□ पंगतीतले जेवण महागणार : गॅस सिलिंडर १०२ रुपयांनी महाग
■ घरातलं स्वस्त आहे की काय!
□ सर्व फुकट दिले तर आपली अवस्था श्रीलंकेसारखी होईल! ए.सी. लोकलच्या पासाचे दर कमी करण्याच्या प्रश्नावर रेल्वे बोर्ड अध्यक्ष व्ही. के. त्रिपाठी यांचे उत्तर
■ कर्जबुडव्या उद्योगपतींना हजारो कोटींची खिरापत फोन बँकिंगने वाटताना ही अक्कल कुठे गहाण पडलेली असते?
□ `मिशन २०२४’ मध्ये भाजपला तिसरी-चौथी नव्हे तर दुसरी आघाडीच हरवू शकते! निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे मत
■ ती बनवणार कोण, अनेक मांजरांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?
□ बाबरी पाडताना मी तेथे होतो! फडणवीस यांचा दावा
■ नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला तेव्हाही ते तिथे होते म्हणतात!
□ गुजरातमध्ये भाजपला पराभूत करू- केजरीवाल
■ तिथे सगळ्यांना ढोकळा-फाफडा फ्री देताय काय!
□ महाराष्ट्राच्या विकासाची अखंड घोडदौड! राज्यपालांकडून राज्य सरकारच्या कारभाराचे कौतुक
■ एवढं कळतं तर नको तिथे टांग का अडवता!
□ युरोपीय देश महत्वाचे सहकारी-नरेंद्र मोदी
■ आता सगळ्या देशांचा आळीपाळीने दौरा होणार तर.
□ महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची दर्पोक्ती
■ देणारे तुम्ही कोण? आमचीच आहे.
□ लस घेण्याची सक्ती करता येणार नाही! सर्वोच्च न्यायालाचा महत्वपूर्ण निकाल
■ सक्तीचं लसीकरण पूर्ण झाल्यावर निकाल आला… सिनेमात गुन्हा झाल्यावर पोलीस येतात, तसा.
□ निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काढणार स्वत:चा नवा पक्ष, नव्या इनिंग्जची सुरुवात बिहारपासून
■ सल्ला देणे सोपे असते, काम करणे अवघड, हे आता त्यांना कळेल.
□ कुटुंबीयांशी बोलण्यासाठी तुरुंगातील वैâद्यांना व्हिडिओ कॉलची सुविधा देता येईल का? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश
■ कैदी असले तरी माणसंच आहेत की ती.
□ शिवसेना कार्यकर्ते बाबरी मशीद पाडण्यात सहभागी, अडवाणींच्या वक्तव्याचे सेनेकडून पुरावे
■ तेव्हा पळ काढला, आता श्रेय ओरपायला आले.
□ युक्रेनमधील संघर्षात कोणत्याही देशाचा विजय होणार नाही- मोदी
■ हेच भारतातल्या धार्मिक विद्वेषाच्या बाबतीतही म्हणता येईल ना हो मोदीजी!
□ कर्णधारपदाचा जडेजाच्या कामगिरीवर परिणाम
■ काढून घ्या झेपत नसेल तर.
□ एसी लोकलचा मासिक पास महागच; दरकपात न करण्याची रेल्वेची भूमिका
■ महाग करत नाहीत हेच नशीब म्हणायचं सध्याच्या काळात.
□ भाजपला गुजराती मिळाला नाही म्हणूनच महाराष्ट्रातील पाटलांना अध्यक्षपदी बसवले, केजरीवालांनी गुजरात दिनी भाजपला चांगलेच डिवचले
■ निवडणूक लढवा, मराठी-गुजराती काड्या कशाला घालता?
□ व्यायामाचा अतिरेक करू नका! धमेंद्रजींचा प्रेमळ सल्ला
■ नीट चवीने जेवा, खा, प्या, जीवनाचा आनंद लुटा, हेही सांगितलं नाही का त्यांनी?
□ वयाच्या १३व्या वर्षी फडणवीस अयोध्याला गेले हे गंभीर आहे! जयंत पाटील यांचा टोला
■ त्याआधी ते पानिपताची लढाई लढून, १८५७च्या उठावात सहभाग घेऊन आले होते, हे तर माहितीच नाही तुम्हाला पाटील साहेब!
□ तातडीने युद्ध थांबवा, चर्चेतून तोडगा काढा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युक्रेन व रशियाला आवाहन
■ आता थांबलंच समजा युद्ध!
□ चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ. २६ शहरांमध्ये लॉकडाऊन, २१ कोटी घरांत ७३ वर्षांत प्रथमच मे दिन साजरा झाला नाही.
■ दुसर्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वत:च पडतात लोक.
□ `हिंदीसक्तीने तेढ वाढेल’ गायक सोनू निगमचे मत
■ कोणत्याही सक्तीने दुसरं काय होतं?
□ कुणावरही विनोद करण्याची सोय नसल्याने आम्ही आमच्यावरच विनोद करुन हास्यजत्रेत विनोदाचे रंग भरतो- समीर चौघुले
■ त्यात प्रेक्षक रंगून जातात.
□ रामदेव बाबांच्या `रुची सोया’मध्ये हेराफेरी नऊ कंपन्यांना २५ लाख रुपयांचा दंड
■ हेराफेरी नसती तर नवल