• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हे वयच असं असतं…

- संदेश कामेरकर (सिने परीक्षण) (सिनेमा : उनाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 14, 2023
in मनोरंजन
0

तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना एक काळ असा असतो ज्यात आपल्यालाच सारं काही कळतं असा अति आत्मविश्वास असतो. पालकांचे सांगणे उपदेश वाटते. या अल्लड वयात जीवनाला दिशा मिळाली नाही तर आयुष्याचं जहाज खोल समुद्रात भरकटू शकतं. ‘उनाड’ हा चित्रपट याच तरुणाईचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर मांडतो.
ही कथा आहे वयात येणार्‍या तीन उनाड मुलांची. कोकणातील दापोली-हर्णे हे मासेमारीसाठी प्रसिद्ध गाव. इथल्या कोळीवाड्यात ही मुलं राहतात. शुभम (आशुतोष गायकवाड) कॉलेजमध्ये नापास झालाय आणि आता फक्त उनाडक्या करत फिरतोय. त्याचे वडील (देवेंद्र पेम) बोटीवर नाखवा आहेत. ते समुद्रात मासे पकडायला गेले असताना शुभमची आई आजारी पडून देवाघरी जाते. आईला गरज होती तेव्हा वडील समुद्रात होते याचा राग ठेवून शुभम वडिलांचा आणि समुद्राचा तिरस्कार करतोय. बंड्या (अभिषेक भारते) हे वडिलांविना पोर. त्याची आई खंबीरपणे मासेविक्री करून घर सांभाळते आहे आणि जमीलची (चिन्मय जाधव) वडिलोपार्जित बेकरी आहे, पण धंद्यात नुकसान झाल्यामुळे बेकरी बंद करून त्याचे वडील कुवेतमध्ये नोकरी करत आहेत आणि जमीलला देखील ते तिथेच नोकरीसाठी घेऊन जाणार आहेत.
न कळत्या वयातील या तिघांचे आयुष्य मजेत चालू आहे, पण यांच्यातील एकालाही जबाबदारीची जाणीव नाही. याच दरम्यान पुण्यातून एक कुटुंब जवळच्या आंजर्ले गावात स्थायिक व्हायला आले आहे. यांना किल्ला दाखविण्याच्या निमित्ताने शुभमची स्वराशी (हेमल इंगळे) गाठ पडते. योगायोगाने भेटी घडत जातात. शहरातील स्वराला गावातील शुभमचा मनमोकळा स्वभाव आवडतो. मित्र म्हणून शुभमच्या खांद्यावर हात टाकणं, हातात हात घेणं, या शहरातील या कॉमन गोष्टी ती नकळतपणे करते. पण गावातील मुलाला हा प्रेमाचा संकेत वाटतो आणि तो तिच्या प्रेमात पडतो. एका क्षणी शुभम स्वराचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा, मैत्री आणि प्रेम यातील फरक तू समजू शकला नाहीस हे सांगून स्वरा त्याला झिडकारते.
त्यातून कथा अशी काही वळणं घेते की पोलिस आणि गावातल्या टग्या परागचे मित्र शुभमच्या पाठी लागतात, तो जीव वाचविण्यासाठी किनार्‍यावरील एका बोटीत जाऊन लपतो. ती बोट मासेमारी करायला समुद्रात जाते आणि इथून समुद्राचा राग करणार्‍या शुभमचा प्रवास सुरू होतो. त्याच्या आयुष्याचं तारू समुद्रात वादळात हरवेल की तो परत किनार्‍याला लागेल? रागाच्या भरात हातून नकळत झालेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं हा सिनेमा पाहिल्यावर मिळतात.
पूर्वार्धातली तीन मित्रांची कथा तशी पूर्वपरिचित वळणांची आहे, पण, उत्तरार्धात समुद्रात घडणारी कथा आपल्याला गुंतवून ठेवते. ‘उलाढाल’, ‘माऊली’, ‘झोंबिवली’ असे बिग बजेट चित्रपट दिग्दर्शित केलेले आदित्य सरपोतदार यांनी तुलनेने कमी बजेटच्या पण आशयघन अशा या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट थिल्लर विनोद आणि अंगप्रदर्शन करत नाही. शारीरिक जवळीकीचा महत्त्वाचा प्रसंगही संयमितपणे चित्रित केला आहे.
छायालेखक लोरेन्स डिकुन्हा आणि पार्श्वसंगीतकार गुलराज सिंग हे या सिनेमाचे खरे हिरो आहेत. खोल समुद्रात हेलकावणार्‍या बोटीतील सीन पाहताना करताना त्यांचा कॅमेरा स्थिर राहिला आहे असं जाणवतं. कोकणचा समुद्र, त्याची गाज, निसर्गसौंदर्य, गावठाण आणि पाठलागदृश्ये विलोभनीय तसेच उत्कंठावर्धक झाली आहेत. मुख्य कलाकार वगळता इतर सर्व कलाकार गावातील आहेत. पण त्यांच्या अभिनयात कुठेही नवखेपणा जाणवत नाही. याचं श्रेय सिनेमाचे कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांना द्यायला हवं. गुलराज सिंग यांचं संगीतही श्रवणीय आहे. आनंद शिंदे यांनी गायलेले ‘हळद वाजू दे’ हे गाणं सगळीकडे गाजेल, इतकं मस्त झालं आहे. आशुतोष गायकवाड याने तरूण वयातील बेदरकार वृत्ती आणि चूक उमगल्यावर होणारा बदल मनस्वीपणाने मांडला आहे. चिन्मय जाधव आणि अभिषेक भारते यांनी ‘मित्रासाठी काय पण’ या भूमिकेला अनुसरून उत्तम अभिनय केला आहे. हेमल इंगळेनी स्वरा छान सुरात साकारली आहे. देवेंद्र पेम, देविका दफ्तरदार हे अनुभवी कलाकार त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करतात, संदेश जाधव हे बोटीवरील खलाशीच वाटतात इतके या भूमिकेशी समरस झाले आहेत. त्यांचा तांडेल मनात घर करून जातो.
‘उनाड’ हा चित्रपट जियो सिनेमा अ‍ॅपवर उपलब्ध आहे. खरं तर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यात खरी मजा आहे. पण, दापोली ते गुहागर या पट्ट्यातील विलोभनीय कोकण, अथांग समुद्र आणि कलाकारांचा उत्तम अभिनयासाठी हा सिनेमा एकदा तरी पाहायला हवा.

Previous Post

एटीएम कार्ड बदलले जाते तेव्हा…

Next Post

राशीभविष्य

Next Post

राशीभविष्य

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.