साप्ताहिक मार्मिकच्या ६४व्या वर्धापनदिनाच्या सर्व वाचक, विक्रेते, जाहिरातदार आणि अन्य मार्मिकप्रेमींना हार्दिक शुभेच्छा.
मार्मिकचे आजचे वर्धापनदिन विशेष मुखपृष्ठ पाहून अनेकांच्या मनात विचार येईल की मार्मिक आज पासष्टीत प्रवेश करतो आहे, पण मुखपृष्ठावर मात्र तो एका तरुणाच्या रूपातच दिसतो आहे. असं कसं?
मार्मिकच्या स्थापनेपासून सुरुवातीच्या तीसेक वर्षांपर्यंत खुद्द बाळासाहेब मुखपृष्ठे रेखाटत होते, तेव्हा मार्मिकच्या वर्धापनदिनाला साकार होणार्या विशेष मुखपृष्ठांवर मार्मिकचं दर्शन वाचकांना किशोररूपात घडत असे. डोळ्यांवर येणारी केसांची झुलपे, भक्कम शरीर, तेजतर्रार नाकनक्षा, डोळ्यांत तेज आणि अन्यायाच्या विरोधात, खासकरून मराठी माणसावरच्या, महाराष्ट्रावरच्या अन्यायाच्या विरोधात सळसळणारे हात, उसळणारं रक्त ही या मार्मिकच्या मनुष्यरूपाची वैशिष्ट्यं होती… पण, आता तर मार्मिक वयाने ज्येष्ठ नागरिकांमध्ये जाऊन पोहोचला, आता त्याचं रूप तरुण कसं?
तर वाचकहो, तारुण्याचे, वार्धक्याचे नियम तुम्हाआम्हाला, मर्त्य मानवांना! मार्मिकला ते लागू होत नाहीत. तो चिरतरुणच राहणार.
व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ही ओळख असलेल्या शिवसेनाप्रमुखांनी मार्मिकची सुरुवात केली तेव्हापासून हे नियतकालिक सळसळत्या रक्ताच्या तरुणाईचेच आहे. मार्मिकने आजवर कधीही गंभीर विषयांवर विद्वज्जड लेख छापले नाहीत, कधी कशाची वैश्विक परिप्रेक्ष्यातून मांडणी करत असल्याचा आव आणला नाही की गंभीर विश्लेषणाच्या नावाखाली वाचकाला बोअर केले नाही. सर्वसामान्य मराठी माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत त्याला त्याच्या हिताचा विचार सांगितला, महाराष्ट्रहिताचा विचार सांगितला आणि खुसुखुसु ते खदखदा हसवणार्या व्यंगात्मक लेखनाचा विरंगुळा पुरवला. व्यंगचित्र साप्ताहिक ही ओळख असल्याने राजकीय आणि सामाजिक विषयांवरची मार्मिक भाष्य करणार्या व्यंगचित्रांनी महाराष्ट्राला हसत खेळत हास्यचित्रांची, रंगरेषांची भाषा शिकवली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात थकलेल्या महाराष्ट्राला थोडं हलकं फुलकं साहित्य देऊन गुदगुल्या करण्याचा, हसवण्याचा विचार मार्मिकच्या स्थापनेमागे होता. मात्र, मराठी माणसावरचा अन्याय नजरेला पडताच बाळासाहेबांचा ठाकरी बाणा जागृत झाला आणि त्यांनी मराठी माणसांचं एक तेज:पुंज संघटन शिवसेनेच्या रुपाने उभे केलं ते मार्मिकमधूनच. हे संघटनही काही प्रौढांचं नव्हतं, बेडर, लढाऊ युवकांची संघटना हेच शिवसेनेचं स्वरूप कायम राहिलं, त्याचप्रमाणे मार्मिकचंही स्वरूप सळसळत्या तरुणाईचं प्रतिबिंब दर्शवणारंच राहिलं आहे.
बाळासाहेब तरुण होते तिथपासून ते त्यांच्या वार्धक्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवरचे युवक त्यांच्याकडे आकृष्ट होत असत. हा राजकीय नेतृत्वाच्या संदर्भात एक चमत्कारच आहे. ते कधीच कोणत्याच वयात म्हातार्याकोतार्यांचे नेते झाले नाहीत, मार्गदर्शक मंडळात कुंथन चिंतन करत बसण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता. ते कायम तरुणांच्या गराड्यात असायचे, तरुणांच्या हिताचा, तरुणांच्या पद्धतीने विचार करायचे आणि तरुणांच्याच भाषेत मांडायचे. तो जोश, ती आक्रमकता, ती सळसळ स्वाभाविकच बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचेच शब्दचित्ररूप प्रतिबिंब असलेल्या मार्मिकमध्येही उतरलेली आहे आणि ती तशीच कायम राहणार… मार्मिकचा शतक महोत्सव होईल, तेव्हाही मार्मिकच्या मुखपृष्ठावर हा लढाऊ बाण्याचा युवकच दिसत असेल!
मार्मिकसाठीच नव्हे तर एकूणच छापील माध्यमांसाठी काळ मोठा कठीण आहे. ज्या न्यूज चॅनेलांनी कोविडकाळात वर्तमानपत्रांतून कोरोना विषाणू पसरतात, अशी अफवा पसरवून वृत्तपत्रसृष्टीच्या स्थैर्याला सुरुंग लावला, त्यांनाही आता प्रेक्षक उरलेला नाही. मोबाइलने एकंदर वाचनाची आणि बातम्या, विश्लेषणपर कार्यक्रम पाहण्याची सगळी धाटणीच बदलली आहे. एकीकडे ही व्यावसायिक परिस्थिती आणि दुसरीकडे, आमच्या आरत्या ओवाळण्यापलीकडे काही छापाल तर खबरदार, असं दरडावणार्या सत्ताधीशांचा दबाव यांच्यामुळे प्रस्थापित माध्यमं आपला वचक, आपला दबदबा हरवून बसलेली आहेत. बहुतेकांनी सत्तेशी जुळवून घेतलं आहे. आपली अंतिम बांधिलकी जनतेशी आहे, हेच मान्य नसलेले नेते आणि वाचकांशी बांधिलकी नसलेली माध्यमं यांनी लोकशाहीच खिळखिळी केली आहे.
अशा काळात मार्मिक नुसताच प्रकाशित होत नाही, तर दिमाखात, उत्तम निर्मितीमूल्यांसह प्रकाशित होतो आहे. तो कोणाचीही भाटगिरी न करता सत्तेला आरसा दाखवण्याचं काम करतो आहे. महाराष्ट्राच्या सत्तेवर बेकायदा येऊन बसलेल्या मिंध्यांना आणि त्यांच्यामागे उभ्या असलेल्या आसुरी महाशक्तीला आवाज देण्याची हिंमत करतो आहे. सत्ता महाराष्ट्राची पण दिल्लीच्या तालावर नाचणारे मिंधे ती राबवत आहेत गुजरातच्या हितासाठी, असं भीषण चित्र आज महाराष्ट्र पाहतो आहे. त्याचा पर्दाफाश करण्याचं काम मार्मिकने निडरपणे चालवलेलं आहे.
गेल्या दहा वर्षांत देशाने आणि राज्याने दुर्दैवाचे दशावतार पाहिलेले आहेत. ते कधीतरी संपतील अशी उभारी लोकसभेच्या निकालाने दिली. मात्र, उन्मत्त सत्तेच्या चारशे पारच्या वल्गनांच्या जनतेने ठिकर्या ठिकर्या उडवल्या असल्या तरी आजही सरकार पूर्वीच्याच कपटी आणि पाताळयंत्री सत्ताधीशांचंच आहे. सत्तेवरची सैलावलेली पोलादी पकड मजबूत करण्यास्ााठी महाराष्ट्राची, मुंबईची सत्ता येनकेनप्रकारेण आपल्याकडे राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लाडकी बहीण वगैरे कधीही प्रत्यक्षात न येणार्या फसव्या योजनांची जाहिरातबाजी सुरू आहे.
देशात, राज्यात युवकांच्या हाताला काम नाही, महागाई उच्चांक गाठते आहे, सगळीकडे कंत्राटदारांचं राज्य प्रस्थापित झालेलं आहे, कमिशनची मलई खाणं सुरू आहे, मुंबईचे, महाराष्ट्राचे लचके तोडणं सुरू आहे. या कठीण काळात महाराष्ट्राला जागवण्याचं, चेतवण्याचं काम प्रसारमाध्यमांनीच करायचं आहे. मार्मिकने ही जबाबदारी आजवर बेडरपणे पार पाडली आहे आणि यापुढेही हा पत्रकारिता धर्म अखंड पाळत राहू.
वाचकहो, तुमचा आशीर्वाद असो द्यावा!