शिस्त आणि खडूसपणा यांच्यातला फरक बॉस लोकांना कधी कळेल?
– नेहा सामंत, बाभई नाका, बोरिवली
ओह ओ.. बॉस खूपच हँडसम आणि मालदार दिसतोय. आपण खडूसपणा सोडला तर सगळं मनासारखं घडतं.
पुरुषांना आकृष्ट करून घेण्यासाठी बायका खूप मेकअप करतात. बायकांना आकृष्ट करून घेण्यासाठी पुरुष असलं काहीही अजिबात करत नाहीत. तरी बायकांनाच सुंदर का म्हटलं जातं?
– अरविंद जायभिये, अचलपूर
हे म्हणजे ‘मेकअप करून करून भागला आणि प्रश्न विचारायला लागला’ असं झालं. मेकअप कितीही केला तरी आपल्या मूळ चेहर्यात फरक पडत नाही म्हणून बायकांच्या मेकअपबद्दल बोलणं बरं नाही मामा.
रक्ताचे नाते मोठे की मैत्रीचे?
– समीर शहा, डोंबिवली
बायकोचे… कोणाकडेही पैसे मागून बघा, फक्त बायकोच पैसे देईल. (नातं तोडायला जाल तर दामदुप्पट पोटगी मागेल.)
मेलेला माणूस काही बोलू शकत नाही, लिहू शकत नाही, कळवू शकत नाही. मग मेल्यावर माणूस स्वर्गात किंवा नरकात जातो, हे जिवंत माणसांना कसे कळले?
– सागर कामेरकर, दापोली
मुळात जिवंत माणसाला हा प्रश्न पडतोच कसा?
आईवडील म्हणतात, नोकरी कर. माझी इच्छा आहे व्यवसाय करण्याची. तुम्ही सांगा, मी काय करू?
– रोहन देसाई, हातखंबा
आईचे दागिने आणि बाबांचा प्रॉव्हिडंट फंड वापरून व्यवसाय करायचा आणि म्हणायचं ‘आईची माया आणि बाबांचा आशीर्वाद’. त्यापेक्षा, स्वतःच्या मेहनतीने ‘हवा तो’ धंदा करा. नाहीतर नको ते धंदे करण्यापेक्षा आईबाबांचं ऐकून नोकरी करा.
आजच्या भावना कशानेही दुखावण्याच्या काळात तुम्ही ‘यदाकदाचित’सारखं नाटक मोकळेपणाने लिहू शकाल, असं वाटतं का?
– मंगेश वाघमारे, सायन
कशाला खाजवून खरूज काढताय. (मला लिहिणं जमेल.. पण माकडाच्या हातात कोलीत कशाला द्या? ज्यांना जे जमत तेवढंच करतात लोक) मुळात प्रश्न असा आहे की आपल्याला बघायला जमणार आहे का?
आरेच्या जंगलातील मेट्रो प्रकल्पाला शांततापूर्ण रीतीने विरोध करणार्या आंदोलकांना ‘झोला छाप’ ठरवून त्यांना झोडपून काढायला हवे होते, असे विधान एखादा संवेदनशील अभिनेता कसं काय करू शकतो?
– मेधा जोशी, गोरेगाव
अभिनेता आहे तो, पैसे देणारे सांगतील तेवढाच बोलणार. त्यांची कुवत तेवढीच. अशा माणसाला संवेदनशील बोलताय म्हणजे आपण असंवेदनशील आहात का ताई?
माझी बायको फार कजाग आहे. पण, प्रेयसी प्रेमळ आहे, म्हणून कसा बसा तग धरून आहे. असं किती दिवस चालणार?
– राजेश जोपळे, दिंडोरी
इतके दिवस चालताय ना? ‘दिवस जाऊ द्या’, मग बघा कशी पळापळ होते तुमची…
‘कांतारा’ या कन्नड सिनेमाने त्यांच्याकडील लोककथा, ग्रामीण परंपरा आणि लोककला यांचा संगम साधून भारतभर यश मिळवलं. महाराष्ट्रात हे सगळं आहे, तरी याची सांगड घालणारा तसा भव्य सिनेमा का बनत नाही?
– रहीम शेख, तुळजापूर
आपण स्वतःच ठेवतो झाकून आणि दुसर्यांचं पाहतो वाकून वाकून (ही आपली सवय बदलेल तेव्हा घडेल तुमच्या मनासारखं).
मी मनोरंजनासाठी न्यूज चॅनेल पाहतो, आता बातम्यांसाठी काय पाहू?
– देवेंद्र राजे, सोलापूर
मोलकरणीशी गोड बोला. सोसायटीतल्या सगळ्या बातम्या कळतील. बाकी बातम्या हव्या असतील तर हेर पथक बाळगा. ‘राजे’ फक्त नावाचे आहेत का?
पुरुष फोनवर एक मिनिटाच्या वर का बोलत नाहीत? पण बायका फोनवर एक तासाच्या खाली का बोलत नाहीत?
– रॉनी तुस्कानो, विरार
पुरुष बायकोच्या माहेरच्या माणसांशी एक मिनिटाच्या वर बोलत नाहीत. पण बायकोच्या मैत्रिणींशी तासनतास बोलत बसतात. (खोटं वाटतं तर हाच प्रश्न बायकोला विचारा, उत्तरात एका शब्दाचा फरक पडला तर मला विचारा.)