भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर, त्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाई फेकली आणि त्यानंतर एकच गदारोळ झाला. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील विचारी म्हणवल्या जाणार्या काही मंडळींनी या शाईफेकीचा निषेध केला असला तरी राज्यभरातील बहुतांश सर्वसामान्य जनतेने मात्र कार्यकर्त्यांच्या या निषेधाच्या, एरवी निश्चितपणे निषेधार्हच ठरली असती अशा, कृतीचं समर्थन केल्याचं दिसलं. असं का घडलं असावं? पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांच्या मानल्या जाणार्या या महाराष्ट्रात शाईफेकीसारख्या गैरकृत्याला पाठिंबा किंवा समर्थन कशामुळे लाभलं?
याचं उत्तर भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि संघविचारी राज्यपालांनी (यांना भाज्यपाल हेच संबोधन योग्य) गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या अतिरेकामध्ये दडलेलं आहे. अविवेकी आणि उथळ वागण्याबोलण्याची स्पर्धा लागल्याप्रमाणे ते बेताल वागत बोलत आहेत. ठरवून एखादी मोहीम चालवावी अशा प्रकारे ही चार चवलीची मंडळी महाराष्ट्राचे मानबिंदू असलेल्या थोर व्यक्तिमत्वांबद्दल सतत आक्षेपार्ह उद्गार वारंवार काढत आहेत. महाराष्ट्र इतका थंड कसा झाला, या बेताल गरळ ओकण्याच्या प्रकारांची प्रतिक्रिया महाराष्ट्रात कशी उमटत नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचं उत्तर चंद्रकांत पाटलांवरच्या शाईफेकीतून मिळालं.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आणि दैवत आहे. महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई, राजर्षी शाहू महाराज, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सगळे महापुरुष या महाराष्ट्राच्या अस्मितेची जाज्वल्य प्रतीके आहेत. अनेक राजकारणी मंडळी भले उठता बसता आपल्या राजकारणासाठी या थोर विभूतींची नावे घेत असतील, पण सर्वसामान्य बहुजन जनतेचं तसं नाही. या राज्यातील करोडो बहुजनांच्या हृदयात आणि मस्तिष्कात हे महामानव त्यांच्या आभाळाएवढ्या कार्यामुळे कायमस्वरूपी वसलेले आहेत. त्यांचा वारंवार होणारा अवमान जनतेला अस्वस्थ करीत होता.
या दीड दमडीच्या भाजपेयींची मुक्ताफळं आठवा… रामदास स्वामी होते म्हणून शिवाजी महाराज घडले, दहाव्या-बाराव्या वर्षी जोतिबा आणि सावित्रीबाईंचे लग्न झाले… काय करत असतील ते दोघे? शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते, असे तारे भगतसिंग या नावाला लाज आणणार्या महामहीम राज्यपालांनी तोडले. त्यानंतर भाजपचा धनदांडगा मंत्री आणि बिल्डर मंगलप्रभात लोढा याची अक्कल गवत चरायला गेली. त्याने शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून आग्य्रातून करून घेतलेल्या थरारक आणि धाडसी सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी आणि सुरत-गुवाहाटी खोके-ओक्के सहलीशी केली. पाठोपाठ कोणा प्रसाद लाडोबाला कंठ फुटला आणि त्याने शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, रायगडावरच त्यांचे बालपण गेले, असा क्रांतिकारक शोध लावला. पाठोपाठ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाम्यांचा विषय निघाला तेव्हा, भाजपचा एक प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी याने शिवाजी महाराजांनी आग्य्राहून सुटकेसाठी औरंगजेबाला पाच माफीनामे लिहून पाठवले, अशी बकवास केली. हे कमी होते म्हणून की काय, चंद्रकांत पाटील यांनी जोतिबा आणि सावित्रीबाई, कर्मवीर भाऊरावांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा उभारल्या, अशी संतापजनक मांडणी केली. एकाहून एक गलिच्छ नग आणि सगळेच संघ-भाजपचे! हा काही योगायोग नाही. तिकडे तो बोम्मई रोज महाराष्ट्राला ललकारतोय आणि इकडचे मिंधे चिडिचुप्प, त्याने बेळगावात पाऊल ठेवू नका म्हणून सांगितलं की यांचं शेपूट आत. पण, आजचा महाराष्ट्र ज्यांनी घडवला आहे त्या महापुरुषांवर चिखल फेकताना बारा रेड्यांचं (हत्ती हा चांगला प्राणी आहे हो, त्याची उपमा काय द्यायची यांना) बळ येतं यांच्या अंगात. का नाही लोक संतप्त होणार?
हे सगळं अनावधानाने कसं होऊ शकतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते? मिर्झाराजे जयसिंग शिवाजी महाराजांची कोंडी करण्यासाठी मोठ्या फौजफाट्यासह स्वराज्यावर चालून आले, तेव्हा त्यांचा विजय व्हावा आणि शिवाजी राजांचं अस्तित्व मिटून जावं यासाठी होमहवन करणारे लोक कोण होते? संत तुकारामांना हयातभर छळणारे, त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवायला लावणारे आणि त्यानेही समाधान झाले नाही म्हणून अखेर त्यांना ‘सदेह वैकुंठा’ला धाडणारे कोण होते? त्याही फार पूर्वी संत ज्ञानेश्वरांना, त्यांच्या मातापित्यांना छळणारे, प्रायश्चित्त म्हणून त्यांना आत्महत्या करायला लावणारे कोण होते? असंख्य उदाहरणे देता येतील. मागील शेकडो वर्षांत हे सगळे प्रकार करणार्या सनातन्यांचे आजच्या काळातील वैचारिक वारसदार म्हणजे हे कोश्यारी आणि इतर भाजपेयी. लोकांना स्वाभिमानाने जगणे शिकवणारे, शहाणे करणारे महामानव, संत, प्रबोधनकार हे यांचे दुश्मन. लोक शहाणे झाले, तर्कसंगत विचार करू लागले तर यांना कशाला विचारतील, उलट पायताणाने बडवतील. यांचा दांभिक सांस्कृतिक राष्ट्रवाद मनुस्मृतीप्रमाणे जाळून टाकतील. तसं काही होऊ नये म्हणूनच या सगळ्या संतांचे, महामानवाचे विचार चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आणायचे. समाज सुधारणेचे, समतेचे, जाती-धर्म भेद मिटविण्याचे त्यांचे विचार समोर येऊ नयेत असे प्रयत्न करणे हीच यांची रणनीती. त्यासाठीच ज्ञानेश्वरांना समाधी घ्यायला लावायची, तुकारामांना वैकुंठाला धाडायचं आणि आजच्या काळात दाभोळकर-पानसरेंच्या हत्या घडवून आणायच्या!
भिडे-एकबोटे यांच्यासारखे अनेक लोक यांच्या विखारी विचारांना समाजात रुजवण्याचं काम वर्षानुवर्षे करीत राहतात. अनेकदा प्रचंड वादग्रस्त वक्तव्य करूनही, जातीय-धार्मिक दंगली पेटवण्याचे आरोप होऊनही या लोकांवर कारवाई का होत नाही? कारण त्यांचे पाठीराखे सत्तेचं संरक्षक कवच त्यांच्याभोवती भक्कमपणे उभं करतात. कोणतेही आरोप सिद्ध न होता, कोणताही पुरावा नसताना अनेक सामाजिक विचारवंत, कार्यकर्ते शहरी नक्षलवादी ठरवून वर्षानुवर्षे जेलमध्ये अन्यायकारक पद्धतीने डांबून ठेवले जातात आणि जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आरोप असलेले लोक मात्र सुखनैव बाहेर राहतात (शिवरायांचा एवढा अपमान झाला तेव्हा हे तथाकथित शिवप्रेमी कोणत्या बिळात लपले होते?). बलात्कार्यांच्या शिक्षांमध्ये इथे कपात केली जाते आणि बाहेर आल्यावर त्यांचे सत्कार सोहळे आयोजित केले जातात. त्यांना उमेदवार्या देऊन लोकशाहीच्या पवित्र मंदिरांमध्ये निवडून आणलं जातं! ही संघ-भाजपची नीती आहे आणि हे त्यांचं घाणेरडं राजकारण आहे. हे सगळं समजू लागलेले लोक अस्वस्थ आणि संतप्त होणारच ना?
सद्यकाळात लोक दैनंदिन जगण्यात भेडसावणार्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत. वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, सभोवतालचं असुरक्षित आणि तणावपूर्ण वातावरण अस्वस्थतेत भर घालीत आहे. एक प्रकारचं औदासिन्य लोकांच्या अंतरात दाटलेलं आहे. साहजिकच उत्स्फूर्तपणे उठाव, आंदोलनं, चळवळ करण्याची जनतेची मानसिकता कमी झालीये. परंतु याचा अर्थ चला, आता आपल्याला काहीही बरळायला रान मोकळं आहे असा काढून कोणीही उठावं आणि जनतेच्या प्रेरणास्थानांचा अवमान करावा, त्यांच्याविषयी चुकीचं बोलावं, असा होत नाही. मग स्वतःची किंवा घरादाराची पर्वा न करता कोणीतरी पुढे येतात आणि चुकीचं बोलणार्यांना आपल्या परीने धडा शिकवण्याचा प्रयत्न करतात. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यातलाच प्रकार आहे. हा संतुलित प्रमाणात बाहेर पडलेला उद्रेकच आहे आणि बेताल, निर्बुद्ध, उथळ वक्तव्य करणार्या सगळ्याच राजकारण्यांना, त्यातही भाजपच्या मंडळींना मोठा इशारा आहे.
आपण तर करू शकत नाही पण आपल्या मनातील कृत्य कोणीतरी केलंय याचं समाधान परवा चंद्रकांत पाटलांचं तोंड काळं झाल्यावर सोशल मीडियावर अनेकांच्या लिखाणातून बाहेर पडलं. मागील काही काळातील आपल्या मनातील खदखदत्या अस्वस्थतेला कोणीतरी आपल्या कृतीतून वाट करून दिली असं अनेक लोकांना वाटलं. उथळ, अविवेकी, बेताल बोलणार्या सर्वच भाजपेयींनी यापासून आता योग्य बोध घ्यायला हवा. नाहीतर नव्या पद्धतीने त्यांना तो द्यायला आणखी कोणीतरी तयार होईल आणि त्याबद्दल लोकांना वाईट वाटणार नाही.
महात्मा गांधींच्या हत्येनंतर एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करणारी पिढी शरीराने संपलेली असली तरी त्यांचे विकृत विचा त्यांच्यासोबत संपलेले नाहीत. त्यांचे वारसदार आजही गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून विकृत कंड शमवून घेण्याचा प्रयत्न करतात. खुनी नथुरामचे मंदिर, पुतळे उभारून त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं करताना त्यांना अहिंसा आठवत नाही. मात्र चंद्रकांत पाटलांवर कोणी शाई फेकली तर लगेच त्यांना अहिंसा आठवली! ‘हे बरे नव्हे..विचारांचा मुकाबला विचारांनी करायला हवा,’ वगैरे वगैरे. सत्ताधारी सुधारले नाहीत तर शाईचे ते चार थेंब भविष्यात एखाद्या क्रांतीची ठिणगीही ठरू शकतात ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला हवी. धर्मांधतेने राजकारण करणार्यांनी, त्यासाठी रक्तपाताचं कोणतंही सोयरसुतक नसणार्यांनी लोकांना अहिंसेची आठवण करून देण्यासारखा विनोद करू नये.
छत्रपती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर यांच्याविषयी मुळात यांनी तोंड उचकटू नये. संकुचित संघ विचारांच्या अगदी विपरीत या थोर विभूतींचे, महामानवांचे विचार आहेत. हे विचार माणसाला माणसाशी जोडणारे आहेत. समता आणि बंधुभाव शिकवणारे आहेत. केवळ आपल्याच नव्हे तर सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण देणारे आहेत. महिलांचा सन्मान करणारे आहेत.
संघ संस्कार आणि भाजपचे विचार याच्या अगदी उलट आहेत. त्यामुळे त्यांनी गोळवलकर, हेडगेवार आदी त्यांच्या थोर विभूतींविषयी बोलावे. त्यात ते चुकणार नाहीत आणि त्यांची जीभही घसरणार नाही. बहुजनांच्या प्रेरणास्थानांविषयी बोलताना नकळत त्यांच्या पोटातील ओठावर येतं आणि मग सगळा घोळ होतो. तोंड काळं होण्याची वेळ येते… पुढे ते… असो… काळजी घ्या.