आज आश्चर्य वाटेल पण फक्त १०० वर्षांपूर्वी महात्मा जोतिराव फुले यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव पुणे नगरपालिकेत फेटाळण्यात आला होता. त्यामुळे पुण्यातला ब्राह्मण ब्राह्मणेतर संघर्ष टिपेला पोचला होता.
– – –
नकट्यांचा बाजार सारा… या छत्रपती मेळ्याच्या गाण्याने १९२४च्या गणेशोत्सवात धिंगाणा केला. या गाण्याचा थेट रोख नगरपालिकेतल्या टिळकपक्षीयांवर होता. त्यामुळे टिळकवादी म्हणवणारे भयंकर चिडले होते. परिणामी गणेशोत्सवादरम्यान पुण्यातल्या जोगेश्वरी देवळाजवळ आणि गायकवाड वाड्यात हाणामारी झाली. `केसरी’ने आरोप केले की छत्रपती मेळ्याने बेमर्याद पुंडाई केली. त्यांना गायकवाड वाड्यातून हाकलवून लावण्यात आलं, तसंच त्यांनी नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कार्यालयावर हल्ला केला, मवाळांचं मुखपत्र असणार्या `ज्ञानप्रकाश’नेही छत्रपती मेळ्यावर टीका केली. त्याला केशवराव जेधेंनी छत्रपती मेळ्याचे सचिव म्हणून खुलासा पाठवला होता.
या खुलाशानुसार जोगेश्वरी मंदिरातल्या गणपतीसमोर रात्री साडेनऊ वाजता छत्रपती मेळ्याने हजेरी लावली. नियमानुसार गणपतीचं नमन झाल्यानंतर पेशवाईचा पोवाडा झाला. तो आवडल्यामुळे आणखी एक पद म्हणण्याचा आग्रह झाला. तेव्हा जवळपास दोन हजार लोक होते. त्यानंतर टिळकांच्या पुतळ्याविषयीचं पद झालं. ते बहुदा ‘नकट्यांचा बाजार सारा’ असावं. त्याविरोधात गर्दीतल्या ब्राह्मणांनी आरडाओरडा केला. त्यामुळे गर्दीतल्याच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांमध्ये मारामारी झाली. त्यात छत्रपती मेळ्यातले तरुण सहभागी नव्हते, असा खुलासा जेधेंनी केला आहे. शेवटी ते लिहितात, ब्राह्मण समाजाने ज्या पदाला आरडाओरड केली ते पद छत्रपती पदावलीत पाहावे, म्हणजे त्यात अर्वाच्य असे काय आहे ते ज्ञानप्रकाशकारांनाच दिसेल. ज्ञानप्रकाशने टिळक चरित्रावर जी टीका केली आहे, त्यापेक्षा या पदातील न्याय्य टीका पुष्कळच सौम्य आहे हे कोणालाही दिसून येईल.
जेधे-जवळकर या तरुण मित्रांनी छत्रपती मेळ्यांमधून चालवलेल्या ब्राह्मणेतरांच्या जागृतीला प्रबोधनकारांचा पाठिंबा होता. केसरी कंपूच्या सन्मित्र मेळ्यामधल्या बीभत्स पदांवर टीका करून प्रबोधनकारांनी छत्रपती मेळ्याची जोरदार पाठराखण केली आहे. ती अशी, छत्रपती मेळ्याने भिक्षुकी कारस्थानांच्या सुळाला हात घालताच कोब्रा पिसाळला आणि शाब्दिक वाक्प्रहाराला प्रत्यक्ष दंडुक्याची दटावणी दिसू लागतांच माबाप सरकारशी या मेळ्याविरुद्ध खलबत्ते घोटू लागला. जी पापे आपण गेली २० वर्षे स्वत: केली तीच छत्रपती मेळ्यावर लादण्याची कारवाई पुण्याच्या गटारयंत्राने व कोब्रापत्रांनी केली. छत्रपती मेळ्याचा पद्यसंग्रह आता प्रसिद्ध झाला आहे. तो पहा आणि सन्मित्र समाजाचा पद्यसंग्रह पहा. म्हणजे भल्या बुर्याचा निकाल तेव्हाच लागेल.
आचकटविचकटपणा, बायकांची छिनाल नालिस्ती वगैरे दोषारोप छत्रपती मेळ्यावर करणार्यांनी गटारयंत्राचे गटार उपासण्यापेक्षा प्रत्यक्ष तुलनेचा अनुभव घ्यावा. म्हणे या मेळ्याच्या पदांत ब्राम्हणांची निंदा आहे. जणू काय ब्राम्हणांनी आजपर्यंत कोणाची टवाळी कुचाळी निंदा कधी केलीच नाही. अगदी रवळीतले धुतलेले तांदूळ! ज्या शहाण्यांना बायकांची कुचाळी गेली २० वर्षं बिनबोभाट पचते, त्यांनीच ब्राह्मणांच्या निंदेचे एवढे स्तोम माजवावे, या पाजीपणालाच भिक्षुकशाही म्हणतात. बोल बोलता वाटले सोपे, फळे भोगता का छांती कापे? ब्राह्मण स्वत:ला व्यासाचे किंवा ब्रम्हदेवाचे बाप समजत असले, तरी अखिल ब्राम्हणेतर दुनिया त्यांना कोण समजते, एवढेच छत्रपती मेळ्याने आपल्या पद्यांत दाखविले आहे.
माकडाला माकड म्हणू नये, तर काय त्याला माणुसकीचे सर्टिफिकीट द्यायचे? इतिहास व अनुभव यात प्रत्यक्ष पुरावा न सापडणारे एकही विधान छत्रपती मेळ्याने केलेले नाही, एवढे सांगितले म्हणजे पुरे.
छत्रपती मेळ्यातल्या गाण्यांना अडवण्यासाठी केसरी कंपूने त्याच्यामागे पोलिसी सेन्सॉर लावलं. नोकरशाहीत ब्राह्मणांचा प्रभाव असल्यामुळे पोलिसांनी छत्रपती मेळ्याच्या सगळ्या गाजणार्या पदांवर बंदी आणली. २९ पदांपैकी फक्त दोनच पदं मंजूर केली. बंदी घातलेल्या पदांमध्ये नकट्यांचा बाजार सारा हे प्रमुख होतं. टिळकांच्या पुतळ्याच्या निमित्ताने त्यात नगरपालिकेच्या कारभारावर भयंकर टीका होती. त्यावर बंदी घालण्याआधीच हे पद पुण्यात लोकप्रिय झालं होतं. गल्लोगल्ली ते लोकांच्या तोंडी बसलं होतं. पण या पदाशिवाय मेळा गाजणार कसा, असा प्रश्न होता. त्यावर केशवराव जेधेंनी काढलेली युक्ती प्रबोधनकारांनी सांगितली आहे, केशवराव जेध्यांनी शक्कल काढली. एक बँड भाड्याने घेतला. त्याने मेळा रस्त्याने जाताना `नकट्यांचा बाजार सारा’ या पदाचे नुसते सूर वाजवायचे आणि मेळ्यातल्या मंडळींनी खुळखुळ्यांच्या काठ्यांच्या त्या तालात फक्त ठेका धरायचा. परिणाम विचित्र झाला, पदांचे चोपडे आधीच छापून बाहेर पडलेले असल्यामुळे, लोकांना ते गाणे तोंडपाठ झाले होते. बॅण्डचे सूर वाजू लागले का रस्त्याच्या आजूबाजूला जमलेले लोक त्या सुरात ते गाणे मोठ्याने बोलून साथ देऊ लागले. सेन्सॉरी कात्रीने मेळेवाल्यांचे तोंड बंद केले, पण आता लोकांच्या तोंडावर कोण हात ठेवणार?
१९२४च्या गणेशोत्सवाच्या आधी जुलै महिन्यात टिळकांचा तर सप्टेंबर महिन्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा पुतळा पुणे नगरपालिकेना उभारला होता. त्यामुळे पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर तणाव होता. `नकट्यांचा बाजार सारा’मुळे झालेल्या हाणामारीने त्यात तेल ओतले होते. या पार्श्वभूमीवर सहाच महिन्यांनी म्हणजे मार्च १९२५ मध्ये पुणे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात पुणेकरांनी सहा तरण्याबांड सत्यशोधक ब्राह्मणेतरांना निवडून दिलं. त्यात केशवराव जेधे, विठ्ठलराव झेंडे यांच्यासह सणस, मानुरकर, पाटोळे, वायाळ होते. जेधे तेव्हा फक्त २९ वर्षांचे होते. ४३ नगरसेवकांच्या नगरपालिकेत त्यांचा गट अल्पसंख्य होता. त्यामुळे त्यांनी पालिकेत आणलेले ठराव संमत होणार नाहीत, हे त्यांना माहीत होतं. तरीही त्यांनी समाजात जागृती घडवण्यासाठी ठराव मांडण्याचा धडाका लावला.
नगरपालिकेच्या खर्चाने चालणार्या सार्वजनिक हौद आणि नळांवर स्पृश्य अस्पृश्य असा भेद न करता ते सगळ्यांसाठी खुले करावेत, असा पहिला ठराव त्यांनी मांडला. आज आपल्याला याचं आश्चर्य वाटलं. पण शंभर वर्षांपूर्वी जेधेंनी असा ठराव पुणे महापालिकेत मांडला होता, हा इतिहास आहे. त्यावर नगरपालिकेत चर्चा झाली. नगरपालिकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव आपटे म्हणाले, या ठरावाने पुण्यात बखेडा माजेल. आमची बायकामाणसे या गोष्टीला तयार नाहीत. हा ठराव सर्व सभासदांनी नापास करावा. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार हा ठराव बहुमताने फेटाळून लावण्यात आला.
जेधेंनी ४ जुलै १९२५ला आणखी एक ठराव आणला. ठराव इतकाच होता की पुणे नगरपालिकेने २५ हजार रुपये खर्चून महात्मा जोतिराव फुलेंचा पुतळा उभा करावा. त्याला कुणी आक्षेप घेतला असेल, असा विचारही आज आपल्या मनाला शिवत नाही. पण तेव्हा पुण्यातली परिस्थिती पूर्णपणे उलट होती. या ठरावामुळे सनातन्यांमध्ये एकच गदारोळ झाला. ब्राह्मणी कंपूने त्याविरोधात टीकेचं रान उठवलं. भालाकार भोपटकरांनी भाषणात सांगितलं, पुणे नाही, तर कोल्हापूर हे महात्मा फुलेंच्या पुतळ्यासाठी योग्य स्थान आहे. फुले हे सार्वजनिक म्हणजे पब्लिक गृहस्थ नसून सेक्शनल म्हणजे विशिष्ट पंथीय होते. कै. जोतिरावांनी पुण्यातील नागरिकांची कोणती सेवा केली? असा प्रश्न त्यांनी विचारला.
वस्तुस्थिती वेगळी होती. महात्मा फुलेंचा जन्म पुण्यात झाला होता आणि ते पुणे नगरपालिकेचे सहा वर्षं सदस्यही होते. त्या काळात पुणे शहराच्या हितासाठी कार्यरत होते. तरीही पुणे नगरपालिकेत फक्त ब्राह्मणच नाही, तर बहुसंख्य ब्राह्मणेतर सदस्यही या ठरावाच्या विरोधात होते. त्यात बाबूराव फुले हा महात्मा फुलेंच्या चुलतभावाचा मुलगाही होता.
४ सप्टेंबर १९२५ ला या प्रस्तावावर नगरपालिकेत चर्चा झाली. पण त्याआधी महात्मा फुलेंच्या चारित्र्यहननाचे प्रयत्न ब्राह्मणी कंपूकडून झाले. दुसरीकडे श्रीपतराव शिंदे यांच्या विजयी मराठा आणि दिनकरराव जवळकर यांच्या मजूर या वृत्तपत्रांनी जेधेंच्या ठरावाची कड घेत विरोध करणार्यांवर टीका केली. त्यात जवळकरांची टीका ही जहरी आणि नको त्या थराला जाणारी होती. प्रत्यक्ष चर्चेच्या दिवशी ग. म. नलावडे यांनी लिहिलेली ‘सत्यशोधक का ख्रिस्तसेवक’ ही महात्मा फुलेंवर खोटेनाटे आरोप करणारी पुस्तिका नगरपालिकेत मोफत वाटण्यात आली. त्यात महात्मा फुलेंच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवण्यात आलेत. त्यातही बाबूराव फुलेचा पुढाकार होता आणि त्याचा भाऊ विश्वनाथ फुले याने या पुस्तिकेची प्रस्तावना लिहिली होती. बाबूरावाने तर नगरपालिकेच्या सभेतल्या चर्चेत भाग घेत म्हटलं, जोतिराव फुले ख्रिस्ती झाले होते. ते ख्रिस्ती मिशनर्यांचे हस्तक होते. असा धर्मद्रोही मनुष्य फुले घराण्यात जन्माला आला म्हणून लाज वाटते.
शेवटी बहुमताअभावी ठराव फेटाळण्यात आला. त्यानंतर सत्यशोधकांत आणि माळी समाजातही संतापाची लाट उसळली. ७ सप्टेंबर १९२५ ला माळी समाजाच्या सात हजार जणांनी एकत्र बैठक घेऊन बाबूराव आणि त्याच्या कुटुंबावर बहिष्कार घातला. पुढच्या वर्षी झालेल्या माळी परिषदेतही त्यांना माफी मागायला लावून गचांडी धरून हाकलवून लावण्यात आलं. या बाबूराव फुलेच्याविषयी प्रबोधनकारांनी आपली आठवण सांगितली आहे. ती त्यांच्या शब्दात जशीच्या तशी,
फुले पुतण्याने (बाबूराव फुलेने) महात्मा जोतिरावांना बाटगा किरिस्ताव वगैरे दिलेल्या शिव्या दुसर्या दिवशी मंडईभर ज्याच्या त्याच्या तोंडी ऐकू येताच, तेथल्या एकजात माळणींनी त्या पुतण्याच्या नावाने कडाकडा हात चोळून शाप दिला. `मेल्याच्या तोंडात किडे पडतील. हृदयाच्या तळतळाटाने दिलेला तो शाप अक्षरश: खरा ठरल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले. परिस्थितीच्या ढकलणीसरसा कर्जत सोडून पुन्हा (१९३०-३१) मी पुण्याला नवी पेठ येथे रहात होतो. शेजारीच त्या फुल्याचे वास्तव्य होते. प्रेत नेण्याची रहदारी त्याच रस्त्याने होत असे. एका सकाळी कुणाचे तरी प्रेत जात होते. बरोबर फार मोठा जमाव होता. अनेक ठळक नागरिक त्यात दिसले. अॅडव्होकेट भाऊसाहेब गडकरी त्यात दिसताच मी त्यांना हाक मारून कोण गेलं हो? म्हणून विचारता ते म्हणाले, वा, माहीतच नाही का तुम्हाला? तुमच्या अगदी शेजारची केस. बाबुराव फुले कित्येक दिवस घशाच्या रोगाने आजारी होते. सारखे किडे पडायचे तोंडातून. त्याने आज पहाटे अंगावर राकेल ओतून आत्महत्या केली.’
प्रा. जी. ए. उगले यांनी लिहिलेल्या सत्यशोधक समाजाचा इतिहास या पुस्तकानुसार महात्मा फुलेंचे मोठे भाऊ राणोजी. त्यांचे चिरंजीव बाबाजी. बाबाजींचा मुलगा महादेव याने महात्मा फुलेंच्या निधनानंतर त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सत्यशोधकांनी मिळून त्याला हाकलवून लावले. त्यातून भावकीचं भांडण सुरू झालं. त्यात महादेव याचे दिवटे बाबूराव आणि विश्वनाथ यांनी महात्मा फुले पुतळा प्रकरणात ब्राह्मणी कंपूची साथ दिली. बाबूराव टिळक पक्षाचा निष्ठावान नगरसेवक होता. त्यामुळे सत्ताधार्यांशी निष्ठेची किंमत त्याला मिळत आली. त्याच्या निधनानंतर पुण्याच्या एसपी कॉलेजवळच्या एका रस्त्याला त्याचं नावही देण्यात आलं. आजही त्याच्या नावाचा फलक पुण्यात सन्मानाने उभा आहे. बाबूरावाची झालेली भीषण अखेर कुणाला माहीत नाही, पण महात्मा फुलेंची नालस्ती करणार्याचा गौरव पुरोगामी महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून रोज होतो आहे.