प्रबोधनकारांच्या महान कर्तृत्वाची ओळख करून देणार्या प्रबोधन १०० या सदराचा हा तिसरा टप्पा. प्रबोधनकारांच्या संघर्षाचा प्रवास आता ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास या पुस्तकापर्यंत पोचला आहे.
– – –
दोन वर्षांपूर्वी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी सुरू केलेल्या `प्रबोधन` नियतकालिकाच्या प्रकाशनाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने `प्रबोधन १००` या सदराला सुरुवात झाली. प्रबोधनकारांच्या कार्यकर्तृत्वाची आणि विचारांची ओळख आजच्या वाचकांना करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रबोधनकारांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून त्यांच्या आयुष्याचा पट मांडण्यास सुरवात झाली तो प्रवास आता `कोदंडाचा टणत्कार` या पुस्तकाने घडवलेल्या क्रांतीचे परिणाम सांगण्यापर्यंत आला आहे.
पनवेलसारख्या गावात प्रबोधनकारांचं बालपण गेलं. त्यांचं शिक्षण सुरू असतानाच वडिलांची नोकरी सुटली आणि नंतर त्यांचं निधन झालं. त्यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली परिस्थिती अगदी रसातळाला गेली. अवघा दीड रुपया कमी पडला म्हणून त्यांना मॅट्रिकची परीक्षा देता आली नाही. त्यानंतर त्यांनी तर्हेतर्हेच्या नोकर्या आणि धंदे करत कुटुंबाचा चरितार्थ चालवला. लग्न आणि सरकारी नोकरीमुळे दादरमध्ये त्यांच्या आयुष्यात स्थैर्याचा काळ आला.
तेव्हाच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अहवालात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. प्रबोधनकारांनी राजवाडेंनी केलेले आरोप लीलया खोडून काढले. ते करताना त्यांच्या लक्षात आलं की हा फक्त एका समाजाचा प्रश्न नाही. स्वजातीच्या अभिमानात अडकलेले इतिहास संशोधक इतिहासाचं हत्यार वापरून शिक्षण घेऊन नव्याने उभं राहू पाहणार्या बहुजन समाजाचा स्वाभिमान कापून काढत आहेत. त्या दृष्टीने `कोदंडाचा टणत्कार` हे प्रबोधनकारांचं पुस्तक हा महाराष्ट्राच्या इतिहासलेखनातला टर्निंग पॉइंट ठरला.
त्याच्या पहिल्या आवृत्तीत प्रामुख्याने राजवाडेंच्या आरोपांचं खंडन होतं. त्याच्या पुढे जाऊन इतिहासाची नवी बहुजनी मांडणी करण्याची गरज होती. त्यामुळे आजवर दडपलेला इतिहास समोर येण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. त्यासाठी प्रबोधनकारांनी गावोगाव भाषणं दिली. त्या दौर्यांमध्ये त्यांना भिक्षुकशाहीच्या कचाट्यातून बहुजन समाजाला सोडवण्याचं महत्त्व उमगलं. त्यासाठी इतिहासाची नव्याने मांडणी करण्याचं अत्यंत मोलाचं काम प्रबोधनकारांच्या `ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड` या पुस्तकाने सुरू केलं. ग्रामण्य म्हणजे एखाद्या जातीने धर्मबाह्य कृत्य केल्याचा आरोप करून तिच्यावर बहिष्कार आणि विविध निर्बंध घालणं. अशा महाराष्ट्रातील ग्रामण्यांचा समग्र आणि साधार इतिहास या पुस्तकात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कायस्थ प्रभू समाजावर झालेल्या अशाच एका ग्रामण्याचा उल्लेख इतिहासाचार्य राजवाडे यांच्या लेखात आहे. त्यात केलेले आरोप खोडून काढतानाच प्रबोधनकारांना वारंवार ग्रामण्ये का होतात या प्रश्नाचा शोध घ्यावासा वाटला. त्यासाठी त्यांनी अनेकांना पत्रं लिहिली. महाराष्ट्रभर फिरून अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. गावोगावी जाऊन जुनी कागदपत्रं मिळवली. त्यात एका कायस्थ प्रभू वृद्धेने विश्वासाने दिलेल्या कागदपत्रांचं गाठोडंही होतं. सीकेपींनी वेदोक्त मंत्रांचा अधिकार आहे की नाही, याच्याशी ग्रामण्याचा थेट संदर्भ होता. ग्रंथाच्या लिखाणाच्या काळातच सनातनी लोक छत्रपती शाहू महाराजांना सनातनी वेदोक्त प्रकरणावरून त्रास देत होती. मराठे हे क्षत्रिय आहेत की शूद्र यावर तंजावरच्या कोर्टात केस सुरू होती. त्याविषयी महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रांत तावातावाने चर्चा सुरू होत्या. तेव्हा ताज्या असणार्या संदर्भात ग्रामण्यांचा तोवर दडवून ठेवलेला इतिहास या ग्रंथात मांडलेला आहे.
मध्यम आकारातल्या साधारण सव्वादोनशे पानांची या पुस्तकाची पहिली आवृत्ती जुलै १९१९मध्ये यशवंत शिवराम राजे यांनी प्रसिद्ध केली. दादरच्या वास्तव्यात प्रबोधनकारांच्या भोवती सीकेपी समाजातल्या तरुणांनी गर्दी केली होती. त्यात यशवंत राजे होते. तेही प्रबोधनकार राहत त्या मिरांडाच्या चाळीतच राहत. त्यांनीच प्रबोधनकाराचं `कुमारिकांचे शाप` हे पुस्तकही प्रसिद्ध केलं होतं. `ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास` या पुस्तकावर प्रबोधनकारांचं नाव लेखक म्हणून नाही, तर संपादक म्हणून आहे. तर मदतनीस संपादक म्हणून विनायक सीताराम जयवंत यांचं नाव आहे. पुस्तकात कापडी बांधणीची किंमत १ रुपया १३ आणे तर कागदी बांधणीची किंमत १ रुपया छापलेली आहे. पुस्तकाच्या सुरवातीलाच रामदास स्वामींचा एक श्लोक आहे.
प्रकाशक शिवराम राजे यांनी दोन शब्द लिहिलेत. त्यात त्यांनी या पुस्तकाची भूमिका स्पष्ट केलीय, `जातिमत्सराने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान केले आहे. हाच प्रकार या उप्पर तसाच चालू राहणे बरे नव्हे. म्हणून त्याचे खरेखुरे राक्षसी स्वरूप देशबांधवांसमोर मांडण्यास ते या निरर्थक वादापासून देशाचा बचाव करण्याचा काही तरी योग्य मार्ग शोधून काढतील, या आशेने हे ऐतिहासिक महत्त्वाचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येत आहे.` प्रबोधनकारांनी पुस्तकाच्या उपोद्घातादाखल लिहिलेला बराचसा मजकूर पानं वाढत असल्याने बाजूला ठेवावा लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. पण पुस्तकात छापलेला उरलासुरला उपोद्घातही तगडा आहे. महाराष्ट्रातल्या जातिभेदांची आणि विशेषतः चित्पावन ब्राह्मण इतरांची करत असलेल्या जातमत्सराची चिकित्सा त्यात आहे.
ग्रामण्य करून इतर जातींचा स्वाभिमान ठेचून स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी कसा केला केला याचा इतिहास मांडण्याची गरज नोंदवताना प्रबोधनकार लिहितात, `महाराष्ट्राच्या इतिहासातील ग्रामण्याचा इतिहास हा एक काळाकुट्ट परंतु अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ग्रामण्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक दिव्याखालचा अंधार आहे. हा इतिहास हे एक कटुतम सत्य आहे… पाश्चात्यांच्या हातून जी अमानुष कृत्ये घडली, त्यापेक्षा अधिकपटीने हलकट पशुवृत्तीचे वर्तन आमच्या महाराष्ट्रांतील राष्ट्रधुरिणांच्या आणि धर्मरक्षक (?) वर्गाच्या हातून घडलेले आहे. अर्थात या पातकाला चव्हाट्यावर बांधल्याशिवाय त्याच्या पुनरावृत्तीचा बंदोबस्त करणारा दवा कोण कसा सांगू शकेल? म्हणून आम्ही हा राष्ट्राच्या सडक्या भागाचा इतिहास आमच्या महाराष्ट्राचं हे राष्ट्रीय दुखणे आता चव्हाट्यावर बांधण्याचा उपक्रम करीत आहोत.`
हेच सूत्र ते उपोद्घाताच्या शेवटी अधिक स्पष्ट करतात, `हिंदूसमाजरूपी विराट पुरुषाच्या मर्मस्थानी झोंबलेले जातिमत्सराचे कालकूट विष राष्ट्रीयत्वाच्या किंवा विश्वबंधुत्वाच्या कोरड्या गप्पांच्या मलमपट्ट्यांनी नाहीसे होणे शक्य नाही. त्याचे उच्चाटण करायला काहीतरी जालीम रसायन पोटांतच घेणे भाग आहे. अशा प्रकारचा कांहीतरी प्रयत्न करण्याची हिंदुसमाजाला प्रेरणा व्हावी व त्यांना निश्चित दिशेने औषधोपचार करण्यास सुलभ जावें, म्हणून आम्ही `ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास` हे रोगाचे तंतोतंत निदान ठरविणारे चिकित्सापत्रक महाराष्ट्रीयांपुढे ठेवीत आहोत. याच्या परिशीलनाने जातिमत्सराचा व द्वैतभावाचा जुनाट रोग महाराष्ट्रीय हिंदू समाजांतून अज्जीबात घालविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची प्रेरणा ती प्रतापगडची श्रीभवानी सर्वांना देवो.`
ग्रामण्याचा इतिहास म्हणजे महाराष्ट्रातल्या जातीच्या नावावर झालेल्या अत्याचारांचाच इतिहास आहे. त्याचा सांगोपांग विमर्श घेताना प्रबोधनकारांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, छत्रपती शिवरायांच्या महान कर्तृत्वाच्या मानाने त्यांच्या कारकिर्दीतल्या कागदपत्रांची संख्या क्षुल्लक का? एका पत्राच्या आधारे ते सांगतात, सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांच्या पदच्युतीसाठी केलेल्या कारस्थानांच्या दरम्यान पटवर्धन आणि नातू या विरोधकांनी चिटणीसांची घरं लुटून १८ उंट भरतील इतकी कागदपत्रं जाळून टाकली.
`कोदंडाच्या टणत्कार` लिहिताना मिळालेल्या सूत्रानुसार `ग्रामण्याचा साद्यंत इतिहास` आणि त्यातील एका महत्त्वाच्या ग्रामण्यात उल्लेख झालेला प्रतापसिंहाना छत्रपतीपदावरून खाली खेचण्यासाठीच्या कारस्थानांचा सविस्तार पर्दाफाश करणारा `रंगो बापूजी` हा महाग्रंथ, हा प्रबोधनकारांच्या इतिहासलेखनाचा चढता आलेख आहे. अनेकांसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातली बहुसंख्य कोडी अजून उलगडलेली नाहीत. त्यासाठी हा इतिहास वाचून डोळ्यात अंजन घालून घ्यावंच लागेल.
जवळपास अडीच हजार वर्षांच्या कालावधीत प्रबोधनकारांनी सीकेपी समाजावर घातलेल्या एकूण ११ ग्रामण्यांचा तपशीलवार इतिहास तर या पुस्तकात आहेच. शिवाय क्षत्रिय मराठे, दैवज्ञ ब्राह्मण, शुक्ल यजुर्वेदी यांच्यावरच्या ग्रामण्यांचाही इतिहास आहे. मात्र गौड सारस्वत ब्राह्मण आणि पाठारे प्रभू यांच्यावरच्या ग्रामण्यांचा इतिहास त्यांना संबंधित समाजातले अभ्यासक मदतीला न मिळाल्यामुळे लिहिता आलेला नाही. ही ग्रामण्ये प्रामुख्याने चित्पावन ब्राह्मणांनी केलेली असल्यामुळे पुस्तकाच्या परिशिष्टात चित्पावनांच्याही इतिहासातल्या वादग्रस्त गोष्टी नोंदवून आरसा दाखवलेला आहे. विशेष म्हणजे यात प्रबोधनकारांनी स्वतः कोणताही दावा केलेला नाही, तर इतर मोठमोठ्या अभ्यासकांनी लिहिलेल्या ग्रंथामधील १५ उतारे दिलेले आहेत.
शेवटी प्रबोधनकार परमेश्वराची प्रार्थना करतात, त्यातून त्यांनी कोणत्याही एका जातीला लक्ष्य न करता जातभेदांच्या पलीकडे जाण्याची इच्छा स्पष्ट होते.
जावो लयाला मतभेद सारा
एका वरो भारत या विचारा
महाराष्ट्र जाणो झणिं ऐक्यवर्म
देवा जनी चेतवि राष्ट्रधर्म
तरीही प्रबोधनकारांना जातीय अत्याचारांचा इतिहास का मांडवासा वाटतो, हे समजून घेणं आजच्या संदर्भातही महत्त्वाचं आहे. ते लिहितात, `सध्याच्या मन्वंतरात जे जे तत्त्ववेत्ते पुराणिक राष्ट्रीय तत्त्वज्ञानांची पुराणे झोडण्यास पुढे सरसावलेले आहेत, त्यांची कुवत, त्यांची मूळ संस्कृती आणि त्यांच्या मनोवृत्तींची रचना काय आहे, या सर्व गोष्टींची पंचराशिके सोडविण्याच्या कामी आणि कोठे कोणते प्रमाण व्यस्त येते किंवा सम येते हे बिनचूक दाखविण्याच्या कामी ग्रामण्यांचा इतिहास हाच एक गुरू होय, याच मुळीच संशय नाही.`
(`ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास` हे पुस्तक ‘prabodhankar.com’ या वेबसाईटवर सहज वाचता येईल.)