वक्तृत्वशास्त्र ग्रंथ छापला जात असताना प्रबोधनकारांची लोकमान्य टिळकांशी भेट झाली. या भेटीत त्यांनी ग्रंथाचं आणि प्रबोधनकारांच्या लेखनाचं कौतुक केलं. ती भेट अनेक कारणांनी अविस्मरणीय झाली.
– – –
`वक्तृत्वशास्त्र` पुस्तकाचा शेवटचा फॉर्म छापण्याआधी थोडा मजकूर कमी पडतोय, अशी तार वासुकाका जोशींनी प्रबोधनकारांना केली. आता नव्या तंत्रज्ञानामुळे कमी मजकूरही पसरून जास्त पानांत वापरता येतो. किंवा जास्तीचा मजकूर हवा असेल तर तसं मोबाइलवरून कळवता येतं. मोबाइलवरूनच नवा मजकूर पाठवता येतो. पण शंभर वर्षांपूर्वीचा काळ वेगळाच होता. प्रबोधनकारांना सकाळची पूना एक्स्प्रेस पकडून पुण्याला जावं लागलं. ते स्टेशनवरून थेट चित्रशाळा प्रेसमध्येच गेले.
प्रबोधनकार पोचले तेव्हा तिथे लोकमान्य टिळकही आले होते. वासुकाकांनी त्यांच्याशी प्रबोधनकारांचा परिचय करून दिला, `बळवंतराव, आपल्याकडे वक्तृत्वशास्त्र छापले जात आहे ना, त्याचे लेखक हे ठाकरे.` त्यावर प्रबोधनकारांनी टिळकांना नमस्कार केला. त्यापुढचा संवाद प्रबोधनकारांच्याच शब्दात वाचणं संयुक्तिक ठरेल,
`टिळक : उत्तम पुस्तक लिहिले आहे तुम्ही.
मी : आपण कधी पाहिले? पुस्तक अजून बाहेरही पडले नाही.
टिळक : अहो, पाहिल्याशिवाय का मी बोलतो? पुस्तकाच्या प्रत्येक फार्माचा प्रूफ काका आमच्याकडे दाखवायला आणतात ना. पाहतो सवडीने चाळून.
मी : आपल्यासारख्यांचा आशीर्वाद असल्यावर…
टिळक : मी देणार आहे अभिप्राय. (थोडा वेळ थांबून) आपण कोण, देशस्थ का?
मी : नव्हे, कायस्थ.
टिळक : अस्सं. तरीच. तुम्ही कायस्थ म्हणजे पूर्वापार कलमबहाद्दर. ती चमक आहे तुमच्या पुस्तकांत.`
तेव्हा स्वातंत्र्यलढ्याचं देशपातळीवर नेतृत्व करणार्या लोकमान्य टिळकांसारख्या मोठ्या नेत्याने पहिल्याच भेटीत एखाद्या तरुण लेखकाला त्याची जात विचारणं आज आपल्याला खटकतं. पण त्या काळात हे प्रकार कुणाला खटकत नसत. ते सर्रास होत होतं. आजही समोर दिसणार्या माणसाची जात आडून आडून विचारली जातेच. त्यामुळे `तुम्ही देशस्थ का?` या टिळकांच्या शंभर वर्षापूर्वीच्या प्रश्नाचा थेट अर्थ तुमची जात कोणती, असाच असणं सहाजिकच होतं. अर्थात, लोकरीत कशीही असली तरी लोकमान्यांसारख्या गीतारहस्यात लोकसंग्रहाच्या तत्वाचा सर्वाधिक आग्रह धरणार्या तत्त्वज्ञाला समोरच्या लेखकाची जात समजून घेण्यात रस असावा, याला आज किंवा केव्हाही संकुचितपणाचा म्हणावा लागेल. कोणतीही टिप्पणी न करता केवळ दोघांमध्ये झालेला संवाद नोंदवून प्रबोधनकारांनी तो अधोरेखित केला आहे.
पुढच्या काळात प्रबोधनकारांनी टीका केली की लोकमान्यांचं राजकारण हे देशहितासाठी नसून फक्त ब्राह्मणहितासाठी आहे. त्याची काही मुळं या संवादात असू शकतात. आत्मचरित्र लिहिताना म्हणजे पन्नास वर्षांनंतर उतारवयात प्रबोधनकारांना हा संवाद लक्षात होता, याचा अर्थ त्यांच्यावर या संवादाने टिळकांविषयीच्या मतावर प्रभाव टाकला असावा, असा अंदाज बांधता येतो. पण प्रबोधनकारांनी त्याआधीही टिळकांना जवळून पाहिलं होतं. वैदिक विवाहविधीच्या संपादनावर चर्चा करण्यासाठी टिळकांची गजाननराव वैद्यांसोबत मुंबईत दीर्घ चर्चा झाली होती. तेव्हा प्रबोधनकार हिंदू मिशनरी सोसायटीचे कार्यकर्ते म्हणून हजर होते. तेव्हा टिळकांची विद्वत्ता आणि विनोदबुद्धीही प्रबोधनकारांनी अनुभवली होती.
लोकमान्यांनी कौतुक केल्यामुळेच वासुकाका जोशींनी `वक्तृत्वशास्त्र` ग्रंथात छापण्यासाठी मान्यवरांचे अभिप्राय मिळवले होते. तसाच लेखी अभिप्राय टिळकांकडूनही मिळावा, असं प्रबोधनकारांना वाटत होतं. पण टिळक तेव्हा चिरोल खटल्यासाठी लंडनला जाण्याच्या गडबडीत होते. लंडनला जाण्याआधी मुंबईतल्या एलफिन्स्टन रोडवरच्या एका गिरणीच्या मैदानात त्यांचं भाषण होतं. प्रबोधनकारांना जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी त्यांचे मित्र पांडुरंग सहस्रबुद्धे यांच्याबरोबर पुस्तकाच्या दोन प्रती टिळकांसाठी पाठवल्या. त्यावर टिळकांनी निरोप दिला, `प्रती मिळाल्या. बोटीवर निवांतीने वाचून अभिप्राय कळवतो.` टिळक काही फर्डे वक्ते म्हणून प्रसिद्ध नव्हते. मात्र संवादी शैलीमुळे त्यांची भाषणं लोकांना आवडत. विद्यार्थी असताना त्यांना भाषण करायला जमत नसे. त्यांनी वक्तृत्व स्वतः मेहनतीनं कमावलं होतं. त्यामुळे त्यांना `वक्तृत्वशास्त्र` ग्रंथाचं महत्त्व स्वाभाविकपणे कळणार होतंच. प्रबोधनकारांनाही तशी खात्री असावी. टिळक लंडनला गेले. प्रबोधनकार अभिप्रायाची वाट बघत होते. `केसरी`त न. चिं. केळकरांची लंडनची पत्रं छापली जात. त्यात टिळकांच्या लंडनमधल्या कामाचा वृत्तांत असे. त्यात अभिप्राय आला नसल्याने प्रबोधनकार निराश होते.
अपेक्षित ठिकाणी अभिप्राय न मिळता वेगळ्याच ठिकाणी त्यांना हा अभिप्राय वाचता आला. ते अगदी सहज गिरगावात गेले होते. तिथे बॅकरोडवर कीर्तन विद्यापीठात गीतावाचस्पती सदाशिवशास्त्री भिडे यांना भेटायला गेले होते. ते अंध होते, पण वेदांताचे विद्वान म्हणून गाजले होते. प्रबोधनकार आल्याचं कळताच भिडेशास्त्री प्रचंड खुष झाले. म्हणाले, `अहो ठाकरे, तुमच्या वक्तृत्वशास्त्रावर लोकमान्यांच्या अभिप्राय आला आहे. पहा आमच्या कीर्तन मासिकाचा ताजा अंक.` भिडेशास्त्रींना होणारा आनंद स्वाभाविक होता, वâारण ते लोकमान्यांचे भक्तच होते. त्यांनी टिळकांचे नातू ग. वि. केतकर यांच्यासह `गीताधर्म मंडळ` या प्रसिद्ध संस्थेची स्थापना केली होती. ते त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. ती स्थापना त्यांनी २३ जुलै १९२४ला म्हणजेच टिळकांच्या जयंतीच्या दिवशी केली होती. त्यामुळे त्यांना लोकमान्यांनी दिलेल्या अभिप्रायाचं कौतुक किती असेल, हे कळू शकतं.
भिडेशास्त्रींनी टिळकांना पत्र पाठवलं होतं की त्यांना त्यांच्या कीर्तन विद्यालयासाठी वक्तृत्वावर काही इंग्रजी पुस्तकं असतील तर ती पाठवावीत. त्यावर टिळकांनी उत्तर पाठवलं, `इकडील पुस्तकांचा कीर्तनाच्या कामी तादृश काही फायदा होणार नाही. तुम्ही आपल्या रा. रा. काका जोश्यांनी छापलेले ठाकरे यांचे वक्तृत्वशास्त्र पुस्तक अभ्यासक्रमात ठेवावे.` प्रबोधनकार पुस्तकात छापण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या अभिप्रायाची वाट बघत होते. त्यात छापण्यासाठी अभिप्राय पोचू शकला नाही. टिळक त्या काळात लंडनमध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये अडकले होते. त्यांची फारच दगदग झाली होती. त्यामुळे त्यांनी अभिप्राय पाठवला नाही, तर ते समजून घ्यायला हवं. पण तो अभिप्राय किमान `केसरी`त छापून आला असता तर पुस्तक वाचकांपर्यंत पोचण्यात त्याचा फायदा झाला असता. पण प्रबोधनकारांनी कीर्तन मासिकातल्या अर्धवट अभिप्रायावर समाधान मानून घ्यावं लागलं. तरीही हे पुस्तक वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोचलं असावं. कारण याच पुस्तकाचं पुनर्लेखन करून प्रबोधनकारांनी १९७० साली `वक्तृत्व – कला आणि साधना` हे पुस्तक आणलं, त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय, `शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि कॉलेजांतील वक्तृत्वसभांनी या पुस्तकाचा टेक्स्टबुक म्हणून आस्थेने अभ्यास केला.`
प्रबोधनकारांच्या बहुतेक पुस्तकांच्या अर्पणपत्रिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याला `वक्तृत्वशास्त्रा`ची प्रस्तावनाही अपवाद नाहीच. दत्तोपंत पोतदारांनी त्यांना विचारलं, `ग्रंथार्पण कोणाला करणार केशवराव?` त्यावर प्रबोधनकार म्हणाले. `महाराष्ट्रीय बंधू भगिनींना`. या उत्तराने दत्तोपंत खूष झाले आणि त्यांनी प्रबोधनकारांच्या पाठीवर जोरात शाबासकीची थाप मारली. अर्पणपत्रिका म्हणून प्रबोधनकारांनी `महाराष्ट्रीय बंधू भगिनीं`ना उद्देशून तेरा कडव्यांची एक कविताच केली आहे. त्याची सुरवात अशी आहे,
`वक्तृत्वशास्त्र लिहिले श्रमुनी, करितो तुम्हांस अर्पण मी।
रसिकपणें गुण घ्यावा, दोषरहित हे असा न करि पण मी।।
शोधुनि मोठा राजा ग्रंथार्पण त्या करा असे तत्त्व।
आहे प्रचलित जरि ते रुचत न मातें गतानुगतिकत्व।।`
या कवितेत प्रबोधनकार लिहितात की राजांच्या गर्दीत फक्त महाराजा सयाजीराव गायकवाडच रसिक दिसतात. म्हणजे हा ग्रंथ अर्पण करता येईल असे ते एकमेव राजे आहेत. पण लेखक म्हणून प्रसिद्ध नसल्यामुळे त्यांचा दरवाजा आपल्यासाठी खुला नाही. पण लेखक म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर तरी हा दरवाजा उघडला का, याचा नव्याने शोध घ्यायला हवा. शेठ दामोदर सावळाराम यंदे यांच्यापासून जागृतिकार भगवंतराव पाळेकरांपर्यंत आणि इतिहास संशोधक वि. स. वाकसकरांपासून व्यायाममहर्षी प्रो. माणिकरावांपर्यंत बडोदा दरबारात मानाचं स्थान असलेल्या अनेक मान्यवारांशी जिव्हाळ्याचे संबंध असतानाही सयाजीरावांनी प्रबोधनकारांना सहकार्य केल्याचे दाखले मिळत नाहीत. याच कवितेत प्रबोधनकार विश्वास व्यक्त करतात की हा ग्रंथ वत्तäयांना अगम्य गुरुकिल्ली दाखवील. त्यांचा मराठी भाषेविषयीचा अभिमानही यातून दिसून येतो,
`भाषामाता माझी थोर मर्हाठी प्रसिद्ध शिवबांची।
दासांची, नाम्यांची, ज्ञानेशांची, मयूर तुकयांची।।
मी अल्पबुद्धि सेवक केली जशि साधली तशी सेवा।
सेवा प्रेमें आपण म्हणजे समजेन मान्य ती देवा।।`
आपली ही सेवा भिल्लिणीच्या उष्ट्या बोरांसारखी आहे, असंही ते सांगतात. प्रस्तावनेतही त्यांनी ही भावना व्यक्त केलीय. ते लिहितात, `वक्तृत्वासारख्या असामान्य कलेबद्दल प्रत्यक्ष शिक्षण देणारा ग्रंथ लिहिणे, त्यातील सर्व मुद्द्यांचे विवेचन स्पष्ट सिद्ध करणे आणि नॅचरल एव्होल्युशन यथाक्रम परंपरेने विषयांची मांडणी करणे, म्हणजे लहानसहान काम नव्हे. वास्तविक हा विषय आमच्यापेक्षा विद्वत्तेने व लौकिकाने श्रेष्ठ अशा एखाद्या सुप्रसिद्ध जातीवंत वत्तäयाने अधिक चटकदार किंवा मुद्देसूद लिहिला असता, हे आम्ही जाणून आहोत. परंतु काय करावे? सध्या सर्वच जाडे-जाडे विद्वान नाटके आणि कादंबर्यांचे किल्ले सर करण्यात गुंतलेले आहेत. तेव्हा विचार केला की, जसे येते तसे `वेडे वांकुडे` गावे आणि ज्या विषयाची आपल्याला विशेष आवड त्यावरच पुस्तक लिहून आपल्या भाषामातेची अल्पस्वल्प सेवा करावी.`