• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

होळी रे होळी… पुरणाची पोळी…

- वैभव भाल्डे (सुग्रास)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 15, 2024
in खानपान
0

आपल्याकडे प्रत्येक सणाचं नातं एकेका पदार्थाशी जोडलं गेलंय, गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड किंवा बासुंदी, नारळी पौर्णिमेचा नारळीभात, बाप्पाचे मोदक, दिवाळीचा फराळ, संक्रांतीला तिळगूळ तसंच होळी म्हटलं की आठवते पुरणाची पोळी!! या आठवड्यात तर होळीच्या आधी पुरणपोळीच जास्त गाजायला लागली, खायची उद्याच असली तरी आगाऊ नोंदणीसाठी हो!! ठासून पुरण भरलेल्या, पिवळ्याधम्म गुळाच्या, साखरेच्या अशा विविध विशेषणांसहीत वर्तमानपत्रात पण त्याहीपेक्षा खूप जास्त जाहिराती समाजमाध्यमांवर फिरताहेत. आयत्या खाण्याची पंढरी असलेल्या आमच्या पुण्यात तर प्रत्येक लहानमोठ्या खाऊच्या दुकानात बारा महिने उपलब्ध असतेच. पुरणपोळीला मात्र होळीसाठी सध्या जास्त उठाव आहे!! महाराष्ट्राच्या खाद्यपरंपरेत पुरणपोळीला सम्राज्ञीची उपमा दिली तरी ती वावगी ठरणार नाही!! विदर्भापासून कोकणापर्यंत व पश्चिम महाराष्ट्रापासून खान्देशापर्यंत प्रत्येकच प्रांतात थोड्याफार फरकाने बनत असली तरी पुरणाच्या पोळीशिवाय सणसमारंभ अपुरेच राहतात हे नक्की!!
तसं बघितलं नं तर पुरणपोळी बनवणं हाच एक उत्सव असतो. पिवळीधम्मक टपोरी हरभर्‍याची डाळ नजरेखालून गेली एकदा की दोन तीनदा धुवून भरपूर पाण्यात घालून शिजवली जाते. मऊ शिजलेली डाळ पुरणयंत्रातून किंवा आजकालच्या सोप्या पद्धतीनुसार मिक्सरमधून वाटली की त्यात समप्रमाणात साखर व एक छोटा गुळाचा खडा घालून पुरण पाकवायला ठेवलं जातं. आधी सर्व साखर पाघळते नी पुरण पातळ होते, आळताना उडणार्‍या पुरणाचे चटके खाल्ल्याशिवाय पर्याय नसतो!! साधारण घट्ट होऊन पुरणाला चमक आली की ते झाले असे समजतात. अर्थात तत्पूर्वी त्यात चव खुलवायला वेलदोड्यांची व जायफळाची पूड घालणं अनिवार्य असतं जणू! पुरण शिजल्याचा हा सुगंध घरभर दरवळला की आपोआपच मनामनांत आनंदाची लकेर पसरते, मरगळ दूर होते. म्हणून तर म्हटले की पुरणपोळी बनवणे हाच एक उत्सव ठरतो!!
पुरणपोळीच्या पारीसाठी कणिक भिजवणे हीपण एक महत्त्वाची पायरी असते. दोनदा चाळून घेतलेल्या कणकेत थोडा मैदा व गार तेलाचं सढळ हाताने मोहन व चवीला मीठ घालून नेहमीच्या पोळ्यांच्या कणकेपेक्षा सैल कणिक भिजवावी लागते. पुरणपोळीची कणिक मुरलेली असेल तर पोळ्या जास्त चांगल्या होतात. कणकेचा लहान गोळा घेऊन हाताने त्याची पारी बनवून त्यात साधारण त्या गोळ्याच्या अडीचपट पुरणाचा गोळा भरून कणकेचे आवरण सगळीकडून नीट लागले की शक्यतो तांदूळपिठीवर हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. पुरण काठापर्यंत पोचले व पोळी एकसारखी लाटली गेली की मध्यम आचेवर तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायची.
साजुक तूप, दूध, नारळाचे दूध, आमरस, खीर अशा विविध पदार्थांबरोबर पुरणपोळी खाल्ली जाते. अर्थात पोळी व पुरणही बनविण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेतच! सगळ्याचा समान धागा म्हणजे आत भरलेला पुरणाचा गोडवा!!
हा अंतरंगीचा ठासून भरलेला गोडवाच पुरणपोळीला सम्राज्ञीपद बहाल करतो, नाही का? मग माणूसपणाच्या आपल्या वाटचालीत आपल्याला समृद्ध व्हायचं असेल, जास्त समाधानी आयुष्य जगायचं असेल तर हा अंतरंगीचा गोडवा आपल्यातही हवाच की!! पुरणपोळीच्या घासाची चव जरी आधी आवरणाची लागली तरी नंतर रेंगाळतो तो पुरणाचा गोडवा तसेच आपल्या बाह्य वर्तणुकीपेक्षा मनामनांवर जास्त परिणामकारक ठरतो हा आतला गोडवा. ओढूनताणून आणलेला किंवा कारणाने दाखवलेला मनाचा गोडवा दुसर्‍याची नाही तर स्वत:चीच फसवणूक करतो. मात्र ताठा, अहंकार वगैरे गोष्टी बाजूला सारून मनाचा मूळ स्वभावच जपता व जोपासता आला ना, तर ती आध्यात्मिकतेची सुरुवातीची व महत्वाची पायरी ठरते. केवळ दाखविण्यासाठी बदललेलं बहिरंग जेवढं फोल ठरतं, तेवढंच मुळातूनच घडलेलं अंतरंग या वाटचालीस सहाय्यभूत ठरतं. मनाला लाभलेला हा गोडवा, इतरांना दिलासा देतोच, पण आपली किल्मिषं तोडतो, जगण्याची जगाकडे बघण्याची नवी उमेद व दृष्टी देतो. मनात निर्मिलेला व जपलेला इतरांप्रतीचा अकृत्रिम स्नेह बहुगुणित होऊन आपल्यावरच यथायोग्य बरसतो हे निश्चित!!
माताजी श्री सारदादेवी म्हणतात, मला आई म्हणून हाक दिली तर लेकराची ती विनंती मी नाकारूच शकत नाही. अंतरंगीच्या विशालतेची, सहृदयतेची व वात्सल्याची ती मूर्ती! तो त्यांचा जसा स्थायीभाव आहे, तसाच काही अंशी जरी आपण बाळगू शकलो तरी नक्कीच समाधानाचा आयाम वाढतच जाईल. थोरामोठ्यांची चरित्र अंगिकारायचीच यासाठी असतात की आपापल्या कुवतीनुसार, वकुबानुसार आपण त्यांच्यातले सद्गुण आत्मसात करू शकतो. पुरणाच्या पोळीसारखं बाह्यरूप थोडसं डागाळलेलं असलं तरी आतल्या गोडव्यामुळे जशी ती सम्राज्ञीपद मिरवते, तसेच आपल्या बाह्य वर्तणुकीपेक्षा मनातल्या संवेदना, सहवेदना, सहिष्णुता अशांसारख्या मधुर प्रवृत्तींमुळेच आपणही स्वत:बरोबरच इतरांच्या मनांना दिलासा देऊ शकतो, ती जिंकूही शकतोच की!
सर्वांना होळी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा, होळी रे होळी… पुरणाची पोळी!!

Previous Post

बाल कलाकार ते प्रमुख नायिका बेबी शकुंतला

Next Post

अ‍ॅपने केले खाते साफ!

Next Post

अ‍ॅपने केले खाते साफ!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.