेमात पडण्याच्या वयात तो जाहिरात आणि विक्री या विषयांच्या प्रेमात पडला. तसं पाहिलं तर मार्वेâटिंग त्याच्या रक्तातच होतं कारण चेतनचे वडील टपारिया टूल्स या अभियांत्रिकी साधने बनविणार्या कंपनीत विक्रीचे काम करायचे. त्यामुळे लहानपणी प्लॅस्टिकच्या खेळण्यांमध्ये रमण्यापेक्षा चेतन वडिलांच्या ऑफिस बॅगमधील पक्कड, सॉकेट्स, क्लॅम्प या खेळण्यांसोबत जास्त रमायचा. मैदानातील विटी दांडूऐवजी लोखंडी पाइप आणि नटबोल्ट्स हेच चेतनचे खेळसाहित्य होते. कॉलेज संपल्यावर त्याने पहिली नोकरी धरली ती एसबीआय लाइफ इन्शुरन्सची. त्या काळात विमा म्हणजे काय हेही फारशा लोकांना माहीत नसायचे आणि ज्यांना माहीत होतं त्यांच्या मनात एलआयसी म्हणजेच विमा हे समीकरण पक्कं झालं होतं. अशा वेळी नवीन कंपनीसाठी नाशिकच्या गल्लीबोळात फिरून, मार्केटिंग-कौशल्य पणाला लावून ग्राहक जोडणे, विमाविक्रीसाठी नवीन एजंट बनविणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे कठीण काम चेतनने अनेक अडचणींना तोंड देत पेलले.
विमा कंपनीत दोन वर्षांचा अनुभव घेऊन चेतनने २०११ साली बायोसेन्सर्स या हृदयाचे स्टेंट बनवणार्या आंतरराष्ट्रीय कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करायला सुरुवात केली. मुंबई पुणे, नाशिक या शहरी भागातील प्रसिद्ध व अनुभवी हृदयरोग तज्ज्ञ हे या शस्त्रक्रिया साधने बनवणार्या कंपनीचे प्रमुख ग्राहक होते. विविध रुग्णालयांच्या अधिकार्यांसोबत जनसंपर्क वाढवत आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या हृदयाला पाझर फोडून कंपनीचा धंदा कसा वाढेल याची काळजी घेत चेतनने दुसरी नोकरी इमाने इतबारे केली. या मल्टिनॅशनल कंपनीत परदेशी लोकांसोबत काम करताना सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या नाशिकच्या या मराठी मुलाचं इंग्रजी हळूहळू पॉलिश होत गेलं. इथेही दोन वर्षांचा काळ लोटल्यावर त्याला नवीन क्षेत्र खुणावायला लागलं. आरोग्यसेवा क्षेत्राला राम राम करून चेतनने सकाळ मीडिया ग्रूपमधील ‘अॅग्रो वन’ या साप्ताहिकासाठी पुन्हा इव्हेंटस् आणि मार्केटिंग हेच जॉब प्रोफाईल निवडले. या कामासाठी तो नाशिकहून पुण्यात शिफ्ट झाला. या नोकरीच्या निमित्ताने, शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करणार्या व्यक्तींसोबत चेतनने महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम केले.
या तिन्ही नोकर्यांचा आढावा घेताना चेतन म्हणाला, मी कोणतीही नवीन जबाबदारी घ्यायला सदैव पुढे असायचो आणि दिवस-रात्र काम करताना कधी घड्याळाकडे पाहिलं नाही. आजही या तीनही कंपनीतील सहकारी व वरिष्ठांसोबत माझे ऋणानुबंध टिकून आहेत.
तीन नोकर्या केल्यावर, यापुढे आपलं मार्केटिंग कौशल्य स्वतःसाठीच का वापरू नये, या विचारापासून तशा ठोस निर्णयापर्यंत येणे चेतनसाठी सोपे नव्हते. तो म्हणाला, ‘नोकरी करत असताना माझं लग्न होऊन नवीन संसार सुरू झाला होता. हातातील भरवशाची नोकरी सोडून बिनभरवशाचा धंदा करण्याचा निर्णय घेणं हे फारच कठीण होतं, पण जिद्द आणि घरच्यांचा पाठिंबा या जोरावर मी व्यवसायाची नवी वाट धुंडाळायला तयार झालो. धंदा तर करायचा आहे, पण भांडवलाचा पत्ता नाही अशी बहुतांश तरुणांची असते, तशीच माझी पण गत होती. भांडवलाचं काय करायचं? असा प्रश्न अनुत्तरित असताना एक दिवस अचानक मित्र गणेश पाटील याची भेट झाली. गणेश पूर्वीपासूनच समुद्री सुरक्षा, अग्नीसुरक्षा, इमारत बांधकाम आणि रस्ते बांधणीच्या सुरक्षाविषयक व्यवसायात होता. शिळोप्याच्या गप्पा मारल्यावर गाडी व्यवसायाकडे वळली. गणेश आधुनिक मार्केटिंगची समज असलेल्या जोडीदाराच्या शोधात होता आणि मी व्यवसायाचा पाया पक्का असलेल्या जोडीदाराच्या शोधात. तिथेच आमचे व्यावसायिक विचार जुळले आणि २०१६ साली ‘पीएन सेफ्टी’ (पाटील-नलावडे सेफ्टी) या नावाने मस्जिद बंदर येथे नवीन कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली. तुम्हाला सांगतो, मस्जिद बंदर हा विभाग म्हणजे व्यवसाय करणार्यांसाठी अलिबाबाची गुहा आहे. जगातील कोणताही माल, कोणतंही सामान तुम्हाला इथे होलसेल दरात मिळतं. देशभरातून अनेक व्यापारी इथे सामान घेण्यासाठी येत असतात. व्यावसायिक गजबजाट असलेल्या या विभागात वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. अशा ठिकाणी व्यवसायाची सुरुवात झाली तर तुम्ही तुमची पाहिली लढाई जिंकलेली असते. कोणताही संग्राम हा जिंकण्यासाठीच लढला जातो. व्यावसायिक यशासाठी या धंद्यातील तुमचे स्पर्धक कोण आहेत, चढाओढ किती आहे, आपण विकणार्या वस्तूंचे मार्केट कसे आहे, आपला माल विकला जाईल का, विकल्यावर त्याचे पैसे वेळेवर येतील का, या सर्व बाबी आधी तपासून पाहाव्या लागतात.’ नफ्यातोट्याच्या सर्व शक्यता पडताळल्यावर चेतनने व्यवसायाला सुरुवात केली.
आपली मराठी मुले धंदा करायचं ठरवतात, तेव्हा त्यांच्यापुढे भांडवल ही समस्या प्रथम डोकं वर काढून उभी राहते. नवीन व्यवसायाला सुरुवात करताना आपल्याकडे मोठा कारखाना हवा, मोठी गाडी, पॉश ऑफिस असावं, हाताखाली पाच-पंचवीस माणसे कामाला हवीत, अशा त्यांच्या कल्पना असतात. कारण या मुलांनी त्यांचे आईवडील जिथे कामाला असतात ते ऑफिस पाहिलेलं असतं. त्या ऑफिसच्या मालकांना मर्सिडीज, बीएमडब्लूमधून फिरताना, मोठमोठे पुरस्कार घेताना, जगभर फिरताना प्रत्यक्षात किंवा फोटोंमधून पाहिलेले असतात. झालंच तर हिंदी-मराठी सिनेमात बिझनेसमनची भूमिका साकारणारे चरित्र अभिनेते महागड्या कोटाने व वाढलेल्या पोटाने कसे ‘गर्भश्रीमंत’ दिसतात, कसे वागतात हे त्यांनी पाहिलेलं असतं. ही मुलं या कल्पना घेऊन स्टार्ट अप किंवा कारखाना उभारणीचा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन बँकेत जातात तेव्हा तुम्ही कर्ज घेताना गहाण काय ठेवणार, तुमचे मागील तीन वर्षांचे आयटी रिटर्न्स कुठे आहेत याची विचारणा केली जाते. अजून व्यवसायाला सुरुवातच केली नाही, तर आयटी रिटर्न्स कुठून आणायचे, असा प्रश्न मुलांसमोर उभा राहतो. समजा, खटपट करून कर्ज मिळवले, धंदा सुरू केला आणि अनुभव नाही म्हणून नवीन धंद्यात सुरुवातीलाच खोट आली तर पुन्हा त्याच धंद्यात उभं राहणं फार कठीण असतं. म्हणूनच व्यवसाय करताना आधी त्या व्यवसायाच्या खाचाखोचा समजून घेणे, अनुभव घेणे, जमेल तितका अभ्यास करणे या गोष्टी करायला हव्यात. आपले प्लस पॉइंट ओळखून धंद्याची सुरुवात बिनभांडवलाने करता आली तर फारच उत्तम, कारण अशा वेळी तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं आणि तुम्ही रोजच्या खर्चाच्या ताळेबंदाचा विचार न करता ध्येयाच्या दिशेने बिनधास्त मार्गक्रमण करू शकता. धंद्यात उतरल्यावर पुढील काही महिने बँक खात्यात एक तारखेला हमखास जमा होणारा पगार बंद होतो आणि शिलकीमधून रोज पैसे खर्चासाठी काढावे लागतात, ही स्थिती नोकरी सोडून नवीन धंद्यात पडणार्यांसाठी सुरुवातीच्या काळात फार भयावह असते. कॉर्पोरेट जॉबमधील कंफर्ट सोडून, व्यवसायात आलेल्या नोकरदार मंडळींच्या बचतखात्यातील गंगाजळी आटायला लागते तेव्हा एका वर्षातच ते गाशा गुंडाळतात आणि व्यवसाय करण्याचे स्वप्न बघायचेच थांबवतात. हे टाळण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करताना महागडी गाडी, पॉश ऑफिस आणि देखावा टाळून अनावश्यक खर्च कमी करणे व व्यवसायाची खरी गरज ओळखून हिशेब मांडणे आवश्यक असते.
चेतनची कहाणी थांबवून मध्येच हे सांगण्याचं कारण म्हणजे चेतनने हे भान ठेवलं आणि व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात कंपनीचे खर्च आटोक्यात ठेवत सुरक्षा साहित्याची विक्री सुरू केली, म्हणून तो आजच्या टप्प्यावर पोहोचला आहे, हे या सदरातून व्यवसायाची प्रेरणा घेणार्या वाचकांच्या मनात अधोरेखित व्हायला हवं. एका बाजूला चेतनने हिरानंदानी, टाटा प्रोजेक्ट्स, रहेजा अशा इमारत बांधकाम व्यावसायिकांना ग्राहक बनवले तर सुरक्षा साहित्याची घाऊक विक्री करण्यासाठी हैद्राबाद, बंगलोर, चेन्नई, बडोदा, दिल्ली अशी भारतभ्रमंती करत नवीन वितरक नेमले. व्यवसायाची घडी हळुहळू बसत होती.
या व्यवसायातील रोड सेफ्टी हा विषय चेतनसाठी जास्त कुतूहलाचा होता. देशातील रस्त्यांवर २०२० साली साडेतीन लाख अपघात झाले आणि त्यातील एक लाख तीस हजार लोकांना जीव गमवावा लागला अशी अधिकृत आकडेवारी सांगते. हे जीवघेणे अपघात कमी करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा तसेच रोड मेन्टेनेंसचे काम करणार्या खाजगी कंपन्या नेहमीच प्रयत्न करत असतात. या कामात आपल्याला काय मदत करता येईल याचा विचार चेतनच्या मनात नेहमी घोळत असे. एक दिवस तो नाशिक हायवेचं काम पाहणार्या एका क्लायंटकडे गेला असताना ते म्हणाले चेतनजी, ‘आम्ही सिंगापूरवरून एक ‘रोबोटिक फ्लॅगमॅन’ मागवला आहे. पण त्यांची किंमत अडीच लाख रुपये प्रति नग असल्यामुळे आम्हाला ते अधिक संख्येने विकत घेता येत नाहीत. तुम्ही हा फ्लॅगमॅन भारतात कमी किंमतीत बनवून देऊ शकता का?’ समोरून आलेलं नवीन चॅलेंज चेतनने स्वीकारलं आणि रोबोटिक फ्लॅगमॅन बनविण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचा शोध सुरू केला. आयआयटीमधील काही जणांकडे विचारणा केली, अवघं लॅमिंग्टन इलेक्ट्रॉनिक मार्केट पालथं घातलं, पण हाती निराशाच आली.
काय करावं सुचत नव्हतं… मग एक दिवस चेतनला एक अस्सल भारतीय मंत्र आठवला ‘जुगाड’! आता त्या दिशेने प्रवास सुरू झाला. भिवंडी येथे त्याने घेतलेले वेअरहाऊस होते, तिथे एक-एक वस्तू जमा करून एका हातात लाल दिवा लुकलुकणारा कंदील घेऊन ‘थांबा’ हा इशारा देणारा आणि दुसर्या हाताने समोरून येणार्या वाहनचालकांना इथे काम सुरू आहे, तुम्ही सावकाश बाजूच्या लेनमधून पुढे जा, असं खुणेने सांगणारा ‘स्वयंचलित मूर्तिमंत झेंडेवाला’ अखेर तयार झाला. फॅक्टरीतच याचं नामकरण केलं गेलं ‘पी. एन. रक्षक’ आणि किंमत ठेवली रु. ४९०००/-. कंपनीतील ज्या डायरेक्टर साहेबांनी हा फ्लॅगमॅन बनवायला सांगितला होता, त्यांना चेतनचा फ्लॅगमॅन फारच आवडला आणि त्यात काही जुजबी बदल करायला सांगून आणखी ‘पीएन रक्षक’ बनविण्याची ऑर्डर दिली.
चेतन सांगत होता, देवदूत या जगात असतात, असं म्हणतात पण ते कधी देवळात बसत नाहीत ते आपल्या आजूबाजूला असतात; कधी कधी ते कॉर्पोरेट जगतात देखील असतात. ज्या डायरेक्टर साहेबांनी आम्हाला फ्लॅगमॅनची ऑर्डर दिली होती त्यांनीच एका रोड सेफ्टी कॉन्फरन्समध्ये विविध कंपन्याच्या डायरेक्टर्सना आमच्या ‘पीएन रक्षक’ची माहिती दिली. ती कॉन्फरन्स संपल्यावर काही दिवसातच माझ्याकडे इतर रोड मेन्टेनन्स कंपन्यांच्या ऑर्डर्सचा ओघ वाढला. आता आमचा ‘पीएन रक्षक’ देशभरातील अनेक हायवेंवर दिमाखाने उभा आहे.
एका बाजूने चेतनच्या कंपनीला स्थैर्य लाभत होतं, पण खर्या उद्योजकाने अल्पसंतुष्ट राहू नये असं म्हणतात. ‘दिल मांगे मोअर’ ही कॉलर ट्यून त्यांच्या मनात गुणगुणायला हवी. एक दिवस चेतनचे ‘सकाळ मीडिया’मधील जुने बॉस, डेप्युटी जनरल मॅनेजर प्रमोद राजेभोसले त्याला भेटले. त्यांनी विचारलं सध्या नवीन काय सुरू आहे? चेतनने त्याच्या ‘पीएन रक्षक’ची माहिती दिली. त्यावर ते म्हणाले, मी तुझी एका माणसाशी ओळख करून देतो, ते तुला नक्कीच मार्गदर्शन करतील. राजेभोसले यांनी ‘सकाळ’ समूहाचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांची वेळ घेतली. या भेटीच्या आठवणींना उजळा देत चेतन म्हणाला, मी पार्टनर गणेशसोबत पवार साहेबांच्या दालनात दाखल झालो आणि त्यांना प्रेझेंटेशन दिलं. त्यांना देखील ‘पीएन रक्षक’ ही कल्पना आवडली. त्यांनी मला विचारलं, ‘माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी आहे?’ मी म्हणालो, ‘आम्हाला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरकडून ऑर्डर मिळत आहेत, पण आमची यापेक्षा मोठी झेप घेण्याची इच्छा आहे. त्यासाठी भारत सरकारच्या एनएचआय डिपार्टमेंटकडून ऑर्डर मिळाली तर आम्ही संपूर्ण देशात काम करू शकू.’ पवार साहेब म्हणाले, ‘हे खातं तर गडकरी साहेबांकडे आहे ना? थांबा..’ त्यांनी लगेच फोन उचलला व नितीन गडकरी साहेबांना फोन लावला. पण फोन बिझी होता. काही मिनिटांत गडकरी साहेबांच्या पीएचा फोन आला. त्यांना पवार साहेबांनी माझ्याविषयी सांगितलं आणि साहेबांसोबत माझी भेट घालून द्या अशी विनंती केली. जाताना पवार साहेबांनी मला त्यांचा पर्सनल मोबाईल नंबर दिला आणि काही अडचण आली तर मला कॉल कर असा धीर दिला. गडकरी साहेबांच्या भेटीसाठी आम्ही नागपूरला पोहचलो. पाहतो तर काय, साहेबांच्या ऑफिसबाहेर ही तोबा गर्दी! अडीच तीन हजार लोक- ज्यात मदत मागायला आलेली जनता, मतदारसंघातील लोक आणि कार्यकर्ते प्रतीक्षेत होते. चार-पाच तासांनी आमचा नंबर लागला, गडकरी साहेबांच्या केबिनमध्ये आम्ही पाय ठेवला. आपल्या देशाचे वरिष्ठ कॅबिनेट मंत्री समोर बसले आहेत आणि ते वेळ देऊन आपलं म्हणणं ऐकणार आहेत, यावर काही क्षण माझा विश्वासच बसत नव्हता. आम्ही फोटो प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. आमच्या ‘पीएन रक्षक’ला हायवेवर एखाद्या गाडीने धडक दिली की मला रोड मेंटनन्स करणार्या कंपनीकडून फोन यायचा की आज तुमच्या फ्लॅगमॅनमुळे आमच्या एका कामगाराचा जीव वाचला. तेव्हा मी त्यांना सांगायचो की मी खरंच चांगलं काम करत असेन तर मला लेखी पत्र द्या. अशा अनेक ग्राहक कंपन्यांची प्रशस्तीपत्रं माझ्याकडे जमा झाली होती. ती मी गडकरी साहेबांना दाखवली तर ते म्हणाले, हा फ्लॅगमॅन मी पाहिला आहे. त्यांनी एक क्षण विचार केला आणि मला विचारलं, ‘यमुना एक्सप्रेसवर दिसतो तो फ्लॅगमॅन तुझा आहे का?’ मी म्हणालो, ‘होय. आम्हीच तो एल अँड टी कंपनीला विकला आहे.’ यावर गडकरी साहेब म्हणाले, ‘तू मला दिल्लीला येऊन भेट. बाकीचं आपण दिल्लीत बोलू.’ मोजून चार मिनिटात आमची मीटिंग संपली आणि मी एक आशादायक चित्र घेऊन मुंबईत परतलो.
मिशन दिल्ली… मराठी माणूस सीमोल्लंघन करायला थोडा कचरतो, दुसर्या राज्यातील माणसांसोबत व्यवहार, करारनामा करताना थोडी धाकधूक त्याच्या मनात असते. असं म्हणतात की ‘मराठी माणूस युद्धात जिंकतो पण तहात हरतो.’ पण तुम्हाला देशपातळीवर काम करायचं आहे, कंपनी मोठी करायची आहे तर नवीन आव्हानांना तोंड देण्याशिवाय गत्यंतर नाही. इथून माल पाठवला की दिल्लीमधील व्यापार्यांचे पैसे वेळेवर येत नाहीत किंवा ते बुडवतात, अशी मुंबई मार्वेâटमध्ये वदंता आहे. सगळेच असे असतात असं नाही, पण मराठी व्यापार्यांचे तोंड दुधाने भाजले असेल तर तो दिल्लीची ‘लस्सी’देखील फुंकून फुंकून पितो. या विषयावर चेतन म्हणाला, ‘मीदेखील हीच गोष्ट ऐकून आहे, त्यामुळेच मी रिस्क घेत नाही. मी दिल्लीतील व्यापार्यांना सांगतो की बाबा रे, तू दोन पैसे कमी भाव दे, पण पैसे अॅडव्हान्समध्ये पाठव, तरच मी मुंबईतून पार्सल पाठवतो. समोरून मोठी ऑर्डर दिसत असली तरीही धंद्यात कॅश फ्लो खेळता राहावा, यासाठी धंद्यात असे काही निर्णय घ्यावे लागतात.’
तर दिल्लीत काय झालं? गडकरी साहेबांशी त्यांच्या बंगल्यावर भेट झाली. आम्ही प्रेझेंटेशन पुन्हा सुरू करणार इतक्यात ते म्हणाले, ‘मला तुझे काम माहीत आहे.
माझ्याकडून काय मदत हवी आहे ते सांग.’ मी म्हणालो, ‘मी, आजवर प्रायव्हेट कंपन्यांसोबत काम केलं आहे आता मला गव्हर्नमेंटसोबत काम करायचं आहे.’ यावर ते म्हणाले, ‘चेतन, हा तुझा स्टार्टअप आहे. गव्हर्नमेंटसोबत काम करताना इन्वेस्टमेंट खूप जास्त लागते. तिथे तुला अडचण येऊ शकेल. त्यामुळे तू सध्या प्रायव्हेट कंपन्यांसोबतच काम कर. मी शक्य असेल ती मदत तुला करेन आणि तुझ्या ‘पीएन रक्षक’मुळे रस्ते कामगारांचे जीव खरोखरच वाचत असतील तर मी टेंडर नियमांमध्ये हा घटक बंधनकारक करता येतं का, हे पाहीन व यासाठी प्रयत्न देखील करेन.’ दिल्लीत दोन दिवस थांबून आम्ही ‘आय नॅम प्रो’ या सरकारी रोड हायवे साहित्याच्या पोर्टलवर कंपनीची नोंदणी केली आणि इतर कामं आटोपून मुंबईत परतलो. सरकारी पोर्टलवरून ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. काही दिवसातच रस्ता मेन्टेनन्सच्या सरकारी टेंडरमध्ये ‘रोबोटिक फ्लॅगमॅन’ बंधनकारक करण्यात आला. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्या, कोणतीही ओळख नसलेल्या एका मध्यमवर्गीय मेहनती तरुणाला दिलेला शब्द गडकरी साहेबांनी पाळला यातच त्यांच मोठेपण आहे. त्या सरकारी आदेशानंतर कामाचा ओघ वाढला, अनेक पुरस्कार मिळाले, व्यवसायाला स्थैर्य प्राप्त झाले.
आज एक प्रॉडक्ट फॉर्मात आहे म्हणून सदासर्वकाळ तेच मॅचविनर राहील, याची काही गॅरंटी नसते. यासाठीच आज एक प्रॉडक्ट पैसे कमावून देत असताना फक्त त्यावरच कंपनीचा डोलारा उभा न करता सोबत इतर उत्पादनांकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज ‘पीएन रक्षक’सोबतच चेतनची इतर सुरक्षाविषयक साधनांची विक्री देखील देशभरात चांगली सुरू आहे. मिळालेल्या यशाने हुरळून न जाता, रोज बदलणार्या मार्केटला आणि अकस्मात येऊ शकणार्या वादळांना तोंड देण्यासाठी चेतन नलावडे हा युवक त्याच्या आजवरच्या अनुभवाचं लाईफ जॅकेट घालून उभा आहे.
हंगामी रोजगारी, कारखान्याबाहेरील काम, कामाची बदलती जागा, अतिरिक्त शारीरिक श्रम, अपुरी जागा इत्यादी कारणांमुळे रस्त्यावरच्या अपघातांचे प्रमाण वाढत असते. विकसित देशांमध्ये मानवी जीवन अमूल्य समजले जाते. एक जीव वाचवायला
हेलिकॉप्टर, विमान, रुग्णवाहिका, पोलीस यांची रांग लावली जाते. पण भारतासारख्या विकसनशील देशात हे होऊ शकत नाही. म्हणूनच कोणत्याही औद्योगिक, बांधकाम क्षेत्रात सुरक्षितता-उपायांचे कठोर अवलंबन हीच अपघात कमी करण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना आहे. आज सरकार देखील याबाबत गंभीरतेने विचार करून कठोर कायदे आणत आहे. यामुळेच येत्या काही वर्षांत हा व्यवसाय तेजीत येईल.
शहरीकरणाच्या प्रचंड लाटेत देशातील प्रत्येक राज्यात पायाभूत प्रकल्पनिर्मिती होत असताना, मराठी तरुणांसाठी सेफ्टी साहित्य क्षेत्र उद्योगात नवीन संधी निर्माण होत आहेत. आपण राहतो त्या विभागात-शहरात, नवीन बांधकामे, नूतनीकरण, रस्त्यांची कामे सुरू असतात. तिथे लागणारी सुरक्षासामुग्री, फायर ऑडिट, समुद्री सुरक्षा, तिथे काम करणार्या कामगारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, फेस शील्ड, सेफ्टी आयवेअर, इअर मफ, हार्नेस, फॉल अरेस्टर, हुक्स, रेस्क्यू, सेफ्टी शूज, हॅण्डग्लोव्हज, सेफ्टी नेट्स, मल्टीपर्पज फायबर कोन, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, टॉर्च, फर्स्ट एड किट अशी अनेक साधने लागत असतात. त्या कन्स्ट्रक्शन साइटवर जाऊन चौकशी केली तर त्यांना हे सामान कुठून व किती किमतीला मिळतं याची माहिती मिळेल. या वस्तूंचा पुरवठा करणारे घाऊक व्यापारी मस्जिद बंदर येथे आहेत आणि अधिक माहितीसाठी इंटरनेटवर हे सामान बनविणारे उत्पादक कोण आहेत याची माहिती मिळू शकते. या व्यवसायाचा नीट अभ्यास केला तर रोजगाराचे एक अनोखे विश्व मराठी तरुणांसाठी खुले होईल.
आदित्य ठाकरेंकडून कौतुक
‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव २०२१’ या कार्यक्रमात तरुण पिढीचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे युवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना माझ्या रोबोटिक फ्लॅगमॅन या इनोवेशनबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘या इनोवेशनमधून तुम्ही लोकांचे जीव वाचवत आहात व महाराष्ट्रात याची निर्मिती होत आहे हे कौतुकास्पद आहे. आपण या इनोव्हेशनचा वापर महाराष्ट्र राज्य व मुंबई रस्ते सुरक्षेसाठी नक्कीच करू शकतो. या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया,’ असे सांगून त्यांनी माझ्यासारख्या तरुण उद्योजकाला अजून चांगले काम करण्याची ऊर्जा दिली.