यावर्षीची एक सकारात्मक बातमी म्हणजे करवंदांचं भरघोस उत्पादन आलं आहे. गेल्या वर्षीपेक्षा माझ्या तज्ज्ञ अंदाजानुसार साधारणपणे यंदा ऐंशी लाखाच्यावर अधिक फळं आली आहेत. (कुठे आलीत त्याचा अभ्यास तुम्ही करा.)
परवा आम्ही ओरोसला डोंगरावर गेलो होतो… अजून काही ठिकाणी डोंगर जिवंत आहेत. झाडाझुडुपांनी, करवंदाच्या, तोरणांच्या, भेडसं, गुंजांच्या जाळ्यांनी शोभिवंत आहेत. सध्या कुड्याची पांढरीशुभ्र फुलं उन्हात समईप्रमाणे तेवत आहेत. आता थोड्याच दिवसात नाजूक कोवळ्या हिरव्या शेंगा कानातले घातल्यासारख्या डोकावतील. किंचित कडवट तुरट या शेंगा चघळल्या तर तोंडाला चव आणतात. हल्ली बाजारात पण विकायला दिसतात. बघा एकदा भाजी करुन!
तर करवंदीच्या एकेका झुडपाला यावर्षी लाखो करवंद लगडलेली आहेत. अजून सगळी पिकली नाहीत. पण आंब्याच्या पाडाप्रमाणे पूर्ण तयार झाली आहेत. करवंदं एकाच प्रकारची नसतात. लांबट, गोल, लहान, मोठी, कधी आतून फिक्कट, कधी गडद गुलाबी असतात. मांजरीच्या पिल्लाच्या डोळ्यांप्रमाणे काही अगदी काळीभोर लुकलुकणारी असतात.
काही कानठळ्या बसवणारी आंबट काही आंबट गोड काही अगदी खडीसाखरे सारखी गोड असतात. डोंगरावर फिरत असताना वेगवेगळ्या जाळ्यांमधली ही करवंदं चव घेवून खात असताना आपलं पाखरात कधी रुपांतर होतं, तेच कळत नाही.
भेळ, पाणीपुरी इ. चटकमटक पदार्थाची (आणि कविता ऐकण्याची) रम्य वेळ संध्याकाळच! तशीच माझ्या मते करवंदं खाण्याची वेळ संध्याकाळीच! कोण कोण बारा वाजता बाजारातून करवंद आणून खातात. अपमानच हा त्यांचा!
त्यातही करवंदं खाण्याचा बेत माहेरी असला तर त्याची चव न्यारीच!
तर सकाळी दहाच्या दरम्याने पोहे किंवा घावने-चटणीचा चवदार नाश्ता पार पडलेला आहे! नंतर बाराच्या दरम्यान तिखट मिरमिरीत छोट्याशा रसाळ गर्यांचा आस्वाद बाबांच्या आग्रहाखातर नीटपणे घेतलेला आहे. दुपारी साग्रसंगीत आईच्या हातचं आमरस पुरीचं, डाळीची आमटी, भात, फणसाची भाजी आणि लसणीच्या चटणीचं जेवण अंगावर आलेलं आहे. मग दिवसा काळोख पडल्यासारखी तासाभराची गडद नीज होते. मग पाचचा चहा होतो. तो आळस बर्यापैकी धुवून काढतो. हे सगळं यथास्थित झालं की वेणीफणी पावडर कुंकू करुन करवंद खायला सगळ्यांनी मुलाबाळांसकट जंगलात जायचं. याला पाचक फिरणं म्हणतात. म्हणजे चालल्यामुळे डोंगर चढल्यामुळे अन्न पचतं. छान व्यायाम होतो. श्वास फुलतो. चुरचुरीत हवेचं सेवन होतं. आणि वर ही पचायला हलकी आंबटगोड जीभ स्वच्छ करणारी मस्त काळीभोर नक्षत्रांसारखी निर्मळ करवंदं… ही कुड्याच्या पानाच्या खोल्यात म्हणजे द्रोणात इकठ्ठी केली तर त्यांची गोडी अधिकच वाढते (इकठ्ठी म्हटलं की करवंदातून निघालेल्या पांढर्या सफेत डिंकाने चिकटलेली करवंद डोळ्यासमोर येतात.)
परवा पुण्याला गेल्ते, तिथे एका मैत्रिणीकडे गेले होते. तिला म्हटलं.. ये आता कोकणात.. भरपूर फिरुन करवंदं खावूया.
म्हणाली ‘हल्ली दोन वर्षात पुण्यात करवंदं दिसलीच नाहीत आणि कोरोनामुळे कुठे गेलोही नाही… ‘ती वांगी चिरत कुठे कीड आहे का बघत होती!
‘आणि मार्केटमधे दिसली तरी ती कधीची काढलेली… मऊ लिबलिबीत… ताजेपणा नसतोच त्यात…’ मी म्हटलं.
‘हूँ.. आणि करवंदं झाडावरुन काढण्यात किती मजा असते. इथे टोचतं तिथे लागतं. पाय निसरडीवरुन घसरतो. उंचावरचं किंवा लांबचं करवंद काढण्यासाठी धडपड.. मुलांची बडबड..! अचानक हातात करवंदांचा एक टपोरा घोस येतो… खूप मस्त वाटतं.. यंदा हिचे बारावीचे क्लास… कठीण दिसतय यंदाही,’ ती वांग्याची भाजी परतताना जरा खंतावत म्हणाली.
किती साध्या साध्या गोष्टींना संसार करताना मुरड घालावी लागते.
‘अगं, चार दिवस येवून जायचं.. तुला माहितेय का? करवंदं झाडावरुन तोडून खाल्ली तर मुलांचा अभ्यास चांगला होतो,’ मी हसत (अर्थातच) म्हटलं. मग काय शेंगदाण्याचं ओबडधोबड कूट भाजीत टाकताना ती पण हसली. हसावंच लागतंय.. काय करनार तरी काय..?
पण मी काहीच खोटं बोललं नव्हते. मुलांना असं डोंगरदर्यांमधे फिरवलं की की ती करवंदांसारखी ताजी टकटकीत होतात.तुम्ही प्रत्येक्ष अनुभव घ्या. कुड्याचं पानं किंचित कोनातून फिरवून करवंदीचाच काटा टोचून त्याचा द्रोण करण्याचा अद्भुत आनंद त्यांना द्या. लोकं महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी खायला जातात तेव्हा त्यांना प्रत्यक्ष मळ्यातून स्ट्रॉबेरी खायचा आनंद दिला जातो! पण मला वाटतं त्यात फक्त खाण्याचा आनंद मिळतो (त्यात स्ट्रॉबेरी मला का कोण जाणे कृत्रिम निर्बुद्ध फळं वाटतात). धडपडीचा, जरा टाचा उंचावून जगाकडे बघण्याचा निर्भेळ आनंद तुम्हाला मिळत नाही. करवंदं हा सगळा आनंद तुम्हाला देतात. तुम्ही खावून बघा.. आपुन खोटं नाय बोलणार.
डोंगरावर गेलं की सगळीकडे करवंदीच्या नखशिखांत मढलेल्या जाळ्या दिसतात. सोन्याच्या हारात मधेमधे रत्नं जडवावीत तशा! सगळ्या प्रकारच्या करवंदांची चव घेत आपण वर वर जात राहायचं. टॉपला गेलं की आपण चढलेला चढ बघून एक छानसं निर्मळ समाधान आपल्या द्रोणात पडतं. खाली उतरताना आवडलेल्या करवंदांची आपण पुन्हा चव घेवू शकतो.. आणि पोटात जर काही रिकाम्या जागा असतील तर नीट भरु शकतो.
अजून तरी करवंदांवर कसली फवारणी होत नाही की कसले डोस दिले जात नाहीत. ही एक समाधानकारक बाब! (उगीचच लेखाची लांबीरुंदी वाढवावी म्हणून मी करवंदाची खिरमट, करवंदांचं लोणचं, चटणी, सरबत किंवा केसात माळायला येणारी विशिष्ट प्रकारची करवंद असले तपशील दिले नाहीत हे लक्षात घ्या.)
अशा प्रकारे करवंदं साग्रसंगीत खावून झाली की हातातले करवंदांनी गच्च भरलेले द्रोण संभाळत (हे घरात राहिलेल्यांसाठी नजराणे असतात) उतारावर तोल राखत हलक्या अंगाने आणि मनाने मजेत घरी यायचं. मनातल्या मनात रात्री फक्त पेज घेण्याचा निश्चय करायचा. कारण पोट तुडुंब भरलेलं असतं. पण घरी गेल्या गेल्या जाहीर करायचा नाही!
एवढा चतुरपणा करवंदं खाल्ल्यावर येतोच आपल्या अंगात!
या जगात कधी काय घडेल सांगता येत नाही. अचानक संध्याकाळी मसालेभात आणि मठ्ठ्याचा बेत जाहीर होवू शकतो.