अलीकडे बरेचजण ‘मद्य’ममार्गी झालेत. पूर्वी लग्नकार्य सणसूद किंवा मोठमोठे कार्यक्रम असले तर गोडाधोडाचे जेवण असायचे. एकत्रित पंक्ती उठायच्या. गुलाब जामुन, पुरणपोळ्या वा श्रीखंड कोण जास्त खातो याच्या पैजाही लागायच्या. उघड्यावर मंडप पडलेला असे खाली जेवणावेळी उठायच्या. आता हे जेवणावळींचे बिर्हाड मोठमोठ्या हॉटेलांमध्ये शिफ्ट झाले आहे. आता पंक्तीतला ऐसपैसपणा जाऊन जाऊन लॉन्स वा महागड्या हॉटेलमध्ये उभ्या उभ्या पाच-पन्नास बेचव पदार्थांचे अग्निहोत्र सुरू झाले आहे. एखादा कोपरा सामिष भोजनासाठी व आणखी एखादा डिलिशिअस कोपरा मद्यपानासाठी राखीव असतो. येथे कोण जास्त पितो, याच्या पैजा लागत नाहीत. प्रत्येक जण विक्रमवीरच असतो.
१९७०-८०च्या काळात फारसा विदेशी दारूचा गवगवा नव्हता. गावठी आघाडीवर होती. मोरारजींचे शासन होते. त्यामुळे दारूबंदी होतीच. माझे वडील दमाने आजारी होते. सारखी धाप लागायची. औषधगोळ्या फारशा प्रभावी नव्हत्या. कुणीतरी त्यांना थोडी थोडी ब्रँडी द्यायला सांगितली. उघड उघड ती मिळायचीच नाही. बकाल झोपडपट्टीत कुठेतरी ती मिळायची. हे समजल्यावर मी शोधत शोधत गेलो. बकाल वस्तीचा मोहोल्ला, आजूबाजूला वावरणार्या वेश्या पाहून खूपच घाबरल्यासारखे झाले. अधून मधून पोलीसही दंडुका घेऊन फिरकताना दिसायचे. खाटेवर बनियन-लुंगी घातलेल्या जाडजूड दल्लूशेटला मी अडचण सांगितली. तो म्हणाला, ‘बाप जब तक जिंदा है, तब तक बिनधास्त मेरे से लेके जा. बिलकुल डरने का नहीं!’ झोपडीतल्या पोराने ब्रँडीची कॉर्टर आणून दिली. मी ब्रँडीची बाटली उराशी लपवत कशीबशी घरापर्यंत आणली. वडिलांचा दमा थोडा कमी झाला. तीन चार महिने त्यांनी रेटले. पाच सात बाटल्या मी आणल्या असतील. दल्लू दादा वडिलांची चौकशी करी. ‘बुढे के नाम पर तुम मत पिना समझा? शराब तेरे लिये अच्छी नहीं. दारू विकणार्याचे हे इथिक्स!
काही वर्षे मी एचएएल कंपनीत नोकरीस होतो. ३१ मार्च व डिसेंबरमध्ये ऑफिसर्स क्लबतर्पेâ ‘प्रॉडक्शन टार्गेट कम्प्लिशनची जंगी पार्टी असे.’ नॉनव्हेज व दारूची दोन पेग्सची कुपन्स देण्यात येत. पार्टीला न येणार्या वा दारू न पिणार्या ऑफिसरची कुपन्स त्यांचे मित्र अधाशीपणे गोळा करून घेत. मग काय यथेच्छ दारूपान, नाचगाणी, बेहोश धांगडधिंगा चाले. हेच का ते उच्चपदस्थ अॅटिट्यूड असलेले ऑफिसर्स, असा प्रश्न पडे. चिकन वाया जाईल इतकी प्लेटमध्ये घेऊन अतिरिक्त खात आणि ओव्हरडोस झाल्याने कोपर्याकोपर्याला लोळत पडत. रात्री बारा साडेबाराला कंपनीचा ट्रक येई. चार दोन शिपाई सगळ्यांना आत टाकून घरोघर पोहोचवून देत. फुकटचं मिळाल्यावर किती खायचं याचं भान नसल्याचे हे उदाहरण.
नाशिकला पेठ रस्ता हा मोठा परिसर आहे. तेथे बांधकामासाठी दगड फोडणारी मंडळी उघड्यावर राहात. तिन्ही सांजा झाल्या की ही मंडळी बायका व पुरुष धगधगत्या चुलीभोवती कोंडाळ करून ओलंसुकं खात गावठी दारू पिऊन यथेच्छ भांडत. रात्रभर कल्ला चाले. त्यातले बहुतेक सोलापूरकडचे असल्याने भाषाही कळत नसे. अतिकष्टावरचा तो रिलिफ असायचा. अजूनही असे गावोगावचे तांडे गावठी विषारी दारू पिऊन मेल्याच्या बातम्या येत असतात.
या सर्व गोष्टींचा परिपाक डोक्यामध्ये असतो आणि नकळतपणे तो व्यंगचित्रातून प्रतीत होत जातो. उदा. एक भिकारी गाणे गात गात फिरत असताना एका दारूच्या दुकानापुढे जाऊन उभा राहतो. नकळत गाणे गातो, ‘तू माझी माऊली, मी गं तुझा कान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे’! यावर हसण्याशिवाय काय कॉमेंट्स करणार? हल्ली गुंडांना तुरुंगात दारू, चमचमीत खाणे, मोबाईल गैरमार्गाने पुरवले गेल्याच्या बातम्या येतात. मी इथले हे व्यंगचित्र काढले त्या वेळेला वेगळी परिस्थिती होती. कशी ती स्वतःच पाहा. एखादा समाजसेवक मोसंबीच्या रसावर प्राणांतिक उपोषण सोडतो. अतिउत्साही कार्यकर्त्याकडून नेमकी ‘मोसंबी’ नावामुळे काही वेळेला चूक होते, ती कशी ती पाहा. एक शहाणा की वेंधळा दारुडा घरी जातो. तो स्वत: घरी आधी जातो की नंतर, हा गुदगुल्या व्हाव्यात असा विनोद.
ज्या वेळेला मी सोवळा ओवळा होतो त्यावेळेला घडलेली अतिशय सुंदर घटना दिल खेचत आहे. मधू नावाच्या माझ्या मित्राचं सासर शहापूरजवळच्या खर्डी गावात होतं. मामाच्या मुलीशीच लग्न झाल्याने तो आवडता जावई होता. मामा खर्डीतील प्रतिष्ठित मेंढपाळ होते. शे दोनशे मेंढ्या, बकरी त्यांच्याकडे होत्या. जुना चौपदरी वाडा होता, खाटकांचे दुकानही होते. एकदा सणासाठी त्यांनी मधूला बोलावले होते. मी मधूचा जवळचा मित्र. तो म्हणाला, चल येतोस? दोन दिवस जाऊन येऊ. मधूला आणण्यासाठी मामांचाच दत्तू नावाचा मुलगा टॅक्सी घेऊन आला होता. उंचपुरा गोरापान. संध्याकाळी सहा साडेसहाला आम्ही खर्डीला पोचलो. त्यावेळी खर्डी खेडेवजा होती. कच्चे रस्ते, मातीची जुनाट घरे. मामांच्या वाड्याजवळ टॅक्सी थांबली. पायरीवर उंचेपुरे, काळेशार, झुपकेदार मिशीवाले, सहा फूट उंचीचे धोतरबंडीतले मामा उभे होते. वाड्याच्या मोठ्या अंगणात पाचपन्नास मेंढ्या, बकर्या हिरवागार चारा खात मॅऽऽ मॅऽऽ चा सूर घोळवत होत्या. वाडा कौलारू आणि भिंती मातीने सारवलेल्या होत्या. मामांनी पायरीवरच मधूला कडकडून मिठी मारली. थोडा वेळ थोपटत राहिलो. हे पाहुणं कोण? माझ्याकडे पाहत त्यांनी मधूला विचारले.
ऑफिसातला माझा मित्र. फार चांगले चित्र काढतो. त्यावेळी मला फारशी प्रतिष्ठा नव्हतीच. पण मधूच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. आम्ही तिघे जण पडवीत आलो. ती थोडी अंधारलेली होती. जमिनीवर खरबरीत घोंगडी होती त्यावर बसलो. आतमध्ये छोट्या छोट्या खोल्या होत्या. एकीतून धूर येत होता. बहुधा चुलीवर मटण रटरटत होते. अधून मधून घरातल्या नऊवारीतल्या, डोईवर पदर घेतलेल्या बायका आतल्या आत हळू आवाजात बोलत होत्या. एकीने पितळी तांब्यात पाणी व दोन चार पितळी ग्लास आणून ठेवले. थोडे अंधारत चालले होते. मामांचा मुलगा आत बाहेर करत होता. बायको कोठे दिसते का म्हणून मधू अधूनमधून स्वयंपाकघराकडे चोरटेपणाने पाहात होता.
‘पाहुणं थोडी घेतील ना,’ अंधारात मामांनी मधूला हळू आवाजात विचारले. जाडगेल्या मधूने मानेनेच ‘हो’ केले. मी कावराबावरा होऊन त्या खाणाखुणा पाहात होतो. ‘ज्ञानेश हात धुऊन घे,’ असे म्हणून त्याने मला बाहेर बोलावले. दत्तू तेथे आला. मधु म्हणाला, ‘माझे मामा आता ग्लासात तुला दारू देतील. नाही म्हणायचे नाही. आम्ही दोघे तुझ्या शेजारी असू. कंदिलाच्या प्रकाशात मामांना कमी दिसतं. ते तुला ग्लास देतील. मी तुझ्या मागे असेन, तो हळूच माझ्या हातात द्यायचा. समजलं?’
‘या पाहुणं तुम्ही आमच्या मधूचे मित्र. या वयात तुम्ही पिऊ नये. पण मी माझ्या मधूचं मन मोडणार नाही. ते दोघे तर घेत नाहीतच,’ मी त्यांच्यासमोर बसलो. माझ्या मागे ते दोघे अंधारात शांत बसलेले. मामांनी स्वत:साठी व माझ्यासाठी गावठी दारूचे ग्लास भरले. एका गृहिणीने थाळीत तळलेले मटणाचे तुकडे आणून ठेवले. पिण्याचा श्रीगणेशा सुरू झाला. मधू मला मागून पाठीला ढोसत होताच. मागून हळूच त्याने पाण्याचा ग्लास माझ्या हाती देत माझा दारूचा ग्लास काढून घेतला. दारूने लवकरच ताबा घेतल्याने मामा मला आग्रह करून करून ओतत होते. अंधारात ग्लासची अदलाबदल छान चालू होती. गावठीच्या दोन तीन बाटल्या संपल्या होत्या. त्या मधू, दत्तू व मामांच्या डोळ्यात उतरल्या होत्या.
‘ह्या वयात पाव्हणा भक्कम (स्टॅमिन्याचा) दिसतो. माझ्याकडे पाहात मामा हळू आवाजात पुटपुटले. माझ्या मागच्या त्या दोन सज्जन मुलांच्या तोंडातून तर शब्दही बाहेर पडत नव्हता. पाण्याचे रिकामे ग्लास तोंडी लावून माझे पोटही अकारण तुडुंबले होते. ‘वाढायचं का’? आतून आवाज आला.
‘चालंल चालंल…’ मामा बरळले. गृहिणीने मोठा थाळा आणला. त्यात मटण व एका थाळीत चार पाच बाजरीच्या भाकरी होत्या. एका ताटातच सगळ्यांनी जेवायचं होतं. बाप-मुलगा-भाचेजावई, आहाहा! त्यांच्यासाठी तो सुवर्णक्षण होता, पण मी गडबडलो. मला ते अस्ताव्यस्त गरगटे जेवण शक्य होणार नव्हते. पण दाराआडून लक्ष ठेवणारी घरातील वयस्कर स्त्री हुशार व समजूतदार होती. तिने मला वेगळे ताट, भाकरी, कांदा आणून माझ्यापुढे ठेवला. ते तिघे खाता खाताच तेथे लवंडले. जराशाने सावरले. मामा म्हणाले, सगळ्यांनी वर माडीवर झोपायला चला. वर तीन चार खाटा तयार होत्या. गोधडी अंथरलेली व जाडसर टोचणारे जाडसर कांबळ पांघरायला. मी माझ्या खाटेवर पडलो. कांबळे पांघरणे शक्यच नव्हतं इतकं टोचणारं होतं. तसं माझंही जेवण चांगलं झालं होतं. डोळ्यांवर झोप तरंगत होती.
जराशाने मामांचा आवाज आला. ते जिना चढून वर येत होते, पोरांनो झोपले का रे? असं काहीतरी बरळत वर येत होते. दत्तू आणि मधू केव्हाच घोरायला लागले होते. झोकांडत ते वर आले. मधूच्या खाटेजवळ गेले. माझा बेटा, माझा बेटा, माझा मधू, म्हणत त्याचे मुके घ्यायला लागले. चार पाच मिनिटे तो कार्यक्रम चालू होता. मी नकळत हादरलो. झुकांडत मामा दत्तूजवळ गेले. माझा दत्ता, माझं कोकरू, माझा बाळू असं म्हणत त्याच्या गालाचे मुके घेऊ लागले. मी जाम टरकलो आणि रूतणारी घोंगडी थेट डोक्यापर्यंत घट्ट ओढून घेतली. दत्तूच्या खाटेकडून मामा माझ्याजवळ आले. पाहुणं झोपलं का ओऽऽ पाहुणं झोपलं का… ते माझी घोंगडी ओढू लागले. मी जाम टरकलो आणि रुतणारी घोंगडी थेट डोक्यापर्यंत घट्ट ओढून घेतली मी जिवाच्या आकांताने तोंडावर ती घट्ट पकडून ठेवली. त्यांनी नाद सोडला म्हणाले, पोरा, लहान वयात इतकी दारू कशाला ढोसायची? तुझ्यापायी माझा मधू बिघडायला नको म्हंजे झालं! असं म्हणत झुंकांडत ते खाली गेले. एव्हाना त्या बोचर्या घोंगडीमुळे मी आतल्या आत घामाघूम झालो होतो. माझ्या आयुष्यात येऊ पाहणारा तो पहिला मुका मी असा टाळला… हुश्श!