साहित्य क्षेत्रातल्या अनेक व्यक्ती त्यांचे मित्र होत्या. कवी ग्रेस, गायक पोहनकर, श्रीनिवास खळे, बाबासाहेब पुरंदरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, रतन टाटांशी त्यांचे चांगले संबंध होते. कलावंतांच्या आपल्या घरी मैफिली भरवण्याचा ‘व उतम खाना खिलविण्याचा त्यांना मोठा शौक होता.
– – –
काल परवा मोफत बिर्याणी हा किस्सा व्हायरल झाला. यावरून माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी सांगितलेला किस्सा आठवला. काही वर्ष ते नाशिकला डीआयजी म्हणून कार्यरत होते. अतिशय उमदे, उंचेपुरे ‘नॉन करप्ट’ म्हणून ख्यात होते तसेच कठोर प्रशासक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. काव्यशास्त्र विनोद व भरपूर मित्रमंडळी त्यांना खूप आवडायची. काही वर्षे ते पीटीसीत (आताची पोलीस अॅकेडमी) प्राचार्य होते. त्या काळात पीटीसीत त्यांनी हजारो झाडे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून लावून घेतली. एका मुलाने दोन झाडे लावायची. त्यानेच त्यासाठी ३ बाय ३ बाय ३ फुटाचा खड्डा खोदायचा. खड्डा खोदताना मुले घामाघूम होत, हाताला फोड येत. ते मुलांना म्हणत, बघा, हे काम किती कष्टाचे आहे, गरीब लोक उपाशीपोटी उन्हातान्हात अशी कामे करतात. त्यांच्यावर लाठी उगारताना, मारझोड करताना हे कष्ट तुम्ही लक्षात ठेवावे म्हणून तुम्हाला खड्डे खोदायला सांगितले. त्यातले पहिले दोन खड्डे थोडेफार त्यांनी खोदले. ते विद्यार्थी नंतर मोठे मोठे ऑफिसर झाले पण अॅकेडमीत गेले की आवर्जून आपण लावलेली झाडे पाहायला जातात, आठवणीने ऊर भरून येतो असे ऐकले होते.
तात्यासाहेब शिरवाडकरांचा इनामदारांवर विशेष लोभ होता. तात्यांकडे त्यांचे रोजचे येणे जाणे असे. काही मित्र व तात्यासाहेबांना घेऊन ते पावसाळ्यात यथेच्छ भटकंती करीत. तात्यासाहेबांना विविध गेस्ट हाऊसेसची खूप आवड होती. ज्ञानपीठ मिळाल्यानंतर सप्तशृंगी गडावर एका गेस्टहाऊसमध्ये तात्यासाहेबांना ज्ञानपीठ सोहळ्यात करायच्या भाषणाची लिखित प्रत आम्हाला ऐकवली होती. इनामदार खूप गप्पिष्ट होतेच, ते अनेक गमती जमती आम्हाला सांगत असत. मुंबईत असतानाचा एक किस्सा त्यांनी सांगितला. त्या साली मुंबईत विनयभंगाच्या बर्याच केसेस झालेल्या होत्या. काही केसेसमध्ये पोलिसांवरही आरोप झालेले होते. अशा वातावरणात पूर्ण गणवेशात ते एके ठिकाणी लिफ्टमध्ये शिरले. आत एक साठीच्या आजीबाई आधीच उभ्या होत्या. लिफ्ट सुरू झाली व जराशाने अचानक बंद पडली. खालच्या व वरच्या मजल्याच्या मधोमध. इनामदारांनी आवाज दिला, अरे कोई है.. अरे कोई है.. हाका मारून ते थकले. आजीबाईंना त्याची दया आली. म्हणाल्या, बाळा उगाच दमू नकोस, आता मी मदतीसाठी हाका मारते. इनामदारांना ते ऐकून घाम फुटला. म्हणाले, माझे आई, तुम्ही असे काही करू नका. मोठ्ठा गोंधळ होईल. मी बघतो काय करायचे ते!
महाराष्ट्रभरच्या थोरा मोठ्यांत त्यांचे जाणे येणे असे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंबरोबर आम्ही तीन दिवस रायगडवर होतो. अजय पोहनकर, श्रीनिवास खळे, बाबांचे सवंगडी, इनामदार आदी. बाबासाहेबांनी इंचाइंचावरच्या परिसराचा इतिहास सांगितला. येथे बाजार भरे, येथे महाराज उतरत, येथे अमुक तमुक द्रोह्याचा कडेलोट केला, वगैरे. फिरता फिरता बाबांच्या पुढे मागे आठ दहा जणांचा घोळका. इतक्यात पोहनकर यांना करंगळी लागली. बाबांनी सांगितलेल्या या पावन भूमीवर करायची कुठे? बिचारे हवालदिल झाले. मी म्हटले, ‘मागेच थांबा, आम्ही पुढे जातो आटपून घ्या’! पाच मिनिटांनी रिलॅक्स होऊन आले. विचारलं, कसं जमवलंस? तो कडेलोट कडा दिसतो ना बाबांनी दाखविलेला तेथे! ‘उगाच एखादी पावन जागा भ्रष्ट व्हायला नको ना.
दुसर्या दिवशी पहाटेच बाबांनी आम्हाला समाधीजवळच्या प्रशस्त परिसरात नेले ते व पोहनकर एका प्रसन्न जागी समोरासमोर बसले. बाबा म्हणाले, पोहनकर, होऊन जाऊ द्या. पोहनकर यांनी सकाळचा या यमन बिहागसारखा (मला फारसे ज्ञान नाही, क्षमस्व) राग तंतुवाद्यावर बोटे फिरवीत सुरेख गायला. पूर्वेला सूर्य महोदय अलगद वर येत होते… सूर समाधी भंग होऊ नये म्हणून. शे पन्नास मंडळींनी ती आगळी वेगळी मैफिल एन्जॉय केली.
कामानिमित्त एकदा इनामदारांना अहमदाबादला जावे लागले. तेथे त्यांचे एक बॅचमेट एसीपी होते. दोघांची भेटगाठ झाली गप्पा झाल्या. मित्र म्हणाला, चल हॉटेलात जाऊन चहा घेऊ. जरा मनमोकळ्या गप्पा मारू. एका गुजराती हॉटेलात गेले. फापडा, ढोकळा, गोडसर आळूवडी, छास, जिलेबीसारखा भरभक्कम नाश्ता केला. इनामदारांनी वेटरला किती पैसे झाले असे विचारले. मित्र म्हणाले, वेड्या, हा माझा एरिया, मी पैसे देणार. माझा गेस्ट आहेस ना तू? मला सगळे लोक ओळखतात. माझी काय इज्जत राहील? दोघे उठले, काउंटरजवळ गेले, एसपींनी पाकीट काढले. तेवढ्यात मागून तो वेटर पोर्या ओरडला, ‘बे फोकटीया!’ (दोन फुकटे)! त्या दोघा मित्रांत एकमेकांकडे पाहण्याची हिंमतच उरली नाही.
अरविंद इनामदार मुंबईत क्राइम कमिशनर होते. त्यांनी आर.के. लक्ष्मण यांचा किस्सा सांगितला होता. पोलीस लायब्ररीसाठी त्यांना आरकेंकडून पोलिसांचे एक चित्र हवे होते. चार दोन वेळा प्रयत्न करूनही इनामदारांना त्यांनी दाद दिली नाही. आर. के. यांनी इनामदारांबद्दल चौकशी केली तेव्हा माहितगारांनी सांगितले की इनामदार हे नॉनकरप्ट ऑफिसर आहेत. आरकेंनी त्यांना भेटायला बोलावले. जुजबी माहिती विचारून स्केच द्यायचे कबूल केले. म्हणाले, मला वेळ आहे, आताच काढून देतो. बसायला खुर्चीच नसल्याने इनामदार फुल पोलीस ड्रेसमध्ये अर्धा तास चक्क उभेच राहिले. अगदी बिनतक्रार. आरकेंची स्वतःची शिस्त होती, इनामदारसुद्धा शिस्तीचेच ऑफिसर होते. लफ्फेदार सिग्नेचर करुन त्यांनी इनामदारांना चित्र भेट दिले. ‘एक सॅल्यूट करणारा पोलीस’ त्यांनी रेखाटला होता. रिटायर झाल्यावर आर. के. पुण्यात स्थायिक झाले. इनामदार पुण्यात त्यांना भेटायला घरी गेले. नंतर दोघांचा दोस्ताना सुरू झाला.
इनामदार उच्चशिक्षित तर होतेच, पण काव्य, शास्त्र, विनोद, पॉलिटिक्स याचे गाढे अभ्यासकही होते. नाशिकला सर्व क्षेत्रातल्या मित्रांची त्यांची गोल्डन गँग होती. गायक बाळ देशपांडे, मोहन तलरेजा, मी, आर्टिस्ट तुपे, आर्किटेक्ट संजय पाटील आदी.
पहिल्यांदा ते नाशिकला पीटीसीचे प्राचार्य होते नंतर ते डीआयजी झाले. कमिशनर ऑफीस त्यावेळी (१९८६) अस्तित्वात नव्हते. चार जिल्ह्यांचा भार त्यांच्याकडेच होता. बदल्या किंवा गैर कामे करून घेणारे अनेक लोक आम्हा मित्रांभोवती गोळा होत (कमिशन देण्याच्या बोलीवर). इनामदारांपर्यंत आम्हाला पोचवा असे म्हणत. बॅगभर पैसेही दाखवत. पण तो मोह आम्ही टाळत असू. इनामदार जमदग्नी होते. लाच, वशिला, बदल्यांची कामे, चमचेगिरी त्यांना मान्य नसे. अशा एका अभ्यागताचा एक किस्सा आम्ही मित्र सांगत असू. धुळ्याचा एक व्यापारी इनामदारांच्या मित्राच्या मदतीने साहेबांपर्यंत पोहोचला. कट्टे (गावठी पिस्तुल) विकत घेतल्याचा त्याच्यावर आरोप होता आणि तो ते नाकारत होता. मित्रही त्याची भलावण करत होता. इनामदारांनी दोस्ताला बाहेर जायला सांगितले आणि म्हणाले, बोलो क्या बात है? त्याने कळवळून सांगितले की मी कट्टे विकत घेतलेले नाहीत. इनामदारांनी हवालदाराला आत बोलावले आणि कमरेचा जाडजूड पट्टा काढायला सांगितले. व्यापार्याला म्हणाले, पॅन्ट निकाल अौर वहां जाकर खडे रहो. हवालदाराने पट्टा चार-दोन वेळा हवेतच फिरवला. व्यापार्याजवळ डायपर नव्हता. कट्टाखरेदीची चालीसा त्याने घडघडा बोलून दाखवली. गुन्हेगार असो वा दोषी, त्याला क्षमा नसे.
रायगडला एसीपी असताना ए. आर. अंतुले यांच्याशी त्यांची ओळख झाली. दोघांनाही वाचनाची आवड. पुस्तकांचे देणेघेणे सुरू झाले. दोघे बरोबर फिरायला जात, भरपूर गप्पा होत. आणि अचानक अंतुले मुख्यमंत्री झाले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर सगळे शासकीय अधिकारी जमा झाले होते, त्यात इनामदारही होते. हस्तांदोलन करता करता ते इनामदारांजवळ येऊन थांबले आणि प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाले, आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते. सत्ता लगेचच डोक्यात गेली असावी. इनामदार शांतपणे म्हणाले, ‘नाही सर आपण प्रथमच भेटत आहोत.’ अंतुलेंच्या चेहर्यावर खुनशी भाव उमटले. ठिणगी पडली होती.
बरोबरचे अधिकारी म्हणाले, कशाला आगाऊपणा केलास? इनामदारांची बदली डायरेक्ट गडचिरोलीला करण्यात आली. आई आजारी असल्याने इनामदारांनी गडचिरोलीला जाण्यास नकार दिल्याने त्यांना सस्पेंड करण्यात आले. राहती क्वार्टर तात्काळ सोडण्यास सांगण्यात आले.त्यास इनामदारांनी नकार दिला. ते घरीच बसले आईची सेवा करीत. अंजलीताईना त्यांनी जवळ बोलावून म्हटलं, ‘माझ्याकडे फक्त २० हजार रुपये आहेत. त्यातच घर चालवायचे आहे. किती दिवस वा वर्ष ते ठाऊक नाही.’ नंतर संपूर्ण ज्ञानेश्वरी अर्थासह आजारी आईला त्यांनी रोज थोडी थोडी वाचून दाखविली… अंदाजे १८/१९ महिने ते घरीच होते. सिमेंट घोटाळ्यात अंतुले पायउतार झाले. काही दिवसात भरपाईसह इनामदार पुन्हा नोकरीवर रुजू झाले.
ते अत्यंत बुद्धिमान, कर्तृत्त्ववान होते, ज्ञानी होते, गुणी होते- नॉन करप्ट पण कठोर शिस्तीचे होते. झुकणारच नाही अशा वृत्तीचे होते. या स्वभावाचा त्यांना अनेकदा त्रास झाला. साहित्य क्षेत्रातल्या अनेक व्यक्ती त्यांचे मित्र होत्या. कवी ग्रेस, गायक पं. अजय पोहनकर, श्रीनिवास खळे, बाबासाहेब पुरंदरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, रतन टाटा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. आपल्या घरी कलावंतांच्या मैफिली भरवण्याचा व त्यांना उतम खाना खिलविण्याचा त्यांना मोठा शौक होता. मात्र ते स्वतः पूर्ण व्हेजिटेरियन होते, हॉट ड्रिंक्स कधी घेतले नाही.
तात्यासाहेबांबद्दल त्यांना फार प्रेम. तात्यांना आवडतील अशा छोट्या मोठ्या भेटी ते आणत. एकदा तात्यांना त्यांनी तयार करुन घेऊन चपलांचा जोड आणला.तात्या चमकले व म्हणाले, ‘इनामदार, मी इतका काही वाईट लिहित नाही.’ इनामदार हडबडले. तात्या हसले.
इनामदार त्यांच्या पायाशी बसले. तात्यांच्या एकेका पायात चप्पल सरकावत पाय माथी लावत म्हणाले, ‘देवा, या दण्डकारण्यातूनच भरताने रामरायाच्या पादुका नेल्या होत्या. त्या फक्त आज परत करतोय इतकेच. कुणाच्या डोळ्यांत पाणी आले नाही सांगता येत…