‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी लिहिलेल्या आणि मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘हिटलर’ या पुस्तकातील एक रोमहर्षक प्रकरण… संक्षिप्त स्वरूपात.
– – –
सकाळी सहा वाजल्यानंतर श्टाउफनबेख आपल्या घरातून निघाला. त्याच्यासोबत त्याचा अॅजटंट होता. तो लेफ्टनंट होता.
रांग्जडार्फ एअरफील्डवर त्यांना जनरल श्टीफ भेटला. ते विमानात चढले. ते रास्टेनबर्गजवळच्या हवाई तळावर सव्वादहा वाजता उतरले. प्रवाशांना बर्लिनला परत नेण्यासाठी दुपारपर्यंत थांबण्यास पायलटला बजावलेले होते. जंगलातून अर्धा तास गाडी चालल्यानंतर ते फ्यूरर हेडक्वार्टरच्या पहिल्या फाटकापाशी आले. सुरुंगक्षेत्र आणि फॉर्टिफिकेशन्सचे (ठिकठिकाणी मशीनगनर्स वगैरेंसाठी बांधलेले काँक्रीटचे आसरे) वलय यांच्यामधून जवळपास दोन मैल चालत ते दुसर्या फाटकापाशी आले. तिथे वीज खेळवलेल्या काटेरी तारांच्या मध्ये मोठे आवार होते. आणखी मैलभर चालून ते अधिकार्यांच्या चेकपॉइंटपाशी आले. तिथे त्यांचे पास तपासण्यात आले. पण ब्रीफकेस तपासली गेली नाही. दोनशे यार्डांवर आणखी एक तिसरे कुंपणाने वेढलेले आवार लागले.
ही होती ‘सिक्युरिटी रिंग-ए.’ याच आवारात हिटलर व त्याचा स्टाफ राहत आणि काम करत. या सर्वांत आतल्या कंपाउंडला काटेरी तारांचे कुंपण होते. त्यावर एस.एस. गार्ड्स आणि सीक्रिट सर्व्हिसची माणसे यांची गस्त सतत चालू असे. इथे प्रवेश करण्यासाठी अगदी फील्ड मार्शलजवळसुद्धा हिमलरच्या सुरक्षाप्रमुखाने दिलेला पास लागत असे. इथेसुद्धा ती ब्रीफकेस तपासली गेली नाही. तिचा ताबा अॅजटंटने घेतला. श्टाउफनबेख अधिकृत कागदांची दुसरी ब्रीफकेस घेऊन आत गेला. त्याने सिग्नल्सचा प्रमुख जनरल फेलगीबेल याला गाठले. बाँब फुटल्याबरोबर काय करायचे हे फेलगीबेलच्या हातात होते. ‘कृती करण्याची वेळ झाली’ असे बर्लिनमधल्या कटवाल्यांना कळवायचे; लगेच सर्व टेलिफोन, टेलिग्राफ आणि रेडिओ दळणवळण कापून वुल्फशांझेला सर्वस्वी अलग पाडायचे हे त्याचे काम होते.
फेलगीबेल आपले काम करायला एकदम सज्ज आहे, हे कळल्यानंतर श्टाउफनबेख आणखी एका ओ.के.डब्ल्यू. अधिकार्याशी थोडे बोलला आणि खायटेलच्या ऑफिसात गेला. खायटेलने त्याला दिलेली खबर घाई करायला लावणारी होती. मुसोलिनी येणार होता आणि त्यामुळे माध्यान्हीची कॉन्फरन्स अर्धा तास आधी सुरू व्हायची होती. म्हणजे फक्त अर्धा तास उरला होता. हॉलच्या बाहेर त्याला खायटेलचा अॅजटंट भेटला. त्याला त्याने ‘फ्रेश’ होण्यासाठी कुठे जायचे हे विचारले. अॅजटंटने त्याला लॅवेटरी दाखवली. तिथे श्टाउफनबेखचा अॅजटंट ब्रीफकेस घेऊन उभा होता. त्या ठिकाणी श्टाउफनबेखने एक पक्कड घेऊन बाँबमधली एक काचेची कॅपसूल चिरडली. आता तिच्यातले अॅसिड एक बारीक तार खाऊन टाकणार होते आणि पंधरा मिनिटांत बाँब उडणार होता.
बाँब पुन्हा त्या ब्रीफकेसमध्ये बंद होता. एक सार्जंट आला व त्वरा करायला सांगून गेला. खायटेलचा अॅजटंट यार्न्स्ट जॉन फॉन फ्रायंड म्हणाला, ‘चल, चल, चीफ वाट बघताहेत.’ ते चालत कॉन्फरन्स बरॅक्सकडे गेले. श्टाउफनबेख फ्रायंडला म्हणाला, ‘मला फ्यूररच्या शक्य तेवढ्या जवळ जागा देशील का? म्हणजे मला सगळे समजेल.’ श्टाउफनबेखला चांगले ऐकू येत नाही हे फ्रायंडला माहीत होते. खायटेल दरवाजात वाट पाहत होता. कॉन्फरन्स सुरूही झाली होती. खायटेल त्याला टेलिफोन रूमवरून कॉन्फरन्स रूमच्या घडीच्या दरवाजामधून आत घेऊन गेला. कॉन्फरन्समध्ये भाग घेणारे एका चिंचोळ्या लांबट टेबलाभोवती जमले होते. टेबलावर नकाशे पसरलेले होते. टेबलाचा वरचा भाग खूप जड होता आणि दोन जाडजूड मजबूत आधारांवर तोललेला होता.
फक्त हिटलर टेबलाच्या मधोमध दरवाजाकडे पाठ करून बसला होता. त्याचा चष्मा नकाशावर पडला होता. त्याच्या हातात मॅग्निफाइंग ग्लास होती. त्याच्या लगत उजवीकडे उभा असलेल्या जनरल आदोल्फ हुंटझिंगरने पूर्व आघाडीवरचा अहवाल वाचून दाखवला. हिटलरने नवागतांकडे पाहिले. त्यांचे सलाम स्वीकारले. श्टाउफनबेख हुंटझिंगरच्या बाजूला उभा राहिला. मग त्याने ती ब्रीफकेस टेबलाच्या खाली हिटलरच्या जास्तीत जास्त जवळ जाईल अशा प्रकारे ढकलली. ती टेबलाच्या अवजड आधाराला टेकून उभी राहिली. तिथून हिटलर फक्त सहा फुटांवर होता, पण ती हुंटझिंगरच्या पायाला लागत होती. त्यामुळे त्याला नकाशा नीट पाहता येत नव्हता. त्याने खाली वाकून ती ब्रीफकेस टेबलाच्या दुसर्या बाजूला ढकलली.
१२.३७ ला श्टाउफनबेख कोणाच्या लक्षात येणार नाही अशा रितीने बाहेर गेला आणि इमारतीच्या बाहेर पडला.
बरोबर १२.४२ ला बाँबचा स्फोट झाला. जनरल पुटकामाला पडता पडता खिडकीच्या खाली ठेवलेला हीटर दिसला. त्याला वाटले, हीटरचा स्फोट झाला. कोणीतरी ओरडले, ‘आग!’ पुटकामा सरपटतच दरवाजाकडे गेला. दरवाजा जमिनीवर पडला होता. त्यावरून त्याने उडी मारली. मग ‘बाकीचे कुठे आहेत’ असा विचार त्याच्या डोक्यात आला. हिटलर कुठे आहे ते पाहायला तो वळला. त्याच क्षणी पाटलोणीच्या चिरफळ्या उडालेला, चेहरा काजळीने काळा झालेला असा हिटलर खायटेलसह त्याच्याकडेच येताना त्याला दिसला. दोघांच्याही अंगावर भरपूर धूळ आणि लाकडाचे तंतू उडाले होते. झोपेत चालावे तसे ते त्याच्या अंगावरून पुढे गेले. तो त्यांच्या मागून जाऊ लागला. हिटलर आणि खायटेल फ्यूरर बंकरकडे चालले होते.
कॉन्फरन्स रूम सोडल्यानंतर श्टाउफनबेख घाईघाईने बंकर क्र. ८८ मधील ओ.के.डब्ल्यू. सिग्नल्स ऑफिसमध्ये गेला. तिथे तो आणि जनरल फेलगीबेल बाँब फुटण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात तिथल्या सिग्नल ऑफिसरने येऊन सांगितले, ‘श्टाउफनबेखची कार तयार आहे. हेडक्वार्टर्स कमांडंट त्यांची लंचसाठी वाट पाहत आहेत.’
त्याच क्षणी स्फोट झाला!
‘काय चाललंय?’ फेलगीबेलने विचारले. त्याच्या अॅजटंटने उत्तर दिले, ‘कोणा भटक्या जनावराने भुईसुरुंग उडवला असणार.’ श्टाउफनबेख म्हणाला, ‘मी काही आता परत कॉन्फरन्समध्ये जात नाही. लंचसाठी कमांडंटकडे जातो.’ पहिल्या चेक पॉइंटवरच्या गार्डने स्फोटाचा आवाज ऐकला होता. त्याने फाटक बंद केले आणि उघडायला नकार दिला. श्टाउफनबेख झपाट्याने गार्ड रूममध्ये गेला. तिथून त्याने फोन केला. फोन खाली ठेवला आणि शांतपणे सांगितले, ‘लेफ्टनंट, मला जाण्याची परवानगी आहे.’ बॅरियर उचलली गेली. श्टाउफनबेख व त्याचे सोबती फाटकातून बाहेर पडले. त्या वेळी १२.४४ झाले होते. काही क्षणांत अलार्म वाजला. दुसर्या बॅरियरजवळ श्टाउफनबेखने पुन्हा फोन केला. या वेळी कॅम्प कमांडंटच्या एडला, ‘मी कर्नल काउंट फॉन श्टाउफनबेख चेकपॉइंट साउथजवळून बोलतोय. स्फोटामुळे गार्ड मला जाऊ देत नाही. मला घाई आहे. जनरल फ्रॉम माझी वाट पाहत एअर फील्डवर थांबलेत.’ मग फोन खाली ठेवून सरळ खोटे बोलला, ‘सार्जंट मेजर, तुम्ही ऐकलेत. मला जाण्याची परवानगी आहे.’ पण सार्जंट मेजर फसायला तयार नव्हता. त्याने खात्रीसाठी फोन केला. सुदैवाने होकार आला.
श्टाउफनबेख आणि त्याचा अॅजटंट विमानतळावर पोहोचले तेव्हा एक वाजला होता. काही क्षणांतच त्यांचे हाइनखेल १११ उडाले. तीन तासांचा प्रवास होता. विमानाच्या रेडिओला रेंज नसल्याने बर्लिनमधले काही ऐकता येत नव्हते. ‘फेलगीबेलने बेंडलरश्ट्रास येथील कटवाल्यांना संदेश दिला का? दिला असल्यास बर्लिन ताब्यात घेऊन पश्चिम आघाडीवरच्या कमांडर्सना आधीच तयार असलेला संदेश पाठवण्याची हिंमत त्यांच्यात असेल का? असे प्रश्न त्याला सतावत होते.
ती तपकिरी रंगाची ब्रीफकेस टेबलाच्या आधाराच्या विरुद्ध बाजूला ढकलली गेली नसती तर हिटलर ठार झाला असता. स्फोटानंतर काही मिनिटांतच डॉक्टर आणि मदत-कर्मचारी कामाला लागले. गंभीर जखमींना रुग्णवाहिकांमधून रास्टेनबर्ग येथील फील्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हिटलरचा खासगी डॉक्टर हान्स कार्ल फॉन हॅसेलबाख याने त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्याच्या जखमा बांधल्या. उजवा खांदा फार पिळवटला होता म्हणून तो हात स्लिंगमध्ये घातला. मग हिटलर म्हणाला, ‘आता ते माझ्या हातात आहेत. आता मी कारवाई करू शकतो.’ डॉ. मोरेल आला. त्याने तपासले. हिटलर पुन:पुन्हा एकच बोलत होता, ‘मला काही झाले नाही. विचार करा! मला काही झाले नाही!’ हिटलरची नाडी नॉर्मल होती. हिटलरच्या तिन्ही सेक्रेटरी तो जिवंत आहे हे स्वत:च्या डोळ्यांनी पाहायला धावत आल्या. त्यानंतर आला हिमलर. त्यालाही वाटले होते की, बराकीत काम करणार्या कामगारांनीच बाँब बनवला असावा. व्हॅलिट लिंगे कॉन्फरन्स बराकीत गेला. तिथल्या सार्जंटकडून त्याला कळले की, श्टाउफनबेख बर्लिनहून अर्जंट कॉल येण्याची अपेक्षा करत होता. मग कोणाला तरी आठवण झाली, की श्टाउफनबेख याने टेबलाच्या खाली ब्रीफकेस ठेवली होती. एअरफील्डला केलेल्या टेलिफोनमुळे कळले, की श्टाउफनबेख दुपारी १ वाजल्यानंतर ‘लगबगीने’ बर्लिनला रवाना झाला.
आता हिटलरच्या लक्षात आले की, फक्त श्टाउफनबेख हाच स्फोटाला जबाबदार होता. हिटलरने त्याला पकडण्याचा हुकूम सोडला, पण तो बर्लिनला प्रक्षेपित झालाच नाही, कारण स्फोट झाल्यानंतर काही क्षणांतच हिटलरच्या एका अॅजटंटने हेडक्वार्टरचा सिग्नल्स ऑफिसर कर्नल झांडर याला संपूर्ण टेलिफोन आणि टेलिप्रिंटर दळणवळण तोडायला सांगितले. तसे त्याने केले. त्याने योग्य तेच केले, याच्याशी फेलगीबेल सहमत झाला. फ्यूरर हेडक्वार्टर अलग पाडायचे हे त्याचे काम होते. पण थोड्याच वेळात त्याला कळले की, हिटलर जिवंत आहे. त्याने स्वत:च्या ऑफिसला फोन केला आणि आपल्या चीफ ऑफ स्टाफला सांगितले, ‘काहीतरी भयंकर घडले आहे. फ्यूरर जिवंत आहे. सगळं ब्लॉक कर.’ चीफ ऑफ स्टाफ काय ते समजला. तोसुद्धा कटवाला होता. काही मिनिटांत फ्यूरर आणि आर्मी यांच्या हेडक्वाटर्सची मेन स्वीचेस निश्चेष्ट पडली.
या दळणवळण ब्लॅकआउटमुळे कटवाल्यांना बर्लिन काबीज करायला वेळ मिळाला होता, पण बेंडलरश्ट्रासमध्ये सगळा गोंधळ असल्यामुळे तसे घडले नाही. हिटलर ठार झाला की नाही हे निश्चित नसल्याने ते ऑपरेशन ‘वालक्यूऽरऽ’ सुरू करायला तयार नव्हते. वुल्फशांझेकडची खबर इतकी अस्पष्ट होती की, १५ जुलैच्या खोट्या इशार्याची पुनरावृत्ती करायला ते धजत नव्हते. ते सगळे जनरल स्टाफ इमारतीमध्ये श्टाउफनबेखची वाट पाहत होते. कटाचे दोन सर्वोच्च नेते जनरल लूडविश बेख आणि फील्ड मार्शल फॉन विट्झलीबन हे आधीच तयार केलेला जाहीरनामा व हुकूम जाहीर करत असायला हवे होते, पण त्यांच्यापैकी कोणी अजून बेंडलरश्ट्रासवर आलेला नव्हता. वुल्फशांझेमधून फेलगीबेलकडून आदेश यायची ते वाट पाहत होते. त्यात मोलाचा वेळ वाया चालला होता. तिकडून काहीच आदेश नव्हता.
दुपारच्या भोजनानंतर हिटलर वुल्फशांझेजवळच्या लहानशा रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेला. पाऊस तोंडावर येऊ नये यासाठी तोंडावर हॅट ओढून तो येरझार्या घालत होता. मुसोलिनीची ट्रेन येईपर्यंत त्याच्या येरझार्या चालल्या होत्या. मुसोलिनी स्वत: भुतासारखा दिसत होता. त्याने कसेबसे नवे फॅशिस्ट सरकार स्थापन केले होते, पण त्यासाठी त्याला हिटलरच्या दबावाखाली अनेक ‘दगाबाजां’ना ठार करावे लागले होते. त्यांच्यामध्ये त्याचा जावई काउंट झानो याचाही समावेश होता. हिटलर मुसोलिनीचा विचार करत नव्हताच. आपण वाचलो याचेच त्याला कौतुक होते आणि तेच तो मुसोलिनीला सांगत होता. त्याने मुसोलिनीला कॉन्फरन्स रूममध्ये नेऊन तिथला विध्वंस दाखवला. आपली चिरफळलेली विजार दाखवली. शेवटी हिटलर म्हणाला, ‘आपली परिस्थिती वाईट, अत्यंत वाईट आहे. पण आज इथे जे घडलं त्याने मला नवी हिंमत दिली आहे.’
श्टाउफनबेख बर्लिनबाहेरच्या विमानतळावर उतरला तेव्हा पहाटेचे जवळजवळ पावणेचार वाजले होते. ‘खुनाचा प्रयत्न यशस्वी झाल्यावर जो परवलीचा शब्द कळवायचा होता तो कळवला की नाही,’ हे जनरल ओलब्रिश्थला विचारता स्पष्ट उत्तर आले नाही. वालक्यूऽरऽ सक्रिय झालं नाही, हे श्टाउफनबेखच्या लक्षात आले. त्याने तत्काळ फोन करून बर्लिनला कळवले, ‘मी येईपर्यंत थांबू नका. सुरुवात करा.’ त्याने बर्लिनला जाण्यासाठी लुफ्टवाऽफऽची एक कार मिळवली. आता ओलब्रिश्थ कामाला लागला. त्याने बर्लिनचा वेअरमाख्ट कमांडंट जनरल कोर्ट्झफ्लाइश याला कळवले, ‘गार्ड्स बटालियन, श्पांडाव गॅरिसन, दोन शस्त्रास्त्र प्रशिक्षण केंद्रे यांना सज्ज करा. कोर्ट्झफ्लाइश कटात नव्हता, तरीसुद्धा त्याने हुकमाची तामिली केली. ओलब्रिश्थने कामाला वेग आणण्यासाठी बर्लिन गॅरिसनचा कमांडर जनरल हाझे याला हलवले. चार वाजून दहा मिनिटांनी त्याचे सैन्य कूच करायला सज्ज झाले. ओलब्रिश्थने सगळ्या कमांडर्सना हुकूम दिला होता, की एस. एस. पथके घुसायला लागली तर बळ वापरा. काही मिनिटांत सगळी वाहतूक बंद झाली. बाहेर पडण्याचे सगळे मार्ग रोखण्यात आले.
ओलब्रिश्थ आता जे करत होता ते त्याने तीन तासांपूर्वी करायला हवे होते. त्याने जनरल फ्रॉमवर झडप घातली. ‘मिलिटरी डिस्ट्रिक्ट कमांडर्सना वालक्यूऽरऽ सुरू झाल्याचे हुकूम सोड’, असा त्याला हुकूम दिला. फ्रॉम हा कटातही नाही आणि बाहेरही नाही असा माणूस होता. त्याने खायटेलला फोन करून हिटलर मेल्याची खातरजमा करून घेण्याचा हट्ट धरला. खायटेलने सांगितले, ‘सगळा वाह्यातपणा आहे. हिटलर जिवंत आहे. जरासा जखमी झाला आहे. पण तुझा चीफ ऑफ स्टाफ फॉन श्टाउफनबेख कुठे आहे?’ फ्रॉम म्हणाला, ‘तो अजून माझ्याकडे आला नाही.’
बहुतेक कटवाले ओलब्रिश्थच्या ऑफिसात जमून श्टाउफनबेखची वाट पाहत होते. श्टाउफनबेखने सांगितले, ‘आपण मोठा स्फोट, ज्वाळा नि धूर पाहिला. हिटलर मेला. आता आणखी एक क्षण वाया न घालवता कामाला लागले पाहिजे. आणि हिटलर जिवंत असला तरी त्याची सत्ता उलथण्यासाठी शिकस्त केली पाहिजे.’ जनरल बेखने होकार भरला. श्टाउफनबेखने त्याचा मावसभाऊ जनरल फॉन स्ट्युल्पनागेल याला पॅरिसमध्ये फोन लावला. त्याला श्टाउफनबेखने स्फोटाबद्दल सांगितले. श्टाउफनबेखने सिग्नल्स ऑफिसरना, त्याच्या बर्लिनबरोबरच्या लाइन्स वगळता फ्रान्स व जर्मनी यांच्या दरम्यानचे टेलिफोन दळणवळण कापायला सांगितले.
बेंडलरश्ट्रासमध्ये श्टाउफनबेख फ्रॉमला हिटलर मेला हे पटवण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, ‘खायटेल नेहमीप्रमाणे खोटे बोलतोय. मी स्वत: मेलेल्या हिटलरला उचलून नेताना पाहिला.’ हे अर्थातच खोटे होते. ओलब्रिश्थने सगळ्या मिलिटरी डिस्ट्रिक्ट्सना ‘आपण’ वालक्यूऽरऽ संदेश पाठवल्याचे सांगताच, फ्रॉम टेबलावर मुठी आदळत ओरडला, ‘हा शुद्ध आज्ञाभंग झाला. ‘आपण’ म्हणजे काय?’ फ्रॉमने वॉलक्यूऽरऽ अॅलर्ट रद्द करण्याचा हुकूम दिला. फ्रॉम श्टाउफनबेखला म्हणाला, ‘प्रयत्न फसला. तू ताबडतोब स्वत:ला गोळी घालून घे.’ श्टाउफनबेखने नकार दिला. ओलब्रिश्थ फ्रॉमला म्हणाला, ‘आताच प्रहार केला पाहिजे, अन्यथा जर्मनीचा कायमचा सर्वनाश होईल.’ फ्रॉमने त्याला विचारले, ‘याचा अर्थ ओलब्रिश्थ, तू सुद्धा?’ ओलब्रिश्थने होकार दिला. त्यावर फ्रॉम म्हणाला, ‘मी तुम्हाला औपचारिक अटक करतो.’ ओलब्रिश्थ म्हणाला, ‘तू आम्हाला अटक करू शकत नाहीस. आम्हीच तुला अटक करतो.’