काही वर्षांपूर्वी आपल्याकडे घरपोच मनोरंजनाचे दूरदर्शन आणि आकाशवाणी हेच दोनमेव पर्याय होते. एखादी बडी राजकीय हस्ती निजधामाला गेली की आठवडाभर दूरदर्शन आणि आकाशवाणीवर दुखवटा पाळला जात असे. या दुखवट्यादरम्यान ज्या काही शास्त्रीय संगीताचे प्रसारण व्हायचे. शनिवार, रविवारचे सिनेमे, छायागीत, रंगोलीवर गदा आल्याने आबालवृद्धांकडून त्या गचकलेल्या नेत्याला शिव्याशापांची लाखोली वाहिली जायची. मृत्यूपश्चात वाट्याला आलेल्या या शिव्याशापांमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मरण पावलेले कित्येक नेते अजूनही स्वर्गराज्याच्या दारात वेटिंग लिस्टमध्ये आहेत.
– – –
डिसेंबर महिन्यात, उत्तर कोरियाचे माजी सत्ताधीश किम जोंग इल यांच्या मृत्यूच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात हसण्यावर ११ दिवसांची बंदी घालण्याचा आदेश सध्याचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी दिला होता. कुणाकडेही डोळे वटारून पाहणे कोरियन लोकांच्या स्वभावातच नसल्याने हा आदेश तंतोतंत पाळलाही गेला म्हणे. या ११ दिवसांच्या काळात देशातील जनतेला हसायची परवानगी नव्हती, खुश व्हायची परवानगी नव्हती, दारू प्यायची देखील अनुमती नव्हती. मुळात सरकारने बंदी घातली नसती तरी या काळात कोरियन लोकांनी दारूला हातही लावला नसता याची मला खात्री आहे. आनंदी व्हायचं नसेल, हसायचं नसेल तर कोण कशाला पदरमोड करून दारू पिईल म्हणा!
सुतकाच्या काळात सुखबंदी, आनंदबंदी, दारूबंदी इथवर सरकारचा हेका समजण्यासारखा होता. पण त्याच बरोबरीने सरकारने शॉपिंगवर देखील बंदी घातली होती. या शॉपिंगवरील बंदीचं लॉजिक सुरुवातीला मला कळलं नाही. (अनाकलनीय घटनांचं लॉजिक आयटी सेलकडून रेडिमेड मिळण्याची सोय झाल्यापासून आपली तर्कसंगत विचार करण्याची सवयच सुटली आहे. हे असंच चालू राहिलं तर डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे एक दिवस आपलं हे तर्कसंगत विचार करण्याचं शेपूटही नाहिसं होण्याची शक्यता आहे. असो.) बराच विचार केल्यावर मी या निष्कर्षाप्रत आलोय की, नवरे मंडळी दारू पीत नाहीत म्हणून बायका खुश होतील (आणि हसतील देखील) हा धोका सरकारच्या ध्यानी आला असावा आणि केवळ स्त्री-पुरुषांच्या दुःखाचा बॅलन्स करण्यासाठी त्यांनी बायकांच्या सुखावर म्हणजेच शॉपिंगवर देखील बंदी घातली असावी.
एखादा सरकारी आदेश पूर्णपणे लॉजिकल असला तर सरकार म्हणून आपल्या नावाला बट्टा लागेल अशी भीती वाटल्यामुळे असेल कदाचित पण किम जोंग उनच्या त्या आदेशात पुढे असंही म्हटलंय की, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला तरी, मयताच्या सग्यासोयर्यांना मोठ्याने रडण्याची परवानगी नाही. ‘अमुक तमुक ने किया है तो कुछ सोच समझके ही किया होगा,’ असा भक्तपंथी विचार करण्याची हल्ली आपल्याला सवय झालेली असल्याने मी तोरसेकरी जिद्दीने या आदेशात लॉजिक शोधलं आणि ते मला मिळालं देखील. मला असं वाटतं की एखाद्याच्या मयतावरील रडण्याचा आवाज किम जोंग इलच्या मृत्यूवेळी झालेल्या रडण्या-भेकण्याच्या आवाजापेक्षा जास्त डेसिबल भरला तर स्वर्गस्थ किंवा नर्कस्थ किम जोंग इलच्या आत्म्याला ऑलिव्ह ऑइलच्या कढईतून बाहेर काढून पाम तेलाच्या कढईत ढकलतील, असं किम जोंग उनला वाटले असेल. आदेशातील, ‘या सरकारी सुतकाच्या दिवसात दु:खी दिसत नसलेल्या व्यक्तीला पोलीस अटक करू शकतात’ हे पुढील कलम म्हणजे अतीच झालं. मुळात एखादी व्यक्ती सुखी आहे की दुःखी हे कुणी आणि कशाचे आधारे ठरवावं? सुखाचं किंवा दुःखाचं मापन करणारा एखादा पोर्टेबल हॅपिनेस मीटर कोरियन पोलिसांकडे आहे की काय, याविषयी बातमीत काही लिहिलेलं नव्हतं. मुळात या सुतककाळात दुःखी असणे महत्वाचे नसून दुःखी दिसणे जरुरीचे आहे. दिवसाचे चोवीसही तास दुःखी दिसण्याचा असा फतवा कधीकाळी रात्री आठ वाजता आपल्या इथे जाहीर झाला तर टीव्हीवरील चर्चांत भाग घेणारे डावे विचारवंत सोडून बाकी सगळ्यांना जेलमध्ये जाऊन चक्की पिसिंग अँड पिसिंग करावं लागेल.
काही वर्षांपूर्वी आपल्याकडे घरपोच मनोरंजनाचे दूरदर्शन आणि आकाशवाणी हेच दोनमेव पर्याय होते. एखादी बडी राजकीय हस्ती निजधामाला गेली की आठवडाभर दूरदर्शन आणि आकाशवाणीवर दुखवटा पाळला जात असे. या दुखवट्यादरम्यान ज्या काही शास्त्रीय संगीताचे प्रसारण व्हायचे (ते आजच्या ‘रिव्हर अँथम’पेक्षा लाखपट सरस असलं तरी) त्यात बहुतांश लोकांना काहीही रस नसायचा. शनिवार, रविवारचे सिनेमे, छायागीत आणि रंगोलीवर गदा आल्याने आबालवृद्धांकडून त्या गचकलेल्या नेत्याला शिव्याशापांची लाखोली वाहिली जायची. मृत्यूपश्चात वाट्याला आलेल्या या शिव्याशापांमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मरण पावलेले कित्येक नेते अजूनही स्वर्गराज्याच्या दारात वेटिंग लिस्ट किंवा आरएसीमधे आहेत अशी खबर आमच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
आपल्याकडे राजस्थानात एक प्रथा आहे, वरच्या जातीतील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की खालच्या जातीतील बायकांना (रूदाली) पैसे देऊन रडण्यासाठी बोलावले जाते. पोट भरण्यासाठी असं खोटं खोटं रडणं हाच त्यांचा व्यवसाय असतो. जी कुणी व्यक्ती गेलीय तिच्याशी या बायांना काही देणंघेणं नसतं. ‘मोले घातले रडाया, नाही आंसू, नाही माया’ असा सगळा कारभार! किम जोंग उनला या रूदालीविषयी कल्पना असती तर त्यांनी भारतातून लाखभर रूदाल्या मागवायला कमी केलं नसतं. त्यानिमित्ताने आपल्या सरकारलाही परकीय चलन मिळविण्याचा एक नवीन स्रोत शोधल्याचा टेंभा मिरविता आला असता.
पैशाने जसं सुख विकत घेता येत नाही तसं दुःखही! दुःख ना पैशाने विकत घेता येतं, ना जबरदस्तीने कुणावर लादता येतं. सुख आणि दुःख दोन्ही पार आतून आलं तर ते माणसाच्या चेहर्यावर दिसल्यावाचून राहत नाही. सुखी माणसाच्या चेहर्यावर दुःखाचं आणि दुःखी माणसाच्या चेहर्यावर सुखाचं कलम करू गेल्यास ते कलम मूळ धरत नाही. पण हे कडवं सत्य किम जोंग उनच्या तोंडावर सांगण्याची आलम उत्तर कोरियात कोणाची बिशात नाही आणि त्यांचं दुर्दैव म्हणजे मला कोरियन भाषा येत नाही.
आपण जनतेवर करीत असलेले अत्याचार कमी म्हणून की काय, दहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या हुकूमशहाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व जनतेने दुःखी राहावे, दुःखी दिसावे असा फतवा आताचा हुकूमशहा काढतो आणि गरीब बिचार्या कोरियन जनतेला मुकाट्याने या फतव्याचे पालन करावे लागते. तुम्ही आम्ही त्या देशाचे नागरिक नसल्याने निदान त्या फतव्याची खिल्ली उडवून त्यावर हसण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. हे स्वातंत्र्य टिकवू या आणि आजवर होऊन गेलेल्या, आज असलेल्या तसेच भविष्यात होऊ घातलेल्या हुकूमशहांना हसत-हसत स्मितांजली वाहू या!