गुरूतुल्य ज्येष्ठ पत्रकार, संपादक पंढरीनाथ सावंत यांच्यासारख्या `चतुरस्र’ व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभायला जे `भाग्य’ लागतं ते मला सतत ५० वर्ष मिळालं. त्यांच्या जाण्याची दु:खद वार्ता कानी आली तेव्हा गेल्या अर्धशतकातल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.
१९७४मध्ये मी `श्री’ साप्ताहिकासाठी काम करू लागलो तेव्हा आचार्य अत्रे यांच्या `मराठा’ दैनिकाच्या प्रेसमध्ये ते छापलं जायचं. तिथे संपादकीय विभागात सावंत यांचा विषय निघाला. ‘ते येतात का इथे? मला त्यांना भेटायचंय त्यांचं `मार्मिक’मधलं `टोच्या’ नावाने लिहिलेलं सदर आम्ही सारे नेहमी वाचतो.
`असं… ठीक आहे. पंढरी आला की सांगतो.’ दुसरे एक सावंत म्हणजे नाटककार आत्माराम सावंत माझ्याकडे कौतुकाने पहात म्हणाले. तेवढ्यात मला मशीन खात्यातून फायनल प्रूफ चेकिंगसाठी बोलावणं आलं तिथल्या गडबडीत अर्ध्या पाऊण तास गेला असेल नसेल इतक्यात एक लेंगा झब्बा घातलेला चाळीशीतला माणूस आला. त्यांना कोणीतरी माझ्याकडे पाठवलं होतं.
`तुम्ही दिलीप जोशी का? …या देहाला पंढरीनाथ सावंत म्हणतात. तुम्ही माझी आठवण काढल्याचा कळलं म्हणून आलो.’ वयाने विसेक वर्षांनी मोठा असलेला हा अनुभवसंपन्न ज्येष्ठ पत्रकार, माझ्यासारख्या नवख्या तरुणाची स्वत:हून ओळख करून घेतोय. मी अक्षरश: स्तिमित झालो.
`तुमचा ‘टोच्या’ मी वाचतो’ मी चाचरत बोललो.
`वाचतोस ना! तो मी अनेकदा बरोबर घेऊनही फिरतो.’
मी अवाक… असा अवलिया पत्रकार माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच भेटला. तेवढ्यात चहा आला. `ए… इकडे दे रे दोन कटिंग.’ मग थोड्या गप्पा झाल्या, म्हणजे सावंत बोलत होते आणि मी ऐकत होतो. ते निघाले तेव्हा मी औपचारिकतेने म्हणालो, `तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं.’
या छापील वाक्यावर ते मनसोक्त हसले आणि बोलले, मला भेटल्यावर बर्याचजणांना बरंच काही वाटतं… भेटत रहा… हां… पण मित्र म्हणून. इथे मला सगळे ‘ए’ पंढरी म्हणतात. तूही तसंच म्हटलं तरी चालेल.’
अर्थात, त्यांना समोरासमोर कधी तसं म्हटलं नाही. पण आमच्या मित्रमंडळीत `पंढरी’च असायचा. कधी कधी स्वत:ची ओळख ते एखाद्याला ‘सर पंढरीनाथ सावंत’ अशीही करून देत. या शीर्षकाने एकदा त्यांचं व्यक्तिचित्र मी `मार्मिक’मध्ये रंगवलं.
`मार्मिक’ हा सावंतांच्या जिव्हाळ्याचा विषय. ठाकरे कुटुंबाशी त्यांचं नातं तर थेट प्रबोधनकारांपासूनचं… सावंत, दादांच्या अनेक गोष्टी सांगायचे. लेखन सुबोध, सोपं आणि अर्थवाही कसं असावं ते मी दादांकडूनच शिकलो असं ते म्हणायचे… आणि प्रबोधनकारही सावंतांना आपला शिष्य म्हणत असत.
पत्रकार, चित्रकार, छायाचित्रकार, लेखक, वक्ता आणि गायकसुद्धा! पंढरीनाथ सावंतांना कधीही कुठल्याही रुपात व्यक्त होण्याची ‘सिद्धी’ प्राप्त झालेली होती. पहिल्या भेटीत मला आणि नंतर अनेकांना कलंदर वाटलेला हा माणूस विलक्षण अभ्यासू होता. एखादा विषय चिकाटीने आणि सखोलपणे समजून घेण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह आणि भाषा ज्ञान अफाट होतं. मराठीबरोबरच इंग्लीश, गुजराती, उर्दू अशाही भाषा त्यांना अवगत होत्या. दुसर्या महायुद्धावर लिहिण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी जर्मन भाषाही शिकून घेतली होती.
एरव्ही चेष्टा मस्करीत रमले आहेत असं वाटणारे पंढरीनाथ, त्याचवेळी एखादा गंभीर विषयांवरचं लिखाण कसं करावं याचं चिंतन अंतर्मनांत करीत असत. एकदा अशाच मौजमजेच्या गप्पा चालल्या असताना त्यांनी एकदम दुसर्या महायुद्धाची कहाणी सांगायला सुरुवात केली. चर्चिल, हिटलर, स्टॅलिन अशा जागतिक नेत्यांच्या वक्त्यांचे संदर्भ मुखोद्गत असल्यासारखे ते बोलू लागले. इगतपुरीला घन:श्याम भडेकरांच्या बंगल्यात `ट्रीप’साठी जमलेले आम्ही सारे, पंढरीचं ते अभ्यासपूर्ण विवेचन वेळेचं भान विसरून ऐकत राहिलो. श्याम मोकाशी यांच्या लोणावळ्याच्या घरातही असाच गप्पांचा फड रंगायचा.
वाचन, लेखन, फोटोग्राफीइतकाच चित्रकलेचा अभ्यासही सावंतांनी केला. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाला, `पंढरीच्या वयाची ऐंशी… की तैशी’ अशा शीर्षकाने मी एक `ग्रीटिंग’ बनवलं आणि `मार्मिक’च्याच ऑफिसात बसून सावंतांना म्हटलं, `सेल्फ पोट्रेट द्याल?’ क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, `उद्या सकाळी…’ आणि त्या रात्री त्यांनी स्वत:ला कॅन्व्हासवर जलरंगात साकारलं. ८०व्या वर्षी ‘आता कसं जमेल’ वगैरे कारणं न सांगता.
जीवनाविषयीची अमर्याद उत्सुकता आणि तितकाच उत्साह हे आमच्या या ज्येष्ठ मित्राचं जीवन रसायन होतं. गेल्या महिन्यात त्यांच्या ९०व्या वाढदिवशी चित्रकार-मित्र दत्तात्रय पाडेकरसह घरी जाऊन भेटलो. चेहर्यावर परिचित उत्साह पसरला. पाडेकरने केलेले स्केच पाहताना `हो… मी आता असाच दिसतो.’ असं म्हणताना त्यांचे डोळे लकाकले, घरच्यांच्या आणि आमच्या आग्रहावरून त्यांनी दोन गाणीही म्हटली. आणि मग त्यांना एकदम भरून आलं. `असेच येत जा…’ असं आम्ही निघताना बोलले. आता या भेटीगाठी थांबल्या, राहिल्या त्या अनेक आठवणी. तो ठेवा मोलाचा आहे.