शंभर वर्षांपूर्वी तरुणांच्या गर्दीत गाजणारे गणपती मेळे हे प्रामुख्याने पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची ओळख बनले होते. टिळकवादी म्हणवणार्यांनी त्यातल्या गाण्यांतून विरोधकांवर घाणेरड्या भाषेत टीका चालवली होती. त्याला विरोध करण्यासाठी जेधे-जवळकरांनी छत्रपती मेळा सुरू केला. त्याला प्रबोधनकारांनी पाठिंबा दिला.
– – –
`देशाचे दुष्मन या पुस्तकावरून पुण्यात बाह्मण-ब्राह्मणेतर तणाव टोकाला पोहोचला होता. त्याची सुरुवात फार आधीच झाली होती. त्याचं कारण होतं सार्वजनिक गणेशोत्सवातले मेळे. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवातल्या हुल्लडबाजीला विरोध होतो, तो काही आजचा नाही. अगदी सुरुवातीपासून तो होतोय. मुळात १८९३ साली पुण्यात झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीत मोहर्रमला पर्याय देण्यासाठी भाऊसाहेब रंगारी यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवाची सुरुवात झाली. गणेशोत्सवाला वैचारिक अधिष्ठान देणार्या केसरीमधल्या अग्रलेखात साक्षात लोकमान्य टिळकांनीही गणेशोत्सवाच्या सार्वजनिकीकरणाची पूर्वपीठिका हीच सांगितलेली आहे. वारी असताना लोकजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव हवाच कशाला, असा प्रश्न थोर विचारवंत राजारामशास्त्री भागवतांनी विचारला होता. तो चर्चेचा विषय होता. आज वर्गणीवरून टीका होते, तशी लोकमान्यांच्या कार्यकर्त्यांना फंडगुंड म्हणून तेव्हाही झाली होती. सार्वजनिक कामांसाठी गोळा केलेल्या निधीचा अपहार करतात म्हणून अच्युतराव कोल्हटकरांनी त्यांना फंडगुंड हे नाव दिलं होतं.
शिवाय या उत्सवासाठी सगळ्या समाजांकडून वर्गणी घेतली जात असली, तरी कमिटीत फक्त ब्राह्मणच असतात, तसंच सगळे उत्सवातल्या कार्यक्रमात फक्त ब्राह्मण वक्ते आणि कलाकारांनाच स्थान मिळतं, अशी ब्राह्मणेतरांची तक्रार होतीच. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवात सादर होणार्या मेळ्यांच्या घसरलेल्या दर्जावरूनही टीका होत होतीच. १८९४ साली लोकमान्यांनी विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव पहिल्यांदा बसवला, तेव्हा त्यांचे कट्टर अनुयायी काशिनाथ जाधव यांनी पहिला मेळा सुरू केला. यात वाद्यांच्या गदारोळात मेळ्यातल्या तरुणांची गर्दी जोरजोराने सामूहिक गाणी म्हणत असे. आजच्या ढोलताशा पथकांसारखे हे मेळे सार्वजनिक गणेशोत्सवाची ओळखच बनले होते. ते रात्रभर वेगवेगळ्या गणपतींसमोर जाऊन गाणी म्हणत असत.
अगदी सुरुवातीला लोकप्रबोधनाला प्राधान्य देणारे मेळे लवकरच टिळक पक्षाच्या प्रसिद्धीचं आणि टिळक-विरोधकांवर टीकेचं साधन बनले. फक्त ब्राह्मणांचे सन्मित्र मेळ्यासारखे मेळेच हे करत असं नाही, तर क्षत्रिय समाजाचा मेळा, मावळी मेळा वगैरे बहुजनी मेळेही ब्राह्मणी मेळ्यांचीच री ओढत असत. नेमस्त पुढारी, सुधारक पक्षाचे नेते आणि शिक्षण घेणार्या मुलींवर त्यात खालच्या थराला जाऊन टीका होत असे. य. दि. फडके यांनी त्याची काही उदाहरणं दिली आहेत, ती अशी,
अहो हे सुधारक नव्हे, पण असती वेर्डेंवे।
यांचे कळेनात कावे, मारा यांना पैजार।।
समाजसुधारकांवर टीका करणारं आणखी एक पद त्या काळात लोकप्रिय होतं, ते असं,
बट आय एम रिफॉर्मर, आय डोंट लाइक सच मर्मर।
आय वुईल टेक माय वाईफ निअर, साहेबाच्या।।
गोपाळकृष्ण गोखलेंसारख्या देशाचं नेतृत्व करणार्या विद्वान नेत्याला नारी वेषातला नाच्या म्हणणं, फिरोजशाह मेहतांवर मेथाचा उपटला कल्ला, अल्ला, अल्ला असं गाणं रचणं किंवा राजारामशात्री भागवतांना वानर म्हणणं असे प्रकार चालत असत. विशेषतः शाळेत जाणार्या आणि सुशिक्षित मुलींची टिंगलटवाळी करणारी पदं सर्वात लोकप्रिय असत. आणि हे सगळं गणेशोत्सवात विद्येच्या देवतेसमोर होत असे. इतकंच नाही, तर हे प्रकार खुद्द लोकमान्य टिळकांसमोरही होत असत, असं प्रबोधनकारांनी नोंदवून ठेवलं आहे. ते असं,
गणपती मेळ्यांच्या खुळाला कोब्रांनी इतके चिळस आणणारे रूप दिले की मेळ्यांचा धिंगाणा म्हणजे दुसरा शिमगाच बनला. या शिमग्यात गणपती देवाचे नुसते नाव आणि टिळक देवाचे गाव, हा प्रकार असला तरी सुधारक, मवाळ पक्ष, सरकार, गांधी, ब्राह्मणेतर यांच्या बेचाळीस पूर्वजांचा उद्धार पदांतून करण्यात येत असे. विशेष टाळ्यांच्या कडकडाटाची गोष्ट म्हटली म्हणजे शिक्षित प्रागतिक स्त्रियांची बीभत्स निंदा ही होय. हे सर्व प्रकार टिळकांच्या मृत्यूनंतरच बोकाळले असे नव्हे, तर खुद्द त्यांच्या नाकासमोर बिनबोभाटी मोठ्या अहमहमिकेने चालू असत.
जीवनगाथेत प्रबोधनकार हेच आणखी सविस्तर सांगतात, सन्मित्र समाज मेळा सालोसाल गर्जत होता. केसरीछाप वृत्तपत्रांच्या पाठिंब्याने जहाल पक्षाची हा मेळा एक जबरदस्त राजकारणी शक्ती होती. गत सालातल्या सार्या जहाल मवाळ वादाच्या उखाळ्यापाखाळ्या या मेळ्याच्या पदांतून गायल्या जायच्या. गायकवाड वाद्यात लो. टिळकांच्या अगदी नाकासमोर. त्यात गोखल्यांची नि त्यांच्या पार्टीतील रँग्लर परांजपे प्रभृति मंडळींची भरपूर निंदा नालस्ती असायची. अखेर अखेर तर सन्मित्रचे निंदासत्र इतके मोकाट बहकले की कॉलेजात जाणार्या तरुण मुलींचीही वाह्यात टवाळी होऊ लागली. अनेक विचारवंतांना याची चीड यायची, पण करतात काय? जहालाग्रणीच जेथे ती आचरट पदे जिभल्या चाटीत नि टाळ्या कुटीत ऐकायचे, तिथे विरोध करावा कोणी?
जवळपास तीस वर्षं हे कोणताही अडथळा न होता सुरू होतं. पुण्यातल्या गणेशोत्सवावर तोवर टिळक पक्षाचं एकछत्री वर्चस्व होतं. त्याला पहिलं आव्हान दिलं ते केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या जोडीने. १९२१च्या गणेशोत्सवातली स्त्रीशिक्षणाला विरोध करणारी पदं ऐकून जवळकरांनी मजूर साप्ताहिकात त्याचं सुतोवाच केलं होतं, येत्या वर्षी सुधारकांनी, सत्यशोधकांनी व सुशिक्षित स्त्रियांनीही मेळे तयार करून या वक्रतुंड धर्माभिमान्यांची चांगली पूजा बांधावी. त्यांच्याच भाषेत त्यांचे उसने वाण परत करावे, अशी माझी सूचना आहे. वरील मंत्राखेरीज दुसरा मार्ग लागू पडणार नाही म्हणून नाइलाजाने हा उपाय सुचवावा लागत आहे.
तसा हा जालीम उपाय केशवराव जेधेंच्या पुढाकारात लगेचच १९२२च्या गणेशोत्सवात अमलात आणला गेला. छत्रपती मेळ्याची स्थापना झाली. जेधेबंधूंनी खर्च उचलला. कॉलेजात जाणारी मुलं आणि पुण्याच्या पूर्व भागातल्या तालमीतलं मुलं हिरीरीने त्यात सामील झाली. १९२२चा गणेशोत्सव छत्रपती मेळ्याने गाजवला. यात आघाडीवर सहभागी असणारे दिनकरराव माने यांनी लिहिलेल्या आठवणी अशा, छत्रपती मेळ्याची पडघम टिपरी झडली की, `अरे आला छत्रपती मेळा, पळा भटांनो पळा पळा हा ठेका सुरू. आम्हाला रात्ररात्रभर जागरणे, मेळ्यांची पालुपदे घोळून घोळून घसे बसलेले, तुफान गर्दीचा सहानुभूतीचा घेराव, हसर्या पोलिसांचे स्वयंसेवक दल, जाईल त्या भागात जयनाद, मेळेवाल्यांचा भगव्या रंगाच्या फेट्यांचा थाट किती आकर्षक होता!’
या मेळ्यात गायल्या जाणार्या सोळा पदांची पुस्तिका जवळकरांनी प्रसिद्ध केली होती. आजही छत्रपती पद्यसंग्रह या नावाने तो जवळकर समग्र साहित्यात उपलब्ध आहे. त्यातली पदं नेमकी कुणी लिहिली आहेत, याचा उल्लेख नाही. पण बहुसंख्य पदं ही ब्राह्मणांवर, त्यातही चित्पावनांवर कडक टीका करणारी आहेत. लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर, रामदास स्वामी, पेशवाई यावर त्यांचा रोख आहे. त्यातलं ओळखा कोण हा नक्टा या पदात टिळकांवर नाव न घेता टीका केलेली आहे. १९२२च्या गणेशोत्सवात हे पद गाजलं होतं,
परदेश गमन पापाचे, क्षालनार्थ स्वार्थाचे ।।
शेणाचा गिळला गोळा, ओळखा कोण हा नक्टा ।।
सक्तीचे शिक्षण होई, त्यामध्ये आडवा जाई ।।
अंड्यांचा मारही खाई, कोणीही बोलू ना देई ।।
फंडाचा गिळता गठ्ठा, ओळखा कोण हा नक्टा ।।
पण या संग्रहात फक्त टीका नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी यांची थोरवी गाणारीही पदं आहेत. शिवाजी आमुचा राणा, मराठी आमुचा बाणा हे केशवराव जेधेंनी रचलेलं आणि गायलेलं गजलवजा गाणं पुढे अनेक वर्षं लोकांच्या तोंडी रूळलेलं होतं.
छत्रपती मेळ्याच्या लोकप्रियतेमुळे आजवर टिळकपक्षीय मेळ्यांच्या कच्छपी लागलेल्या बहुजनी मेळ्यांनी ब्राह्मणांवर टीका करणारी गाणी गायला सुरुवात केली. त्यात गोपाळ क्लब मेळा, आगरकरवाल्यांचा मेळा, मावळी मेळा, भोर वकिलांचा मेळा, पागेवाला मेळा, दगडू हलवायाचा मेळा, रे मार्केट मेळा, भगवा झेंडा मेळा असल्याचं `विजयी मराठा’ने नोंदवलं आहे. टिळक राहत असलेल्या गायकवाड वाड्यात सगळे मेळेवाले दरवर्षी गणेशोत्सवात हजेरी लावत असत. त्या प्रघातानुसार छत्रपती मेळाही गायकवाड वाड्यात घुसला. गणेशोत्सव मंडळाच्या आयोजकांनी दारूचा विरोध करणारं पद म्हणण्यास सांगितलं. त्यावर मेळेवाल्यांनी सांगितलं की आपण दारूबाजी बंद करण्यासाठी आलेलो नाही, तर गुरूबाजी अथवा भटबाजीला गाडण्यासाठी आलो आहोत.
छत्रपती मेळ्याच्या निमित्ताने जेधे-जवळकरांनी ब्राह्मणी बालेकिल्ल्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी तिथे घेतलेलं पहिलं पद होतं,
रावबाजीच्या मूर्खपणाने गेली पेशवाई।
व्हा बंधूंनो सावध आता, गाडा भटशाही।।
त्यातलं एक कडवं असं होतं,
जेथे जेथे भट हे येती, तट तेथे पडती।
या गोष्टीची आम्हा आता आली प्रचिती।।
तेव्हा उपस्थित असलेल्या ब्राह्मणी कंपूतून शेमशेम असा ओरडा झाला. ते ऐकून सगळे मेळेवाले एकत्र जोरात उभे राहिले. ते बघून तो कंपू शांत बसून राहिला आणि त्यांनी उरलेली पदं शांतपणे ऐकून घेतली. वरताण म्हणून सगळ्यांनी निघताना शाहू छत्रपती महाराज की जय असा जयघोष केला. `विजयी मराठा’ने हा सगळा वृत्तांत दिला आहे.
असं झालं तरीही केसरीने छत्रपती मेळ्याचं स्वागतच केलं, अभिनंदनीय गोष्ट म्हणजे यंदा येथील सत्यशोधक बंधू या उत्सवात सामील झाले ही होय. यंदा त्यांच्यातर्फे सुमारे तीनचार मेळे निघाले. या उत्सवात सामील न होणार्या वर्गात आजपर्यंत हा समाज मोडला जात असे… सत्यसमाजिस्ट वगैरे कित्येकांनी काहीतरी कुरापत निघावी असे वर्तन कोठे कोठे केले, परंतु ते उत्सवात सामील तरी होऊ लागले. उद्या तेही राष्ट्रीय भावनेच्या एकाच प्रवाहात येऊन मिळतील अशी आशा आहे.
पण केसरीकारांची ही आशा काही फलद्रूप झाली नाही. जेधे-जवळकरांनी केसरी कंपूशी उभा दावाच मांडला होता. केसरी कंपूनेही छत्रपती मेळ्याचा प्रभाव कमी व्हावा यासाठी जंग जंग पछाडलं. त्यासाठी अगदी ब्रिटिश पोलिसी यंत्रणेचा आणि हातात असलेल्या नगरपालिकेच्या सत्तेचाही उपयोग करून बघितला. पोलिसी सेन्सॉरने पदांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघर्ष अधिक कडवा झाला. त्याचा भडका उडाला तो १९२४च्या गणेशोत्सवात.
त्याच्या दोन महिने आधीच पुणे नगरपालिकेने लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारला होता. मोताrलाल नेहरूंच्या हस्ते त्यांचं उद्घाटनही झालं होतं. या पुतळ्यासाठी नगरपालिकेने खर्च करावा की करू नये, यावर कोर्टबाजीही झाली होती. तरीही नगरपालिकेतल्या बहुमताच्या जोरावर हा पुतळा उभा राहिला होता. त्याआधी नगरपालिकेने विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा पुतळाही उभारला होता. त्या सगळ्याला ब्राह्मणेतर नेत्यांनी जोरात विरोध केला होता. पण त्याची दखलही घेतली नाही. परिणामी ब्राह्मणेतर नेत्यांनी त्यांच्या हातात असलेलं हत्यार गणेशोत्सवात उपसलं. ते होतं छत्रपती मेळ्यातल्या नव्या गाण्याचं.
नकट्यांचा बाजार सारा, नकट्यांचा बाजार।
लाज काय असणार, तयांना लाज काय असणार।।
कमिटीमध्ये बसुनीनक्टे विचार करिती पुतळ्याचा।
लोकहिताला फाटा देऊनि, स्मारकास धजणार।।
जनसेवेचे नाव करुनि, कमिटीमध्ये बसणार।
टिळकाच्या स्मारकास खर्च रुपये सोळा हजार।।
अडविती सडकेची जागा, तोडून टाकिती बागा।
रयतेला नाडुनि नक्टे, टिळक उभा करणार।।
भटशाही करवीती नक्टे, स्तोम माजवी टिळकाचे।
टिळकाचे मार्केट करविता, थप्पड त्या नसणार।।…
या गाण्याला गणेशोत्सवात तुफान प्रतिसाद मिळाला. पण त्यामुळे टिळकवाद्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं. त्यातून १९२४ आणि त्यानंतरचे लागोपाठ दोन गणेशोत्सव हे जणू युद्धभूमी बनले. त्यात प्रबोधनकार जेधे-जवळकरांना वैचारिक पाठबळ देऊन ठाम उभे होते.