शिवसेनाप्रमुखांचा जन्म ठाकरेंच्या घरात झाला तेव्हा प्रबोधनकारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. ठाकरे कुटुंबांने आपलं सर्वस्व प्रबोधनच्या होमात समर्पित केलं होतं. कधी कधी तर उपासमारीची पाळी येई. शिवसेनाप्रमुखांच्या जडणघडणीत या काळाचा विचार मात्र कधीच होत नाही.
– – –
२३ जानेवारी १९२६ला शिवसेनाप्रमुखांचा जन्म झाला, त्या काळात प्रबोधनकार सर्व प्रकारच्या भेदभावांच्या विरोधात निकराने संघर्ष करत होते. प्रबोधनमधल्या त्यांच्या लिखाणाला नवी धार आली होती. कारण पुण्यामध्ये ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर संघर्षही टोकाला पोहोचला होता. एकामागून एक संकटं येत होती. पण प्रबोधनकार त्यांचा धीराने सामाना करत होते. त्यात त्यांना त्यांच्या पत्नीची साथ होती. चार मुलींच्या पाठीवर मुलाचा जन्म झाल्याने ठाकरेंच्या घरात आनंदाला पारावार उरला नव्हता. केशवराव आणि मातोश्री रमाबाईंनी त्यांच्या मुलाचं नाव बाळ ठेवलं. त्याविषयीचे संदर्भ आपण पाहिले. श्रीकांतजी ठाकरेंच्या आठवणींमध्ये उल्लेख येतो त्याप्रमाणे,दोघांनीही ते बाळ जगदंबेच्या ओटीत ठेवले नि म्हणाले, हे बाळ तुझे, तुझ्या स्वाधीन केलेय! म्हणून त्या बाळाचं नाव बाळ असे ठेवलं.
प्रबोधनकार आणि रमाबाई या दाम्पत्याला एकूण दहा मुलं झाली. ज्ञानेश महाराव यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या मुलाखतींच्या आधारे लिहिलेल्या ठाकरे फॅमिली या पुस्तकात या दहा मुलांची माहिती आहे, ती अशी, प्रबोधनकार सुधारक विचारांचे आणि कृतीचे. आधुनिक समाजप्रयोगांवर, घडामोडींवर त्यांची बारीक नजर असायची. त्याचा अभ्यासही करायचे! तेव्हा र.धों. कर्वे यांनी मोठ्या जिद्दीने चालवलेला कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम प्रबोधनकारांना ठाऊक नव्हता, असं कसं आपण म्हणायचं? तरी प्रबोधनकारांना एकूण दहा अपत्ये! सुधा (सुळे), १९९३मध्ये निधन झालेल्या प्रमिला (टिपणीस), सुशीला (गुप्ते), १९९५च्या प्रारंभी निधन झालेल्या सरला (गडकरी)- त्यांना ठाकरे फॅमिली हिरुताई अशी हाक मारत आणि जन्मानंतर काही महिन्यांतच निधन झालेल्या लीला ह्या पाच बहिणींनंतर बाळासाहेबांचा जन्म झाला. त्यांच्या पाठीवर दिवाकर नावाचा भाऊ होता. त्याला घरातले बबन म्हणायचे. पण तो अडीच वर्षांचा असताना त्याला एकाएकी ताप भरला. नंतर फिटस् येऊ लागल्या नि त्यातच त्याचा अंत झाला… म्हणजे बाळासाहेबांनंतर दिवाकर आणि त्याच्यानंतर श्रीकांतजी. श्रीकांतजी सांगतात, ‘आम्हा सर्व भावंडांत आईचं सुख मला अधिक मिळालं.’ कारण त्याच्यानंतर आठ वर्षांनी संजीवनी (करंदीकर) आणि नंतर शेंडेफळ रमेश.
या परिच्छेदात प्रबोधकारांना कुटुंब नियोजनाची माहिती असल्याची शक्यता वर्तवली आहे. ती खरीच आहे, कारण प्रबोधनच्या दुसर्या वर्षाच्या अंकातच कुटुंबनियोजनाचा परिचय करून देणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. तरीही प्रत्येक विचारवंताला काळाच्या आणि परिस्थितीच्या काही मर्यादा असतातच. तशा त्या प्रबोधनकारांनाही होत्या. प्रबोधनकारांच्या वयाच्या ४१च्या वर्षी बाळासाहेबांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांना चार मुलं झाली. त्यामुळे नाव बाळ असलं तरी कुटुंबातला सगळ्यात मोठा मुलगा म्हणून बाळासाहेबांच्या खांद्यावर अनेक जबाबदार्या आपसूक आल्या. शिवसेनाप्रमुखांचा जन्म झाला तेव्हाच घरात ठाकरे दाम्पत्यासह पाच मुलं आणि रमाबाईंच्या मातोश्री असे एकूण आठ जण होते. कमावणारा एक आणि खाणारे आठजण अशी ठाकरेंच्या घराची परिस्थिती होती.
आधीच बेताच्या असलेल्या आर्थिक परिस्थितीत प्रबोधनकारांवर एकामागून एक संकटं येत होती. तेजाबी लिखाणामुळे ही संकटं येणारचं होती. पण परिस्थितीने त्यांचा परखड लेखणीला कधीच लगाम घातला नाही. शिवाय ते ब्राह्मणेतर चळवळीची वैचारिक भूमिका मांडत असले, तरी ते कोणत्याही सामाजिक संघटनेचे किंवा राजकीय पक्षाचे सदस्य नव्हते. ते समतेचे एकांडे शिलेदार होते. आलेली संकटं निधड्या छातीने आणि एकट्याने झेलत होते. पण टेम्प्ट्रेस पुस्तिकेमुळे आलेल्या बदनामीच्या खटल्यामुळे त्यांच्यावर आलेलं संकट मोठं होतं. कोर्टबाजीत पैसा जाणार होता आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. शनिमाहात्म्य या ग्रंथात प्रबोधनकारांनी तेव्हाची परिस्थिती वर्णन केली आहे. ती अशी, टेम्पट्रेस खटल्याच्या सबबीवर पांढर्याफेक नीतिमंतांच्या सोनेमोल मातीचे पिवळेधमक चलनी नाणे कायदेबाजीच्या टाकसाळीत घडत असतानाच, प्रबोधनाचे तरुण सहसंपादक बापूसाहेब चित्रे कल्याण मुक्कामी क्षयाला बळी पडले. बापूसाहेबांच्या मृत्यूने माझा उजवा हात लंजूर झाला आणि खटल्याने द्रव्यशोष करून डावा हात तोडला. खलास! पुन्हा मी हातपाय तुटून खास शनीच्या अड्ड्यात `चौरंगा होऊन पडलो!`
बापूसाहेब चित्रेंच्या जाण्याने प्रबोधनकारांना मोठा धक्का बसला. तरीही इतर सहकार्यांच्या मदतीने प्रबोधनकारांनी पुढे वर्षभर प्रबोधन मोठ्या ताकदीने चालवलं. त्यासोबत लोकहितवादी नावाचं साप्ताहिकही चालवलं. पण हे करताना प्रबोधनकारांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची होती, ती`शनिमाहात्म्य` या पुस्तकातच अशी येते, त्या १।।। वर्षात लक्ष्मी माझ्यावर इतकी रूष्ट झाली की `नच सुंदरी करू कोपा मजवरी धरि अनुकंपा म्हणून मी तिची परोपरीने समजूत केली; पण व्यर्थ! केलेला प्रत्येक प्रयत्न सपशेल ठेचाळला. पुढे टाकलेले प्रत्येक पाऊल मागेच पडू लागले. व्यवहाराचा आव सांभाळण्यासाठी गृहलक्ष्मीनेही आपल्या सर्व मौल्यवान स्वधनाचा स्वयंस्फूर्तीने होम करून, ती केवळ मंगळसूत्राची लंकेची पार्वती बनली. उपासमारीचेही काही प्रसंग अनुभवले, तथापि श्री हरीचे नाव घेऊन नेटाने कारभार रेटीत होतो.`
हे वर्णन १९२६ आणि १९२७ सालचं आहे. म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला, त्या वर्षी ठाकरे कुटुंब अत्यंत हलाखीत जगत होतं. प्रबोधनकारांनी जे काही कमावलं होतं आणि रमाबाईंनी जे काही सांभाळलं होतं, ते प्रबोधनच्या होमात अर्पण केलं होतं. ठाकरे कुटुंबाने केवळ समाजहितासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. त्या काळच्या रीतीनुसार सरकारी नोकरी करून सुबत्ता मिळवणं प्रबोधनकारांसाठी कठीण नव्हतचं. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रबोधनसाठी त्यांनी उलट सरकारी नोकरी सोडली होती. घरात पाच लहान मुलं आहेत, त्यापैकी एक तर वर्ष दीड वर्षाचा आहे. तरीही घरात अधूनमधून उपासमारीची वेळ येत आहे. अशा परिस्थितीतही प्रबोधनकारांनी पाठीचा कणा कधी झुकवला नाही. कुणासमोर शरण गेले नाहीत. ते लढत राहिले.
पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेवला म्हणून ज्यांच्या घरात साधी सायकलही नव्हते, ते प्रायवेट जेटने फिरू लागलेले आपण पाहिलेत. केवळ ठाकरे नावाच्या पुण्याईवर लाखो जणांच्या घरावर सोन्याची कौलं चढल्याचंही आपण पाहिलं. पण त्या सगळ्यांना शिवसेनाप्रमुखांना लहानपणी दोन वेळ जेवणाचीही ददात होती, हे माहीत नसतं. पुढची आणखी दहाएक वर्षं तर परिस्थिती आणखी बिघडली. पुण्यात असेपर्यंत तर निदान हक्काचा निवारा तरी त्यांच्या डोक्यावर होता. पुढे नाटक कंपनीबरोबर पोटापाण्यासाठी गावोगाव भटकावं लागलं. कधी मामाकडे अचलपूरला तर कधी धाकट्या काकाकडे मुंबईत आश्रित म्हणून राहावं लागलं. शिवसेनाप्रमुखांनी प्रबोधनकारांचा विचार का उचलला नाही, हा प्रश्न विचारणारे शिवसेनाप्रमुखांच्या या जडणघडणीच्या काळातली परिस्थिती लक्षात घेत नाहीत. सत्यशोधनाचा निखारा पदराला बांधल्यावर होणारी कुटुंबाची होरपळ त्यांनी लहानपणी अनुभवली होती. तरीही त्यांनी तेच आयुष्यभर भोगावं, ही अपेक्षा प्रबोधनकारांची हलाखीची परिस्थिती करणार्या समाजाला विचारायचा अधिकारच नव्हता. यात प्रबोधनकारांचंही काही चुकलं नव्हतं, ना शिवसेनाप्रमुखांचं. त्यात चूक असेलच तर निबर मराठी समाजाची होती. प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख ही दोन्ही स्वतंत्र कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होती. त्यांनी त्यांच्या त्यांच्या काळावर आपला ठसा उमटवला.
प्रबोधनकारांच्या निधनाआधी काही महिने १७ सप्टेंबर १९७३ ला `माझी जीवनगाथा`चं प्रकाशन झालं. त्या कार्यक्रमात प्रबोधनकारांचं अखेरचं भाषण झालं. त्यात त्यांनी सांगितलंय, `माझा नि माझ्या आई वडील, आजी आजोबांचा संप्रदाय वेगळा होता. बाळने आपला संप्रदाय काढलाय. शिवसेना शब्द घेऊन हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्याची झुंज सुरू आहे. ह्या कार्यात तो माझ्या शतपट पराक्रम करील, याचा मला अभिमान वाचतो. `आपल्या मुलाच्या पराक्रमाचा प्रबोधनकारांना अभिमान होताच. त्या पराक्रमाचा पाया त्यांनीच रचला होता. पण त्याचबरोबर त्या दोघांचे संप्रदाय निराळे आहेत हेही त्यांना माहीत होतं. ते बाळासाहेबांनाही माहीत होतं. त्यामुळेच आपण प्रबोधनकारांचा वारसा चालवतोय, असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. तरी त्यांच्या झोपण्याच्या खोलीत त्यांच्या समोर प्रबोधनकारांचाच फोटो अखेरपर्यंत होता. सकाळी उठल्यावर ते पहिला नसस्कार प्रबोधनकारांनाच करत.
हे समजून घेत असताना, प्रबोधनकारांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा उल्लेख कुठे केला आहे, याचा शोध घेणं इंटरेस्टिंग आहे. स्वतःच्या लहान मुलाचा उल्लेख प्रबोधनातल्या लिखाणात किंवा आत्मचरित्रात करावा, असा काही प्रबोधनकारांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे प्रबोधनकारांच्या समकालीन लेखांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख येत नाही. आपल्याला बाळासाहेबांचं नाव दिसतं ते त्यांचा जन्म झाल्यानंतर अडीच वर्षांनी प्रकाशित झालेल्या प्रबोधनकारांनी लिहिलेल्या`शनिमाहात्म्य` या पुस्तकात. या पुस्तकातल्या दोन प्रकरणांत प्रबोधनकारांनी शिवसेनाप्रमुखांच्या जन्माच्या आधी आणि नंतर असा जवळपास दशकभराचा आत्मचरित्रात्मक प्रवास मांडला आहे. त्यातही हा उल्लेख नाही. तरीही या पुस्तकाच्या पहिल्या पानावरच शिवसेनाप्रमुखांचं नाव येतं. तेही प्रकाशक म्हणून. कारण हे पुस्तक छापणारी प्रबोधनकारांची प्रकाशन संस्था आहे, बाळ आणि कंपनी, मुंबई नं. १४.