रांगेतील महिला एकामागोमाग एक मतदान केंद्रात जात होत्या. त्या बुरखेवाल्याही आत गेल्या. तसा मीही मागोमाग गेलो. ठरल्याप्रमाणे त्यांनी चेहर्यावरचा बुरखा बाजूला केला. बोटाला शाई लावून घेतली. मी फोटो काढणार इतक्यात केंद्र अधिकारी ओरडला, नो… नो… केंद्रात फोटो घेता येणार नाही. खोलीबाहेरून फोटो घ्या. मी म्हणालो, साहेब निशाणीवर शिक्का मारताना फोटो घेत नाही, तर मतपत्रिका पेटीत टाकताना फोटो घेतोय. परंतु त्याने सक्त मनाई केली. त्याच्या आडमुठेपणामुळे माझी सर्व मेहनत फुकट गेली.
– – –
ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती. मतदानाच्या दिवशी घडणार्या घडामोडींचे फोटो घेण्यासाठी मी मुंबईहून ठाण्याला गेलो होतो. पत्रकारांना मतदान केंद्रामधील फोटो घेणे सोयीचे व्हावे म्हणून ठाणे महानगरपालिकेने आम्हाला ओळखपत्रे दिली होती. त्यावर लिहिले होते ‘ठाणे महापालिका निवडणूक १९८६. वृत्तपत्र प्रतिनिधी घन:श्याम भडेकर. दैनिक नवशक्ती छायाचित्रकार यांना दि. १ मार्च ८६ रोजी मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे’. याखाली स्वाक्षरी होती ठाणे महापालिका आयुक्त गोविंद स्वरुप यांची.
ठाणे नगरपालिका, दै. नवशक्ती आणि महाराष्ट्र शासनाचे असे तिघांचे ओळखपत्र सोबत असताना मला माझ्या कर्तव्यापासून कोण रोखू शकणार होते? आता आपल्याला मुक्त प्रवेश मिळेल अशा समजुतीमध्ये ठाण्यातील विविध भागांतील मतदान केंद्रांवर जाऊन फोटो घेतले.
एका केंद्रावर मुस्लीम महिला बहुसंख्येने रांगेत उभ्या होत्या. सर्वांनी काळा बुरखा परिधान केलेला. संसाराचा गाडा आटपून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिला आवर्जून आल्या होत्या असे मला फोटोत दाखवायचे होते. मराठी वृत्तपत्राच्या वाचकांना बुरखेधारी महिलांचे फोटो बघण्यात कितपत स्वारस्य असेल, त्यांना काय आवडेल, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करावा लागतो. विषय कोणताही असो. त्याचा फोटो सुंदरच दिसायला हवा. काळ्या बुरख्यातून ही सुंदरता दिसू शकते म्हणून मी काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. माझे हिंदी तितकेसे चांगले नव्हते. उगाच बोलता बोलता शब्दभ्रम व्हायचा आणि आपलाच बुरखा फाटायचा. त्यापेक्षा मराठीतून बोलून पाहू या. महाराष्ट्रातील मुस्लिमांना मराठी चांगले बोलता येते आणि समजतेही. म्हणून मराठीत विचारले, ‘ताई, तुमचा फोटो काढला तर काही हरकत नाही ना? तुम्ही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला आहात असा फोटो उद्याच्या वृत्तपत्रात येईल. त्यासाठी तुमचा चांगला फोटो छापता येईल. तुम्ही एक मिनिटासाठी सर्वांनी चेहरा दाख्विलात तर मी फक्त एकच फोटो घेईन.
फोटोग्राफरला सौंदर्यदृष्टी असावी असं माझं मत. विश्वात चराचरात दिसणारे नेत्रदीपक सौंदर्य आपण कॅमेर्यात टिपावे आणि वाचकांना दाखवावे असा माझा प्रामाणिक प्रयत्न चालू होता. महिलांचा आवडता प्राणी म्हणजे फोटोग्राफर. त्याने केलेली विनंती त्या सहसा झिडकारत नाहीत. त्या एकमेकींच्या कानात काहीतरी कुजबुजल्या आणि हो, नाही म्हणता तयार झाल्या. हो आम्ही देऊ फोटो काढायला. अट एकच होती की रस्त्यात फोटो काढायचा नाही. आम्ही मतदान केंद्रात जाऊ तेव्हा आत मतदान करताना आम्ही चेहरा दाखवू, त्यावेळी तुम्ही फोटो घ्या असे त्या म्हणाल्या.
आमचा संवाद शेजारील रांगेत उभ्या असलेल्या एका मराठी महिलेने ऐकला आणि चटकन तिनेही डोक्यावर पदर घेतला. आता तिलाही पदर बाजूला कर म्हणावं तर मराठी ठसका लागायचा.
रांगेतील महिला एकामागोमाग एक मतदान केंद्रात जात होत्या. त्या बुरखेवाल्याही आत गेल्या. तसा मीही मागोमाग गेलो. ठरल्याप्रमाणे त्यांनी चेहर्यावरचा बुरखा बाजूला केला. बोटाला शाई लावून घेतली. मी फोटो काढणार इतक्यात केंद्र अधिकारी ओरडला, नो… नो… केंद्रात फोटो घेता येणार नाही. खोलीबाहेरून फोटो घ्या. मी म्हणालो, साहेब निशाणीवर शिक्का मारताना फोटो घेत नाही, तर मतपत्रिका पेटीत टाकताना फोटो घेतोय. परंतु त्याने सक्त मनाई केली. त्याच्या आडमुठेपणामुळे माझी सर्व मेहनत फुकट गेली. त्या महिला मतदान करून निघून गेल्या.
अधिकार्याला मी ‘नवशक्ती’ दैनिकाचे ओळखपत्र दाखवले तरी नाही, मग शासनाचे अधिस्वीकृती पत्र दाखवले तरीही नाही. मग ठाणे महानगरपालिकेने दिलेले ओळखपत्र दाखवले. ते मात्र त्याने चष्मा लावून निरखून पाहिले. वाचले व म्हणाला, यात मतदान केंद्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. फोटो घेण्याची नाही. तुम्ही आत या खुर्चीवर बसा. मतदान कसे चालले आहे, ते पाहा पण फोटो घेऊ नका.
मी त्याला खूप समजावले, `अहो, हे ओळखपत्र पुन्हा नीट वाचा त्यात म्हटले आहे. नवशक्तीचे छायाचित्रकार. आता तुम्हीच सांगा छायाचित्रकाराला प्रवेश कशासाठी असेल? छायाचित्र घेण्यासाठीच ना? की इथे येऊन टेबलवर बसण्यासाठी परवानगी दिली आहे.
त्याने कायद्याचे जाडजूड पुस्तक काढले. त्यातील चटकन एक पान उघडून कायद्याने फोटो कसा घेता येणार नाही ते वाचून दाखवले. तो कायदा मी पाच वेळा वाचला. पाय आपटत केंद्राबाहेर पडलो. ठाणे नगरपालिकेने मला उल्लू बनविल्याची खात्री पटली. मुंबईपासून इतका दूरवर आलो. पोटात अजून अन्नाचा कण नाही. दिवसभर उपाशीपोटी धावपळ करतो आहे, पण कुणी हवा तसा फोटो घेऊ देत नाही. लोकशाहीतील मी चौथा स्तंभ आणि आम्हालाच कायदे लागले शिकवायला, तर कसे चालेल.
ज्यांनी मला हे ओळखपत्र दिले, त्या ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांचा पत्ता शोधत त्यांच्या कचेरीत गेलो. आयुक्त गोविंद स्वरुप यांच्या केबिनबाहेर पट्टेवाला उभा होता. कोण पाहिजे? कुठून आलात? काय काम आहे असे हजार प्रश्न विचारून त्याने माझी चौकशी सुरू केली. मी स्वरुप साहेबांना भेटायचे आहे म्हणालो. कमिशनर साहेब मतदान केंद्राची पाहाणी करण्यासाठी राऊंडअपवर गेले आहेत. थोड्या वेळाने परत येतील, असे तो म्हणाला.
मी कचेरीखाली येऊन त्यांची वाट पाहत उभा राहिलो. मनात म्हटले, येऊ तर दे त्यांना. असतील गोविंद स्वरुप, तर त्यांना माझेही स्वरुप दाखवतो. त्या बुरखेधारी महिलांची खूप मनधरणी करून मी त्यांना फोटोसाठी तयार केले होते, पण फोटो घेता आला नाही, याचा राग मनात होताच आणि भुकेने जीव व्याकूळ झाला होता. बाजूच्या कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन यावे असे वाटले. पण दरम्यान आयुक्त निघून जायचे. दोन हात कमरेवर ठेवून मी विठोबासारखा पायरीवर उभाच. साहेबाच्या स्वागतासाठी.
पंधरा वीस मिनिटांतच स्वरुप साहेब दोन मोटारींच्या ताफ्यासह कचेरीवर परतले. सोबत अंगरक्षक सेक्रेटरी वगैरेंचा लवाजमा होता.मी ओळखपत्र दाखवले व तुम्ही माझी कशी फसवणूक केलीत ते तावातावाने सांगितले. तुम्ही दिलेले ओळखपत्र फोटो काढण्यासाठी आहे की मतदान बघण्यासाठी आहे, ते अगोदर स्पष्ट करा असे ठणकावून सांगितले. मला मतदानाचा फोटो घेता आलाच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली.
गोविंद स्वरुपांचे बाह्य स्वरुप अगदीच निर्मळ, विनम्र. अतिशय शांत स्वभावाचे आयुक्त. ते थकून भागून जेवण घेण्यासाठी कचेरीत परतले होते. पण माझे स्वरुप पाहून पुन्हा मोटारीत बसले. मलाही गाडीत घेतले. लाल दिव्याची गाडी सायरन वाजवत मतदान केंद्राच्या दिशेने निघाली. मी त्याच केंद्राजवळ साहेबांना घेऊन गेलो, जेथे फोटो काढण्यास मनाई करण्यात आली होती. तो केंद्राधिकारी कायद्याचे पुस्तक हाती घेऊन तयारीतच उभा होता. स्वरुप म्हणाले, घ्या फोटो तुम्हाला हवे तसे. आता कोणीही तुम्हाला अडवणार नाही. दोन वृद्ध महिला मतदान करत असताना स्वरुप साहेब पाहणी करत आहेत असा फोटो निघाला. पण मनाचे समाधान झाले नाही.
आपल्या नशिबी आबालवृद्धांचेच फोटो काढण्याचे ‘भाग्य’ होते तर ते चेहरे कसे दिसणार ज्यांचे फोटो टिपता आले नाहीत.