सध्या उत्सवाची धूम असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचे उत्सवी वातावरण आहे. त्यानंतर पितृपक्षात पितरे पृथ्वीवर उतरतील तेव्हा कावळ्यांना ‘अच्छे दिन’ येतील. नवरात्रात तर गरबा आणि दांडियाला उधाण येईल. मग दसरा-दिवाळी आणि फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळेल. परवा माझा मानलेला परममित्र पोक्या म्हणाला, टोक्या, हा सगळा माझा पायगुण आहे असं मी जर म्हटलं तर तू काय म्हणशील? ज्या अर्थी पोक्या असं विचारतोय त्या अर्थी त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार असं मी मनात म्हणालो. नंतर पोक्याला म्हटलं, असं तू कसं म्हणू शकतोस? त्यावर पोक्या म्हणाला, यंदा ज्या दिवशी ‘मी स्वत:च्या पैशाने छत्री विकत घेतली त्याच दिवशी धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. ज्या दिवशी मी फडणवीसांबरोबर सुरत आणि गोहाटीला गेलो त्याचवेळी लोहचुंबकाला चिकटून घ्यायला लोखंडाचे काळीज असलेले विश्वास बसणार नाही असे बंडखोर आमदार एकामागोमाग एक भाजपाच्या लोहचुंबकाला चिकटून घेण्यासाठी आकर्षित होऊ लागले. त्यानंतर झट मंगनी पट ब्याह होऊन दाढीवाले मुख्यमंत्री कधी झाले हे कळलंही नाही. या सार्यामागे मीच होतो यावर तुझा विश्वास बसणार नाही.
किरीटजी सोमय्यानंतर भाजपाच्या गुप्तहेर खात्यातील विश्वासू कार्यकर्ता म्हणून गेली दोन वर्षे माझी वट आहे. म्हणून तर त्यांनी इडीपासून खोटे वाटपापर्यंत जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी इमानेइतबारे पार पाडली. अमित शहांना माझ्या या पायगुणाची कल्पना गेल्या काही वर्षांपासून आल्यामुळे महाराष्ट्रातील काही राजकीय आणि ‘अराजकीय’ घटना घडवण्यामागे माझा पायगुण नि हातगुण असतो. अर्थात त्यासाठी मी माझी फी घेतो. परवा मुंबई भेटीत बंद दाराआड अमित शहा मला म्हणालेसुद्धा, दाढीवाल्यांना आम्ही मुख्यमंत्री करून बसलो खरे, पण ते आता आमच्या अंगलट येईल की काय अशी भीती मला वाटायला लागलीय. बोलण्याला आणि फिरण्याला धरबंधच नाही यांच्या. आयुष्यात पहिल्यांदाच आमच्यासारख्या महाराजकारणी नेत्यांशी संबंध आल्यामुळे फारच हवेत आहेत ते. आम्ही कधी काय करू शकतो याची कल्पना नाही त्यांना. पोक्या, तू प्रामाणिकपणे सांग, तुला नक्की काय वाटतं या दाढीवाल्यांबद्दल. पण मी त्यांना पुढचंच सांगितलं. मी म्हणालो, सध्या दोन्ही दाढीवाल्यांना दिवस खराब आहेत. दिल्लीच्या आणि इथल्यासुद्धा. कृपा करून तुम्ही दाढी वाढवू नका. नाहीतर तुमचा चेहरा अफझल खानासारखा होईल. आणि परवाच्या भाषणात तुम्ही जे नको ते बडबडलात ना, त्यामुळे मुंबईकर भाजपाला झुरळासारखे झटकतील. हे जर असंच सुरू राहिलं ना तर भाजप महाराष्ट्रातून कधी भुईसपाट होईल हे तुम्हाला कळणारही नाही. तुमचा हितचिंतक म्हणून सांगतो. दुसर्यांना अस्मान दाखवायची धमकी देण्याची ही वेळ नाही. या मातीत, शिवसेनेने भाजपावर आणि इतरांवर केलेले ‘उपकार’ विसरणार्यांना लोक म्हणतील, आसमान में उड़नेवाले मिट्टी में मिल जायेगा… शिवसेनेला संपवण्याची भाषा इथली मराठी जनता कधीच सहन करणार नाही. गद्दारांच्या नादी लागून रेड्याला जर वाघ म्हणत असाल तर फसाल, हे माझं भाकीत आहे.
त्यावर अमित शहा हसत म्हणाले, पोक्या, अरे उडत्या पक्षांची पिसं मोजणारा माणूस आहे मी. कुणाला कधी जवळ करावं आणि कधी दूर करावं हे मोदींपेक्षा चांगलं जाणतो मी. परवा कार्यकर्त्यांच्या म्हणून मीडियासाठी केलेल्या भाषणात मी एकदा तरी त्या दाढीवाल्याचं, त्याच्या गद्दार गटाचं नाव घेतलं का? त्यांच्याशी किंवा कुणाशी युती करण्याची घोषणा केली का? कोण किती खड्ड्यात आणि पाण्यात आहे हे अचूक जाणतो मी. मला तर या मंत्रिमंडळाचीच घृणा वाटू लागली आहे. यांच्या आश्वासने देण्ला काही धरबंध नाही. मोदींचे ठीक आहे. त्यांचे कोणी मनावर घेत नाही. पण केंद्रातले आणि महाराष्ट्रातले आपले मंत्री आणि नेते इतके बिनडोक असून कसे काय चालतील! पूर्वी मंत्री हा बिनडोकच असावा असं लोक गृहित धरूनच चालायचे. जेवढे त्याचे डोके मोठे तेवढे त्यात दगड-गोटे जास्त. फक्त मी त्याला अपवाद आहे हे मी माझ्या कृतीतून दाखवत असतो. आता त्या निर्मला सीतारामन बाई. त्यांना मोदींनी अर्थमंत्री कशासाठी केलं याचा अर्थ मला अजून लागला नाही. या बाई जिथे जिथे जातात तिथे त्यांना पंतप्रधान मोदींचा फोटो दिसला नाही की त्या म्हणे अस्वस्थ होतात. गेल्या आठवड्यात त्या हैद्राबादच्या दौर्यावर होत्या. तिथे त्यांनी अर्थव्यवस्थेतील बिळे शोधण्यासाठी अनेक रेशन दुकानांना भेट दिली. मात्र अनेक दुकानांत मोदींचा फोटो त्यांना दिसला नाही. त्याबरोबर त्या भडकल्या. त्यांनी जिल्हाधिकार्यांना फैलावर घेतलं. मात्र तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाने प्रत्येक गॅस सिलींडरवरच मोदींचा हसरा फोटो चिकटवून त्याखाली सिलींडरची एक हजार एकशे पाच ही किंमतही मोठ्या अक्षरात लिहिली. असे मंत्री असल्यावर सरकारची इज्जत ती काय राहणार? दुसरे तुमचे ते दाढीवाल्यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री तानाजी सावंत. हे तानाजी तर सतत आपल्या जीभेचा दांडपट्टा चालवून स्वत:चं हसू करून घेत असतात. या बंडवाल्यांसाठी आम्ही काय चिंचोके नव्हते वेचले! पण एकदा नको तिथे पाजळायची सवय झाली की आपलं काय नेमकं उघडं पडत आहे याची शुद्ध त्यांना नसते. दाढीवाले दौरे काढतात म्हणून त्यांनीही दौरा काढला आणि दिली पुण्यातील ससून हॉस्पिटलला भेट दिली. तिथे डॉक्टरांना वैद्यकीय सल्ले देताना ‘तुम्ही त्या हाफकीन नावाच्या माणसाकडून अजिबात औषधे खरेदी करू नका. लबाड माणूस आहे तो’ असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला तेव्हा उपस्थित डॉक्टर्स तोंड लपवून खोखो हसू लागले. शेवटी एक डॉक्टर हसू दाबत म्हणाला, सर हाफकीन हा कोणी माणूस नसून हाफकीन इन्स्टिट्यूट ही परेलमधील प्रसिद्ध वैद्यकीय सरकारी संस्था आहे. मग या मंत्र्याने सारवासारव करत तिथून पळ काढला. मागे मंत्री असताना कोकणात खेकड्यांनी धरण फोडल्यामुळे पूर आला असे विक्रमी वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशांना जवळ करून आमच्या भाजपची बदनामी होते. आमची मतं घटतात. तूच सांग पोक्या, अशा मंत्र्यांची संगत केली तर काय होणार आमच्या पक्षाचं, या विचाराने आतापासूनच माझ्या पोटात गोळे यायला सुरुवात झालीय. त्यात दाढीवालेही आपले ज्ञान पाजळत आपणही फडणवीसांपेक्षा ‘कम’ नहीं याचं ओढून ताणून प्रदर्शन करण्याच्या मागे आहेत. ‘वर्षा’वर जे वळावळी घडवल्या म्हणजे सगलं आपल्या मनासारखं होतं असं घडत नाही हे यांना कोण सांगणार? त्यावर मी फक्त एवढंच बोललो, ते काय बोलले ते फार महत्त्वाचं नाही. पण तुम्ही जे बोललात ते भाजपाला निस्तरावं लागणारच!