प्रबोधनच्या मे १९२५च्या अंकात छत्रपती संभाजी महाराजांच्या गोवा स्वारीवरचा लेख छापून आला होता. तोवर बखरी आणि ब्राह्मणी इतिहासकारांनी रचलेल्या ग्रंथांत शंभुराजांच्या चरित्राची बदनामीच केली जात होती. त्यांच्या चरित्रावरचे डाग धुणारं संशोधक वा. सी. बेंद्रे यांचं पहिलं संशोधन बहुदा प्रबोधनमध्येच प्रकाशित झालं.
– – –
प्रबोधनकारांची वृत्ती सामाजिक कार्यकर्त्याची होती, व्यासंग इतिहासकाराचा होता, लेखणी पत्रकाराची होती आणि वक्तृत्व नाटककाराचं होतं. प्रबोधनकारांमधला सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार आणि नाटककार अत्यंत प्रभावी असूनही त्या प्रत्येक भूमिकेत त्यांच्यातला व्यासंगी इतिहासकार कुठेच लपत नाही. उलट त्यांचा मुळातला पिंड इतिहासकाराचाच असल्याचं वाटत राहतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याहीपेक्षा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच्या इतिहासाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन त्यांच्या लिखाणातून दिसून येतो.
प्रबोधनच्या तिसर्याच म्हणजे १ नोव्हेंबर १९२१च्या अंकात प्रबोधनकारांचा शिवराया प्रणिपात कराया ब्रिटानिया आली हा गाजलेला अग्रलेख आहे. त्यात ते लिहितात, शिवाजीच्या चरित्राचे व चारित्र्याचा आजपर्यंत जितका गर्हणीय विपर्यास व मानखंडना झालेली आहे, तितका विपर्यास व मानखंडना जगातील कोणत्याही स्वराज्यसंस्थापकाची झालेली नाही. याची कारणमीमांसाही ते करतात, श्रीशिवाजी महाराज नवमतवादी नवयुगाचे सूत्रधार, मृत झालेल्या राष्ट्राला जिवंत करणारे धन्वंतरी आणि आत्मतेजाने दगडधोंड्यांनासुद्धा चैतन्याचे कल्पतरू बनविणारे जादूगार होऊन गेले. अर्थात त्यांच्या नवमतवादी पराक्रमाच्या बरोबरच त्यांच्या चारित्र्याचा विपर्यास करणारा जीर्णमतवाद हातात काजळीचे काळे मडके घेऊन लपत छपत त्यांच्या मागोमाग पाठलाग करीतच होता. हेतूंचा विपर्यास, कर्तबगारीची बीभत्स हेटाळणी व वृद्धिंगत होणार्या वैभवाची निंदा, या गोष्टी नवमतवाद्याची प्रियकर लेणी होत. शिवाजी महाराजांवर या लेण्यांचा वर्षाव करण्याच्या कामी मुसलमान व इंग्रज बखरकारांच्या जोडीनेंच महाराष्ट्रांतल्या जीर्णमतवाद्यांनी आपल्या मत्सरी बुद्धीला असूयेच्या सताड मैदानावर बेफाम नाचविण्यास मुळीच कमी केले नाही.
इतिहासलेखनाच्या बाबतीत इतकी परखड भूमिका असलेल्या प्रबोधनमध्ये त्या काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या दुसर्या दशकात मराठी इतिहासलेखनाच्या क्षेत्रात सक्रिय असणार्या वासुदेव सीताराम बेंद्रेंची हजेरी प्रबोधनमध्ये लागली नसती तरच नवल. एकतर प्रबोधनकार ठाकरे आणि वा. सी. बेंद्रे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या एकाच जातीतून आले होते. त्या काळात प्रबोधन हे ब्राह्मणेतरांसाठी आणि त्यातही कायस्थ लेखकांसाठी हक्काचा वैचारिक मंच बनलं होतं. पण बेंद्रेंचा प्रबोधनमधला पहिला उल्लेख हा इतिहासकार म्हणून नाही, तर मराठी शॉर्टहॅण्ड पद्धतीचे संशोधक म्हणून आहे. १ एप्रिल १९२२च्या प्रबोधनच्या अंकात बेंद्रेंची एक जाहिरात आहे. तिचा मथळा असा आहे, नवीन राष्ट्रीय चैतन्यांतील एक अदभुत चमत्कार – मराठी शॉर्टहॅन्ड पद्धति.
प्रबोधनकारांप्रमाणेच बेंद्रेदेखील शॉर्टहॅण्ड आणि स्टेनोग्राफीत निपुण होते. वयाच्या चौदाव्या वर्षी रेल्वेत शिकाऊ म्हणून नोकरीला असताना तीन महिन्यांत शॉर्टहॅण्ड स्टेनोग्राफी शिकले म्हणून त्यांना गोल्ड मेडल देण्यात आलं होतं. या विषयात एक तप संशोधन करून त्यांनी मराठी शॉर्टहॅण्डची सोपी पद्धत शोधून काढली होती. त्याच्या पुस्तकाची प्रकाशनपूर्व जाहिरात छापून आली होती. पुढे सतत या जाहिरातीच्या वेगवेगळ्या आवृत्त्या प्रबोधनमध्ये छापून आलेल्या दिसतात. तर १६ मे १९२२च्या अंकात पुस्तकाचं परीक्षणही आलंय.
कलमबहाद्दरांस शेलापागोटे या सदरात प्रबोधनकारांनी बेंद्रेंच्या शीघ्र ध्वनिलेखन पद्धति या पुस्तकाचं वाचनीय परीक्षण केलंय. त्यात ते लिहितात, मराठी भाषेसाठी किंबहुना अखिल हिन्दी भाषांसाठी सशास्त्र ध्वनिलेखन पद्धतीची उणीव किती भासत आहे आणि त्या उणीवेसाठी शेकडों देशभक्त वक्त्यांची मान हकनाहक फांसावर कशी लटकली जात असते, हे गेल्या २५ वर्षांतल्या राजकीय खटल्यानी सिद्ध करून दाखविले आहे… मराठी भाषेकरिता शास्त्रशुद्ध व व्याकरणशुद्ध पायावर उभारलेली ध्वनिलेखन पद्धति अस्तित्वात नसल्यामुळे ज्ञानाच्या व भाषणस्वातंत्र्याच्या क्षेत्रांत आजपर्यंत भयंकर उत्पात घडत आहेत. ही परिस्थिती पालटविण्याच्या कामी प्रो. बेंद्रे यांचा प्रस्तुत ग्रंथ अद्भुत क्रान्ति घडविल्याशिवाय खास रहाणार नाही.
पण अशी कोणतीही क्रांती न घडल्याचेही प्रबोधनकारांना चार वर्षांनंतर म्हणजे जुलै १९२६च्या ‘प्रबोधन’च्या अंकात मान्य करावं लागलंय. बेंद्रेंच्या ध्वनिलेखनाच्या कामाचं कौतुक करण्यासाठी त्यांनी तीन तुकड्यांत स्फुटं लिहिली आहेत. त्यात बेंद्रेंच्या कामाचं महत्त्व आणि गरज सांगितलेली आहेच. शिवाय त्याला मान्यवरांनी दिलेली दादही सविस्तर नोंदवली आहे. बेंद्रेंच्या `स्टेनोग्राफी फॉर इंडिया’ या पुस्तकाचाही उल्लेख आहे. याच अंकात प्रबोधन ग्रंथालयाच्या पुस्तकांची चार पानी यादी आहे. त्यात बेंद्रेंच्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकाची जाहिरातवजा नोंद आहे.
प्रबोधनमध्ये वा. सी. बेंद्रेंचा पहिला इतिहासविषयक लेख हा बाजीप्रभू देशपांडेंवरचा आहे. ज्ञानकोशकार केतकरांनी त्यांच्या विद्यासेवक मासिकात बाजीप्रभू देशपांडेंच्या कर्तृत्वावर उपस्थित केलेल्या शंका आणि ते कायस्थ नसल्याचा दावा याला जून १९२५ च्या प्रबोधनमध्ये बेंद्रेनी दिलेलं उत्तर प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर बेंद्रे प्रबोधनमध्ये अधूनमधून लिहित राहिलेले दिसतात. पहिल्या अंकात प्रबोधनकारांनी हे सगळे लेख प्रबोधनच्या वाचकांसाठी प्रसिद्ध केले होते. केतकरांच्या खुलाशावरही बेंद्रेंनी प्रबोधनकारांच्या सांगण्यावरून जून १९२५मध्ये उत्तर दिलंय. त्याच्याशी संबंधित छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना लिहिलेलं पत्रंही या अंकात आहे.
मे १९२५च्या मासिक प्रबोधनमध्ये बेंद्रेंचा रूढ इतिहासाला धक्का देणारा लेख प्रसिद्ध झाला. ‘छत्रपति संभाजी : गोव्याच्या राजकारणाची आवश्यकता’ हा त्यांचा लेख सव्वा आठ पानांचा आहे. नव्या साधनांच्या आधारे संभाजीराजांच्या कर्तृत्वाची नवी मांडणी या लेखात केलेली आहे. लेखातून लक्षात येतं की साधारणपणे १९१९पासून ते ही मांडणी करत होते. तसंच १९२१ला भारत इतिहास संशोधन मंडळाच्या पाक्षिक बैठकीत त्यांनी याच विषयावर मांडणी केली होती. त्यानंतर सर जदुनाथ सरकार यांनी त्यांना इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्यांना प्रबोधनमधल्या लेखात संभाजीराजांच्या गोव्याच्या मोहिमेवरची सविस्तर माहिती देता आलीय.
या लेखात बेंद्रेंनी एक भविष्यवाणी केलीय, संभाजीच्या कारकीर्दीवर चढविलेला उग्रत्वाचा व नालायकीचा काळा रंग `काळा’लाच न पटून की काय साफ धुवून निघत आहे. व माझी अशी खात्री आहे की आणखी एक दोन वर्षांतच महाराष्ट्रातील अंधारकोठड्यांत खितपत पडलेली जीर्ण साहित्य रत्नं प्रकाशांत येऊन महाराष्ट्राच्या डोळ्यांसमोरील काळा चष्मा दूर करतील, व नंतर संभाजीला सत्य स्वरूपांत पहातांना अखिल महाराष्ट्राला या थोर पुरुषाबद्दल धन्यता व अधिकाधिक आदर वाटू लागेल, इतकेच काय ते पहावयाचे आणि सांगावयाचे या अर्थाने भविष्य आज पुन्हा एकदा वर्तवून ठेवतो. या भाकितात बेद्रेंना आपल्या संशोधनाबद्दल वाटणारा आत्मविश्वास दिसतो आहे.
कोलकाता युनिवर्सिटीतील थोर इतिहासकार प्रा. सुरेंद्रनाथ सेन यांनी पोर्तुगीज कागदपत्रांतील मराठा आरमाराच्या कारवायांविषयी महत्त्वाची माहिती उजेडात आणली होती. बेंद्रेंनी त्यातला संभाजी महाराजांविषयीचा भाग अनुवादित करून प्रबोधनच्या जानेवारी १९२६च्या अंकात प्रकाशित केला होता. याच अंकात बळवंत हरी जोशी या सातार्याच्या शिक्षकाने लिहिलेल्या चित्रवंश नावाच्या ऐतिहासिक दीर्घकाव्याचा सविस्तर परिचयही बेंद्रेंनी करून दिला आहे. यात चिटणीस घराण्याचा १६०० ते १९०० अशा तीनशे वर्षांचा इतिहास अडीच हजारांहून अधिक श्लोकांत वर्णन केलेला आहे. त्यात प्रामुख्याने बाळाजी आवजी आणि खंडो बल्लाळ या इतिहासप्रसिद्ध कायस्थ वीरांची चरित्रं आहेत.
वा. सी. बेंद्रेंच्या प्रबोधनमधील सर्वात महत्त्वाचा लेख १९२६च्या मे महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झालाय. छत्रपति संभाजी विरुद्ध अनाजीपंत व सोयराबाई यांची कारस्थाने, सोयराबाईंचे विषप्राशन असं प्रबोधनच्या शैलीला न शोभणारा लांबलचक मथळा असणारा हा लेख सविस्तर पुराव्यानिशी संभाजीराजांवरचे आक्षेप दूर करतो. याच लेखाचा पुढचा भाग प्रबोधनच्या पाचव्या वर्षाच्या चौथ्या अंकात आला आहे. या लेखावर आधारित केवळ धर्मासाठी! नावाच्या एका नाटकाचा एक अंक पाचव्या वर्षाच्या सहाव्या अंकात प्रकाशित केलंय. त्याच्या सुरवातीला प्रबोधनकार भूमिका मांडताना लिहितात, छत्रपति संभाजी महाराजांचे चरित्र सध्या अत्यंत विकृत स्थितींत लोकांपुढे नाचत असते. पुराणवजा बखरींनी या बाबतीत अनेक घोडचुका केल्या असल्या तरी त्यांचाच आधार घेऊन अनेक कादंबरीकारांनी व नाटककारांनी छत्रपति संभाजीला अतिशय वाईट रंगांत रंगविण्याची वाईट कामगिरी बजावलेली आहे, यात संशय नाही. अलीकडे झालेल्या इतिहास संशोधनाच्या आधाराने प्रस्तुत नाट्यकृति लेखकाने रंगविण्याची उमेद बाळगली आहे, ती कशी काय सफल होते, हे यथाक्रम दिसून येईलच. ऐतिहासिक सत्यनिरूपण आणि त्याबरोबरच वाचकांचे मनोरंजन साधण्याचा हा उपक्रम वाचकांना पसंत पडेल, अशी उमेद आहे.
नाटकांतून होणार्या संभाजी महाराजांच्या बदनामीला नाटकांतूनच उत्तर देण्याचा एक प्रयत्न म्हणून या नाटकाच्या अंकाकडे पाहता येईल. हे गद्य नाटक प्रबोधनमधून क्रमशः प्रकाशित करण्याची प्रबोधनकारांची इच्छा होती. पण त्यासाठीचा निवांतपणा प्रबोधनकारांना मिळालेला दिसत नाही. या नाटकाचा लेखक म्हणून कोणाचंही नाव नाही. त्यामुळे तेव्हाच्या नियतकालिकांतल्या प्रघाताप्रमाणे असं लेखन संपादनाने केल्याचं मानलं जात असे. पण नाटकाच्या सुरवातीला दिलेल्या परिचयात संपादक प्रबोधनकारांनी लेखकाचा तृतीयपुरुषी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे दुसराच कुणीतरी असावा असं वाटतं. प्रबोधन बंद पडल्यानंतर प्रबोधनकारांनी अनेक गाजलेली नाटकं लिहिली. त्यात या विषयावर नाटक लिहिलं नाहीच. शिवाय त्या नाटकांची शैलीही वेगळी होती. त्यामुळे हे नाटक कुणी दुसर्याने लिहिलंय, असा तर्क बांधता येतो. या नाटकाचे लेखक वा. सी. बेंद्रे तर नसतील, असं हे नाटक वाचताना वाटत राहतं.
१९२७च्या मार्च महिन्याच्या प्रबोधनच्या अंकात परमानंदाच्या शिवभारत या संस्कृत ग्रंथाचा महत्त्वाचा भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा ग्रंथ बेंद्रेंनीच प्रकाशात आणला होता. संभाजी महाराजांच्या चरित्राविषयीचे अनेक आक्षेप दूर करणारा या ग्रंथाचा काही भाग प्रबोधनमधून पहिल्यांदा वाचकांसमोर आला असावा. याशिवाय बेद्रेंनीच या अंकापासून पुढे तीन अंकांत डॉ. जॉन प्रâायर या इंग्रज प्रवाशाने केलेलं शिवकालीन महाराष्ट्राचं वर्णन मराठीत भाषांतरित करून मांडलं आहे. यामुळे त्या काळातील महाराष्ट्राचं समाजजीवन आपल्याला कळत जातं. ते फारच रोचक आणि महत्त्वाचं आहे.
वा. सी. बेंद्रेंचं अत्यंत महत्त्वाचं लिखाण प्रबोधनमधून प्रकाशित झाल्याचं लक्षात येतं. ज्या विषयांवर मुख्य प्रवाहातली नियतकालिकं लिहिण्यास तयार नव्हती ते विषय आणि मुख्य प्रवाहातील नियतकालिकांनी लिहिलेल्या इतिहासाच्या विरोधात जाणारी मांडणी बेंद्रे करत होते. हे प्रवाहाच्या विरोधात पोहणंच होतं. त्याला प्रबोधनने मोठा आधार दिल्याचं आढळतं. बेंद्रेच्या इतिहासलेखनाचे महत्त्वाचे पैलू महाराष्ट्राभरातील वाचकांपर्यंत पोचवण्याचं काम प्रबोधनने केलेलं आढळतं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांवरील बदनामीची काजळी दूर करण्याच्या कामात प्रबोधनने मोलाची कामगिरी बजावलेली दिसते.