जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्ताने दरवर्षाप्रमाणे ‘कार्टून्स कट्टा’, महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रूपने यंदाही पुण्यात व महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांत व्यंगचित्र प्रदर्शन व कार्यशाळांचे आयोजन केले होते. व्यंगचित्रकार व्यवस्थांमधील दोषांवर व समाजातील वास्तवतेवर बोट ठेवत असतो. या दिनानिमित्त व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांनी ‘बोलक्या रेषा’तर्फे यंदाही आपल्या व्यंगचित्रांतून पर्यावरण व इतर सामाजिक समस्यांवर या प्रदर्शनात व्यंगप्रकाश टाकला.
या प्रदर्शनात एकूण ३०० व्यंगचित्रे लावण्यात आली होती. हे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालनात ५ मे ते ७ मे या कालावधीत रसिकांना विनामूल्य पाहाता आले. या प्रदर्शनाला तुफान गर्दी झाली होती. याच प्रदर्शनाच्या निमित्ताने तीनही दिवशी चित्रकार व व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके व कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. वृत्तपत्रे, मासिके व इतर ठिकाणी कार्यरत असणार्या तरुण व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन मिळावे व व्यंगचित्रकला या क्षेत्रात त्यांनी प्रगती करावी यासाठी सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य रंग, ब्रश, पेन्सिल, कागद उपलब्ध करून देण्यात आले होते. व्यंगचित्र कसे रेखाटायचे याबद्दलचे तसेच व्यंगचित्र, चित्र, अर्कचित्र या विषयांची माहिती छोट्यांना या कार्यशाळांतून देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. या सर्व कार्यशाळा विनामूल्य होत्या.