ज्येष्ठ पत्रकार व ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत अखेर अनंतात विलीन झाले. सतत वाचन, चिंतन, मनन व त्याचबरोबर अविरत लेखन हा त्यांचा ध्यास होता आणि पत्रकारिता हाच त्यांचा श्वास होता यात अजिबात अतिशयोक्ती नाही. कारण लेखनाशिवाय ते राहूच शकत नव्हते. लेखनाने विविध पैलू असलेले हे भन्नाट व्यक्तिमत्त्व. वैज्ञानिक विषयांपासून ऐतिहासिक विषयांपर्यंत आणि गुन्हेगारी विषयांपासून सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, कलाविषयक घटनांपर्यंत चिकित्सक आणि संशोधन वृत्तीने वेध घेऊन ते कसे काय लिहितात हे अनेकांना पडलेलं कोडं होतं. मराठीप्रमाणेच इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, विविध ग्रंथांचा व्यासंग, विनोदी आणि मिश्किल स्वभाव, साधी राहणी आणि सडेतोड वृत्ती ही त्यांची ठळक वैशिष्ट्यं त्यांच्या लेखनातून आणि राहणीमानातून दिसत होती.
काळा चौकीतील दिग्विजय मिल कंपाऊंडमधील बैठ्या चाळीतील छोटेखानी घराच्या खिडकीपाशी बसून त्यांचं लिखाण सुरू असे. विद्वानांच्या घोळक्यात आणि गुंडांच्या टोळक्यात तितक्याच सहजपणे वावरण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ‘भीती’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशातून कधीच अदृष्य झाला होता. प्रबोधनकारांच्या तालमीत तयार झालेल्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या सहवासाने पावन झालेल्या पंढरीनाथांनी विविध विषयांवर पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांचं ‘मी पंढरी गिरणगावचा’ आत्मचरित्रपर पुस्तक २०२२मध्ये प्रकाशित झालं. ‘हे आत्मचरित्र म्हणजे विसाव्या शतकाचा अर्ध्याहून अधिक भागाचा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो व तो सर्वांनी त्याच नजरेने वाचला पाहिजे’ असा आशीर्वादही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी त्यांना दिला. त्यात त्यांच्या पत्रकारितेच्या जीवनाच्या विविध वळणं घेत झालेला प्रवास जसा आहे तसाच त्यांच्यातील निसर्ग चित्रकारिता, फोटोग्राफी आणि व्यक्तिचित्रकलेची (पोट्रेट) झलकही आढळते. त्यांच्या चित्रांचं प्रदर्शनही काही वर्षांपूर्वी नरीमन पॉइंटला भरलं होतं.
एखाद्या तरुणाच्या उत्साहाने त्यांची लेखनसाधना अगदी गेल्या महिन्यापर्यंत सुरू होती. इतक्या विविध गुणांचा समुच्चय असलेलं हे व्यक्तिमत्व घडलं तरी कसं याचं कुतुहल त्यांचं पुस्तक वाचून बर्याच प्रमाणात शमत असलं तरी त्यांना घडवण्याचं, पत्रकारितेत योग्य दिशा दाखवण्याचं, कठीण प्रसंगांना भिडण्याचं, बेडरपणे लढण्याचं सामर्थ्य केवळ प्रबोधनकारांनी आणि शिवसेनाप्रमुखांनी दिलं. ज्या ज्या वेळी पंढरीनाथांच्या जिवावर बेतलं, बायपास सर्जरी, पेसमेकर यांची गरज भासली, त्या त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी काय काय केलं हे फक्त त्यांना आणि त्यावेळी केईएम वॉर्ड नं. पाचचे शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. रवी बापट यांनाच माहीत! हा माणूस माझ्यासाठी आणि शिवसेनेसाठी जगला पाहिजे हा बाळासाहेबांचा ध्यास होता. त्यांच्या ज्ञानाची, कलेची, विद्वत्तेची आणि निरीच्छ वृत्तीची कदर बाळासाहेबांना होती. म्हणूनच बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ची धुरा त्यांच्या हाती दिली. त्यावेळी त्यांच्यातील विश्वासाचं नातं अधिक दृढ होत गेलं. बाळासाहेबांचा तो विश्वास त्यांनी अखेरपर्यंत जपला.
महाड तालुक्यातील विन्हेरे हे त्यांचं गाव. सभोवतालचा निसर्ग त्यांनी डोळ्यात, मनात आणि हातात-बोटांत जपलेला. चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत दाखल झालेले पंढरीनाथ वेगवेगळ्या नोकर्या करीत जी. डी. आर्ट आणि डीटीसी (चित्रकला शिक्षकाची परीक्षा) उत्तीर्ण झाले. मुंबई महापालिकेच्या उर्दू शाळेत चित्रकला शिक्षक झाले. नामांकित चित्रकार होण्याची स्वप्नं पाहात असताना त्यांची गाठ प्रबोधनकारांशी पडली आणि सारं चित्रच बदलून गेलं. प्रबोधनकारांच्या तालमीत त्यांनी पत्रकारितेचे धडे घेतले. प्रबोधनकार त्यांना म्हणाले होते, टेबलाला बांधून घेऊ नकोस. पत्रकारिता करताना सगळीकडे फिरता येईल, प्रदेश माणसे पाहता, अनुभवता येतील अशा नोकर्या कर. त्याप्रमाणेच ते वागले. ‘मार्मिक’ वगळता कोणत्याही नियतकालिकात ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिले नाहीत, परिणामी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरताना पुष्कळ माणसे राजकारण्यांपासून विविध थरातले लोक आणि विपुल ज्ञान त्यांना अनुभवायला मिळालं. ‘ज्येष्ठ पत्रकार’ हे सार्थ बिरुद त्यांच्या पाठीशी लागलं, पण ऐश्वर्य मिळालं नाही. पैसा कमावून धनसंचय करता आला नाही. सरकारी कोट्यातून फ्लॅट मिळवता आला नाही, किंबहुना त्यांना तो नकोच होता. आपल्या बैठ्या चाळीतील घरात आपल्याला सुखाने जगता येतं, स्वाभिमान जपून राहता येतं, सुखाची झोप लागते यातच आनंद मानताना त्या साध्या राहणीचा तोराही कधी त्यांनी मिरवला नाही. बाळासाहेबांनी पुकारलेल्या शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग होता. ‘मार्मिक’मधून त्यांचं स्तंभलेखन गाजलं. ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक झाल्यावर बाळासाहेबांना त्यांनी लेखनातून मोलाची साथ दिली. त्यांच्या ‘टोच्या’ने तर अनेक राजकीय पुढार्यांची वस्त्रे कोपरखळ्या मारत उतरवली. ‘टोच्या’ हे टोपणनाव त्यांना ‘मार्मिक’चे तत्कालीन सहसंपादक, व्यंगचित्रकार, पट्टीचे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी दिलं होतं, प्रबोधनकारांकडे त्यांनी बातमीचा श्रीगणेशा केला. त्यातून त्यांची शोधपत्रकारिता जन्मास आली.
पंढरीनाथांनी ‘मार्मिक’मध्ये नसताना ‘श्री’ साप्ताहिक, ‘लोकमत’, ‘पुढारी’, ‘प्रभंजन’, ‘चित्रलेखा’, ‘मराठी ब्लिट्झ’ यांसारख्या साप्ताहिकांतून, नियत-अनियतकालिकांत विपुल लेखन केलं. प्रबोधनकारांच्या शिकवणीनुसार सार्या महाराष्ट्रात तसंच देशातील विविध भागांत फिरून तिथल्या समस्या, प्रश्न यांचा अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शोधपत्रकारिता करताना अनेकांची बिंगे उघडी पाडली. बनावट सौंदर्यप्रसाधनांचं भांडं फोडलं. १९७२ला महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या कहाण्या पाथर्डी, वांबोरी, सोनई, लाखेच्या कालव्यापर्यंत जाऊन लिहिल्या. दुष्काळातही अकलुजला शंकररावांनी पाण्याचं नियोजन करून फुलवलेले उसाचे मळे पाहिले. नगर जिल्ह्यात आणि श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्यांची मातापूर ते मातीपूर मार्गावरची शेतकर्यांची ऊस पिकाची किमया पाहिली. त्यावर लिहिले, त्यातील उणीवा दाखवल्या, त्यावर सूचना केल्या. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावून त्यांच्या कामगिरीला दाद दिली. शरद जोशींच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या शेतकरी दिंडीचा त्यांचा मजेशीर वृत्तांत गाजला. ‘माढ्याचा की पंढरीचा? कोणता विठोबा खरा?’ यावर त्यांनी संशोधकांच्या साक्षी घेऊन सादर केलेला वृत्तांतही गाजला. खोमेनी आणि मुंबईतला अंडरवर्ल्ड डॉन मन्या सुर्वे याची त्यांनी ‘श्री’साठी काढलेली पोट्रेट म्हणजे त्यांच्या चित्रकलेतील प्रभुत्वाचा अर्क होता.
आणीबाणीनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांनी ‘श्री’साठी घेतलेली मुलाखतही अंकाचा खप दीड लाखांवर घेऊन गेली. ‘श्री’चा राजीनामा देऊन संभाजीनगरच्या ‘लोकमत’मध्ये ते आले, तेव्हा रोजगार हमीच्या कामातील भ्रष्टाचार त्यांनी पुराव्यासकट बाहेर काढला आणि संबंधितांना शिक्षाही झाली. बिहारच्या दौर्यात झालेली जयप्रकाश नारायण यांची भेट, त्यांच्या सभेच्या छायाचित्रांसह त्यांची तिथल्या सर्व पत्रकारांना पुरवलेला त्या सभेचा वृत्तांत, नेपाळच्या सीमेवर होणारी तरुण मुलींची विक्री इत्यादी बिहार दौर्यातील त्यांचे वृत्तांतही वाचनीय होते. चिपळूणजवळील झोंबडी गावातील हातभट्टीची विषारी दारू पिऊन मृत्यू पावलेल्यांची हकीकत, इंदूरला सागर जिल्ह्यात न बांधलेल्या दहा मंदिरांचा वृत्तांत मिळवण्यासाठी झालेला फुकटचा मन:स्ताप, मराठवाड्यातील विद्यापीठ नामांतराच्या दंगलीत झालेला हिंसाचार आणि जाळपोळीचा वृत्तांत, १९८३, १९८९चा जलप्रलय, राजापूरच्या गंगेची हकीकत, १९९३ला झालेल्या मराठवाड्यातील भूकंपाच्या कहाण्या, खार जमिनीचा प्रश्न असे अनेक विषय हाताळताना पंढरीनाथांमधील जागरूक पत्रकार सतत डोकावत असे. या प्रवासात त्यांना भेटलेल्या माणसांबद्दल त्यांनी भरभरून लिहिले आहे आणि ढोंगी माणसांची बिनपाण्याने केली आहे.
प्रबोधनकारांच्या सांगण्यानुसार १९७२ साली त्यांनी ‘मार्मिक’ सोडला. विविध नियतकालिकांमध्ये काम केल्यानंतर १९८४-८५ला ते मुंबईत परतले, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना पुन्हा ‘मार्मिक’चं कार्यकारी संपादक केलं. २०१९मध्ये ते ‘मार्मिक’मधून निवृत्त झाले. बाळासाहेब गेल्यावर आत्माच हरपल्यासारखी त्यांची स्थिती झाली होती. तरीही बाळासाहेबांनी आणि प्रबोधनकारांनी दिलेल्या आत्मबळाच्या जोरावर त्यांची लेखणी तळपत राहिली. विज्ञान, जागतिक युद्ध, हिटलर, हिटलरचे अवतार, शेरलॉक होम्स, ड्रॅक्युला, नोस्त्रादामस इ. त्यांचे लिहिण्याचे आवडते विषय होते. त्यांच्यावरील पुस्तके आणि काहींचे अनुवादही प्रसिद्ध आहेत.
अतिशय छोट्या, मुंगीच्या आकाराच्या अगदी सरळ रेषेत असलेल्या, त्यात कुठेही खाडाखोड नाही इतकी विचारांशी ठाम असलेली त्यांची वळणदार अक्षरांची कॉपी हा त्यांच्या कलात्मक लिखाणाचा नमुना होता.
ते उत्तम गायकही होते हे फारसं कुणाला माहीत नसेल. ‘सामना’, ‘हिंदी सामना’ आणि ‘मार्मिक’मधील पत्रकार-पत्रकारेतर कर्मचार्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रबोधन प्रकाशनतर्फे २०१५च्या सुमारास रवींद्र नाट्यमंदिरात ‘झाली फुले कळ्यांची’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पंढरीनाथांनी गायलेल्या हिंदी चित्रपटगीतांना श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. शास्त्रीय संगीतापासून भावगीतांपर्यंत अनेक प्रकारच्या गीतांचा संग्रह त्यांच्याकडे होता. ‘मार्मिक’मधील सहकार्यांचे गुण हेरून त्यांची ‘सदरे’ त्यांनी सुरू केली. अनेकांना आर्थिक अडचणीत त्यांनी आपल्या परीने सहाय्यही केलं. त्यांच्या निधनाने विविध विषयांवर सफाईने लेखन करणारे, आजच्या पिढीसमोर निर्भीड पत्रकारितेचा आदर्श ठेवणारे सिद्धहस्त पत्रकार व्यक्तिमत्व हरपलं आहे.
– श्रीकांत आंब्रे
(लेखक साप्ताहिक ‘मार्मिक’चे निवृत्त सहसंपादक आहेत.)