अशी आहे ग्रहस्थिती :
मंगळ-राहू-हर्षल मेषेत, शुक्र-बुध-रवि मिथुनेत, १७ जुलै २०२२ रोजी रवि-बुध कर्केत, बुध अस्त, केतू तुळेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु-नेपच्युन मीनेत, चंद्र मीनेत, त्यानंतर कुंभ, मीन राशीत. सप्ताहाच्या अखेरीस मेषेत.
दिनविशेष : १६ जुलै रोजी संकष्टी चतुर्थी
मेष – नोकरीत वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, सबुरीने घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला ग्रहस्थिती बदलेल. रवि-शनि समसप्तक योग व मंगळ-राहू अंगारक योगामुळे कामाच्या ठिकाणी अडचणीची स्थिती निर्माण होईल. राग बाजूला ठेवून समंजसपणे घ्या. संततीच्या कामात अडथळे येतील. कौटुंबिक सौख्यात दरी निर्माण होईल. स्वराशीचे गुरु-नेपच्यून आध्यात्म, ध्यानधारणा, तीर्थयात्रा यांत रुची निर्माण करतील. अडचणीच्या काळात समाधान मिळेल.
वृषभ – शुक्राचे मिथुनेतील धनस्थानात भ्रमण होत असल्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायात यश मिळेल. मौल्यवान वस्तूंच्या व्यापार्यांना अनुकूल काळ आहे. रवि-बुधाचे कर्केतील राश्यांतर वक्री शनि-मंगळाच्या दृष्टीत होत असल्याने संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. कुटुंबासाठी आकस्मिक खर्च होईल. गुरुमहाराजांची कृपा राहील. व्यवसायानिमित्त प्रवास होतील. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
मिथुन – आरोग्याची काळजी घ्या. दात, डोळे, घसा यांचे विकार उद्भवू शकतात. बुध अस्त रवीबरोबर कर्केत राश्यांतर, शुक्र-लग्नी, त्यामुळे अधिकार मिळतील. महत्वाची कागदपत्रे किंमती वस्तू गहाळ होऊ शकतात. आर्थिक स्थिती उत्तम राहील. गुरुकृपा लाभेल. शेजारधर्म पाळा. वाद टाळा. भावंडांबरोबर वाद होतील. करमणूक क्षेत्रातील मंडळींच्या संततीच्या बाबत शुभघटना घडतील. अपेक्षित लाभ मिळतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.
कर्क – मान वाढेल. मंगळ दशम भावात, अंगारक योग. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. कुटुंबात विनाकारण नाराजी निर्माण होईल. आईबरोबर शाब्दिक चकमक उडेल. वाहनांसाठी पैसे खर्च करावे लागतील. पाळीव प्राणी आजारी पडतील. मित्रमैत्रिणीबरोबर वाद होतील. नमते घ्या. संततीची कामे मार्गी लागतील. नोकरीनिमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामात विलंब होईल. कुटुंबासाठी पैसे खर्च होतील.
सिंह – नोकरीत कर्मचार्यांबरोबर वाद होईल. एखादी व्यक्ती शत्रुत्वाने वागेल, सावध राहा. कामाच्या ठिकाणी मनासारखी वागणूक न मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. महिलांना पोटाचे त्रास जाणवतील. परदेशात कायदे कानून पाळा. गैरवर्तणूक करण्याचे टाळा. लाभात येणारा शुक्र अडकलेले पैसे मिळवून देईल. व्यवसायात नव्या संधी आल्यामुळे बँक बॅलन्स वाढेल.
कन्या – अनपेक्षित लाभाचा आठवडा आहे. राशिस्वामी बुधाच्या राश्यांतरामुळे व्यावसायिक लाभ होतील. जोडधंदा सुरु होईल. विवाहेच्छुंसाठी चांगला काळ आहे. वक्री शनी, दृष्टीत येणार रवि त्यामुळे नोकरीत बदली-बढतीसाठी अनुकूल काळ आहे. घेतलेला निर्णय रद्द करावा लागेल. कामाच्या ठिकाणी त्रास होईल. संततीच्या बाबतीत वेळकाढूपणामुळे एखादा निर्णय लांबणीवर पडेल. अष्टमातील मंगळ-राहू आजाराला निमंत्रण देईल. वाहन हळू चालवा.
तूळ – व्यवसायात मोठे लाभ होतील. नवीन मोठी कंत्राटे मिळतील. शुक्राचे भाग्यातील भ्रमण, रवि-बुधाचे कर्केतील दशमात होणारे एकत्रित राश्यांतर यामुळे मोठे घबाड मिळेल. वक्री शनिमहाराजांच्या सुखस्थानातील भ्रमणामुळे कौटुंबिक नैराश्य येईल. मानसिक त्रास होईल. काळजी घ्या. रोखीचे व्यवहार नोकराच्या भरवशावर करू नका. नवीन गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे.
वृश्चिक – वास्तू, प्लॉट खरेदीला नक्की गती मिळालेली दिसेल. काहींना आर्थिक फटका बसेल. कायदेशीर गोष्टींत कागदपत्रांची तपासणी करूनच पुढे जा. अन्यथा सरकारी चौकशीला सामोरे जावे लागू शकते. रवि-बुधाचे एकत्रित होणारे राश्यांतर संततीसाठी शुभदायक आहे. गुरु-रवी-बुध नवपंचम योगामुळे मानसन्मान मिळेल. भाग्याला कलाटणी मिळेल. नोकरदारांना बढतीचे योग आहेत.
धनु – आर्थिक-कौटुंबिक स्थावर मिळकतीसंदर्भातील अडकलेली कामे मार्गी लागतील. गोचर स्थितीमध्ये वक्री शनि महाराज धनभावात आहेत. वास्तूविषयक लाभ होतील. पंचमातील केतू-राहू-मंगळामुळे कटकारस्थानापासून सावध राहा. काहींना मेंदूविषयक समस्या निर्माण होतील. काहींना मामाकडून सहकार्य मिळेल. विमा क्षेत्रात चांगले लाभ होतील. वक्री शनि आणि मंगळाची दृष्टी अष्टम भावावर असल्याने अपघाताची शक्यता आहे.
मकर – सावध भूमिका घ्या. वक्री शनि राशीत स्थिरावत आहे. सुखस्थानात राहू-मंगळ अंगारक योग, रवि-बुधाचे राश्यांतर सप्तमभावात, त्यामुळे नोकरीवर गदा येऊ शकते. वरिष्ठांबरोबर मतभेदाचे प्रसंग निर्माण होतील. सर सलामत तो पगडी पचास या उक्तीप्रमाणे प्रत्येक पावलावर सावध निर्णय घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. जपून बोला. कामगार संघटनेत सांभाळून निर्णय घ्या.
कुंभ – धकाधकीचा काळ आहे. आरोग्यावर परिणाम होईल. मंगळाची दृष्टी षष्ठम भावावर असल्यामुळे कामाचा हुरूप वाढेल. अडचणींवर सहज मात कराल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मातृसुख मिळेल. संगीत क्षेत्रात चांगले यश मिळेल. संततीच्या विद्याव्यासंगात वाढ होईल. दाम्पत्य जीवनात नाराजीनाट्य निर्माण झाले तरी अडचणीतून सहज बाहेर पडाल.
मीन – १९ आणि २० तारखेला होत असणार्या गजकेसरी योगामुळे पांचो उंगलिया घी में, असा अनुभव येईल. प्रेमप्रकरणात यश येईल. संततीसौख्य, विवाहसौख्य लाभेल. गुरु-बुध-रवि नवपंचम योग अतिशय शुभ राहील. आनंद, उत्साहाच्या भरात अभिमान वाढून कुणाला दुखावू नका. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी चालून येतील. नव्या कामात सहज यश मिळेल. नोकरदारांना पगारवाढीचे योग आहेत.