देशाची राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाने आम आदमी पक्षाची सत्ता संपुष्टात आणून बहुमतासह झेंडा रोवला आणि एक चमत्कार घडून आला… देशात कोण कोणाशी युती/ आघाडी करील ते सांगता येत नाही, पण ज्यांच्यात निश्चितपणे आघाडी होऊ शकत नाही, अशा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे समर्थक या निकालाने आनंदित झाले!
भाजपने निवडणूक जिंकली आहे, त्यामुळे त्यांचा आनंद समजू शकतो. आप हा पक्ष आणि अरविंद केजरीवाल हा नेता त्यांच्या डोळ्यांत कुसळासारखा सलत होता; देश ताब्यात आहे, पण राजधानी दिल्ली आपल्या ताब्यात नाही, याच्यामुळे भाजपच्या गोटात कायम अस्वस्थता असायची. ती आता शांत झाली. पण, काँग्रेसच्या गोटात आनंद का व्यक्त व्हावा? निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. तरी त्यांच्या गोटात आनंद आहे, तो पाहुण्याच्या काठीने (भाजपची एकंदर ताकद पाहता काठी नव्हे खांबच म्हणायला हवे) साप मारला गेला याचा. त्यात फटका बसून आपल्या नाकाचाही चेंदामेंदा झाला, याचं वाईट वाटत नाही त्यांना.
आप हा पक्ष आणि केजरीवाल हा नेता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच उभं केलेलं भूत आहे आणि ही भाजपचीच बी टीम आहे, असं काँग्रेसचे लोक म्हणतात. आता दिल्लीच्या निवडणुकीत मात्र मतं कापणारी काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, असा शोध आप समर्थकांना लागला आहे… ठिकठिकाणी बी टीम बदलत राहतात, ए टीम एकच आहे आणि ती देशासाठी धोकादायक आहे, याचं भानच या साठमारीत या पक्षांना राहिलेलं नाही.
यात काँग्रेसने ‘आप’ला बी टीम म्हणण्याला काही अर्थ निश्चित आहे. एकतर संघाने स्पॉन्सर केलेलं आणि देशाला सर्वार्थाने र्हासाकडे घेऊन गेलेलं अण्णा हजारे यांचं आंदोलन आणि त्यातून उभे राहिलेले सगळेच नेते, यांच्याकडे संशयाने पाहण्यासारखीच परिस्थिती आहे. रामदेव बाबा, किरण बेदी, कुमार विश्वास यांच्यापासून केजरीवालांपर्यंत सगळेच यात येतात. ना त्यांना लोकपाल मिळाला, ना भ्रष्टाचारात काही फरक पडला, ना देशाची कोणत्याही बाबतीत प्रगती झाली. अण्णांना तर थेट कचर्याच्या डब्यात फेकून दिल्यासारखं दूर करून टाकलं गेलं. आता बिचारे निवडणुकीच्या तोंडावर मनातल्या टेलिप्रॉम्प्टरवर उमटवले जातील ते शब्द उच्चारून ए टीमच्या स्क्रिप्टमधली आपली नगण्य भूमिका वठवत राहतात.
केजरीवालांकडून लोकांना आशा होती. पहिल्याच निवडणुकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारे, भ्रष्टाचार संपवण्याचा विडा उचललेले, स्वस्त वीज आणि मोहल्ला क्लिनिक, उत्तम शाळा यांच्या माध्यमातून दिल्लीकरांचा विश्वास जिंकून घेणारे, सर्वसामान्य माणसासारखे दिसणारे, वागणारे, बोलणारे अरविंद केजरीवाल त्या काळात मध्यमवर्गाचे डार्लिंग बनलेले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी आणलेल्या उदारीकरणाचे फायदे लुटून गब्बर बनलेल्या कृतघ्न मध्यमवर्गाला जसा देशहितापेक्षा धार्मिक विद्वेषाचा गांजा महत्त्वाचा वाटू लागला, तसतसे केजरीवालही सावधपणे मधली वाट चालत राहिले. सीएए, एनआरसी आंदोलनापासून अनेक वेळा त्यांनी चतुर भूमिका घेऊन तात्पुरती सुटका मिळवली, पण, मुक्तिबोधांच्या भाषेत ‘पार्टनर, तुम्हारी
पॉलिटिक्स क्या है’ या प्रश्नाला केजरीवालांकडून नि:संदिग्ध उत्तर मिळत नव्हतं. इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांच्याइतकाच बेभरवशाचा भिडू केजरीवाल हेच होते … त्यांनी गुजरातसह अनेक ठिकाणी ताकद नसताना उमेदवार उभे करून काँग्रेसची हानी केली, तेव्हा त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा शिक्का बसला आणि केजरीवालही संधी मिळाल्यास दुसरे मोदीच ठरण्याची शक्यता आहे, हे कायमच दिसत राहिलं. आता त्यांच्याच औषधाचं थोडं चाटण काँग्रेसने त्यांना पाजलं आहे आणि किमान १० जागांवर त्यांच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला आहे. काँग्रेसने आपली पूर्वीची ताकद विसरून केजरीवालांकडे फारच कमी जागा मागितल्या होत्या, त्या दिल्या असत्या तर आज विधानसभेत चित्र काही वेगळं दिसलं असतं.
भाजपने ही निवडणूकही जिंकली, याचं अनेकांना फार कौतुक वाटतं. या पक्षाने आणि त्याच्या विचारधारेने लोकशाहीचा अर्थ सर्व प्रकारचे फंडे वापरून निवडणूक जिंकणं इतका स्वस्त, संकुचित आणि घातक करून टाकला आहे, यात कौतुकास्पद काय आहे? ज्या प्रकारे राक्षसी बळ घेऊन हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, अपप्रचार करतो, विरोधी नेत्यांबद्दल सरळसरळ खोट्या गोष्टी पसरवतो, त्यांच्या रेवड्यांना नावं ठेवत त्याहून मोठ्या रेवड्या वाटतो, निवडणूक आयोगाला ताटाखालचं मांजर बनवून निवडणूक काळात मतदारांवर परिणाम करणार्या घोषणा करतो आणि पंतप्रधानांचं सवस्त्र कुंभस्नान मतदानाच्या दिवशी टेलिकास्ट करतो, ते सत्तेची निर्लज्ज राक्षसी लालसा दाखवणारंच आहे. शिवाय इथेही महाराष्ट्राप्रमाणेच मतदारयाद्यांचा घोळ आहेच. अचानक वाढलेले आणि कमी झालेले मतदार ही एक युक्ती आहेच.
आप आणि केजरीवाल यांना कितीही नावं ठेवली तरी दिल्लीकरांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं. दिल्लीतल्या प्रदूषणाला काही त्या पक्षाला दोषी धरता येत नाही. दिल्लीच्या नायब राज्यपालांपासून अनेक केंद्रीय यंत्रणांनी या पक्षाला भयंकर त्रास दिला होता, त्यांच्यापुढे ते ताठ उभे राहिले होते. हेही दिल्लीकरांना दिसलं नसेलच असं वाटत नाही.
त्यामुळे, आपचा पाडाव करून भाजपचे नेमके कोणते गुण पाहून दिल्लीकरांनी त्यांच्या हाती कारभार दिला आहे, हा प्रश्न पडतो. एकाने निकालावर ट्वीट करताना म्हटले आहे, दिल्लीकरांनी खोकला घालवला आणि मूळव्याध घेतली… आता यापुढे कितीही ठणका लागला तरी हाक ना बोंब अशी परिस्थिती झाली तर नवल काय!