हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती व ‘कार्टूनिस्ट्स कम्बाईन’च्या सहकार्याने ५ मे रोजी मुंबईत जागतिक व्यंगचित्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने ४ व ५ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र कलादालन शिवाजी पार्क, दादर येथे व्यंगचित्रांची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रासह देशभरातून तसेच विदेशातून तब्बल सहाशे व्यंगचित्रकारांनी सहभाग नोंदवला होता.
– – –
चार मे रोजी सायंकाळी पाच वाजता या व्यंगचित्र जत्रा आणि स्पर्धेला आलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री तथा स्मारक समितीचे सचिव सुभाष देसाई, आमदार सदा सरवणकर, कार्टूनिस्ट्स कम्बाईनचे विद्यमान अध्यक्ष संजय मिस्त्री, माजी महापौर श्रद्धा जाधव, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, धनराज गरड, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
पहिल्या सत्रात तरुण व्यंगचित्रकारांच्या जाहीर मुलाखती व्यंगचित्रकार योगेंद्र भगत व संजय मिस्त्री यांनी घेतल्या. यामध्ये निलेश जाधव, ‘मार्मिक’चे मुखपृष्ठकार गौरव सर्जेराव, सिद्धांत जुमडे, विवेक प्रभूकेळुस्कर यांचा सहभाग होता. दुसर्या सत्रात चिंटूचे निर्माते ज्येष्ठ व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांची जाहीर मुलाखत संजय मिस्त्री यांनी घेतली. या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी व तपन मडकईकर यांनी केले.
पाच मे रोजी सायंकाळी पाच वाजता पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी मा. सुभाष देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक शौनक संवत्सर, द्वितीय क्रमांक विश्वास सूर्यवंशी, तृतीय क्रमांक आनंद अंकुश, उत्तेजनार्थ उमेश कवळे आणि जगदीश कुंटे यांचा समावेश होता. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.यावेळी व्यासपीठावर `मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, योगेंद्र भगत, चारुहास पंडित, माजी महापौर श्रद्धा जाधव, संजय मिस्त्री आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले.
उत्तरा मोने यांनी कार्यक्रम सुरू करताना म्हटले की, व्यंगचित्रकलेला मान्यता मिळवून देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यांनी… त्यामुळे लक्ष्मण यांचा कॉमन मॅन जसा आपल्याला परिचयाचा होता, तसाच बाळासाहेबांचा मावळा हाही तितकाच गाजला. मावळा या टोपणनावाने बाळासाहेबांनी अनेक व्यंगचित्रे त्या काळात काढली. बाळासाहेबांच्या आठवणी, त्यांचे फटकारे, स्ट्रोक्स याच्या आठवणी, ते व्यंगचित्रकार कसे झाले या आठवणी संजय मिस्त्री यांनी काल प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सांगितल्या. प्रास्ताविकात मिस्त्री यांनी व्यंगचित्र जत्रा स्पर्धेचा आणि जागतिक व्यंगचित्रकलेचा आढावा घेतला. मा. बाळासाहेबांचा त्यांना अनेक वर्षे सहवास लाभला. त्यातील निवडक आठवणी सांगून ते पुढे म्हणाले की ‘मार्मिक’चे मुखपृष्ठ आणि रविवारची जत्रा अनेक वर्षे विकास सबनीस करत होते. त्याच्या चर्चा करण्यासाठी विकास सबनीस आणि मी जात असे. कारण मीही अनेक वर्षे ‘मार्मिक’चा स्टाफ कार्टूनिस्ट म्हणून काम करत होतो. त्यावेळी बाळासाहेब आम्हाला व्यंगचित्रांच्या कल्पना सांगत. त्या कल्पना ऐकताना डोळ्यांसमोर व्यंगचित्र उभे राहात असे. बाळासाहेबांच्या कुंचल्याने राज्यात चमत्कार घडवला, शिवसेना घडवली, एवढेच नव्हे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री घडविला, असे सांगून ते म्हणाले की २०२४चे भव्य प्रदर्शन आपण दिल्लीत करू आणि त्याचे उद्घाटन तेव्हाचे पंतप्रधान उद्धवजी ठाकरे करतील. महाराष्ट्रात व्यंगचित्रकला टिकण्यासाठी, व्यंगचित्रकार घडविण्यासाठी एखादी ‘बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र अकादमी’ काढावी, अशी विनंती त्यांनी केली.
मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर म्हणाले की शिवसेना म्हटलं की धाडस… शिवसेना म्हटले की घोंघावत येणार्या लाटेला पाठ दाखवून पळणं नव्हे तर त्या लाटेवर जाऊन धडकणं, अशी जी एक जिगरबाज वृत्ती आहे… तिचं दर्शन घडवत ऐन कोरोनाच्या काळात मार्मिक पुन्हा नव्याने लोकांसमोर आणण्याची योजना प्रबोधन प्रकाशनाने आखली. हीरकमहोत्सवात मार्मिकला नव्या युगात आणावं, नव्या वाचकांशी जोडावं अशी सुभाष देसाई साहेबांची कल्पना होती. मार्मिक नव्या रूपात सादर झाल्यानंतरचा काळ कोरोनाचाच होता. त्या काळात अंक कुठे पोहोचतो, त्याचं काय होतंय याचा विचार न करता आम्ही आमचं काम करत राहिलो… आणि या वर्षात जेव्हा कोरोनाचे निर्बंघ उठले, लोकांची साप्ताहिकं बंद पडत आहेत, अशावेळी मार्मिक मात्र दणक्यात चालतोय. आम्हाला वर्गणीदार व्हायचंय असं सांगणारे फोन येत आहेत. यामुळे वर्गणीदारांची संख्या वाढते आहे ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती आणि कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या माध्यमातून यापुढे जे उपक्रम पार पडतील त्यामध्ये ‘मार्मिक’ हाही तुमच्या कुटुंबाचा एक भाग बनून कायम व्यंगचित्रकारांसोबत असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘मार्मिक’मध्ये भ्रष्ट राजकारण्यांचा बुरखा फाडला जायचा पण त्याला विनोदाची झालर असायची. एकाच कार्टूनचे उदाहरण म्हणजे बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची आठवण काढताना त्यांचे एक व्यंगचित्र प्रकर्षाने लक्षात येतं. इंदिराजींच्या राजवटीच्या काळात त्यावेळेला नऊ राज्यांमध्ये काँग्रेस विरोधी सरकारे आली होती. तेव्हा इंदिराजींचं लांब नाक दाखवून त्यावर नऊ लोकं बसलेली बाळासाहेबांनी दाखवली होती. त्याचे कॅप्शन मोठं सुंदर होतं. ‘नाकी नऊ आले’. ही ताकद होती त्यांच्या रेषांमधली… आणि त्यांच्या शब्दांमधली… तीच ताकद, तीच समयसूचकता जागृत ठेवून नवीन व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा यानंतर झाला. माजी महापौर श्रद्धा जाधव, मांडणीकार सागर जाधव, सूर्यकांत सरजोशी (आस्वाद हॉटेल) यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
यानंतर मा. सुभाष देसाई यांनी ‘व्यंगचित्र जत्रा’ हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.ते म्हणाले, इंटरनेटच्या माध्यमातून संजय मिस्त्री यांनी व्यंगचित्रे पाठवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला जगभरातून प्रतिसाद मिळाला. जगभरातून आम्हाला सहाशे व्यंगचित्रे आली. त्याच्यामध्ये साडेतीनशे व्यंगचित्रे परदेशातून आली होती. परीक्षकांनी त्यातून फक्त १५० व्यंगचित्रे निवडून प्रदर्शनात ठेवली. परीक्षकांनी त्यातून निवडक चित्रे निवडून त्यांना क्रमांक दिले. व्यंगचित्रकला कमी होत चालली ही बाळासाहेबांना खंत होती. व्यंगचित्रकार कमी दिसतात. राजकीय व्यंगचित्रकार दिसतच नाहीत. व्यंगचित्रकलेत जास्तीत जास्त तरुणांनी यायला हवं असं त्यांना वाटत होतं. आपल्या प्रदर्शनांना असाच प्रतिसाद मिळत राहिला तर अधिकाधिक व्यंगचित्रकार पुढे येतील. त्यांना प्रकाशात आणण्यासाठी लोक तयार आहेत. ‘मार्मिक’ही तयार आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकातही बाळासाहेबांची जी प्रमुख ओळख होती, व्यंगचित्रकार म्हणून, ती साजरी करणारे व्यंगचित्रांचे एक दालन असेलच, अशी खात्री देऊन ते म्हणाले की बाळासाहेबांची व्यंगचित्रकार ही खास ओळख जगभरातल्या लोकांना व्हावी अशी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचीही इच्छा आहे.