महाराष्ट्रात सध्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेला मिंधे गट आणि भारतीय जनता पक्ष यांची सत्ता आहे. महाराष्ट्राच्या जनतेने २०१९मध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीलाच कौल दिला होता, महाविकास आघाडी सरकार हा त्या जनमताशी केलेला द्रोह होता, अशी मांडणी हे दोन्ही घटक करत असतात. यातले मिंधे अडीच वर्षे महाविकास आघाडीत मंत्रिपदे उपभोगत होते, ईडीचा दट्ट्या लागेपर्यंत त्यांना जनतेशी द्रोह आठवला नव्हता. भाजपने तर जनमताचा तथाकथित कौल नाकारून भल्या पहाटेचा शपथविधीही केला होता. त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे काय? दुसरे खातात ते शेण, आपण खातो ते पंचगव्य, असा यांचा कांगावा असतो.
जनतेचा कौल तुम्हालाच होता, तुम्ही ‘जनतेच्या मनातले’ सरकार स्थापन केले आहे, तर त्याच जनतेला इतके घाबरत का आहात? राज्यातल्या आयाबायांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या निर्भया पथकातल्या गाड्या खोकेबहाद्दर मिंध्यांच्या दिमतीला लावल्या गेल्या आहेत. जनतेच्या मनातले सरकार आणणारे त्या जनतेलाच घाबरत आहेत, म्हणजे सगळे काही ओक्के नाही, हे स्पष्ट आहे.
शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करणार्या भीमसैनिकांवर थेट खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ११ पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले. मंत्र्याने वाट्टेल तसे बरळायचे, महाराष्ट्राच्या मानबिंदूंचा अपमान करायचा आणि त्याची शिक्षा पोलीसांनी भोगायची? राज्याच्या मानबिंदूंचा अवमान करून भावना भडकवल्याबद्दल चंद्रकात पाटील यांच्यावर पोलीसांनी गुन्हा का दाखल केला नाही? चंद्रकांत पाटील एकटेच बरळलेले नाहीत. महामहीम भाज्यपालांपासून सुरुवात झाली आहे. कधी प्रसाद लाड दिव्य इतिहास संशोधन मांडतायत, कधी मंगलप्रभात लोढा अकलेचे तारे तोडतायत, तिकडे कर्नाटकातून मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई रोज महाराष्ट्राला खिजवून दाखवतायत आणि इथले मिंधे दाढी खाजवत मान खाली घालून दिल्लीच्या आदेशाची वाट बघत बसले आहेत, हे चित्र महाराष्ट्राने किती दिवस निमूटपणे पाहायचे?
महाराष्ट्राचे मन जिवंत आहे की मेलेले आहे, मराठी अस्मिता नावाचा काही प्रकार शिल्लक आहे का, हे डिवचून पाहण्याचाच प्रकार भाजपने गेले काही दिवस चालवला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पण, गुजराती जनतेच्या मनात सुरतेच्या लुटीविषयीच्या गैरसमजांमुळे महाराजांविषयी सुप्त आकस आहे. गुजरातच्या निवडणुकांमध्ये मते मिळावीत म्हणून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक शिवरायांचा अवमान केला गेला असावा, अशी शंका घेण्यास वाव आहे. कारण, निवडणुका जिंकण्याच्या, सत्तेच्या राक्षसी लालसेपोटी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचा अनुभव देशात रोज येतच असतो. शिवरायांच्या अवमानावर प्रतिक्रिया उमटली तरी ती राज्यव्यापी आंदोलनात रूपांतरित झाली नाही, हे लक्षात येताच त्यांच्याविषयी भाजपचे नेते पुन्हा अवमानकारक बरळले. पाठोपाठ महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शिक्षणसंस्था उभ्या केल्या, तुम्हाला अनुदान कशाला पाहिजे, अशी उद्दाम भाषा चंद्रकांत पाटील यांनी वापरली. अनुदानाबद्दलचे हे दांभिक मोदी-आकलन आहे. तेही जिथे तिथे फुकटेबाजी, रेवडी संस्कृती वगैरे तारे तोडत फिरत असतात. मोदीजी, तुम्ही तुमच्या खिशातून देता काय अनुदान? निवडणुकांच्या आधी शेतकर्यांच्या खात्यात तुम्ही दोन दोन हजार रुपये जमा करता तेव्हा ते काय असते? वीज फुकट देऊ, शेतकर्यांचे कर्ज माफ करू, या घोषणा करता, तेव्हा ते काय असते? पाटील साहेब, जनता शिक्षण कर भरते. त्यातून तुम्ही शिक्षणसंस्थांना अनुदान देता. हे आमचेच पैसे आहेत. तुम्ही काय राजे महाराजे समजू लागला आहात काय स्वत:च्या खजिन्यातून दानधर्म करायला? समाजातल्या मागे पडलेल्या वर्गाला पुढे आणण्याच्या प्रयत्नांची अशी खिल्ली उडवणे, हे विकृत बुद्धीचे लक्षण आहे. ही विकृती वारंवार डोके वर काढत होती म्हणून समाजमनाचा स्फोट झाला आणि चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाली. शाईफेक करणे हा असमर्थनीयच प्रकार आहे, पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले त्याप्रमाणे शाई फेकली गेल्याने कोणी मरत नाही. मग खुनाच्या प्रयत्नाचा, कट रचण्याचा, सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा कशासाठी? उठसूट महापुरुषांची बदनामी करणे हे तुमचे सरकारी काम आहे काय? तसे असेल तर त्यात अडथळा आणणे हे जनतेचे कर्तव्यच ठरेल. या भीमसैनिकांच्या बचावार्थ शेकडो वकील न्यायालयात उतरले आहेत, ते त्याच भावनेतून. या प्रकरणी एका पत्रकारालाही गोवून त्याला अटक करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा राज्यातल्या सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. त्यामुळे, त्या पत्रकारावरचे गुन्हे मागे घेण्यात आले.
या देशात माजी पंतप्रधानांची हत्या झाल्यानंतर त्या मारेकर्यांना माफ करणारे पंतप्रधानांचे उदार मनाचे कुटुंबीय आहेत. भारताची खरी परंपरा काही असेल, तर ती आहे. फुटकळ शाईफेकीचा बाऊ करून सुडाने गुन्हे दाखल करणे आणि पोलिसांना निलंबित करणे, त्यांच्या बदल्या करणे, हे फारच संकुचित आणि भ्याड वृत्तीचे दर्शन घडवणारे आहे. पण, ती वरपासून खालपर्यंत झिरपलेली आहे. आपल्या दौर्यात निदर्शने झाली म्हणून निदर्शकांना भेटण्याची हिंमत न दाखवता संरक्षणाच्या गराड्यात बसून राहणार्या आणि जीव वाचला म्हणून सुस्कारे सोडणार्या पंतप्रधानांचा हा भयाकुल वारसा आहे.
खोके सरकारच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी, महामहिमांनी समाजात तेढ पसरवणारी विधाने करणे, महापुरुषांची विकृत बदनामी करणे, नको त्या विषयांमध्ये कायदे करायला जाऊन समाजात विष पेरणे, निवडणुकीतले फायदे डोळ्यांसमोर ठेवून राज्याराज्यांमध्ये कलागती लावून देणे, हे फूटपाडू धंदे बंद करून राज्यातल्या जनतेला महागाई, बेरोजगारीपासून संरक्षण देण्याचे काम केले, तर त्यांना कसलेही संरक्षण न घेता जनतेत निर्भयपणे फिरण्याचा आनंद लुटता येईल आणि दोनचार जणांना शिक्षित करण्याच्या कामाला येणार्या शाईचाही अपव्यय होणार नाही.