शेखरच्या घराजवळच राहणारा त्याचा मित्र प्रताप शेखरच्या खुनानंतर खचून गेला होता. त्याच रात्री पोलिस त्याच्या घरी आले, तेव्हा त्यानं शेखरबद्दल त्याला असलेली सगळी माहिती दिली होती. त्या वस्तीत तसं म्हटलं तर प्रतापच शेखरच्या सगळ्यात जवळचा माणूस होता. त्या रात्री मात्र तो त्याच्या कंपनीत कामाला गेला होता. “साहेब, मी घरी असतो, तर शेखरला बाहेर जाऊच दिलं नसतं!’’ असं तो अगदी धाय मोकलून रडून पोलिसांना सांगत होता. शेखरचं कधी कुणाशी भांडण झालं होतं का, त्याचं बाहेर काही प्रकरण वगैरे होतं का, हेही पोलिसांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रतापनं तसं काही नसल्याचं सांगितलं.
—-
भारंबे वस्तीत राहणार्या एका तरुणाचा खून झाल्याची माहिती वायरलेसवरून कळल्यानंतर इन्स्पेक्टर सूर्यवंशी त्यांच्या पथकाला घेऊन काही क्षणांत घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ५०-६० घरांची ही वस्ती. सगळे अगदीच कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातले. कुणी कामगार, तर कुणी रस्त्यावर गाडी चालवणारे, पथारी टाकून व्यवसाय करणारे. या वस्तीतून भांडणं, मारामार्या, दारू पिऊन धिंगाणा, लफडी कुलंगडी, अशा तक्रारी कायमच येत असत. अगदी रागाच्या भरात एखाद्याचा हातपाय मोडून ठेवल्याच्या घटनाही नव्या नव्हत्या. मात्र, खून झाल्याची घटना तरी इन्स्पेक्टर सूर्यवंशींच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडत होती.
शेखर बारगजे या तीस वर्षांच्या तरुणाचा खून झाला होता. शेखर हा वस्तीत स्वतःच्या खोलीत एकटाच राहत होता. दोन खोल्यांची त्याची जागा. त्याची सरबताची गाडी होती. स्टेशनच्या बाजूलाच गेली सात-आठ वर्षं तो इमाने इतबारे व्यवसाय करत होता. कधी पोलिस, तर कधी गुंड येऊन त्रास देत, हटकत, पैसे मागत, परवानग्यांचं झंझट असे. पण सगळं सांभाळून तो व्यवसायात नेटानं टिकून होता. शेखरची धाकटी बहीण अंजली शहरात शिकायला होती. शेखरचा तिच्यावर फार जीव होता. व्यवसायातून पैसे साठवून तो तिच्यासाठी काही ना काही खरेदी करून गिफ्ट देत असे. तिच्या शिक्षणाचा, राहण्याचा खर्चही तोच करत होता.
वस्तीपासून सुमारे दोन किलोमीटरवर एका ओसाड भागात शेखरचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला. शेखरने दारू प्यायली होती, हे तर स्पष्टच दिसत होतं. अंगावर काही वार झाल्याच्या खुणा होत्या. हे काम काही सराईत गुन्हेगाराचं नाही, हेही लक्षात येत होतं. बोटात अंगठी, खिशात पैसेही तसेच होते. त्याचा मोबाईलही खिशात सापडला. चोरीच्या उद्देशाने खून झालेला नाही, हे स्पष्ट होत होतं.
“शेखरला शेवटचं कुणी बघितलं होतं?’’ सूर्यवंशींनी भारंबे वस्तीत येऊन शेखरच्या शेजारीपाजारी चौकशी सुरू केली.
“साहेब, तो रात्री साडेनऊच्या दरम्यान घरी यायचा. त्यानंतर जेवून घरी आरामच करायचा. काल तो आला, पण कुठेतरी जायच्या घाईत होता. आला आणि लगेच आवरून कुठेतरी गेला. कुठे गेला, काय सांगितलं नव्हतं,’’ शेजारच्या एका माणसाने माहिती दिली.
“जेवण स्वतः करायचा?’’ पोलिसांनी विचारलं.
“नाही साहेब, डबा होता त्याचा. शिंदे मावशींकडून डबा यायचा त्याच्यासाठी.’’ ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी लगेच शिंदे मावशींचं घर गाठलं. पलीकडच्याच वस्तीत त्या राहत होत्या आणि घरगुती खानावळ चालवत होत्या.
“शेखर चांगला मुलगा होता साहेब. बहिणीवर, वस्तीतल्या लोकांवर माया करायचा. खानावळीचे पैसे वेळच्या वेळी द्यायचा. कधी काय लागलं तर कुणालाही मदत करायचा,’’ शिंदे मावशींनी सांगितलं. एकूणच शेखर हा स्वभावाने चांगला, साधा आणि सरळ माणूस होता, हेच सगळ्यांच्या बोलण्यातून कानावर आलं. या साध्या, सरळ मुलाचा खून कुणी आणि कशासाठी केला असेल, हेच कोडं होतं. पैसे चोरीला गेले नसल्यामुळे कुठल्याही अज्ञात चोराने हे काम केलेलं नाही, हे तर उघडच होतं. तो रात्री घरी थांबायच्या ऐवजी बाहेर गेला, त्या अर्थी कुणालातरी भेटायला गेला असणार, हे लक्षात येत होतं.
शेखरच्या मोबाईलचे रेकॉर्ड्स मागवून पोलिसांनी इतर तपासाला सुरुवात केली, मात्र त्यातून फारशी काही माहिती मिळत नव्हती. दुसर्या दिवशी संध्याकाळी पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या एका फोन कॉलमुळे मात्र तपासाची चक्रं वेगाने फिरू लागणार होती.
“साहेब, आमच्या एरियातला एक भाई आहे. दिग्याभाई असं त्याचं नाव. तो इथल्या सगळ्या फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल करत असतो. शेखरने त्याला खंडणी द्यायला नकार दिला होता. त्यावरून दिग्याने त्याला धमकीही दिली होती,’’ एका माणसाने फोन करून इन्स्पेक्टर सूर्यवंशींना माहिती दिली.
“कसली धमकी दिली होती?’’
“इथे धंदा करू देणार नाही म्हणाला होता. या भागात राहायचं असेल, तर मला खंडणी दे, नाहीतर तुलाच गायब करून टाकतो, असं म्हणाला होता तो.’’ हे ऐकल्यावर सूर्यवंशींचे डोळे चमकले. खबर देणार्याचं नावगाव विचारण्यात काही अर्थ नव्हता, कारण त्यानं ते सांगितलं नसतं आणि जरी सांगितलं, तरी ते खोटं असणार, याची पोलिसांना कल्पना होती. खंडणीसाठी खून करण्याची धमकी देणार्या गुंडाशी कोण कशाला पंगा घेईल?
दुसर्याच दिवशी या दिग्याभाईला नडायचं सूर्यवंशींनी ठरवून टाकलं होतं. पोलिसांची टीम दिग्याभाईच्या एरियात शिरली, तेव्हा तो असाच कुणाला तरी दमदाटी करताना दिसला.
“काय रे, जास्त माज आला काय?’’ सूर्यवंशींनी त्याला दमात घेत त्याची गचांडीच धरली.
“ओ साहेब, अंगाला हात लावायचं काम नाही,’’ दिग्या दमदाटी केल्याच्या सुरात म्हणाला.
“आम्हाला दमबाजी करतोस? हरामखोर!’’ असं म्हणून सूर्यवंशींनी त्याला तसाच धक्का दिला, तसा तो मागच्या सायकल स्टँडवर कोलमडला. डोक्यावरच आपटला. डोकं चोळत उठला. या साहेबांशी वाकड्यात शिरण्यात काही अर्थ नाही, हे त्याला कळून चुकलं. शिवाय आपल्याच एरियात बेअब्रू नको, हा शहाणपणाचा विचारही त्याने केला असावा.
“साहेब, काय पायजे सांगा ना, हजर करतो.’’ एकदम नरमाईच्या सुरात तो म्हणाला. पोलिसांनी त्याला धरून गाडीत टाकला आणि थेट पोलिस स्टेशन गाठलं. दिग्याभाईचा सगळा तोरा उतरवून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानं शेखरला दमदाटी केल्याचं मान्य केलं, पण ते नेहमीचं तंत्र असल्याचंही सांगून टाकलं. शिवाय त्याच्या नावावर कुठलाही खुनाचा गुन्हा दाखल नव्हता. तो एवढ्या थराला जाईल, असं त्याच्या एकूण अवतारावरून वाटत नव्हतं. लागेल तेव्हा पोलिस स्टेशनला यावं लागेल आणि पुन्हा कुठेही दमदाटी, खंडणीवसुली करताना दिसलास, तर गावातून धिंड काढू, असा दम देऊन सूर्यवंशींनी त्याला परत पाठवून दिलं.
शेखरच्या घराजवळच राहणारा त्याचा मित्र प्रताप शेखरच्या खुनानंतर खचून गेला होता. त्याच रात्री पोलिस त्याच्या घरी आले, तेव्हा त्यानं शेखरबद्दल त्याला असलेली सगळी माहिती दिली होती. त्या वस्तीत तसं म्हटलं तर प्रतापच शेखरच्या सगळ्यात जवळचा माणूस होता. त्या रात्री मात्र तो त्याच्या कंपनीत कामाला गेला होता.
“साहेब, मी घरी असतो, तर शेखरला बाहेर जाऊच दिलं नसतं!’’ असं तो अगदी धाय मोकलून रडून पोलिसांना सांगत होता. पोलिसांनी त्याला आवरलं. शेखरचं कधी कुणाशी भांडण झालं होतं का, त्याचं बाहेर काही प्रकरण वगैरे होतं का, हेही पोलिसांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण प्रतापनं तसं काही नसल्याचं सांगितलं.
“शेखरला त्याच्या कामाशिवाय दुसर्या कशातही इंटरेस्ट नव्हता साहेब,’’ असंही प्रतापनं सांगितलं. आता मात्र पोलिसांसमोर खरंच पेच निर्माण झाला होता.
शेखरच्या पोस्ट मार्टेमचे रिपोर्ट आले, त्यात अपेक्षेप्रमाणेच वेगळं काही निघालं नाही. वार झाल्याने रक्तस्राव होऊन मृत्यू झाला होता.
आठ दिवसांपूर्वी शेखरची बहीण अंजली शहरातून एक दिवसासाठी राहायला आलेली असताना त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकला होता, असं वस्तीत राहणार्या एका बाईनं सांगितलं. पोलिसांनी लगेच अंजलीला चौकशीसाठी बोलावून घेतलं.
“भांडण? नाही…मला आठवत नाही साहेब.’’ पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजली म्हणाली.
“तुझ्या भावाशी तुझं भांडण झालं नव्हतं? तुमच्याच वस्तीतल्या मालपेकर बाईंनी स्वतः ऐकलं होतं,’’ सूर्यवंशी म्हणाले.
“हां हां… ते होय? अहो मी शहरात राहते ना, तर मी तब्येतीकडे लक्ष द्यावं, नीट खावं प्यावं म्हणून दादा मला ओरडत होता. त्याला भांडण म्हणतात का?’’ अंजलीनं खुलासा केला.
“हो, बरोबर आहे तुझं. तसंही शेखर होताच प्रेमळ. तुझ्यावरही तो माया करायचा ना?’’
“हो साहेब, खूप मदत करायचा मला.’’
“तुम्ही दोघं सख्खी भावंडं नसूनही तुमच्यात एवढं प्रेम होतं, हे बघून फार छान वाटलं. आत्ताच्या काळात असं कोण कुणाला जीव लावतंय?’’ सूर्यवंशी म्हणाले, तशी अंजली थोडीशी चमकल्यासारखी वाटली.
“हे तुम्हाला कुणी सांगितलं साहेब?’’ तिनं आश्चर्यानं विचारलं.
“पोलिसांना सगळी खबर ठेवावी लागते, अंजली. तो तुझा सावत्र भाऊ ना?’’ ते म्हणाले. मग अंजलीला सगळं सांगावंच लागलं.
“हो साहेब, बाबांनी आई गेल्यावर दुसरं लग्न केलं. शेखर माझा भाऊ झाला. पण खरंच साहेब, सावत्र भाऊ वाटतच नाही तो. एवढी माया करायचा माझ्यावर.’’ त्याच्या आठवणी सांगताना अंजलीला रडूच आलं. तिच्याकडून जेवढी माहिती मिळवायची तेवढी घेऊन पोलिसांनी तिलाही परत पाठवून दिलं.
“जाधव, शेखरचा काटा नक्की कुणी काढला असेल, काही कळायला मार्ग नाही हो. त्याला त्या दिवशी कुणाचा फोनही आला नव्हता. नक्की कोण टपलं असेल त्याच्या वाईटावर?’’ सूर्यवंशी त्यांच्या सहकार्यांशी बोलताना म्हणाले.
“साहेब त्याच्या जवळच्या माणसांच्या हालचाली तर काही संशयास्पद वाटत नाहीयेत. त्यांनी आपल्यापासून काही लपवलेलंही नाही.’’ सब इन्स्पेक्टर जाधवांनीही त्यांचं मत मांडलं.
“त्यांनी माहिती लपवली नसेल, पण आपल्याला ती लपलेली माहिती शोधून काढावी लागेल. काहीतरी धागा नक्कीच मिळायला हवा.’’ सूर्यवंशी म्हणाले. काही क्षण त्यांनी विचार केला, मग त्यांना काहीतरी सुचलं असावं.
“खुनाच्या रात्री आपण वस्तीत गेलो, तेव्हा काढलेले फोटो आहेत ना? जरा त्याच्या कॉपीज घेऊन या बरं. काही सापडतंय का बघूया.’’ जाधवांनी लगेच तशी व्यवस्था केली. त्यातला एक फोटो बघून सूर्यवंशींचे डोळे चमकले.
“जाधव, चला. खरंतर त्याच दिवशी हे डोक्यात कसं आलं नाही, कुणास ठाऊक.’’ असं म्हणून सूर्यवंशींनी लगेच गाडी काढायची सूचना केली. पोलिसांची गाडी काही क्षणांत भारंबे वस्तीत जाऊन पोहोचली. त्यांनी थेट प्रतापचं घर गाठलं आणि त्याला दार उघडायला लावलं.
“साहेब, तुम्ही आत्ता?’’ प्रतापनं आश्चर्यानं विचारलं.
“अंघोळ झाली का, प्रतापराव?’’ सूर्यवंशींनी त्याला मुद्दामच खोचकपणे विचारलं.
“होय साहेब, सकाळीच झाली.’’
“आंघोळ सकाळीच करतोस ना तू?’’
“होय साहेब.’’
“मग शेखरचा खून झाला, त्या रात्री उशिरा अंघोळ का केली होतीस?’’ या प्रश्नावर प्रताप एकदम गडबडला. त त प प करायला लागला. सूर्यवंशींनी लगेच त्याची गचांडी धरून त्याला गदागदा हलवत पुढचे काही प्रश्न विचारले. त्यावर त्याला नीट उत्तरं देता आली नाहीत.
“शेखरचा खून करून घरी आलास, तेव्हा अंगावर रक्त उडालं होतं. तेच साफ करण्यासाठी अंघोळ करून कपडेही धुवून टाकलेस ना?’’ सूर्यवंशींनी दरडावून विचारल्यावर त्याची बोबडीच वळली. पोलिसांनी त्याला आणखी दमात घेतल्यावर त्यानं कबुली देऊन टाकली.
शेखरची बहीण अंजली ही शहरात राहायला गेली असली, तरी वस्तीत असल्यापासून तिला प्रतापबद्दल आकर्षण होतं. त्याच्याशी लग्न करण्याचा तिचा हट्ट होता, पण शेखर कितीही प्रेमळ असला, तरी प्रतापशी लग्न करायला तो परवानगी देणार नाही, हे तिला माहीत होतं. त्या बाबतीत तो अतिशय हट्टी होता. बहिणीचं चांगल्या घरात लग्न होऊन तिला चांगले दिवस बघायला मिळावेत, यासाठी त्यानं खटपट सुरू केली होती. एकदोनदा त्यानं तिला प्रतापच्या घरीच त्याच्याशी लगट करताना पकडलंही होतं. म्हणूनच तो तिच्यावर खवळला होता.
“अंजलीनंच मला भरीला घातलं साहेब. तिला काहीही करून मी हवा होतो, शेखरचा अडथळा येत असेल, तर त्याला कायमचं बाजूला कर, असं म्हणाली होती. त्यामुळे मीसुद्धा वैतागून गेलो होतो. त्या दिवशी त्याला भेटायला बोलावलं, त्याला दारू पाजली, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. तर तो माझ्याच अंगावर आला. मग मीसुद्धा भडकलो आणि चाकूनं त्याच्यावर भसाभस वार केले. नंतर वाईट वाटलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.’’ प्रतापनं सगळी कबुली देऊन टाकली.
“तुझ्या आयुष्यातली चांगली वेळही तुझ्या हातून निघून गेलेय.’’ सूर्यवंशींनी त्याला सुनावलं, तसा प्रताप धाय मोकलून रडायला लागला.
– अभिजित पेंढारकर
(लेखक चित्रपट आणि मालिकालेखनात कार्यरत आहेत.)