एकेकाळी साधनशुचिता मानणार्या, चारित्र्य जपणार्या आणि सत्तेची, मत्तेची लालसा न धरता एका ध्येयासाठी प्रामाणिकपणे निरलसपणे प्रयत्न करणार्या सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष असलेली भारतीय जनता पक्ष आता अव्वल सोंगाड्यांचा पक्ष बनून बसला आहे. रोज नवी सोंगे आणि रोज नवी ढोंगे. आपण धर्माची, द्वेषाची अफू पाजली की जनता आपल्या सगळ्या सोंगांना भुलते, याने या पक्षाचे गर्वाचे घर वर वर चढत गेले आहे. त्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा जिंकल्यामुळे तर अधिकच चेव आलेला आहे. साहजिकच आता नवे स्फुरण घेऊन हा पक्ष सगळीकडे नवनवीन सोंगे रचायला सज्ज झालेला आहे.
मुळात विधानसभा विजय ज्या ठिकाणी मिळवले, त्या ठिकाणी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा या पक्षाने आधीच मिळवल्या आहेत. त्यात आगामी निवडणुकीत भर पडण्याची शक्यता नाही, त्या सगळ्या राखून किंवा दोनपाच जास्त जिंकूनही उपयोग नाही. त्यामुळे ते नुकसान भरून काढण्यासाठी ज्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, त्यातले एक आहे महाराष्ट्र राज्य. अच्छे दिनची स्वप्नं दाखवून जनतेला महागाईच्या रौरवात ढकलून देणार्या केंद्र सरकारने जनकल्याणाचे काय अप्रतिम दिवे लावले आहेत, असे ढोंग रचणारे रथ देशात सगळीकडे फिरवले जात आहेत. ‘आपला संकल्प, विकसित भारत’ अशी फसवी टॅगलाइन घेऊन फिरणार्या या रथाला नाशकातल्या येवल्यात नागरिकांच्या संतापाला तोंड द्यायला लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताना शेतकर्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं गाजर दाखवलं होतं. प्रत्यक्षात त्यांची सगळी धोरणं शेतकरीविरोधी आणि व्यापारीस्नेही आहेत, शहरांमधल्या मतपेढ्या कायम राखण्यासाठी कांद्यावर निर्यातबंदी, हमीभाव यांची हत्यारं वापरून शेतकर्यांचं नुकसानच केलं गेलं आहे. हा रथ कोटमगावात गेला तेव्हा खोटी आश्वासनं देणार्यांची तोंडं टीव्हीवर पाहून कंटाळलो आहोत, असं नागरिकांनी सांगितलं. उत्पन्न दुप्पट करून देण्याऐवजी आम्हाला भिकेला लावलं, असा रोषही त्यांनी व्यक्त केला. लोकांची इतकी काळजी असेल, तर पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या किंमती निम्म्यावर आणा, असं सांगून कोटमगावच्या महिलांनी रथ पिटाळून लावला. तो पुन्हा रस्त्यावर आणण्याची हिंमत एवढ्यात केली जाणार नाही.
दुसरीकडे भाजपचा अभेद्य गड वगैरे मानले जाणार्या पुण्यात अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या नावाखाली धार्मिक भावना चेतवून मतपेढी सुरक्षित करण्याचा प्रयत्न सजग पुणेकरांनी उधळून लावला. कधी काळी या मंदिरासाठी विटा गोळा करणार्या सत्ताधारी परिवाराने आता ‘राम के नाम दो धागे’ (पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतही या उपक्रमाचं मराठी नामकरण करण्याची सद्बुद्धी प्रभू श्रीरामचंद्राने आयोजकांना दिली नाही बहुतेक) हा नवा खेळ गावोगाव चालवण्याचे घाटले आहे. अयोध्येच्या मंदिरातल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्यात आपलाही दोन धाग्याचा हातभार लागला अशी, रामसेतूच्या कथेतील खारुताईच्या मनात आली असेल तशी, सार्थकतेची भावना लोकांच्या मनात जागवायची आणि हे सगळं आमच्यामुळे घडलं, आता आम्हाला पुन्हा निवडून द्या, हे लोकांच्या मनावर बिंबवायचं, अशी ही चतुर कल्पना. त्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार होत्या. पण या कार्यक्रमातल्या ९० टक्क्यांहून अधिक खुर्च्या रिकाम्या पाहून त्याही नाराज होऊन निघून गेल्या.
ही केवळ दोन उदाहरणं आहेत. पण त्यातून महाराष्ट्रातलं वातावरण काय आहे, इथे सोंगाढोगाचा बाजार उठल्यात जमा आहे, याचा अंदाज बेकायदा सत्तेत बसलेल्यांना यायला हरकत नाही. कारण, महाशक्तीच्या अनैतिक बलप्रयोगातून उदयाला आलेल्या तीन तिघाडा, काम बिघाडा आघाडीने राज्याचा पुरता चोथा करून ठेवला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा भयंकर घोळ घातला गेला आहे. संविधानाच्या चौकटीत हे आरक्षण बसवून देण्याचं काम फक्त संसदेतच होऊ शकतं, हे सर्वांना माहिती आहे. केंद्रात बहुमत असलेलं भाजपचं सरकार ते करत नाही, इथले ढोंगी कळवळा दाखवणारे तिन्ही सत्ताधीश ‘मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर आम्ही पायउतार होतो’ अशी बाणेदार भूमिका घेत नाहीत. फक्त लाखालाखांच्या सभा, टणत्कार, घणाघात, आरोप, प्रत्यारोप, एकमेकांना एकेरी भाषेत संबोधून ललकार्या, वेगवेगळ्या समाजांना चिथावण्या असे लक्ष विचलित करण्याचे उपक्रम सुरू आहेत. मध्येच एखाद्या नवाब मलिकांना पावन करून घेतल्यावर शेजारी बसणार्या दुसर्या हाफला जी गोष्ट कानात सांगता येणं शक्य आहे, ती पत्र लिहून आणि ते भाट माध्यमांकडे पाठवून सांगितलं जात आहे. वर पुन्हा आव नैतिकतेचा. सत्ता काय येते जाते, देशहित महत्त्वाचं, असा सुविचारही हेच शिकवणार.
सर्वांना काही काळ मूर्ख बनवता येतं, काहींना सर्व काळ मूर्ख बनवता येतं, पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही, हे केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्ताधार्यांना वेळेत लक्षात आले तर त्यातच त्यांचे हित आहे. घरात पोळी आणि बाहेर नळी ओरपणार्या साळसूदांची आळीमिळी फार काळ टिकणार नाही. मग सगळेच अवघड होईल.