शनिवार दि. ७ ऑगस्टच्या दुपारपर्यंत बहुसंख्य भारतीयांना नीरज चोपडा हे नावही माहिती नव्हतं… त्या दिवशी संध्याकाळपर्यंत सगळ्या भारतवासीयांच्या तोंडावर हे एकच नाव नाचत होतं… हरयाणाच्या या २३ वर्षांच्या रूबाबदार युवकाने केलेली कामगिरीच तशी जबरदस्त होती… ऑलिम्पिक्समधल्या भालाफेक स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक खेचून आणलं होतं… स्वतंत्र भारताला अॅथलेटिक्समध्ये मिळालेलं हे पहिलं वहिलं सुवर्णपदक.
१९०० सालापासून भारताने अवघी ३५ ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. त्यातली आठ सुवर्णपदकं भारतीय हॉकी टीमने मिळवलेली आहेत आणि अवघी दोन एकेकट्या खेळाडूंनी. अभिनव बिंद्रानंतरचा नीरज हा दुसराच सुवर्णपदक विजेता आहे भारताचा…
…नीरज चोपडाने सुवर्णपदकावर नाव कोरताच महाराष्ट्रात अनेकांच्या मोबाइलमध्ये एक मेसेज झळकला… त्यात नीरज याचं ‘विशेष अभिनंदन’ करण्यात आलं होतं, कारण तो एका विशिष्ट समाजाचा आहे, असा दावा त्या मेसेजमध्ये करण्यात आला होता आणि मेसेज करणारा माणूसही अर्थातच त्याच समाजाचा होता… क्षणात नीरज चोपडाचं भारतीयत्व क्षुद्र होऊन त्याला एका समाजाच्या चौकटीमध्ये कोंडून टाकलं गेलं… यात काही गैर झालं असं ना मेसेज पाठवणार्याला वाटलं असणार, ना मेसेज वाचणार्यांना… कारण गुणवत्ता काय ती आपल्याच समाजात आहे, असा इथल्या प्रत्येक समाजाची कल्पना आहे.
त्या अनाम मेसेजकर्त्याला दोष तरी का द्यावा?
भारतीय पुरुष हॉकी संघाने इंग्लंडच्या बलाढ्य संघाला नमवलं तेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्या सामन्यात गोल करणार्या पंजाबी खेळाडूंचं विशेष अभिनंदन केलं होतं… त्यांच्या त्या ट्वीटला उत्तर देताना एका सामान्य माणसाने त्यांना आठवण करून दिली की हॉकीमध्ये गोल होतो, तेव्हा कोणीतरी प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदून गोल करणार्या खेळाडूकडे अचूक वेळेला चेंडू ढकललेला असतो, त्यानंतर तो गोल करू शकतो… हे सहकारी खेळाडू वेगवेगळ्या राज्यांचे होते आणि त्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे पंजाबचा खेळाडू गोल करू शकले, याचा कॅप्टनना विसर पडला…
…त्यांना तरी दोष का द्यायचा? हरयाणा सरकारने आता नीरज चोपडाला सहा कोटी रुपयांचा पुरस्कार आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. त्या राज्याच्या रौप्यपदक विजेत्यांना चार कोटी रुपये आणि सरकारी नोकरी मिळणार आहे. कांस्यपदक विजेत्या महिला हॉकी संघातील हरयाणाच्या नऊ खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे…
भारताने यंदाच्या ऑलिम्पिक्समध्ये आतापर्यंत फक्त सात पदकं मिळवलेली आहेत… ऑलिम्पिक्सच्या मैदानांमध्ये आपले खेळाडू भारताच्या तिरंग्याची आन, बान आणि शान राखायला, देशाचा गौरव उंचावायला उतरले होते- पदक मिळवताच कोणी मणिपुरी झाले, कोणी हरयाणवी तर कोणी पंजाबी ठरले… यांच्यात ‘भारतीय’ किती उरले?
तरीही हे खेळाडू भाग्यवानच म्हणायचे! वंदना कटारिया किती अभागी! हरिद्वारची ही जिगरबाज हॉकीपटू भारताला पदक जिंकून देण्याच्या ईर्ष्येने सरावात सहभागी झाली होती. त्या काळात तिच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा सरावाची लय बिघडू नये म्हणून ती त्यांच्या अंत्यसंस्कारांनाही गेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने भारतातर्फे ऐतिहासिक हॅटट्रिक नोंदवली. पण, भारतीय संघ उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून हरला तेव्हा तथाकथित उच्च जातीत आयता मिळालेला अपघाती जन्म यापलीकडे कसलंही भांडवल नसलेल्या काही हुच्च युवकांनी तिच्या घराभोवती चकरा मारत जातीवाचक अपशब्द वापरले आणि ज्यांची योग्यता नाही त्यांना खेळवल्यामुळेच भारत हरला, असले भयावह कृतघ्न उद्गार काढले… इंग्लंडच्या गौरवर्णवर्चस्ववादी चाहत्यांनी त्यांच्या फुटबॉल संघातल्या कृष्णवर्णीय खेळाडूंविषयी काढलेल्या गलिच्छ उद्गारांशीच या गटारोद्गारांची तुलना होऊ शकेल!
तो सामना भारताने जिंकला असता आणि वंदना कटारियाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली असती तर या तथाकथित ‘हुच्च’वर्णीयांची प्रतिक्रिया काय असली असती? तेव्हा ती कदाचित ‘भारत की बेटी’ ठरली असती, सामना हरताच तिची जात निघाली… जे जिंकले त्यांचीही जात एव्हाना काढली गेली असेलच आणि त्या त्या जाती-पोटजातीतर्फेही पाहा आमची गुणवत्ता’ असं सांगणारे फलकही झळकले असतील…
…या आठवड्यात स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत पदार्पण करणार्या आपल्या महान देशाची ही शोकांतिका आहे…
पण, तिला एक आशादायक, सोनेरी किनारही आहे…
एकीकडे खेळांसाठीचा निधी कमी करणारे सत्ताधारी ऑलिम्पिक पदकविजेत्यांचे फोटो छोटे आणि आपला फोटो मोठा झळकवणारे स्वप्रसिद्धीपर सत्कार सोहळे आयोजित करत होते; आता जिंकतो आहे तोच काय तो ‘नवा भारत’ आहे, अशा गर्वोन्नत गमजा करत होते, तेव्हा एक माणूस भुवनेश्वरमध्ये हॉकी संघांचा विजय शांतपणे साजरा करत होता… त्यांचं नाव होतं नवीन पटनायक. हे ओडिशाचे मुख्यमंत्री. सहारा कंपनीने भारतीय हॉकी संघांचं प्रायोजकत्व काढून घेतलं तेव्हा कोणताही गाजावाजा न करता आणि त्या संघात ओडिशाचे किती प्रतिनिधी आहेत, आपल्या जातीचे किती प्रतिनिधी आहेत याचा विचार न करता त्यांनी पुरुष्ा आणि महिला या दोन्ही संघांना प्रायोजकत्व देऊन दत्तक घेतलं. त्यांच्या निवासाची आणि सरावाची अत्युत्तम व्यवस्था केली. त्यांच्या खेळात नवी जान फुंकली. त्याची फळं टोकियो ऑलिम्पिक्समध्ये चाखायला मिळाली…
स्वातंत्र्याला अस्सल सुवर्णझळाळी देणारा खरा ‘नया भारत’ हा आहे, बाकी सगळ्या तोंडच्या वाफा!