प्रबोधनकारांचं वय तेव्हा चोवीस पंचवीसच्या दरम्यान होतं. नाटक कंपनीतले त्यांचे सहकारी त्यांचं लग्न जमवायचा घाट घालत होते. पण मुलगी बघण्याचा कार्यक्रम करणार नसल्याच्या निर्णयावर प्रबोधनकार ठाम होते. त्यांनी एकदा तर एका अशा कार्यक्रमाची योजना उधळूनही लावली.
—
लग्नासाठी मुलगी बघायचा कार्यक्रम करणार नाही, ही प्रबोधनकारांची लग्नाविषयीची एक मुख्य अट होती. त्या काळात लग्न याच एका पद्धतीने होत असत. त्यामुळे असा पण प्रत्यक्षात आणणं कठीणच होतं. पण ते प्रबोधनकार होते, त्यांचं तर ठरलं होतं. मुलीला एका वस्तूसारखं पाहणं त्यांना मान्य नव्हतं. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. ते असं, `मुली पाहण्यास जाण्याच्या प्रघाताविषयी तर मला समजू लागल्यापासून विलक्षण चीड. बायकापुरुषांचे तांडे मुलीला पहायला येतात, म्हणजे काय पहातात? त्या काळचे ते पहाणारेही असे निर्लज्ज नि निगर्गट्ट असायचे की तेरातेरा चौदाचौदा ठिकाणी पाहण्याचा विक्रम करून अखेर `यंदा कर्तव्य नाही’चा उलट निरोप धाडायला त्यांना लवमात्र लाजशरम वाटायची नाही. असले प्रकार लग्नसराईच्या सुमाराला शेकड्यांनी घडायचे.’
मुलगी बघण्याच्या कार्यक्रमातल्या निर्लज्जपणाची दोन उदाहरणं प्रबोधनकारांनी दिली आहेत. एका मुलीचा पंधरापेक्षा जास्त वेळा बघण्याचा कार्यक्रम झाला होता. मुलगी रूपवान होती. शिक्षणही चांगलं झालं होतं. बाप हुंडा द्यायलाही तयार होता. प्रबोधनकारांनी तिच्या बघण्याचा कार्यक्रमाचं वर्णन परीक्षेचा तोंडी पेपर असं केलंय. त्या पेपराची प्रश्नोत्तरं संवादरूपातही दिलीत. ती त्यांच्याच शब्दांत वाचायला हवीत.
‘शहाणे : मुली, तुला सूप करता येतो का?
मुलगी : (अनेक प्रश्नांमुळे आधीच चिडलेली) सूप करता येतं, रवळ्या, टोपल्या, हारे काय म्हणाल ते करता येतं. तुम्हाला आता काय हवंय?
एवढा जवाब ऐकताच हे गाडे आपल्याला जुमानणार नाही, याची खात्री पटताच परीक्षक बृहस्पती फरारी झाले.’
असं उदाहरण देऊन प्रबोधनकार विचारतात, फक्त मुलीची परीक्षा का? तिलाच का प्रश्न विचारले जातात? मुलाची परीक्षा मात्र घेतली जात नाही. हे असं का? मुलीकडच्यांनाही मुलाची मुलीसारखीच परीक्षा घेण्याचा अधिकार असायला हवा. प्रबोधनकारांचे प्रश्न काळाच्या खूप पुढचे होते. आज आपल्या समाजातल्या शहाण्या घरांमध्येच मुलाबरोबर मुलीची पसंती आणि तिची मतंही लक्षात घेतली जातात. पण सर्वत्र तशी परिस्थिती नाही. प्रश्न अजूनही मुलाकडचीच विचारतात आणि परीक्षा ही मुलीलाच द्यावी लागते. याचंच आणखी एक उदाहरण त्यांनी दिलं आहे.
प्रबोधनकार दादरच्या मिरांडाच्या चाळीत राहत असताना त्याच चाळीत हजरनीस नावाचा एक तरूण राहत होता. तो नीट बोलता न येणारा म्हणजे प्रबोधनकारांच्या भाषेत गेंगाण्या होता. एकदा तो झकपक कपडे घालून बाहेर जाताना दिसला. प्रबोधनकारांनी विचारलं, इतके तयार होऊन कुठे चालतात? त्यावर मुलगी बघायला जातोय, असं उत्तर देऊन तो निघून गेला. संध्याकाळी हजरनीस भेटताच त्याला प्रबोधनकारांनी पुन्हा विचारलं, काय, जमलं का लग्न? उत्तरादाखल गेंगाण्या आवाजात त्याने उत्तर दिलं, फिसकटलं. कारण काय तर ती मुलगी गेंगाणी होती. स्वतः गेंगाणा असूनही तो गेंगाण्या मुलीला नाकारतो कसा, असा प्रबोधनकारांचा प्रश्न होता. तेच तो मुलगा असता तर सुदृढ आहे, कमावता आहे, बस्स झालं. गेंगाण्या असला म्हणून काय झालं, असं विचारलं गेलं असतं. पण मुलीच्या बाबतीत मात्र हाच तर्क कुणी लावण्यास तयार नसायचं. आजही नसतं.
प्रबोधनकारांची लग्नाच्या बाबतीतली धाडसी मतं माहीत असूनही त्यांचं लग्न जमवण्याच्या खटपटी त्यांचे नाटक कंपनीतले सहकारी करतच होते. स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीचा मुक्काम तेव्हा अमरावतीला होता. दामले नावाचे एक मामलतदार आणि वर्हाडच्या कमिशनर ऑफिसमधले हेडक्लार्क केशवराव असे दोघेजण रोज कंपनीत यायचे. ते आले की थोडा वेळ का होईना, पण प्रबोधनकारांच्या खोलीतही यायचे. नाटक कंपनीत असूनही लेख लिहिणं, वर्तमानपत्रांना बातम्या पाठवणं, देशविदेशातल्या घटनांविषयी चर्चा करणं असं नाटक कंपनीतल्या वातावरणाला न शोभेसं बरंच काही त्या खोलीत सुरू असायचं. त्यामुळे त्या दोघांवर प्रबोधनकारांचा प्रभाव पडला होता. त्यांनी सहज बोलता बोलता प्रबोधनकारांची कौटुंबिक माहितीही काढून घेतली. आर्थिक परिस्थिती समजून घेतली.
ही खटपट करत होते एका सीकेपी समाजातल्या निवृत्त मामलेदारांच्या मुलीच्या स्थळासाठी. मामलेदारांना एकुलती एक मुलगी होती. त्यात शिकलेली आणि रूपवान. सरकारी नोकरीतून त्यांनी पुंजीही चांगली गोळा केली होती. एखादा गरीब मुलगा बघून त्याला घरजावई करून घेण्याची त्यांची इच्छा होती. प्रबोधनकारांच्या घरच्या गरिबीमुळे ते तयार होतील, असं दामले आणि केशवराव या जोडगोळीला वाटलं होतं. प्रबोधनकार मुलगी बघायला तयार होणार नाहीत, हे त्यांना माहीत होतं. पण मुलगी एकदा बघितली की ती पसंत पडेल याविषयीही त्यांना खात्री होती. शिवाय योगायोगाने एखादी मुलगी दिसली तर एखादं कारण काढून नकार देणार नाही, हा प्रबोधनकारांचा विचारही त्यांना माहीत होता. विशेष म्हणजे निवृत्त मामलेदारांनाही हा मुलगा पसंत हाेता.
त्यामुळे आता हे सगळं कसं जुळवून आणायचं, असा प्रश्न होता. त्यासाठी फक्त जोडगोळीच नाही, तर अख्खी नाटक कंपनी कामाला लागली. जनुभाऊ निंबकर आणि मॅनेजर म्हैसकर या कंपनीच्या धुरिणांनीच त्यात पुढाकार घेतला. तेव्हा दौर्यावर आलेल्या नाटक मंडळींना घरी जेवणाला किंवा पार्टीला बोलवण्याचा प्रघात होता. किमान घरगुती फराळाला तरी बोलावलं जाई. त्यानुसार एका दिवशी निवृत्त मामलेदारांनी दुपारच्या फराळाचं निमंत्रण दिलं. मॅनेजरनी फर्मान काढलं, अमुक तमुक यांच्याकडे सगळ्यांनी फराळाला जायचं आहे. मुलगी दिसली की नकार द्यायचा नाही, या प्रबोधनकारांच्या पणामुळे आपला कट यशस्वी होणार याची सगळ्यांना खात्रीही होती. पण अचानक हे बिंग फुटलं.
प्रबोधनकार ज्याच्याबरोबर कोल्हापुरात स्वदेशहितचिंतकात आले तो छोटा किशा काशीकर त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, `काय ठाकरे मामा, आज मामी बघायला जाणार ना?’ प्रबोधनकार चपापले. त्यांनी किशाकडून सगळं काढून घेतलं. किशानेही निरागसपणे सगळं सांगितलं. हुंडा घेऊन घरजावई कुणीही मिळेल, त्यासाठी मीच कशाला? आपण ठरवल्याप्रमाणे गरिबाघरची मुलगीच करायची, यावर त्यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. तसा विचार करून प्रबोधनकारांनी मुक्कामातून पोबारा केला. सदर्याआड टोपी लपवून मी गुपचूप बाहेर पडलो, हे प्रबोधनकारांचं वर्णन ऐकून आपल्याला आज गंमत वाटते. बाहेर जायचं म्हणजे डोक्यावर टोपी असायला हवी, असा तेव्हा प्रघात होता. त्यामुळे टोपी घेतली म्हणजे पुरुष घराबाहेर निघाला, असा अर्थ व्हायचा. आज टोपी नाही आणि तो संकेतही नाही. बाहेर पडल्यावर लपायचं कुठे असा प्रश्न होता. त्यांना शहरातलाच पण थोडा दूरचा एकजण आठवला. प्रबोधनकार दुपारच्या उन्हात त्याच्याकडे गेले. अशा अवेळी हा पाहुणा बघून त्याला आश्चर्य वाटलं. पण दोघे गप्पा मारत बसले. येण्याचं खरं कारण काही प्रबोधनकारांनी सांगितलं नाही.
प्रबोधनकार गायब झाल्याचं बघून जनुभाऊ आणि म्हैसकर संतापले. पण त्यांच्या हातात काही नव्हतंच. ते मामलेदाराकडे फराळाला गेले आणि संध्याकाळी परत आले. प्रबोधनकारही त्याच सुमारास मुक्कामाच्या ठिकाणी परतत होते. जनुभाऊंनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, `काय हो, हा घोटाळा का केलात? दुपारच्या उन्हात कुठे गेला होतात?’ त्यावर प्रबोधनकारांनी खुलासा केला की मला कुणाचंही घरजावई व्हायचं नाही. सुखवस्तू घरातली मुलगी करायची नाही. मामलेदाराकडे रग्गड पैसा आहे. तो हुंडा देऊन कोणाही लग्नाळू मुलाला विकत घेईल. मला सासर्याच्या जिवावर माझ्या कुटुंबाला सुखी करण्याची इच्छा नाही. हे स्वाभिमानी उत्तर ऐकून फक्त जनुभाऊ आणि म्हैसकरच नाही तर दामले-केशवराव ही जोडगोळीही समाधानी झाली. सगळ्यांनी प्रबोधनकारांना शाबासकी दिली. त्यामुळे प्रबोधनकारांविषयी सगळ्यांचा मनात आदर वाढला. पण झाल्या प्रकाराने प्रबोधनकारांचं लग्न जमवण्याचे प्रयत्न मागे पडले नाहीत. उलट त्यांच्या अटीशर्तींनुसार मुलगी शोधण्यासाठी खटपटी सुरू झाल्या.
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)