प्रबोधनकारांच्या पत्नी मातोश्री रमाबाईंनी दोष दिला, तो त्यांना सन्मानासारखा वाटला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा तो सन्मानच होता. जनजागृतीच्या लढाईत सर्वोच्च शौर्य आणि त्यागाचं दर्शन त्यांच्या या कृतीने दाखवलं होतं. यात काही व्यवहार नव्हता. स्वार्थ नव्हता. ही सारी तळमळ अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी होती.
– – –
शनिमाहात्म्य या ग्रंथात प्रबोधनकारांनी लिहिलंय तसं पाडळीतल्या कूपर कारखान्यात धोरणी भांडवलशाही आणि तापट ठाकरे यांच्यातल्या घटस्फोटाची बोंब प्रथम कोणी मारावी, एवढाच प्रश्न उरला होता. प्रबोधनकार आणि कर्मवीर ही जोडी फोडून प्रबोधनकारांना सातार्यातून घालवलं तरच आपल्याला नांगराच्या कारखान्यातून फायदा उकळता येईल, अशी खूणगाठ धनजीशेठ कूपर आणि त्यांच्या भागीदारांनी बांधली होती. तिथे प्रबोधनकारही विश्वासघातामुळे निराश झाले होते. कर्मवीर अण्णा बहुदा कारखाना सोडून गेले होते. त्यामुळे आज ना उद्या प्रबोधनकारांना कूपरच्या कारखान्यात मांडलेला संसार मोडून जावंच लागणार होतं. त्यासाठी एक निमित्त झालं, बापूसाहेब चित्रे यांनी पुण्यात विकत घेतलेल्या छापखान्याचं.
रामचंद्र वामन उर्फ बापूसाहेब चित्रे हे प्रबोधनकारांच्या तालमीत तयार झाले होते. दादरला स्वाध्यायश्रमातून प्रेरणा घेऊन जे सीकेपी तरुण सामाजिक जीवनात उत्साहाने धडपड करत होते, त्यात बापूसाहेबांचं नाव आघाडीवर होतं. प्रबोधनकारांनी दादर सोडून सातार्याला बिर्हाड नेल्यानंतर स्वाध्यायाश्रमातले तरुण स्वाभाविकपणे प्रबोधनकारांच्या फारशा संपर्कात राहिले नाहीत. मात्र त्यांच्यापैकी भा. र. कद्रेकर आणि दत्तोपंत देशमुख हे छापखान्यातले सहकारी म्हणून सातार्याला गेले. त्यांच्यासोबतच प्रबोधनची निष्ठापूर्वक साथ दिली ती बापूसाहेबांनी.
ते मूळ कल्याणचे असावेत, कारण पुढे २८ मे १९२६ रोजी त्यांचा तिथेच मृत्यू झाला. प्रबोधनकार सातार्याला गेले, तेव्हा मात्र ते पुण्यात एलएलबी करत होते. पण प्रबोधनच्या कामातल्या मदतीसाठी ते महिन्यातून दोनदा न चुकता सातारा रोडला येत. प्रुफ तपासणं, मांडणी यात तर ते लक्ष घालतंच. पण काही मजकूर स्वत:ही लिहित. ‘प्रबोधन’च्या सुरुवातीपासूनच म्हणजे १९२२पासून ते प्रबोधनकारांना संपादकीय कामात मदत करत आले होते, तेही कोणता फायद्याचा विचार न करता केवळ स्वयंसेवक म्हणून.
‘प्रबोधन’मध्ये बापूसाहेबांचे विचार करण्यासारखे विचार, स्फुट लेख तसंच कलमबहाद्दरांस शेलापागोटे या सदरांत काही पुस्तक परीक्षणं असं लिखाण छापून आलं होतं. पण त्यांचा ठसा उमटला तो हिंदूजनांचा र्हास आणि अध:पात या अनुवादाने. पाटणा येथील इतिहासकार बॅ. एस. सी. मुखर्जी यांच्या डिक्लाइन अँड फॉल ऑफ हिंदूज या पुस्तकाचं त्यांनी केलेलं हे भाषांतर ‘प्रबोधन’मध्ये क्रमश: प्रसिद्ध होत होतं. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे अपूर्ण राहिलेलं हे पुस्तक पुढे प्रबोधनकारांनी पूर्ण केलं. बापूसाहेबांचा बंगाली भाषेचा उत्तम अभ्यास आणि वाचन होतं. त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रा या काव्यनाटिकेचा मराठीत अनुवाद केला होता. तो प्रबोधनकारांनीच ‘चित्रांगदा’ नावाने प्रकाशित केला. प्रबोधनकार दादरहून सातार्याला गेल्यानंतर मुंबईतून बापूसाहेबांनीच ‘प्रबोधन’चे चार अंक नीट प्रकाशित केले. प्रबोधनकार लिहितात, बापूसाहेब म्हणजे एक प्रेमळ मित्र, उमेदी लेखक, मनमिळाऊ व्यवस्थापक, उत्तम मुद्देसूद वक्ता आणि अक्षरश: सभ्य असा तरुण गृहस्थ.
जुलै १९२६च्या ‘प्रबोधन’मध्ये प्रबोधनकारांनी बापूसाहेबांवर श्रद्धांजलीपर टिपण लिहिलं आहे. त्यात त्यांनी बापूसाहेबांचं ‘प्रबोधन’मधील योगदानाविषयी लिहिलं आहे, एखाद्या कार्याची धुरा आत्मस्फूर्तीने शिरावर घेणारा समानधर्मी सहकारी मित्र लाभणे, ही गोष्ट वर्तमानकाळी कठीण आहे. निदान, आमच्या प्रबोधन कार्यापुरतेच म्हणावयाचे तर अक्षरश: अशक्य आहे. प्रबोधन मुद्रणालयाच्या स्थापनेला व सुरुवातीलाच त्यावर आलेल्या भटी गंडांतरांना ताड देऊन त्याच्या जोपासनेला जर कोणाची शांत, विचारी, धीरोदात्त आणि सहनशील वृत्ती खर्ची पडली असेल, तर ती एकट्या बापूसाहेबांचीच. व्यावहारिक बाबतीत आमच्या दोषांची स्थळे बापूसाहेबांनी आपल्या गुणांनी भरून काढलेली असत. असं असलं तरी ते अगदी मनाने अगदी सरळ होते आणि छक्केपंजे त्यांच्या स्वप्नीही नसत, असंही प्रबोधनकारांनी नोंदवलेलं आहे.
त्यांच्या या साधेपणाचा पुण्यातल्या एका भामट्याने गैरफायदा घेतला. बापूसाहेब पुण्यात रमले होते. मॅट्रिकमध्ये असल्यापासूनच ते श्री. म. माटे यांच्यासोबत अस्पृश्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी जात असत. अस्पृश्योद्धाराच्या प्रत्येक चळवळीत ते आघाडीवर असत. अस्पृश्यांच्या गणेशोत्सवामध्येही ते धावपळ करत. या सामाजिक कामांमुळे त्यांच्या पुण्यात अनेक ओळखी होत्या. या ओळखींमधून एक भामटा छापखानेवाला त्यांना भेटला. छापखान्यावर परतफेड करण्याच्या पलीकडे कर्ज झालं होतं. सावकारांनी त्यावर कायदेशीर कारवाई केली होती. त्यामुळे त्यावर कधी जप्ती येईल, याची त्याला भीती वाटत होती. अशावेळेस त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला एकच मार्ग दिसत होता, त्याचं नाव बदलून नव्या मालकाचा म्हणून दाखवणं. त्याने बापूसाहेबांना त्याच्या कारस्थानासाठी तयार केलं, नाव बदला, डिक्लरेशन करा, नवीन पाटी लावा, जे उत्पन्न येईल, त्यातलं १२ टक्के तुमचं आणि ४ टक्के माझं. पण कर्ज असल्यामुळे सगळा व्यवहार गुपचूप करावा लागेल.
बापूसाहेब सातार्यात नियमित जात असल्यामुळे त्यांना माहीत होतं की प्रबोधनकार आणि धनजीशेठचं कधीही फाटू शकतं. त्यामुळे एखादा तयार छापखाना मिळत असेल तर उत्तम. ‘प्रबोधन’ला स्वत:चा कारखाना असायला पाहिजे, या सदिच्छेने त्यांनी पुण्यातल्या भामट्याचा छापखाना ताब्यात घेण्याचा प्रस्ताव प्रबोधनकारांसमोर ठेवला. बापूसाहेब त्या भामट्या छापखानेवाल्याला घेऊन पाडळीला आले. प्रबोधनकार त्याचा उल्लेख गायतोंड्या भट असा करतात. हा छापखानेवाला ज्या दिवशी पाडळीला आला, त्याच दिवशी प्रबोधनकारांची सहा महिन्यांची मुलगी समर ही डायरियाने अचानक मृत्यू पावली. प्रबोधनकार सांगतात, भवितव्याच्या छाया आधीच पडत असतात म्हणतात. तोच अनुभव या पुणेरी भामट्याच्या जंजाळात अडकून मला भोगावा लागला.
समर हिच्या अंत्यविधीचा प्रसंग प्रबोधनकारांनी ‘शनिमाहात्म्य’मधे सांगितला आहे. तो वाचताना अंगावर काटा उभा राहतो. आपल्या कर्तव्याविषयी पराकोटीची बांधिकली या प्रसंगातून दिसते. हा प्रसंग त्यांच्या शब्दातच वाचायला हवा. तो असा, `त्या अपत्याला मातीआड दृष्टीआड करण्यासाठी त्याच्या समाधीवर दगड ठेवीत असतानाच मी त्या पुणेरी दगडाबरोबरच दगडाची छाती करून, छापखाना खरेदीच्या पाटावरवंट्याची वाटाघाट करीत होतो. या प्रसंगी अपत्यशोकाने विदीर्णहृदय झालेल्या माझ्या सहधर्मचारिणीने `प्रबोधनापुढे पोटच्या गोळ्याचीसुद्धा यांना तिडीक येत नाही, हे काढलेले उद्गार मी वत्सलांछनाप्रमाणे माझ्या हृदयावर आमरण धारण केलेले आहेत. हाच माझा व्हिक्टोरिया क्रॉस. यात माझी सत्वपरीक्षा झाली. तत्वपरीक्षा पार पडली. सुख दु:ख, प्रेम, आदर आणि कर्तव्य यांचा हा संमिश्र विजय होता.’
मराठी पत्रकारितेच्या इतिहासात आवर्जून नोंदवावी लागेल अशी ही एका महान संपादकाची थोरवी सांगणारी घटना होती. आज आपल्या सात पिढ्यांची पोटं भरून ठेवण्यासाठी पत्रकारिता केली जाते. त्या पार्श्वभूमीवर आपल्या पोटच्या मुलीच्या मृत्यूचं दु:ख बाजूला ठेवून प्रबोधन जगवण्यासाठी धडपडणार्या संपादकाची थोरवी उजळून निघते. त्यांच्यासाठी ‘प्रबोधन’समोर इतर कशालाच किंमत नव्हती. ना संसाराला ना पद प्रतिष्ठा संपत्तीला. सर्वस्व पणाला लावून निखार्यांवर चालत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला होता. त्यातच त्यांचा सर्वोच्च आनंद होता. असे प्रसंग फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या पत्रकारितेच्या इतिहासातही दुर्मिळ असतील.
त्या प्रसंगी प्रबोधनकारांच्या पत्नी मातोश्री रमाबाईंनी दोष दिला, तो प्रबोधनकारांना मागे वळून पाहताना सन्मानासारखा वाटला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा तो सन्मानच होता. व्हिक्टोरिया क्रॉससारखा सन्मान. व्हिक्टोरिया क्रॉस हा त्या काळातला ब्रिटिश सैन्यामधला सर्वोच्च सन्मान होता. आताच्या परमवीर चक्रासारखा. जनजागृतीच्या लढाईत सर्वोच्च शौर्य आणि त्यागाचं दर्शन त्यांच्या या कृतीने दाखवलं होतं. यात काही व्यवहार नव्हता. स्वार्थ नव्हता. ही सारी तळमळ अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी होती. नाडल्या जाणार्या साध्या माणसांचं भलं करण्याच्या निरपेक्ष हेतूने होती. प्रबोधनकार या सत्त्वपरीक्षेतून आणि तत्त्वपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर आले होते. पण याचा अर्थ असा नव्हता की पुढे सत्वपरीक्षा होणारच नव्हत्या.
पाडळीच्या भेटीवर आलेल्या भामट्या छापखानावाल्याने प्रबोधनकारांसमोर प्रस्ताव ठेवला, छापखाना चालू आहे. कामे तर नेहमी येतच असतात. कम्युनिस्ट निंबकरांचा साप्ताहिक स्वदेशी माझ्याकडेच छापला जात असतो. छापखाना सर्व साहित्याने सज्ज आहे. चार सहा महिने चालवून पहा. तेवढ्यापुरती माझ्या घरखर्चाची व्यवस्था मी केलेली आहे. धंद्यात जसा हात चालेल, तसे दर महिना माझ्या संसारखर्चाला थोडेफार देत जा, म्हणजे झाले. भाड्याविषयी मी (मोरोबादादाच्या) वाड्याच्या मालकाची समजूत घातली आहे. ते तुम्हाला तुमच्या नावाने बिनशर्थ पावती देत जातील.
गायतोंड्या भामट्याच्या या प्रस्तावावर प्रबोधनकारांनी सगळ्या सहकार्यांची मतं घेतली. त्यात बापूसाहेब अर्थातच होते. पण कर्मवीर भाऊराव पाटील, प्रो. समर्थही. दत्तोपंत देशमुख, भा. र. कद्रेकर अशा सगळ्यांसोबत दोन दिवस चर्चा चालल्या. सगळ्यांनी छापखाना ताब्यात घेण्याचाच सल्ला दिला. कर्मवीर अण्णा म्हणाले, एवीतेवी आज ना उद्या तुम्हाला सातारा रोड सोडावाच लागणार. जी तुमची वाट तीच माझी. तेव्हा छापखान्यासारखे प्रचाराचे हुकमी साधन आपणहून चालत आले आहे. ते सोडू नका. ठरलं, प्रबोधन मुद्रणालय पुण्यात सुरू करायचं. प्रबोधनकारांच्या शब्दात सांगायचं तर माझं नाव आणि बापूसाहेबांचं गाव अशा सोयीस्कर अटीवर सर्व जबाबदारी घेऊन बापूसाहेबांनी आयता चालू छापखाना ताब्यात घेतला. प्रबोधनकारांनी ‘प्रबोधन’च्या शिल्लक फंडातून तात्पुरती रकमेची व्यवस्था करून त्यांचे सातार्यातले मित्र सराफ नारायण बळवंत वाळेवकर यांच्या मार्फत पैशाची व्यवस्था केली. आणि पुण्यात प्रबोधन मुद्रणालय सुरू झालं.