(विशेष सूचना : प्रिय वाचक, ‘मार्मिक’चा यानंतरचा अंक दिवाळी अंक असल्यामुळे या आठवड्यात पुढच्या १५ दिवसांचे भविष्य देण्यात आले आहे. पुढील संपूर्ण वर्षाचे सविस्तर भविष्य दिवाळी अंकात वाचायला मिळेल, ते चुकवू नका.)
अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, बुध (वक्री), मंगळ (अस्त) कन्येत, रवी तुलनेत, केतू-शुक्र वृश्चिकेत, प्लूटो-शनी गुरू (वक्री) मकरेत, १९ ऑक्टोबरनंतर गुरू मार्गी मकरेत, चंद्र-नेपच्यून कुंभेत, २२ ऑक्टोबरपासून तुळेत.
दिनविशेष – १९ आणि २० ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा, २४ ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी, २८ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग सकाळी ९.४०च्या पुढे दिवसभर.
—-
मेष – काही ना काही कारणामुळे मानसिक स्वस्थता बिघडू शकते. महिनाअखेरीस आणि पुढील महिन्यात येणार्या सणासुदीच्या काळात तणाव जाणवेल. राशीस्वामी मंगळ अस्त असून षष्ठात आहे. रवी आणि बुधाची युती आहे, त्यामुळे विपरीत परिस्थतीचा सामना करावा लागू शकतो. सप्तमेश शुक्र-केतू युतीमुळे कुटुंबाबरोबर संवादांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती जाणवेल. विविध प्रकारच्या घटनांमुळे पुढील १५ दिवस कटकटीचे जातील. त्यातच आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढू शकतात. त्यामुळे डोके शांत ठेवून काम करा. तुमचा स्वभाव भिडस्त असल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सहजपणे सामोरे जाऊन त्यामधून यशस्वीपणे मार्ग काढाल. एखादे सरकारी काम अडकले असल्यास तेथे काही गोष्टींमुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी कायदेविषयक समस्या निर्माण होऊ शकते. परिस्थितीला धीराने तोंड द्या. भाऊबंदकी संभवते. त्यामुळे नैराश्य येईल.
वृषभ – येत्या आठवड्यात स्वभाव थोडा गर्विष्ठ बनेल. त्यात जर कुणाला सल्ला देण्याचे धाडस केले तर ते अंगाशी येऊ शकेल. राशीस्वामी शुक्राचे सप्तमातील केतूबरोबरचे भ्रमण तुम्हाला अंतर्मुख बनवेल. पंचमात मंगळ, सप्तमात वृश्चिकेचा शुक्र अशी स्थिती आहे. रसिक स्वभावामुळे कोणत्याही व्यसनात अडकू नका. विद्यार्थीवर्गासाठी रवि-बुधादित्य योग गौरवप्राप्तीचा राहील. कोजागिरी पौर्णिमेला होणार चंद्र-मंगळ संसप्तक योग आणि राशी स्वामी शुक्र-केतू बरोबरच नवपंचम योग अनपेक्षित लाभाचा राहील. आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींना नवरात्रीत केलेल्या उपासामुळे विलक्षण अनुभव येतील. समाजसेवक, विश्वस्त मंडळी सामाजिक कार्यक्रमात सहभागी होतील, त्यामुळे नावलौकिकात भर पडेल, मानसन्मान मिळतील.
मिथुन – प्रशासकीय सेवेत काम करत असाल तर कामाशी काम ठेवा, मत-विचार कुणासमोर मांडू नका, ते फायद्याचे ठरणार आहे. चतुर्थातील रवी, वक्री बुध आणि अस्त मंगळ यांच्यामुळे थोड्या फार प्रमाणात कौटुंबिक समस्या उभ्या. डोळ्याची समस्या उद्भवू शकते. अष्टमातील शनी, वक्री गुरू, पंचम स्थानावर शनीची दृष्टी त्यामुळे घरात मोठ्या भावासोबत, वडिलांबरोबर हेवेदावे निर्माण होतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर जुळवून घ्यावे लागेल. व्यसनाधीन मित्रांपासून लांब राहा, चुकून एखादी नवीन सवय जडू शकते. कोर्टकचेरीच्या कामात समाधानकारक तोडगा निघेल. कोजागिरी पौर्णिमा आनंददायी जाईल. उद्योग-व्यवसायात समाधानकारक उलाढाल न झाल्यामुळे थोडे त्रस्त राहाल.
कर्क – कोणत्याही कामात मोठे धाडस करण्याअगोदर त्या कामाची पूर्ण माहिती घ्या आणि नंतरच पाऊल टाका. नाहीतर डोक्यावर हात मारायची वेळ येऊ शकते. लाभातील राहू, पंचमस्थानातील केतू-शुक्र यामुळे गरजेपुरता आवश्यक फायदा मिळेल. षष्ठ स्थानावरील मंगळाच्या दृष्टीमुळे एखादी शारीरिक पीडा निर्माण होऊ शकते. सप्तमातील शनी-गुरु-प्लूटोमुळे दाम्पत्यजीवनात चढउतार दिसतील. नोकरीमध्ये प्रमोशन, पगारवाढीबाबतची बातमी कानी पडू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर यश नक्की मिळेल. प्रवासाचे योग आहेत, पण जरा सांभाळून राहा, एखादी वस्तू गहाळ होऊ शकते. अभियांत्रिकी, संगणकक्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी लाभदायी काळ आहे. रवीचे तुळेमधील राश्यांतर कुटुंबाबाबत आपुलकी निर्माण करील. कुटुंबाच्या आवडीनिवडी पूर्ण कराल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह – तुमचा स्वभाव खूप महत्वाकांक्षी आहे. तरी या आठवड्यात तुमच्या बोलण्यावर मर्यादा येतील. काहीतरी बोलून वाईटपणा येईल असे वर्तन करू नका, बोलताना जीभ घसरू देऊ नका, म्हणजे झाले. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. एखादे नवीन काम हातात पडू शकते. षष्ठ भावामध्ये शनी-वक्री गुरू असल्यामुळे महिलावर्गास आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. राशीस्वामी रवीचे तुळेत राश्यांतर होत असल्यामुळे हातात घ्याल त्या कामात यश मिळणार आहे. षष्ठातल्या शनीची दृष्टी रवीवर आहे, त्यामुळे सरकारी क्षेत्रात काम करताना पत जपावी लागेल. नियमाविरुद्ध काम करणे महागात पडू शकते. नातेसंबंध जपा, लोक ओळखा. पचनक्रियेशी संबंधित आजारांचा त्रास असणार्या मंडळींनी चमचमीत खाणे टाळावे.
कन्या – आपल्यात दडलेल्या कलागुणांना आता चांगला वाव मिळणार आहे. राशिस्वामी बुधाची लग्नातील उच्चस्थिती, बुध-गुरू-शनी नवपंचम योग, पंचमातील गुरू-शनी त्यामुळे शिक्षणक्षेत्रात चांगले यश िमळेल. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होईल. दिवाळीच्या सुट्टीत लांबच्या प्रवासाचे योग जुळून येत आहेत. १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सर्दी-पडश्याचा त्रास जाणवेल. वक्री गुरू आणि सुखस्थानावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे कौटुंबिक कलह वाढणार नाही याची खबरदारी घ्या. तृतीय स्थानातील शुक्र-केतूमुळे चंचलता वाढू शकते. त्याचा कामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित तुम्ही द्विधा मन:स्थितीत अडकाल. व्यर्थ गोष्टीत अडकू नका. शत्रुपक्षावर मात कराल. व्यावसायिकांसाठी वृद्धीचा काळ असून त्यामधून चांगले आर्थिक लाभ मिळतील. नवीन जोडधंदा करण्याच्या विचारात असाल तर गो अहेड…
तूळ – या आठवड्यात नावारूपाला याल. एखाद्या कामाच्या निमित्ताने देश-विदेशात प्रवासाचे योग जुळून येत आहेत. या आठवड्यात पैसे खर्च होऊ शकतात. धनस्थानातील शुक्र लाभ मिळवून देईल. मोठे उद्योग-व्यवसाय यांना या काळात घवघवीत यश मिळेल. एखाद्या ठिकाणी नवीन गुंतवणूक कराल. त्यातून भविष्यात चांगले लाभ मिळू शकतात. घरात एखादे शुभकार्य पार पडेल. देवधर्मासंदर्भातील एखादे कार्य सफल होईल. चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह होईल, मात्र त्याच्या जास्त आहारी जाऊ नका. पोटाच्या विकाराला निमंत्रण मिळू शकते. दिवाळी तोंडावर आहे, त्यामुळे घरासाठी नवीन वस्तू घेण्याचे नियोजन कराल.
वृश्चिक – राशीस्वामी मंगळ लाभात असला तरी अस्त झालेला आहे. सोबत रवी आणि बुध हे दोन ग्रह आहेत. त्यामुळे या आठवड्यात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. शुक्राचे वृश्चिक राशीमधील भ्रमण अनावश्यक खर्च वाढवणारे आहे, त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. संततीबाबतच्या अपेक्षांची पूर्ती दृष्टिपथात नसल्याने नाराजीचा सूर राहील. नोकरदार मंडळींना चांगले आर्थिक लाभ होतील. कोजागिरी पौर्णिमा अनपेक्षित लाभाची राहणार आहे. जुने येणे वसूल होईल, त्यामुळे खिशात चांगले पैसे राहतील. दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे योग आहेत, त्याचे नियोजन कराल.
धनू – साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू आहे. धनस्थानातील स्वराशीचा शनी, सोबत वक्री गुरू नीचभंग राजयोगात आहे. त्यामुळे अडकलेले काम गोड बोलून पूर्ण करून घ्या. भागीदारी, व्यवसाय यात अडकून राहिलेले पैसे आता हातात पडतील. उद्योग-व्यवसायाची घडी आता सुधारेल. रवीचे तुळेतील राश्यांतर आणि शनीमुळे होणार नीचभंग राजयोग यामुळे आकस्मिक लाभ मिळतील. उद्दिष्ट पूर्ण होईल. परदेशात हितसंबंधी असतील तर त्यांच्यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. मित्र, नातेवाईक यांना अचानकपणे आर्थिक मदत करावी लागू शकते.
मकर – या काळात नवीन ओळखी होणार असून त्यामधून चांगले लाभ होऊ शकतात. राशीस्वामी शनीचे ११ ऑक्टोबरपासून होणारे मार्गी भ्रमण, गुरु-रवीचा नीचभंग राजयोग यामुळे आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. नवीन वाहन, वस्तू याची खरेदी होऊ शकते. षष्ठेश बुध मंगळाबरोबर त्यामुळे अर्धशिशी असणार्या मंडळींना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. परदेशात शिकणार्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतील. वडिलोपार्जित प्रॉपर्टीसंदर्भात सकारात्मक हालचाली होतील. पोलीस, वित्त, लेखा शाखेत काम करणार्या अधिकार्यांसाठी शुभ काळ आहे. राजकीय व्यक्तींना चांगले पद मिळू शकते.
कुंभ – घरातील व्यक्ती, नातेवाईक यांच्याकडून क्लेशदायक वागणे-बोलणे सहन करावे लागेल. कौटुंबिक वाद आणि खटके उडतील. सुखस्थानातील राहू, दशमातील शुक्र-केतू यामुळे गृहकलह वाढेल, त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. चित्त शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा, नामसंकीर्तनात मन रमवणे फायद्याचे राहील. सरकारी क्षेत्रात काम करणार्या अधिकार्यांनी पदाचा गैरवापर करू नये, अन्यथा वेगळेच संकट अंगावर येऊ शकते. गुरूचे राश्यांतर होईपर्यंत खर्च चालूच राहणार आहेत. उधार-उसनवारी टाळा, बँकेकडून कर्ज घेणे टाळा. कागदी पुराव्यांपासून लांब राहा. कोणालाही काही लिहून देऊ नका अन्यथा भविष्यात मोठ्या अडचणीत फसाल.
मीन – राशीस्वामी गुरूचे लाभातील वक्री भ्रमण, सोबत शनी आहे, त्यामुळे हा पंधरवडा अनपेक्षित लाभाचा राहणार आहे. एकापेक्षा अनेक उद्योग करत असाल तर भरपूर पैसे मिळतील. विवाहेच्छू मंडळींना एखादी शुभवार्ता कानी पडू शकते. नवीन वाहन घेण्याचा विचार सुरू असेल तर त्याला चांगली गती मिळू शकते. कुणाला पैसे देताना दहा वेळा विचार करा आणि नंतरच द्या. नाहीतर अडचणीत सापडाल. आरोग्याच्या छोट्या तक्रारी त्रास देऊ शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा मोठा खर्च येऊ शकतो.