अशी आहे ग्रहस्थिती
राहू – हर्षल (वक्री) मेषेत, मंगळ वृषभेत, शुक्र सिंहेत, रवि-बुध (वक्री) कन्येत, केतू तुळेत , शनि (वक्री)-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू (वक्री)-नेपच्युन (वक्री) मीनेत, चंद्र वृषभेत त्यानंतर मिथुन, कर्क आणि सप्ताहाच्या अखेरीस सिंहेत.
मेष – दशम भावात वक्री शनि, वक्री प्लूटो सुखस्थानावर दृष्टी ठेवून आहेत. त्यामुळे मातृ-पितृ सौख्य, कुटुंब याबाबत उदासीन राहाल. राहूमुळे चलबिचल वाढेल. व्यवसायात मंदी जाणवेल. मात्र, व्यवसायाचा गाडा फिरत राहील. जमिनीशी संबंधित व्यवसायात चांगले यश मिळेल. फोर्जिंग, जड व्यवसायात चांगला फायदा होईल. षष्ठ भावातील रवीचे राश्यांतर विरोधकांवर मात करण्याची ताकद देईल. रवि बुधादित्य योगामुळे मातुल घराकडून सुखसौख्य मिळेल. नोकरांकडून सहकार्य मिळेल.
वृषभ – शुक्राचे सुखस्थानातील भ्रमण, रवीचे राश्यांतर पंचम भावात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची ओढ लागून राहील. अपेक्षा वाढतील. शनि महाराजांचे भाग्यातील वक्री भ्रमण साहित्य, संगीत, मेडिकल क्षेत्रात चांगले यश मिळवून देईल. राजकारण, समाजसेवा क्षेत्रात उत्तम आठवडा राहील. संततीच्या बाबत उत्तम आणि जोरदार फळ मिळेल. संततीमुळे पतप्रतिष्ठा वाढेल. सरकार दरबारी सन्मान होईल.
मिथुन – आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. बुध, शनी वक्री असल्याने कोणावरही विश्वास ठेवणे महागात पडू शकते. चोरीची शक्यता आहे. नव्या वास्तूचा विचार लांबणीवर पडेल. १८ आणि १९ सप्टेंबरचा गुरु, चंद्र गजकेसरी योग अनपेक्षित लाभ देईल. लाभेश मंगळ व्यय भावात असल्याने नोकरदारांना त्रासदायक आठवडा आहे. दंडापोटी आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रमोशनमध्ये अडचणी येतील. कारखानदारांना मजूर वर्गाकडून त्रास होईल.
कर्क – अचानक पैसे हातात पडल्याने मन आनंदी राहील. हातून चांगले कार्य घडेल. मंगळ लाभ भावात आहे. वादाचे प्रसंग घडतील, शब्द जपूनच वापरा. कामाच्या ठिकाणी हेतू साध्य होईल. विद्यार्थीवर्गाला उच्चशिक्षणात यश मिळेल. आजोळकडून लाभ मिळेल. सप्तम भावात वक्री शनि-प्लूटो, भाग्यात वक्री गुरू त्यामुळे महत्वाचे विषय पुढे ढकला. कुटुंबात कटकटी होतील.
सिंह – कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. चिडचिड होईल. स्थावर मालमत्तेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. न्यायालयीन कामात यश मिळेल. वकील, बॅरिस्टर यांना चांगला काळ. दलालीत चांगला काळ. शेतीतून चांगला लाभ होईल. रवीचे व्दितीयेतील भ्रमण कौटुंबिक विषयात महत्वाची जबाबदारी पार पाडेल. काही महिलांना मणक्याचा त्रास होईल.
कन्या – चुकीचा निर्णय घेतला गेल्याने त्रास होईल. रवीच्या भ्रमणामुळे अभिमानी वृत्तीत वाढ होईल. अधिकचा आत्मविश्वास पथ्यावर पडेल. १९ आणि २० तारखेला गुरु-चंद्र नवपंचमयोगामुळे अनपेक्षित मार्गाने आर्थिक लाभ मिळेल. सप्तमातील वक्री गुरु आणि पंचमातील वक्री शनि त्यामुळे दाम्पत्यजीवनात वाद घडतील. संततीबाबत समाधानकारक स्थिती राहील.
तूळ – वक्री शनी व प्लुटोच्या भ्रमणामुळे उद्योग-व्यवसायात अनावश्यक त्रास होईल. ताण वाढेल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे मन विचलित होईल. कामानिमित्त लांबचा प्रवास होईल. बाहेरचे खाणे टाळा, पोटाचे त्रास होतील. रवीच्या व्ययातील भ्रमणामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. १९ आणि २० या तारखांना नोकरदारांना चांगला लाभ मिळेल. शुक्र लाभात असल्याने शेअर, सट्टा यातून चांगला लाभ मिळेल.
वृश्चिक – नोकरदारांना लाभदायक आठवडा राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल. सप्तमातील मंगळामुळे सामाजिक कामात अधिक रुची निर्माण होईल. संधीचे सोने करण्यासाठी उत्तम काळ. प्रगतीचा आलेख चढता राहील. शत्रूवर मात कराल.
धनु – शेतकरी, किराणा दुकानदारांसाठी काळ उत्तम आहे. रवीच्या दशमातील भ्रमणामुळे राजकारणी मंडळींना अच्छे दिनचा अनुभव येईल. अति कामाच्या ताणामुळे प्रकृतीत बिघाड होईल. काळजी घ्या. महिलावर्गाला शुभ फळे मिळतील. नव्या वास्तूच्या खरेदीचे नियोजन कराल. चांगले आर्थिक लाभ होतील.
मकर – साडेसाती सुरू आहे. सुखस्थानात राहू, दशमात केतू त्यामुळे कामाच्या ठिकाणी असमाधानकारक स्थिती राहील. मानसिक स्वास्थ्य बिघडेल, चिडचिड होईल. सांभाळून राहा. कामाचा मोबदला समाधानकारक वाटणार नाही. खेळाडूंना यश मिळेल. लेखक, पत्रकारांसाठी चांगला काळ आहे.
कुंभ – कर्जाचे विषय अडकून राहतील. अनावश्यक पैसे खर्च होतील, पण आर्थिक आवक चांगली राहील. घरातील ज्येष्ठांना त्रास होईल. कामानिमित्त प्रवास होईल. शनि-चंद्र दृष्टीयोगामुळे कावेबाज लोकांपासून सावध राहा. नोकर ऐनवेळी दगा देतील. सरकारी नोकरदारांनी काळजी घ्यावी. मेडिकल क्षेत्रात लाभदायक आठवडा राहील.
मीन – पतप्रतिष्ठा वाढेल. नवी नोकरी मिळेल. तिथे महत्वाची जबाबदारी खांद्यावर येईल. प्रतिस्पर्धी मंडळींवर वरचढ ठराल. कामानिमित्ताने खूप धावपळ होईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. मामाकडून चांगली मदत होईल. लाभातील वक्री शनि अनपेक्षित लाभ मिळवून देईल. हात ओला राहील आणि पोट भरलेले राहील.