आजकाल धर्माबद्दल, श्रद्धेबद्दल बोलणं अवघड होऊन बसलेलं आहे. कुणी काही बोलायला गेलं की अचानक कोणीतरी, म्हणजे एखादी स्वयंघोषित संस्कृती रक्षक संघटना वगैरे पुढे येते आणि ते ओरडायला लागतात- ‘तुम्ही आमच्या भावना दुखावल्यात..’ खरंच एखाद्याच्या धर्माची किंवा एखाद्याच्या श्रद्धेची आपण चिकित्सा केली तर अशा प्रकारे भावना दुखावू शकते का? श्रद्धेला ठेच पोहोचू शकते का?
धर्माचं पालन करणे हेच मुळात विवेकी माणसाचं काम आहे. अविवेकी माणूस, अज्ञानी माणूस धार्मिक होवू शकत नाही. आता कोणी म्हणतील- जर तुम्ही विवेकी आहात तर तुम्हाला कुठल्या विशिष्ट अशा धर्माची गरजच काय? आयुष्याच्या एका टप्प्यावर निश्चितच माझ्याही मनात हा विचार येऊन गेलेला आहे. पण नंतर मी यावर बराच विचार केला. अभ्यासही केला. निरनिराळ्या विचारवंतांना वाचत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण माणूस आहोत तर आपल्याला धर्म काही चुकणार नाही. आणि सोडायचाच ठरवला तर मला माझी माझी स्वतःची अशी आचरणपद्धती निर्माण करावी लागेल. तिचं पालन करावं लागेल. तो माझा धर्म झाला… म्हणजे थोडक्यात काय तर धर्म चुकणार नाहीच.
मी रिचर्ड डॉकिन्सचं ‘द गॉड डिल्यूजन’ वाचत होतो. (मधुश्री पब्लिकेशन, मराठी अनुवाद- मुग्धा कर्णिक) त्या पुस्तकात आईन्स्टाईनचं धर्माबद्दलचं मत वाचायला मिळालं. आईन्स्टाईन म्हणतो, ‘मी एक खोलवर अश्रद्ध असलेला धार्मिक माणूस आहे. माझा धर्म एका नव्या स्वरूपाचा धर्म आहे. मी निसर्गावर कधीही काही ध्येय, हेतू असल्याचे प्रत्यारोपण केलेले नाही. त्याला मानवी किंवा दैवी असे कोणतेही गुण चिटकवण्याचा प्रयत्न केलेला नाही. निसर्गात मी केवळ एक भव्य रचना पाहतो. आपली त्या संदर्भातली समज खूपच मर्यादित आहे आणि याचमुळे निसर्गाबद्दल विचार करणारा कोणताही माणूस एका विशाल भावनेने भारावून जातो. ही एक अस्सल धार्मिक भावना आहे, जिचा गूढवादाशी काहीही संबंध नाही. एखाद्या विवक्षित देवावर श्रद्धा ही कल्पनाच मला परकी वाटते आणि भोळसटपणाचीही.’
मी आ .ह. साळुंखे सरांचं ‘आस्तिक शिरोमणी चार्वाक’ वाचलं. त्यातून असं कळलं की चार्वाक नास्तिक होते, पण तरीही हिंदू धर्माने त्यांना कधी बहिष्कृत वगैरे केलं नाही. उलट सहा दर्शनशास्त्रांपैकी एक म्हणून त्यांना मान्यताच दिली. म्हणजे थोडक्यात काय, तर देव मानणे न मानणे हा भाग वेगळा आहे आणि धर्म हा भाग वेगळा आहे. हेही समजलं.
धार्मिक कुणाला म्हणायचं? याबाबतीतली स्वामी विवेकानंदांनी केलेली कल्पना सांगतो. स्वामीजी सांगतात, ‘खरी धार्मिक माणसे देव मानतात की मानत नाहीत हा मुद्दा माझ्या मते गौण असतो; पण ती माणसे स्वतःपासून वेगळी झालेली असतात. त्यांचा अहम् संपलेला असतो. ती ‘चिंता करितो विश्वाची’ म्हणून सत्याच्या शोधात असतात. भोवतालच्या माणसांबद्दलच नव्हे तर निसर्गाबद्दलही त्यांना कणव असते. ती सर्वांचे मंगल चिंतितात आणि त्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणजे धर्म ही एक सनातन संकल्पना आहे. मानवी जीवनातले समाधान, समाधानावर आधारलेले सुख, चराचराशी एकरूप होऊन त्याचे शुभमंगल करण्यासाठी चाललेली अविरत धडपड यातून धर्म साकार होतो.’ (संदर्भ : शोध स्वामी विवेकानंदांचा. – दत्तप्रसाद दाभोळकर.)
धर्माबद्दल मी आणखीन विचार करत गेलो तेव्हा असं लक्षात आलं की कुठलाच धर्म वाईट नसतो. धर्म हा माणसांनी माणसांच्या सोयीसाठी बनवलेला आहे, तर तो वाईट कसा असेल? पण धर्माला नीट समजून न घेता, त्याचा कुठल्याही प्रकारे अभ्यास न करता स्वतःला धार्मिक म्हणून घेणारा माणूस मात्र वाईट असतो.
मागे एकदा भाजपाच्या प्रवत्तäया नुपूर शर्मा महंमद पैगंबरांच्याबद्दल काहीतरी बोलल्या. त्यावर मोठा गदारोळही झाला. कोणा एका शिवणकाम करणार्या इसमाने त्यांना समर्थन दिलं, त्यांना पाठिंबा दर्शविला. एवढ्यावरून दोन मुस्लिम तरुण चिडले आणि त्यांनी सरळ चाकूने भोसकून खूनच केला त्या शिंप्याचा. खून केल्यानंतर त्या तरुणांनी हातात रक्ताळलेला चाकू घेऊन समाजमाध्यमावर जी चित्रफित प्रसारित केली ती मी बघितली. मला ते दोघेही तरुण ठार वेडे वाटले. त्यांच्या डोळ्यात बघितल्यावर मला ते जाणवलं. हे असे वेडे प्रत्येक धर्मात असतात. धर्माची बदनामी सुद्धा अशा वेड्यांमुळेच होत असते.
धर्मामध्ये वेड्यांची संख्या का वाढत जाते? त्याचं कारण सांगतो, दुसरीत असताना मला ‘गुहा बोलते’ नावाचा धडा होता पुस्तकात. त्या गुहेत फक्त आत जाणार्यांची पावलं दिसायची. गुहेतून बाहेर यायला कोणालाच जमायचं नाही. आजच्या काळातले सगळे धर्म त्या गुहेसारखे झालेले आहेत असं मला वाटतं. प्रत्येकाला आपला धर्म वाढवायचा आहे, मोठा करायचा आहे. त्यामुळे धर्मात ही अशी खोगीरभरती होत राहते. इथे जो तो फक्त आत ओढायचं काम करत राहतो. गुणवत्तेवर कुणाचंच लक्ष नाहीये. सगळ्यांचं लक्ष असतं फक्त संख्येवर.
अन्यधर्मीय माणसाला धर्मात घेताना काय निकष लावले जातात? फक्त तो माणूस आहे एवढाच. प्रबोधनकार ठाकरे ‘हिंदू धर्माचे दिव्य’ मध्ये सांगतात, ‘मुसलमानांनी तलवारीच्या बळावर, धाक दाखवून अनेकांना आपल्या धर्मात सामावून घेतलं. त्यासाठी कुठला विधी वगैरे सुद्धा करावा लागत नसे. त्या माणसाने ‘मी इस्लाम स्वीकारला’ असं म्हटलं की तो झाला मुसलमान.’ ख्रिश्चन लोक एखाद्याला पावाचा तुकडा खायला देऊन सांगतात, आजपासून तू आमचा झालास. इतकं सोपं असतं हे सगळं.
कुठलाच धर्म एखाद्याला स्वीकारताना त्याच्या मेंदूची तपासणी करण्याचे सोपस्कार पार पाडत नाही. पण हे करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे काय होईल की आपोआपच वेडे वेडे बाजूला होतील आणि शहाणे शहाणे बाजूला होतील. वेड्या लोकांच्या मनात आपला स्वतःचा धर्म सोडून दुसर्याच्या धर्माबद्दल खूप भीती वाटत असते. भीतीचं मूळ कारण असतं अज्ञान. अभ्यास केला, वाचन केलं तर ही भीती राहणार नाही. नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘धर्मग्रंथावर श्रद्धा असण्याचं कारण म्हणजे ते कोणी वाचतच नाही!’ यातला विनोदाचा भाग जरी बाजूला केला तरी वाचलं पाहिजे हे मात्र खरं आहे. वाचल्याशिवाय अज्ञान कसं दूर होणार?
कुराणबद्दल खूप गैरसमज आहेत लोकांच्या मनात. काही लोकांना तर भीती वाटते कुराणाची. कुराण जिहाद शिकवतो वगैरे. उठसूट जिहादच्या नावाखाली एकमेकांचे गळे कापणारांनी तरी कुराण वाचलेलं असतं का? काय सांगतं कुराण? कुराणमध्ये अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की, ‘जिहादचा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यायचा आहे. कधी करता येईल हा जिहाद? जर कोणी तुमचा अनन्वित छळ वगैरे करत असेल तरच. आणि हे कोण ठरवणार? तर हा निर्णय सुस्थापित शासनाने घ्यायचा आहे. कुठल्याही छोट्या-मोठ्या संघटनेला किंवा वैयक्तिक पातळीवर हा निर्णय घेता येत नाही. त्यातही बचाव सर्वप्रथम आहे, आक्रमण हा नंतरचा भाग आहे.’
कुराण सांगतं, ‘कुठलंही कार्य करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमची बुद्धी वापरा.’ सुरह-२. ‘अल बकरह’मधली ४४ क्रमांकाची आयत सांगते, तुम्ही अल्लाहच्या ग्रंथाचे वाचन करता, तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर का करत नाही?
भगवद्गीतेमध्ये कृष्ण बुद्धीचा वापर करण्याबद्दल, विवेकी बनवण्याबद्दल शिकवण देतात. तीच शिकवण पैगंबर साहेब कुराणमधूनही देतात. पण लोक आपले धर्मग्रंथ नीट समजून घेत नाहीत. धर्माच्या बाबतीत स्वतःच्या डोक्याचा वापर कुणी करत नाही म्हणूनच तर धर्माच्या नावावरून डोकी फुटत राहतात. फुटत राहतील.
कुराण, सुरह-२ मधील १९० ते ९५ क्रमांकाच्या आयतमध्ये जिहादसंदर्भात स्पष्ट सूचना आहे की ‘जो कोणी तुमच्यावर अत्याचार करेल त्याने ज्या मर्यादेपर्यंत तुमच्यावर अत्याचार केला आहे त्या मर्यादेपर्यंतच शिक्षा करा.’ आणि यात काय चुकीचं आहे? तुकोबा सुद्धा सांगतातच की, ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथा हाणू काठी।।’ समर्थही सांगतात, ‘ठकासी व्हावे महाठक’ म्हणून. पण हे नीट समजून घेतलं तर ना!
कुराण, सुरह-३, आले-इमरान, आयत क्रमांक ७ सांगते, ‘या ग्रंथांमध्ये ज्यात सुस्पष्ट असा संदेश आहे, तोच ग्रंथाचा प्रमुख भाग समजा. यामध्ये काही रूपकात्मक सुद्धा गोष्टी आहेत. पण त्याचा तुम्ही तुमच्या मनाने चुकीचा अर्थ लावू नका. त्यातून गोंधळ उत्पन्न होईल असं कोणतंही काम करू नका. ज्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला लागत नाही तो भाग अल्लाह जाणतो असं म्हणून त्याच्यावर सोपवा.’ मला वाटतं इतकं पुरेसं आहे विवेकी माणसांसाठी.
मुद्दा असा की अविवेकी, अज्ञानी, वेड्या लोकांच्या हातात हे धर्माचं शस्त्र पडायलाच नको. पण दुर्दैवाने स्वतःला धार्मिक म्हणून घेणारे जास्त करून वेडेच आढळतात. नुसत्या संख्येने धर्म वाढवून काय उपयोग? माणसाला शहाणं करणं, त्याला माणूस बनवणं हा उद्देश असला पाहिजे कुठल्याही धर्माचा. कृष्ण म्हणतो मला संख्येशी काहीच घेणं देणं नाही. ‘माझे गडी कोण कोण। निवडा भिन्न यातूनी।।’ कृष्ण म्हणतो, मी निवड करणार. कोण पाहिजे कृष्णाला? ‘’प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय:।।’ जे ज्ञानी आहेत, विवेकी आहेत, ज्यांना स्वतःच्या डोक्याचा वापर करता येतो, फक्त अशांनीच माझ्याकडे या, असं कृष्ण म्हणतो. तुम्ही म्हणाल की, मग बाकीच्यांनी कुठे जावं? मला वाटतं बाकीच्या सगळ्या म्हणजे वेड्याबागड्या लोकांसाठी एकमेव जागा म्हणजे रोज नव्याने उदयाला येणारे संप्रदाय.
सध्या एक नवीन संप्रदाय उदयास आलेला आहे बागेश्वर धाम. मला हे बागेश्वर धाम कळाले ते देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे. त्यांनी काही दिवसांपूर्वी ह्या बागेश्वर धामचा दरबार नागपूरमध्ये भरवला होता. श्याम मानव सरांनी या धीरेंद्र शास्त्रीला आव्हान दिलं की, तुम्ही तुमचे जे काही चमत्कार असतील ते माझ्यासमोर करून दाखवा. मग ते बाबा पळाले वगैरे. हा दरबार हनुमानजींचं नाव पुढे करून चालतो. हिंदू धर्मात आठ चिरंजीवांबद्दल सांगितलेलं आहे. त्यातले एक चिरंजीव म्हणजे हनुमानजी. पण या दरबारात हनुमानजींव्यतिरिक्त इतरही बर्याच गोष्टी चालतात. त्याचं काय?
बागेश्वर धाम दरबार चालवणार्या व्यक्तीचं नाव आहे, धीरेंद्र शास्त्री. हा एक साधारण २७-२८ वर्षे वयाचा तरुण मुलगा आहे. त्याचा दावा आहे की, मला गुरूंच्या कृपाशीर्वादाने सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि त्या सिद्धीच्या द्वारे मी अनेक कारनामे करू शकतो. हे बाबा सिद्धीच्या द्वारा भक्ताच्या मनातलं ओळखतात म्हणे. पण याला चमत्कार कसं म्हणायचं? आपल्याकडे ‘सुहानी शहा’ नावाची जादूगार मुलगी आहे. तिने टीव्हीवर येऊन लाईव्ह कार्यक्रमात हे मनातलं ओळखण्याची जादू करून दाखवली. ती सगळ्या जगाने बघितली. त्यामुळे हा काही चमत्कार वगैरे नाही हे सिद्ध झालं. माईंड रीडिंग नावाचं शास्त्र आहे ते. असो.
इथला दरबार म्हणजे एक भव्य दिव्य असा मंडप सजवलेला असतो. त्यावर एक सिंहासन.. त्यावर बाबा बसलेले. दरबारात लाखोंच्या संख्येने लोक जमा झालेले असतात. त्यांच्यात भूतबाधा झालेले काही लोक असतात. चित्रविचित्र हावभाव करत ते मंडपात नाचायला लागतात. मग हे बाबा त्यांना जवळ बोलावून घेतात. गर्दीतून वाट काढत, झुलत झुलत हे लोक बाबांच्या पुढे येऊन उभे राहतात. बाबांच्या हातात एक छोटीशी गदा आहे. ती बाबा हवेतल्या हवेत फिरवतात. डोळे मिटून काहीतरी पुटपुटतात. मग डोळे उघडून त्या माणसावर एक फुंकर मारतात. तो माणूस आणखीनच झुलायला लागतो. बाबाच्या म्हणण्यानुसार आता दरबारात हनुमानजींची सेना आलेली आहे. एकूण आठ चिरंजीवांच्या व्यतिरिक्त ही अशी हनुमानजींची अख्खीच्या अख्खी सेना चिरंजीव असल्याचं मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलं या बागेश्वर बाबाकडून. पण ते असो.दरबारात सेना आली. ती अदृश्य आहे. बाबा सोडून इतर कोणालाच ती दिसत नाही. बाबाजवळ सिद्धी आहे त्यामुळे ते त्या सेनेला पाहू शकतात, तिच्याशी बोलू शकतात. बाबा आदेश देतात सेनेला, ‘सेना, ह्या प्रेताला चांगलं आदळा. फजिती करा ह्याची. ह्याच्या डोक्यात फटके द्या…’ बाबाचा आदेश ऐकून सेना काय करते माहित नाही, पण तो माणूस मात्र दातओठ खायला लागतो. हाताच्या मुठी आवळायला लागतो. चेहरा अजूनच वाकडातिकडा करतो. अंग धाडकन जमिनीवर आढळतो. गडाबडा लोळायला लागतो. स्वतःच्या डोक्यात बुक्क्या मारायला लागतो.. बाबा खुश होतात. दरबार खुश होतो. बाबा बसल्या जागी उडी मारून म्हणतात, भले शाबास! मी त्या सेनेला विनंती करेन की सेना, इथून पुढे त्या बाधित माणसाला तिथल्या तिथे धक्का देऊन पाडण्यापेक्षा सगळ्या सेनेने मिळून त्याला हवेत चांगलं २० किंवा ३० फूट वर उचला आणि तिथून, त्या उंचीवरून खाली आदळा. म्हणजे एका झटक्यासरशी ते बाधा पळून जाईल. दरबाराचा वेळ वाचेल.
आता तुम्ही म्हणाल, असं कुठे असतं का? नुसत्या माराला घाबरून एखाद्याची भूतबाधा कशी नाहीशी होणार? होते!. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे हे. शाळेतल्या एका वर्गमित्राला शाळा अजिबात आवडायची नाही. तो सारखा दांडी मारायचा शाळेला. एक दिवस मास्तराने धरला त्याला आणि दरडावून विचारलं, ‘का रे, काल का नाही आलास शाळेला?’ मुलगा म्हणाला, ‘गुरुजी, काल माझ्या अंगात आलं होतं.’ मास्तराने असा काय तुडव तुडव तुडवला म्हणता त्याला.. त्यानंतर आयुष्यात कधी त्या मुलाच्या अंगात आलं नाही.
आजोबांच्यापासून आमचं माळकरी घराणं. आजोबा स्वतः कीर्तनकार होते. वारकरी सांप्रदायिक लोक कुठलीच अंधश्रद्धा मानत नाहीत. त्यामुळे मला हे अंगात येणं वगैरे काय असतं हे माहीतच नाही. पण आमच्या घरात आजोबांची एक थोरली भावजय होती, तिला सगळे भाभी म्हणायचे (निजामी राजवटीचा प्रभाव). भाभीच्या यायचं अंगात. पण तिचं अंगात आणणं जरा वेगळंच होतं. ती आमच्या आजोबांना खूप मानायची. त्यांना हे असं अंगात येणं मान्य नाही, ते त्यांना आवडत नाही हे माहीत होतं तिला. त्यामुळे तिने त्यांच्यासमोर कधी अंगात आणलं नाही. आजोबा घरातून बाहेर गेल्याची पूर्ण खात्री करून मग अंगात आणायची ती.
मी मोठा झाल्यावर भाभीबद्दल थोडी माहिती विचारली आजीला. तेव्हा कळलं की लहान असताना भाभीला खूप सासुरवास झाला होता. आजोबांची आई म्हणजे माझी पणजी खाष्ट सासू होती. ती भाभीला पहाटे तीन-चार वाजता उठवायची. सगळ्या घराचं दळण तिच्याकडून जात्यावर दळून घ्यायची. पीठही बारीकच आलं पाहिजे असा दंडक होता. थोडंसं जरी जाडसर पीठ आलं तर ते पीठ माझी पणजी भाभीच्या अंगाला खसाखसा चोळायची. असं सगळं. सासुरवासातून बचावाचं कुठलंच साधन भाभी जवळ नव्हतं. मग तिच्या अंगात यायला लागलं. अंगात आलं की तीच सासू तिच्या पायावर लोटांगण घ्यायची. पण मग सासू वारल्यावरही भाभीचं अंगात येणं थांबलं नाही. बहुतेक आता ते सगळं तिला खरंच वाटायला लागलं असेल. असो.