अलीकडच्या काळात तुम्ही झपाटल्यासारखा पाहिलात असा एखादा सिनेमा किंवा एखादी वेबसिरीज आम्हाला रेकमेंड कराल का?
– नितीन डांगे, भुसावळ
या दिवसात पाहिलं खूप पण झपाटल्यासारखं म्हणून सांगण्यासारखं काही नाही.
तुम्ही लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आहात… यातली कोणती भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते?
– सावनी भंडारे, यवतमाळ
सगळ्यात जास्त या तिन्ही गोष्टी आवडतात म्हणून इतर अनेक गोष्टी बंद केल्या.
मोहम्मद रफी यांची ३१ जुलैला पुण्यतिथी आहे. त्यांचं तुम्हाला सर्वात जास्त आवडणारं गाणं कोणतं?
– विनय दहिवाळे, सोलापूर
शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेली सगळीच.
आमच्या इथल्या प्रश्नांना उत्तरं देताना तुम्हाला मजा येते की शाळेतल्या अवघड विषयाची प्रश्नपत्रिका आठवते?
– निर्मला गोंधळे, अक्कलकोट
शाळेतली प्रश्नपत्रिका पाठ्यपुस्तकातली होती; तिची उत्तरं तपासणार्यांना अपेक्षित असलेलीच द्यावी लागणार होती; ही प्रश्नपत्रिका आजवरच्या अनुभवाची आहे. इथे प्रश्न तुमचा असला तरी उत्तर ‘माझे’ आहे.
अपयश ही जर यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं तर हा जिना किती पायर्यांचा असावा?
– स्वप्निल थोरवे (कासारसाई, पुणे)
यश मिळेपर्यंत हा जिना किती का पायर्यांचा असेना? त्याला लिमिट नाही. जेवढ्या पायर्या जास्त तेवढा अनुभव विपुल.
चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या ताटामंदी, मोत्याचा घास तुला भरविते, या गाण्यातला ‘मोत्या’ कोण असावा?
– फणींद्र सोनार, जळगाव
हा जो कोण मोत्या आहे, त्याच्या वाटणीचं मिळतंय तोवर घ्या की जेऊन. त्यातही वर हे भरवलं जातंय. आणि नुसतं घासाचं काय घेऊन बसलात? बाकीचंही इतरांचं आहे हे तुमच्या लक्षातही आलेलं नाही. नसत्या चौकशा करत बसलात तर खालचा तो चंदनाचा पाट आणि ते सोन्या नावाच्या माणसाचं ताटही कधी जाईल ते कळायचं नाही.
माझ्या मुलाला मी किती वेळा सांगितलं की कारपेंटर म्हणजे कार पेंट करणारा; तो म्हणतो सुतारकाम करणारा… कसं सुधारणार आजच्या मुलांचं इंग्लिश?
– यशवंत पाटील, सेलू
जाऊ द्या हो! मुलं हाताबाहेर गेलीत असं समजून द्या सोडून. तो असा अज्ञानी राहिला तर काही बिघडणार नाही त्याचं पुढे.
घरजावई असलेल्या माणसाची बायको दुसर्याबरोबर पळून गेली तर तो जावई सासर्याच्या घरात राहू शकतो का?
– अशोक परशुराम परब, ठाणे
घरजावई हे दाखवण्याचं पद राहून, कामकाज म्हणून तो घरगडी असेल… तेव्हा त्याने याचा निर्णय घ्यावा.
असं होऊ नये कधीच, हीच ईश्वरचरणी प्रार्थना; पण तुम्हाला भूमिका, लेखनसंधी मिळणं बंद झालं, तर उदरनिर्वाहासाठी तुम्ही काय कराल? (अनेक लोक सवयीचा कामधंदा गमावल्याने सैरभैर झाले आहेत, त्यांना मार्गदर्शन मिळावं, म्हणून हा प्रश्न. गैरसमज नसावा.)
– आरती सुर्वे, पोलादपूर
नाट्यव्यवसायात येण्यापूर्वी मी दोन शाळांत माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. मी गणित, सायन्स, या प्रमुख विषयांबरोबर मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय शिकवत असे. मी शिकवण्या घेऊन उदरनिर्वाह करून झालेला आहे. आता या विषयांबरोबर नाट्य, सिनेमा या संबंधी असंख्य विषयांचा शिक्षक म्हणून काम करीत आलो आहे. अनेक संस्थांसाठी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून माझी नियुक्ती आहे. आजवरचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अनेक शिक्षण संस्थांमध्ये प्रमुख पदांवर नियुक्त होण्याची संधी मला कायमच आहे. संशोधनाच्या अनेक संधी सदैव समोर असतात. आणि काहीच नाही झालं तर, अगदी युद्धजन्य परिस्थितीमध्ये सीमेवर सैनिकांच्या मनोरंजनापासून ते शालेय, कॉलेजवयीन मुलांसाठी असंख्य विषयांसंबंधी शैक्षणिक उपक्रमांपासून आचार्यापर्यंत अनेक कामं मला करता येऊ शकतील. मला कोणत्याही क्षेत्राशी वावडं नाही आणि कष्ट मेहनत ही शस्त्र पारजून माझ्या भात्यात कायम तयार असतात.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरून पोहोचणार्या मल्याळी सिनेमांनी सध्या सगळ्या सिनेमाप्रेमींवर गारूड केलेलं आहे. या सिनेमांचं काय प्रमुख वैशिष्ट्य जाणवतं तुम्हाला?
– रमेश दिग्रसकर, बार्शी
विषयांचं कमालीचं वैविध्य, आणि त्या त्या विषयाला भिडण्याची बेधडक तयारी, लेखनातील नावीन्य, अप्रतिम अभिनय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या भाषेतील प्रेक्षकांना असलेलं त्यांचं प्रेम, विश्वास, पाठिंबा आणि तिकीट काढून जाण्याचं सहकार्य अशा अनेक गोष्टी सांगता येतील.